सर्वेक्षणातून काय दिसलं : पॉर्न बघण्याबद्दल लोकांची मतंमतांतरं

सर्वेक्षण माहितीपर लेख

सर्वेक्षणातून काय दिसलं : पॉर्न बघण्याबद्दल लोकांची मतंमतांतरं

- ३_१४ विक्षिप्त अदिती

काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ही बंदी लागू होण्याआधीच, निर्णय घेतल्यावर काही दिवसांत तो मागेही घेतला. त्या निमित्ताने पॉर्न म्हणजे नक्की काय, ते कशासाठी, ते चांगलं आहे का वाईट, याबद्दल सोशल मिडियामध्ये चर्चा झालेली दिसली. अनेक मुद्द्यांप्रमाणे या प्रश्नाबद्दलही काळं किंवा पांढरं अशीच भूमिका घेतलेली दिसली. पॉर्न विरोधकांची भूमिका साधारणतः पॉर्नमुळे वेगवेगळ्या प्रकारची आणि प्रचंड हानी होते अशी भूमिका. त्यात प्रामुख्याने मानसिक/लैंगिक आरोग्याची होणारी हानी आणि त्या जोडीला सांस्कृतिक, नैतिक आणि धार्मिक प्रकारचे आक्षेप होते. ह्या भूमिकेला विरोध करणारी, पॉर्न समर्थकांची, टोकाची भूमिका मला सहज दिसली नाही (पण त्याचं कारण फेसबुक किंवा व्हॉट्सॅप मी ज्या प्रकारे वापरते तेही असू शकतं).

शास्त्रांचा अभ्यास करताना कोणत्याही अभ्यासविषयाचा विचार काळंगोरं या पलीकडे जाऊन करावा लागतो. माणसांच्या वृत्ती-विचारांचा अभ्यास करताना त्यांचं मूल्यमापन करण्यापलीकडे जाऊन तपासणी करावी लागते. १९४८ आणि १९५३ मध्ये डॉ. आल्फ्रेड किन्झी यांनी अनुक्रमे पुरुष आणि स्त्रियांच्या लैंगिक वर्तनाबद्दल रिपोर्ट्स प्रकाशित केले. सेक्सॉलॉजी (माणसांच्या लैंगिकतेचा अभ्यास) या शास्त्रशाखेचा पद्धतशीर अभ्यास डॉ. किन्झी यांच्यामुळे सुरू झाला असं समजलं जातं. किन्झी रिपोर्ट्समुळे तत्कालीन अमेरिकेत, विशेषतः धार्मिक आणि संस्कृती-रूढी-परंपराप्रेमी लोकांमध्ये खळबळ माजली होती. त्यापुढे या क्षेत्रात मोठं नाव झालं ते डॉ. विल्यम मास्टर्स आणि त्यांची सहाय्यिका व्हर्जिनिया जॉन्सन यांचं. मास्टर्स आणि जॉन्सन यांचं वर्णन 'the people who taught America how to make love' असं केलं जातं. मास्टर्स आणि जॉन्सन या जोडगोळीने माणसांचा, स्त्री-पुरुषांचा लैंगिक प्रतिसाद कसा असतो याचा प्रयोगशाळेत शास्त्रशुद्ध अभ्यास केला. आपल्या Sex and Human Loving या पुस्तकात ते लिहितात -

Sexual topics are often controversial and value-laden, but the controversy is often relative to time, place, and circumstance. What is labeled as "moral" or "right" varies from culture to culture, from century to century. Many of the moral issues pertaining to sex relate to certain religious traditions, but religion has no monopoly on morality. People who have no closely held religious creed are just as likely to be moral as those whose values are tied to a religious position. There is no sexual value system that is right for everyone and no single moral code that is indisputably correct and universally applicable.
(तिरपा ठसा मूळ लेखकांचा.)

पॉर्न ही गोष्ट तशी थोडी मजेशीरच. एका बाजूने लैंगिकता, सेक्सॉलॉजी अशा विज्ञानाच्या शाखांशी त्याचा संबंध येतो. दुसरीकडे धर्म आणि स्त्रीवाद अशा (सामान्यतः) परस्परविरोधी विचारधारणा पॉर्नविरोधक असू शकतात. सर्व स्त्रीवादी पॉर्नविरोधक असतात असं नाही आणि सर्व पॉर्नविरोधक स्त्रीवादी असतात असंही नाही. हीच गोष्ट धार्मिक लोकांबद्दलही म्हणता येईल. तरीही अनेक धर्मांचा आणि हल्लीच्या काळात ज्यांना संस्कृतिरक्षक म्हटलं जातं त्यांचा पॉर्नकडे बघण्याचा दृष्टिकोन अनुदार आहे असं दिसतं.

सामान्य लैंगिक गरज म्हणजे बहुसंख्य लोकांच्या अपेक्षा आणि वर्तनांची सरासरी काढली की झालं, एवढा हा विषय सोपा नाही. एक गोष्ट नक्की की काही व्यक्तींची लैंगिक गरज इतरांपेक्षा बरीच वेगळी आणि/किंवा अधिक असते. त्यातही अशा गरजांबद्दल ह्या लोकांना वेगळं समजण्याची किंवा वाळीत टाकण्याची प्रथा आहे; पण या अनुदार वर्तनाची गरज नाही. दुसरं असं की लैंगिकता, लैंगिक अभिव्यक्ती या लपूनछपून करण्याच्या गोष्टी समजल्या जातात. सध्यातरी. चावट पुस्तकं वाचणारे, चावट नाटकं-सिनेमे बघणारे लोक तसं स्पष्टपणे चारचौघांत बोलत नाहीत; ते असभ्य समजलं जातं. त्यातही एखादी कलाकृती(!) एका व्यक्तीला चावट वाटेल, तर दुसरीला अश्लील वाटेल. मग नक्की कोणाचं खरं?

तर ते खरंखोटं करण्यापलीकडे, चांगलं-वाईट ठरवण्यापलीकडे काही गोष्ट असते; ते म्हणजे एकाच गोष्टीकडे बघण्याचे लोकांचे काय दृष्टिकोन आहेत, त्याचा अभ्यास. ते करण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणात केला आहे. पॉर्न बघणं चांगलं किंवा वाईट हे ठरवण्यापेक्षा किती लोकांचा पॉर्नशी एकदातरी संपर्क आलेला आहे, किती लोक नियमितपणे पॉर्न बघतात, अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न आहे. सर्वेक्षणातून मिळालेली माहिती हे समाजाचं वर्णन आहे, समाजाने कसं असावं याचं नाही. कदाचित कुठे तसा सूर लागला असेल तर त्याकडे दुर्लक्ष्य करावं ही विनंती.

सर्वेक्षणातून दिसणारी आकडेवारी ह्या लेखात मांडलेली आहे. हे आकडे ग्राह्य मानावेत का, कितपत ग्राह्य मानावेत ह्याचा मोजका विचारही लेखात आहे. ज्यांना ह्या आकड्यांमध्ये रस नाही, त्यांच्यासाठी लेखाचा सारांश -

पॉर्न ही गोष्ट टाळता येण्यासारखी नाही; पॉर्नमध्ये रस न घेणाऱ्या लोकांचाही पॉर्नशी एकदातरी संपर्क आलेला आहे. बहुतेकसे पुरुष आणि अर्ध्या स्त्रिया पॉर्न बघतात. त्यामुळे 'चांगल्या' (म्हणजे नक्की काय?) स्त्रिया लैंगिकदृष्ट्या थंड असतात, हा गैरसमज सोडून द्यायला हरकत नाही. ज्या स्त्रिया पॉर्न पाहतात, त्यांपैकी बहुसंख्यांची पॉर्न बघण्याची वारंवारता अनियमित किंवा बघत नाही, अशा प्रकारची आहे. निम्म्याधिक पुरुष आठवड्यातून एक किंवा अधिक वेळा पॉर्न बघतात; पाचांतल्या एका पुरुषाची पॉर्न बघण्याची वारंवारता अनियमित प्रकारची आहे. स्त्रिया आणि पुरुषांमध्येही पॉर्न न बघण्यामागचं मुख्य कारण त्याची आवश्यकता वाटत नाही, हे आहे. पॉर्नची किळस वाटणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण नगण्य म्हणावं इतपत कमी नाही. पॉर्न व्यवसायात पुरुषांची आर्थिक सत्ता, निर्णय मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे स्त्रियांना त्यात फार रस नाही किंवा किळस वाटते याबद्दल आश्चर्य वाटत नाही. तरीही पॉर्नवर बंदी आणावी असं म्हणणारे लोक अल्पसंख्य आहेत; वयात न आलेल्या मुलांना पॉर्न दिसू नये आणि ठरावीक वयानंतर पॉर्न बघणं कायदेशीर असण्याबद्दल बहुतेकांना काहीही आक्षेप नाही. पॉर्न बघण्याच्या सवयींमध्ये महानगरांतल्या वास्तव्यामुळे फार फरक पडतो, असं दिसत नाही.

लेखातले सगळे निष्कर्ष, आकडेवारी आंतरजालावर वावरण्यासाठी पुरेसा पैसा आणि उसंत असणाऱ्या, म्हणजे ज्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा अशा गरजा भागलेल्या आहेत अशा लोकांच्या बाबतीत आहेत. पॉर्न बघणं असा उल्लेख सरसकट केलेला असला तरीही त्यात पॉर्न वाचण्याचाही समावेश आहे. सोयीसाठी एकच उल्लेख केला आहे.

आंतरजालावर स्त्रियांचं प्रमाण बरंच कमी आहे; साधारणपणे पाच पुरुषांमागे एकच स्त्री जालावर आहे. (अवांतर गृहपाठ - जालावर पाचपैकी चार पुरुष अयशस्वी असतात का स्त्रियांची क्षमता एका पुरुषापेक्षा अधिक असते?) सर्वेक्षणातून जे लिंगगुणोत्तर मिळालं त्यानुसार ३ स्त्रियांमागे तब्बल १४ पुरुष जालावर येतात. (आईच्च्यान सांगते, हे मी बनवलेले आकडे नाहीत.)

आकडे, आलेख यांबद्दल फार प्रेम नसणाऱ्यांनी यापुढचा लेख आणि पॉर्न-ग्राफ सोडून द्यावा आणि थेट लेखाचा शेवट वाचावा. लेखात अनेक अवांतर वाक्यं आहेत. शुद्ध आकडे आणि त्यांतून निघणारे निष्कर्ष यांतच रस असणाऱ्यांनी कंसातल्या मजकुराबद्दल मला माफ करावं.

ह्या आकड्यांवर विश्वास ठेवता येईल का?

सर्वप्रथम सर्वेक्षणातून दिसणारे आकडे योग्य आहेत का नाहीत याबद्दल आणखी थोडी चर्चा करू. स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तराबद्दल थोडी चर्चा ह्या लेखात आहे. पॉर्न बघण्याच्या सवयींबद्दल लोकांनी जी उत्तरं दिलेली आहेत त्याचा त्यात फारसा ऊहापोह नाही. या सवयींबद्दल मिळालेली उत्तरं ग्राह्य आहेत का नाहीत हे खात्रीलायकरीत्या सांगण्यासाठी अशासारखंच दुसरं सर्वेक्षण करावं लागेल. तसा विदा उपलब्ध नसल्यामुळे जे आहे त्यात काय दिसतंय हे बघू. इथे दिलेल्या आकडेवारीनुसार प्रश्नांना उत्तरं देणाऱ्यांपैकी ४१% स्त्रिया पॉर्न बघतात आणि ३२% स्त्रिया रोज पॉर्न बघतात. याच्याशी आकडे किती जुळतात? ह्या सर्वेक्षणातल्या ४२% स्त्रियांनी आपण पॉर्न बघतो आणि १३% स्त्रियांनी आपण दिवसातून एक किंवा अधिक वेळा पॉर्न बघतो अशी माहिती पुरवली आहे. नील्सन सर्वेक्षणाच्या तुलनेत, नियमितपणे पॉर्न बघणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण ह्या सर्वेक्षणानुसार बरंच कमी आहे; पण पॉर्न बघणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण (धक्कादायक म्हणावं इतपत) एकसारखं आहे. तुलनेकरता अन्य काही विदा उपलब्ध नसल्यामुळे सध्या आहे ही विदा, काही त्रुटींसह, ग्राह्य आहे असं मानायला हरकत नाही.

आकडेवारीला सुरुवात करण्यापूर्वी - एकूण ५४५ लोकांनी सर्वेक्षणात भाग घेतला. भरघोस प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. या सर्वेक्षणाची जाहिरात ऐसी अक्षरे, मिसळपाव, मैत्रीण (सर्व डॉट कॉम) या मराठी संस्थळांवर केली होती. माझी फेसबुक भिंत आणि काही प्रमाणात व्हॉट्सॅप वापरूनही लोकांचा प्रतिसाद मिळवला होता. यांतले कोणते प्रतिसाद कोणी दिले हे समजण्याचा माझ्याकडे काहीही मार्ग नाही. (एकतर मला लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यात रस नाही आणि दुसरं, खाजगीपणा सांभाळल्यामुळे खोटं बोलण्यासाठी फार काही कारण राहत नाही.) या ५४५ पैकी १० प्रतिसाद विश्लेषणातून गाळलेले आहेत; उदाहरणार्थ, गेल्या सहा महिन्यांत पॉर्न बघितलेलं नाही आणि आठवड्यातून एक किंवा अधिक वेळा पॉर्न बघितलं जातं असे प्रतिसाद विश्लेषणातून गाळले आहेत.

निष्कर्ष क्र. १ - पॉर्न न बघणाऱ्यांत बऱ्याच जास्त स्त्रिया आणि कमी प्रमाणात पुरुष आहेत.

एकूण १२७ लोकांनी पॉर्न बघत नाही अशी नोंद केलेली आहे. एकूण स्त्रियांपैकी अर्ध्याधिक, ५४% स्त्रिया पॉर्न बघत नाहीत. पुरुषांपैकी १५% पॉर्न बघत नाहीत. स्त्री-पुरुष तुलनेबद्दल (ताराबाई शिंदेंनंतर) काय दिसतं -

लिंग गुणोत्तर लिंग गुणोत्तर

वरचे दोन पाय-तक्ते लिंग गुणोत्तर दाखवतात. पहिल्या आलेखात संपूर्ण सर्वेक्षणातलं लिंग गुणोत्तर आहे. त्यात स्त्रियांचं प्रमाण जवळजवळ १८% आहे. दुसऱ्या आलेखात पॉर्न न बघणाऱ्या लोकांचं लिंग गुणोत्तर आहे. दुसऱ्या आलेखात स्त्रियांचं प्रमाण दुप्पटीपेक्षा अधिक, ४२%, दिसतं.

पॉर्न न पाहणाऱ्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण खूपच जास्त आहे. आठातला एक पुरुष पॉर्न पाहत नाही, तर निम्म्याधिक स्त्रिया पॉर्न पाहत नाहीत. स्त्री-पुरुषांच्या पॉर्न बघण्याच्या सवयीतला फरक दिसण्यामागे ही काही कारणं -

१. पॉर्न पाहणं ही एका अर्थाने पॉर्न बनवण्यासारखीच पुरुषी मक्तेदारी आहे. ह्याला कदाचित self-fulfilling prophecy म्हणता येईल. इतर बहुतांश व्यवसायांप्रमाणेच पॉर्न व्यवसायही पुरुषप्रधान आहे, पॉर्न बनतं ते (हेटरोनॉर्मेटीव्ह) पुरुष प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून. स्त्रियांना पॉर्नमध्ये रस नसणं याचं अंशतः कारण स्त्रियांना जे बघायला आवडेल, ते पुरेसं बनत नाही हे असू शकतं.
२. यामागे उत्क्रांतिजन्य कारण असू शकतं. उत्क्रांतीनुसार, मनुष्यांचा (आणि सजीवांचाही) मुख्य हेतू आपली गुणसूत्रं पुढच्या पिढ्यांमध्ये पाठवून, गुणसूत्रांना 'अमरत्व' देणं हा आहे. लैंगिक पुनरुत्पादनात, आपली गुणसूत्रं पसरवण्याचे दोन प्रकार असतात. एकाला पुरुषी प्रकार म्हणू, तो म्हणजे अधिकाधिक संतती निर्माण करणे. दुसरा स्त्रैण प्रकार, कमी संतती निर्माण करून त्या सगळ्यांना जगवण्याचा अधिक प्रयत्न करणं. त्यामुळे पुरुषांची सरासरी आणि नैसर्गिक वृत्ती (strategy) अधिक लैंगिक जोडीदार मिळवणं आणि अधिक वेळा संभोग करणं ही असते. स्त्रियांची सरासरी आणि नैसर्गिक वृत्ती (strategy) मर्यादित पण स्वतःला सुयोग्य वाटेल असा लैंगिक जोडीदार मिळवून, त्यातून मर्यादित संतती उत्पन्न करून त्यांचं पोषण व्यवस्थित करणं अशी असते. त्यामुळे पुरुषांना समजा सरासरी १८ जोडीदारांशी संबंध ठेवावेत असं वाटत असेल तर स्त्रियांना सरासरी ४ जोडीदारच पुरेसे वाटतील. (हे आकडे अगदीच रँडम नाहीत; तरीही तुलना म्हणूनच बघावेत.) ह्याचा परिणाम म्हणजे स्त्रियांची संभोगेच्छा पुरुषांच्या एवढीच असेल तरीही त्यांना पॉर्नमध्ये पुरुषांपेक्षा कमी रस असू शकेल.
३. नैतिकता, संस्कृती, धर्म यांचा पगडा आणि त्यातून वाटणारी बंधनं स्त्रियांवर अधिक असतात. कालानुक्रमे ही बंधनं ढिली होत आहेत; परंतु त्याचे काही अवशेष लैंगिकता आणि पॉर्न बघण्याच्या सवयींमध्ये सापडू शकतात. हे कारण पुरेसं विश्वासार्ह वाटत नाही; ज्याचा पुढे तपशिलात ऊहापोह केला आहे.

निष्कर्ष क्र. २ - लोक पॉर्न का बघत नाहीत? - गरज वाटत नाही म्हणून.

पॉर्न न बघण्याच्या कारणांपैकी काही कारणं पर्याय म्हणून दिली गेली होती. त्याशिवाय पॉर्न न बघण्यामागे लोकांचा निराळा विचार असल्यास त्याचीही नोंद करण्याची सोय होती. त्यात केलेल्या काही नोंदींचा उल्लेख करणं योग्य वाटतं - स्त्रीदेहाचं वस्तुकरण, अवास्तव चित्रण, सहज उपलब्ध नाही, पॉर्न वाचणं अधिक रोचक-रंजक वाटतं, पॉर्न चित्रीकरणासाठी नट/नटीचं शोषण होत असेल अशी शंका वाटते म्हणून. ही पाच कारणं देणारे पाच लोक वगळता इतर कारणांबद्दल लोकांची मतं अशी आहेत -

पॉर्न न बघण्याची कारणं

वरच्या आलेखात पॉर्न न बघण्याच्या कारणांची टक्केवारी दिलेली आहे. पहिल्या दोन स्तंभांमध्ये एकूण स्त्री- किंवा पुरुष संख्येपैकी किती टक्के लोकांनी पॉर्न बघत नाही असा उल्लेख केला आहे, ती टक्केवारी आहे.

यातून काय म्हणता येईल -
१. सुमारे तीन चतुर्थांश (किंचित अधिकच) लोक पॉर्न पाहतात. एक चतुर्थांश लोक (किंचित कमी) लोक पॉर्न पाहत नाहीत.
२. पॉर्न न पाहण्याच्या कारणांत मुख्य कारण म्हणजे आवश्यकता वाटत नाही हे होतं. पॉर्न न पाहणाऱ्या स्त्रियांपैकी साठ टक्के स्त्रियांनी हे कारण दिलं. आणि पॉर्न न पाहणाऱ्या पुरुषांपैकी पंच्याहत्तर टक्के पुरुषांनी हे कारण दिलं. किळस वाटणं आणि नावड आहे ही दोन कारणंही पॉर्न न पाहणाऱ्या स्त्रियांपैकी एक तृतीयांश स्त्रियांनी दिली. पॉर्न न पाहणाऱ्या पुरुषांपैकी साधारण वीस टक्के पुरुष ह्याच कारणांसाठी पॉर्न बघत नाहीत.
३. जोडीदाराशी प्रतारणा किंवा व्यसन लागण्याची भीती ही दोन्ही कारणं फारच कमी लोकांनी दिली. एकंदरीत लोकसंख्येच्या फक्त दोन टक्के लोकांना ही भीती/काळजी वाटते.
४. थोडक्यात आवड नसणं आणि गरज नसणं ही पॉर्न न पाहण्याची कारणं आहेत. याउलट प्रतारणा किंवा व्यसनाची भीती ही त्या मानाने नगण्य कारणं आहेत. म्हणजे लोक पॉर्नकडे नैतिक, सांस्कृतिक वा धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून पाहतात असं म्हणता येईल. त्यामुळे नैतिकता, धर्म, संस्कृती यांचा पगडा निदान या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या लोकांच्या पॉर्न बघण्याच्या सवयींवर आहे (ज्या कारणाचा वर उल्लेख केला आहे) असं वाटत नाही.

निष्कर्ष क्र. ३ - नवीन तंत्रज्ञान येऊन, स्थिरावलं तरीही पुस्तक किंवा लिखित शब्दाचं महत्त्व पूर्णपणे संपलेलं नाही.

पॉर्न (अ)नियमितपणे बघणाऱ्या किंवा एकदातरी बघितलेल्या ४४८ लोकांचा स्रोत इंटरनेट आहे. इंटरनेटवरचं पॉर्न म्हणजे निरनिराळ्या संकेतस्थळांवरचे फोटो किंवा व्हिडिओ, असं मी समजत होते; एका प्रतिसादात उद्मेखून इंटरनेटवर पॉर्न वाचण्याचा उल्लेख आहे. बाकी लोकांमध्ये पाच लोकांनी व्हॉट्सअॅपचा आणि तिघांनी 'शेअरिंग' असा विेशेष उल्लेख केला आहे. कुठून पॉर्न मिळवलं जातं यात वेबसाईट्स, पुस्तकं, सीडी/डीव्हीडी असे संस्थात्मक उल्लेख आहेतच. पण स्मार्टफोनचा वापर करून पॉर्न पाहताना, ओळखीच्या वा अनोळखी व्यक्तींकडून फॉरवर्ड्स येण्याची नोंद करावीशी वाटते. 'शेअरिंग' असं लिहिणाऱ्यांनाही ओळखीतल्या लोकांकडून पॉर्न येतं असं गृहीत धरलं आहे; अनोळखी लोकांकडून व्हायरस येण्याची भीती किंवा शंका सर्वज्ञात असावी असं गृहीतक आहे. यात एक स्त्रीने मैत्रांकडून पॉर्न मिळतं असा उल्लेख केला आहे. सात पुरुष आणि एक स्त्री हे दोन्ही आकडे फारच छोटे आहेत; फार कमी लोक आपसांत या ननैतिक समजल्या जाणाऱ्या लैंगिक व्यवहारांबद्दल एकमेकांशी चर्चा आणि देवाणघेवाण करतात असं म्हणता येईल. (अवांतर माहिती - 'कपलिंग' या ब्रिटिश मालिकेत स्टीव्ह आणि जेफ हे 'पॉर्न बडीज' असण्याचा उल्लेख आहे. एक मेला तर दुसऱ्याने मृत मित्राच्या घरी जाऊन सगळं पॉर्न आपल्या ताब्यात घ्यायचं… आणि ते नष्ट करायचं नाही. मित्रमृत्यूचं दुःख असतानाही किमान त्याच्या पॉर्नचा साठा हातात पडला याने आनंदाची दुलईतरी अंगावर घेता येईल. प्रत्यक्षात इंटरनेटवर वावरणाऱ्या भारतीय समाजात हे अगदी अभावानेच आढळत आहे.)

फक्त पुस्तकी पॉर्नमध्ये रस बाळगणारी फक्त एक व्यक्ती - स्त्री आहे. मात्र इंटरनेटच्या साठ्याला पुस्तकांची जोड देणारे ४७ लोक (३ स्त्रिया, ४४ पुरुष) आहेत. या दोन्हींमध्ये भर म्हणून शिवाय सिड्या वापरणारे आणखी ९ लोक (३ स्त्रिया, ६ पुरुष) आहेत. इंटरनेटमुळे जुन्या तंत्रज्ञानापैकी सीडी हे (पुस्तकांच्या तुलनेत) आधुनिक तंत्रज्ञान मागे पडत आहे; पण पुस्तकं काही प्रमाणात आपला आब बाळगून आहेत असं म्हणता यावं. त्यातही स्त्रिया आणि पुरुषांच्या अक्षर-पुस्तकप्रेमात फार फरक नाही असं म्हणता येईल (अनुक्रमे ९% आणि ११%).

'पॉर्न ओके प्लीज' या विशेषांकातल्या एका लेखात आनंद करंदीकर म्हणतात की, चांगलं किंवा आवडेल असं पॉर्न फारच कमी मिळतं. या संदर्भात एका प्रतिसादाचा उल्लेख करावासा वाटतो - पॉर्नचा स्रोत म्हणून 'saved data' असा उल्लेख आहे. वर्तमानातली गरज भागवताना भविष्याची बेगमीही करून ठेवण्याच्या समयसूचकता आणि चातुर्याबद्दल ह्या व्यक्तीचं कौतुक वाटलं. (अवांतर - 'कोर्ट' हा चित्रपट यूट्यूबवर आल्याचं मला समजलं, तेव्हा बघायला मला वेळ नव्हता. "आहेच यूट्यूबवर तर सवडीने बघू" म्हणून मी तो बघितला नाही. ऑस्कर पुरस्कारांसाठी त्याची भारतातर्फे निवड झाल्यावर यूट्यूबवरून सिनेमा उतरवला गेला. मला अजूनही 'कोर्ट' बघायला मिळालेला नाही.)

निष्कर्ष क्र. ४ - तरुण आणि वयस्कर यांच्या पॉर्न बघण्याच्या वारंवारतेत मोठा फरक दिसत नाही.

नियमितपणे पॉर्न पाहणारे

वरच्या आलेखात महिन्यातून एक किंवा अधिक वेळा पॉर्न बघणाऱ्या लोकांची टक्केवारी, वयोगटानुसार दिलेली आहे. सर्व वयोगटांमधले ४०% किंवा अधिक पुरुष आठवड्यातून एका किंवा अधिक वेळा, नियमितपणे पॉर्न बघतात. वयोमानानुसार ह्या टक्केवारीत मोठा फरक पडतो असं दिसत नाही.

स्त्रियांमध्येही हे प्रमाण वयोमानानुसार बदलत नाही; पण हे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत फारच कमी, १५% च्या आसपास, आहे. मुळातच स्त्रियांमध्ये पॉर्न न बघण्याचं प्रमाण अर्ध्याधिक असताना नियमितपणे पॉर्न बघण्याचं प्रमाण कमी असणं अनपेक्षित नाही. मात्र स्त्रिया लैंगिकदृष्ट्या थंड असतात आणि/किंवा त्या पॉर्न बघतच नाहीत अशा गैरसमजांना यातून छेद जातो. ह्या आलेखात १८-२४ आणि ५४+ या वयोगटांमध्ये स्त्रियांची विदा मांडलेली नाही कारण त्या वयोगटांमधल्या फार कमी (अनुक्रमे ५ आणि २) स्त्रियांनी सर्वेक्षणात भाग घेतला.

साधारणतः तरुण लोक लैंगिकदृष्ट्या अधिक कार्यरत असतात त्यामुळे तरुण लोक अधिक पॉर्न बघतात असं दिसेल अशी अपेक्षा होती. स्त्रियांमध्ये हे दिसत नाहीच, पण पुरुषांमध्ये हे आकडे काहीसे उलट दिसतात. कदाचित त्याचा संबंध मोकळ्या वेळेची उपलब्धता, लैंगिकता आणि पॉर्नबद्दल वाढत्या वयानुसार संकोच कमी होणं, २५+ वयामध्ये आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत पातळीवर अधिक मोकळीक (पर्सनल स्पेस) असल्यामुळे पॉर्न बघण्याच्या अधिक संधी उपलब्ध असणं यांच्याशी असेल. दुसरं, पॉर्न बघणं हा लैंगिकतेचा एक पैलू आहे; त्यामुळे लैंगिकदृष्ट्या अधिक कार्यरत म्हणून पॉर्न अधिक बघितलं जात असेलच असा थेट संबंध लावता येणार नाही.

पुढच्या आलेखात अनियमितपणे, (सहा महिन्यांतून एकदा किंवा त्यापेक्षा अधिक अनियमितपणे) पॉर्न बघणाऱ्यांची वयानुसार विभागणी दिलेली आहे. यात स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा बरंच अधिक आहे. यांत २५-३४ या वयोगटातल्या, तरुण स्त्रिया ३५-५४ या वयोगटापेक्षा अधिक अनियमितपणे पॉर्न बघतात असं दिसतं. त्याची कारणंही कदाचित नीतिमत्ता, लैंगिकतेबद्दल असणारे संकोच, उपलब्धता, आर्थिक आणि व्यक्तिस्वातंत्र्य अशा प्रकारची किंवा लैंगिक आयुष्य समाधानाचं असल्यामुळे पॉर्नची फार आवश्यकता न वाटणं अशी असू शकतात.

नियमितपणे पॉर्न पाहणारे

निष्कर्ष क्र. ५ - पॉर्नमुळे दैनंदिन व्यवहारावर परिणाम - बहुतांशी होत नाही.

काही लोकांना पॉर्नमध्ये रस नाही, बऱ्याच लोकांना पॉर्न बघावंसं वाटतं आणि हे लोक पॉर्न कुठून मिळवतात हे बघितल्यावर मला पडलेल्या मुख्य प्रश्नाकडे मी वळले. पॉर्नविरोधकांचा सूर असतो की एकदा पॉर्न बघितलं की ते पुन्हापुन्हा बघावंसं वाटतं. त्याचं व्यसन लागतं. सुरुवात साधं पॉर्न बघण्यातून होते पण पुढे ती यत्ता पार करून लोक हिंस्र आणि अनैसर्गिक पॉर्नकडे वळतात. त्यांना प्रत्यक्ष संभोगाचा आनंद मिळेनासा होतो. यात 'साधं' किंवा हार्मलेस पॉर्न कोणतं आणि अनैसर्गिक पॉर्न कोणतं याच्या व्याख्या व्यक्तीनुसार बदलत जाणाऱ्या असतात. त्यात वस्तुनिष्ठता नसते. हिंसा ही गोष्ट व्यक्तिनिष्ठ नाही असं म्हणता येईल. पण इतर तार्किक विसंगतींबद्दल बोलण्यासाठी हा लेख नाही. दुसरं, लोक अशा प्रकारे पुढच्या यत्तेत जातात का याचाही तपास ह्या सर्वेक्षणातून घेतलेला नाही.

हिंस्र वाटणारं बीडीएसेम किंवा गुदसंभोगाचं पॉर्न बनवताना प्रत्यक्षात सहभागी व्यक्तींना किती वेदना होतात, त्या वेदना सहन करण्याची त्यांची तयारी असते का, त्यांना त्यातून प्रणयाचा आनंद मिळतो का ह्या प्रश्नांची उत्तरं या सर्वेक्षणाच्या आवाक्याबाहेरची आहेत. ('द फेमिनिस्ट पॉर्न बुक' या २०१३ सालच्या पुस्तकात पॉर्नशी संबंधित लोकांचं लेखन गोळा केलेलं आहे. त्यानुसार ह्या लोकांना आपल्या कामातून आनंद मिळतो, किमान त्रास, वेदना, दुःख होत नाही असे स्पष्ट उल्लेख आहेत.) पॉर्न बघणाऱ्या लोकांना प्रत्यक्ष संभोगातून आनंद मिळतो का, याचीही तपासणी सर्वेक्षणात केलेली नाही.

अमेरिकन मानसशास्त्रज्ञांच्या संघटनेने पॉर्नचं 'व्यसन' लागतं ही गोष्ट अमान्य केलेली आहे. व्यसन हा शब्द अमान्य म्हणून सवय म्हणू. सुलभा सुब्रमण्यम् मानसिक विकारांबाबत म्हणतात, "... (विकार जडल्याची) लक्षणं वारंवार दिसतात, दैनंदिन जीवन अडतं, कामं करताना त्रास होतो, नातेसंबंध बिघडत आहेत असं दिसत असेल तर आपला फॅमिली डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ञाकडे जाऊन विचारणं योग्य." पॉर्न बघण्यामुळे माणसांचं दैनंदिन जीवन अडतं का याचा अंदाज घेण्यासाठी काही प्रश्न विचारले होते, उदा - मागच्या वेळेस पॉर्न कधी बघितलं, किती नियमितपणे पॉर्न बघता, पॉर्नशिवाय दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो का आणि पॉर्न बघितल्याशिवाय किती काळ राहता येईल. त्याची आकडेवारी किती ते बघू.

पॉर्न न बघितल्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होतो असं म्हणणारे ५३ प्रतिसाद आहेत. यांतले ३० लोक आठवड्यातून तीनपेक्षा अधिक वेळा पॉर्न पाहतात आणि ५ व्यक्तींनी एका दिवसापेक्षा अधिक काळ पॉर्नशिवाय राहू शकत नाही असं लिहिलेलं आहे. त्यात चार पुरुष ३५-५४ या वयोगटातले आहेत. एक स्त्री ५४+ वयाची आहे. पॉर्न बघितल्याशिवाय दैनंदिन जीवन अडत असेल अशी शंका यावी असे लोक १०% पेक्षा कमी आहेत. 'सरसकट पॉर्नची सवय लागते' या आक्षेपाला दुजोरा देणारी माहिती या सर्वेक्षणातून मिळत नाही; उलट पॉर्न बघणाऱ्या, किमान एकदा बघितलेल्या ९०% पेक्षा अधिक लोकांच्या आयुष्याचा फारच लहानसा हिस्सा पॉर्नचा आहे.

निष्कर्ष क्र. ६ - लैंगिक संदर्भात विचार आणि कृती यांच्यात बराच फरक दिसतो.

सर्वेक्षणात काही प्रश्न विचारले गेले होते ते चोखंदळपणासंदर्भात होते. "याच डिझाईनमध्ये तो रंग दाखवता का?" असे प्रश्न कापडखरेदीच्या वेळेस हमखास विचारले जातात. पॉर्नसंदर्भात अशा काही अपेक्षा असतात का? मास्टर्स आणि जॉन्सन त्यांच्या 'Sex and Human Loving' ह्या पुस्तकात नोंदवतात की प्रत्यक्षात जे लैंगिक व्यवहार करण्याची इच्छा नसते, त्यांची फँटसी काहींना असू शकते. प्रत्यक्षात कोणावरही बलात्कार होऊ नये असं वाटणाऱ्या स्त्रियांनाही फक्त फँटसीमध्ये बलात्काराची इच्छा असू शकते. भिन्नलिंगी (संबंध ठेवणाऱ्या) पुरुषांना लेस्बियन संभोग बघायला आवडतो, अशा छापाचे बरेच विनोद मालिकांमधून (उदा: साईनफेल्ड, कपलिंग, इ.) केले जातात. गे पॉर्नचा ग्राहकवर्ग स्त्रियांमध्ये आहे, अशा अर्थाच्या बातम्या दिसतात. (हा एक संदर्भ.) हे झालं स्ट्रेट किंवा भिन्नलिंगी लोकांच्या बाबतीत. आंतरजालावरच्या लोकांचे व्यवहार आणि फँटसीज यात अंतर आहे हे या सर्वेक्षणातून दिसलं. 'आपण ज्या प्रकारचे लैंगिक व्यवहार करता, त्याच प्रकारचं पॉर्न बघता का' अशा प्रश्नाला लोकांनी दिलेली उत्तरं अशी -

ज्या प्रकारचे लैंगिक व्यवहार होतात फक्त त्याच प्रकारचं पॉर्न बघणारे लोक बरेच कमी आहेत - १३% स्त्रिया आणि २०.५% पुरुष.
ज्या प्रकारचे लैंगिक व्यवहार करतात ते सोडून इतर बघणारे लोक - ४९% स्त्रिया आणि ७२% पुरुष
थोडक्यात साधारण निम्म्या स्त्रिया आणि तीन चतुर्थांश पुरुषांनी फँटसी बघायला आवडते अशी नोंद केलेली आहे.

(काही लोकांनी हा प्रश्न गोंधळवणारा असल्याचं लिहिलं आहे. अपुऱ्या स्पष्टीकरणाबद्दल क्षमायाचना.) पर्यायांमध्ये दिेलेलं नसूनही सात पुरुषांनी आपण अक्षतशिस्न असल्याचं लिहिलेलं आहे; एक स्त्री आणि एका पुरुषाने ह्या प्रश्नाचा विचार न केल्याचं लिहिलेलं आहे. ह्या प्रतिसादांमधून सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या लोकांना ह्या प्रकल्पाबद्दल कुतूहल असल्याचं लक्षात येतं; त्यांच्या प्रामाणिक उत्तरांबद्दल त्यांचे आभार.

ह्या प्रश्नाच्या उत्तरातून पॉर्न निर्माण करण्याची गरज काय, ह्याचं काही प्रमाणात उत्तर मिळतं. आपल्याकडे नसलेली संपत्ती उपभोगण्याचा आनंद लोक श्रीमंतीचं ओंगळ प्रदर्शन करणाऱ्या चित्रपटांमधून भागवून घेतात. प्रत्यक्ष ज्या प्रकारच्या खेळात भाग घेणं शक्य नाही त्या क्रिकेट, फुटबॉलच्या मागे लोक मोठ्या प्रमाणात वेडे होतात, क्रिकेट वा फुटबॉलच्या विश्वचषकाच्या काळात अनेक देशांमध्ये लोकांना त्याचा ताप चढतो. लैंगिक व्यवहार ही गोष्ट उघड्यावर केली जात नाही, त्यामुळे त्याचा लोकांना 'ताप चढलेला' सहज दिसत नाही. पण मोठ्या प्रमाणात स्त्री आणि पुरुष ज्या कामक्रीडा स्वतः करत नाहीत त्या बघण्याचा आनंद मिळवतात. माणसांचं विचारविश्व हे नेहमीच अधिक व्यापक असतं. त्या मानाने कृतिविश्वात वेगवेगळ्या कारणांमुळे मर्यादा येतात. हेच वरील विदेमधून दिसून येतं. नैतिक अधःपतनाचा आरोप पॉर्नवर केला जातो; अर्ध्याधिक लोक फँटसी पॉर्न बघतात, तरीही लोकांच्या नीतिमत्तेचा परिणाम वर्तनावर झाल्याचं, आणि अर्ध्याधिक समाज नीतिमत्ताहीन झाल्याचं दिसत नाही.

निष्कर्ष क्र. ७ - पॉर्नकडून वेगळ्या अपेक्षाही आहेत.

'तुम्ही पॉर्न बघत असल्यास तुम्हांला ज्या प्रकारचं पॉर्न बघायचं असतं ते सहज उपलब्ध आहे का?' हा प्रश्न विचारण्यामागे माझा आणखी एक हेतू होता. पहिला हेतू स्पष्टच आहे; एका व्यक्तीच्या अपेक्षांपेक्षा इतर व्यक्तींच्या अपेक्षा निराळ्या असणार. पण दुसरं महत्त्वाचं कारण, मी स्वतः भिन्नलिंगी व्यक्ती आहे, समाजात आणि माध्यमांमध्येही भिन्नलिंगी लोकांची बहुसंख्या आहे. LGBTQ लोकांच्या गरजा आणखी निराळ्या असतील; त्या सहज समोर येत नाहीत. फँटसी या प्रकारांबद्दल एक (किंवा चार) माणसांच्या कल्पनाशक्तीतून जेवढी उदाहरणं देता येतील त्यापेक्षा व्यवहारात खूप जास्त रंगीत आणि वैविध्यपूर्ण चित्र असेल. या वैविध्यपूर्ण फँटसी आणि अपेक्षा पॉर्नकडून पूर्ण होतात का?

१२% स्त्रिया आणि ५% पुरुषांचं उत्तर नाही असं आहे. एरवी पॉर्न बघण्यात सर्व परींनी पुरुषांच्या मागे असलेल्या स्त्रिया अपेक्षापूर्ती होण्याबद्दल नाराजीच्या बाबतीत पुरुषांच्या पुढे आहेत. पुरुषप्रधान पॉर्न व्यवसायात स्त्रियांच्या गरजा काय आहेत आणि स्त्रीवर्गातही पैसे खर्च करू शकणारा ग्राहक आहे याचा विचार करून, त्यानुसार उत्पादनं बनवली जाणं जरा कठीणच! (अवांतर विचार - पॉर्नसाठी बेखडेल चाचणीसारखी एखादी चाचणी बनवावी का?)

तरीही निम्म्याधिक स्त्रियांनी आपल्याला हवं तसं पॉर्न उपलब्ध असल्याचीही नोंद केलेली आहे. ५६% स्त्रिया आणि (छप्परफाड) ९३% पुरुष आपल्या पसंतीचं पॉर्न उपलब्ध असल्याचं म्हणतात.

निष्कर्ष क्र. ८ - जोडीदाराने पॉर्न बघायला बहुतेकांची हरकत नाही.

लैंगिकता ही चारचौघांत चर्चा न करण्याची गोष्ट आणि त्यापुढे पॉर्न ही तर अगदीच ननैतिक गोष्ट. लग्नाच्या किंवा नात्यातल्या जोडीदारांनी पॉर्न बघण्याबद्दल १३% स्त्रिया आणि ४% पुरुषांना आक्षेप आहे. यांपैकी काही लोक काहीशा नियमितपणे (आठवड्यातून/महिन्यातून एकदा) पॉर्न बघतात. सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्यांपैकी १०% पेक्षा कमी लोकांच्या प्रतिसादांमध्ये विसंगती आढळते.

पण बहुतांश लोकांचा (७६% स्त्रिया, ८५% पुरुष) जोडीदाराने पॉर्न बघण्याबद्दल आक्षेप नाही. आपल्या सोबत जोडीदाराने पॉर्न बघावं असं म्हणणाऱ्या ६% स्त्रिया आणि १०% पुरुषही आहेत.

निष्कर्ष क्र. ९ - पॉर्न टाळता येण्यासारखं नाही.

सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या ५३५ लोकांपैकी ५२६ लोकांचा पॉर्नशी कोणत्या ना कोणत्या प्रकाराने, एकदातरी संपर्क आलेला आहे. स्त्रिया - ८४ (८७%), पुरुष - ४४२ (९८%). यांपैकी एकदा वाचून किंवा बघून सोडून देणाऱ्यांची संख्या आहे २९. स्त्रिया - २२ (२३%) आणि पुरुष - ७ (१.५%).

ह्या सर्वेक्षणाचा विचार करण्याचं प्रमुख कारण होतं केंद्र सरकारने पॉर्नबंदीचा निर्णय घेणं. हा निर्णय त्यांनी दोन दिवसांत लगेचच मागेही घेतला. १५% स्त्रिया आणि ११% पुरुषांना पॉर्नवर कायदेशीर बंदी घालावी असं वाटतं. यांच्यापैकी काही लोक नियमितपणे पॉर्न बघतात याचीही नोंद करतात. पण बहुसंख्य लोकांनी - ८०% स्त्रिया आणि ८८% पुरुषांनी - पॉर्नवर बंदी घालू नये असं स्पष्ट लिहिलेलं आहे. उरलेल्यांपैकी ५% स्त्रिया आणि १% पुरुषांनी 'पॉर्नवर बंदी घालणं शक्य नाही, असं करून काही साधणार नाही' असे उल्लेख केले आहेत.

जर पॉर्नवर बंदी नसेल तर कोणत्या वयापासून पुढे पॉर्न बघायला हरकत नाही असाही प्रश्न विचारला. त्याचे पर्याय होते - १८ वर्षं, वयात येताना (१३-१४ वर्षं) किंवा अन्य काही. यांत काही लोकांनी १५ किंवा १६ अशी उत्तरंही दिलेली आहेत. त्या १५ किंवा १६ चा समावेश 'वयात येताना' ह्या पर्यायात केलेला आहे.

वयोमर्यादा

थोडक्यात, वयात येताना किंवा आल्यावर पॉर्न बघायला हरकत नाही अशी बहुसंख्यांची - ९२% स्त्रिया, ९३% पुरुष - भावना आहे. उदारमतवादी मतांच्या बाबतीत स्त्रिया आणि पुरुषांमध्ये फारशी दरी नाही ही गोष्ट सुखावह. काही मोजक्या लोकांनी ह्या विषयावर 'मत नाही' असं लिहिलं आहे. फार माहिती, अभ्यास नसताना ठासून मतं मांडण्यासाठी आंतरजाल प्रसिद्ध असताना 'मत नाही' असं पर्याय दिलेला नसतात, आवर्जून लिहिणारे लोक असणं ही गोष्टही सुखावह. पॉर्न आणि लैंगिक शिक्षण यांची सरमिसळ होऊ नये, आणि मुलांना आवर्जून लैंगिक शिक्षण दिलं जावं अशा अर्थाचे प्रतिसाद अनेकांनी मुद्दाम लिहिलेले आहेत. ह्या सर्वेक्षणात लैंगिक शिक्षणाबद्दल प्रश्न विचारले नव्हते.

सर्वेक्षणातून काय समजलं हे सांगितल्यावर, काय समजलं नाही किंवा काय शोधलं नाही याबद्दल थोडं लिहिणं अगत्याचं आहे. प्रश्नांची उत्तरं देताना कंटाळा येऊ नये आणि स्वतःची मर्यादा म्हणून मनात असलेले अनेक प्रश्न विचारले नव्हते. उदाहरणार्थ, भिन्नलिंगी स्त्रिया गे पॉर्न बघतात का, किंवा एकेकाळी बीडीएसेम पॉर्नबद्दल आकर्षण नव्हतं, ते आता बघावंसं वाटतं का, किंवा पॉर्न बघितल्यामुळे प्रत्यक्ष माणसांशी, आपापल्या जोडीदारांशी लैंगिक संबंध ठेवण्यात अडचण वाटते का, अशा प्रकारचे प्रश्न विचारले नव्हते. पॉर्नविरोधक पॉर्न बघण्याचे जे तोटे सांगतात, त्यांपैकी व्यसन लागतं हा एकमेव मुद्दा सर्वेक्षणामध्ये काही प्रमाणात लक्षात घेतला. या उलट, पॉर्नबद्दल ननैतिक भूमिका घेणाऱ्यांना ज्या प्रकारचं कुतूहल असतं, उदाहरणार्थ, कोणत्या प्रकारचं पॉर्न सर्वाधिक लोकप्रिय असेल, तसेही प्रश्न विचारले नव्हते. कदाचित हा भविष्यातल्या एखाद्या प्रकल्पाचा भाग असेल.

सर्वेक्षणाला आलेल्या प्रतिक्रियांमध्ये लैंगिक शिक्षणाचा उल्लेख आहे. एकीकडे तज्ज्ञांना अपरिहार्य वाटणाऱ्या लैंगिक शिक्षणाबद्दल आक्षेप घेणारे लोक समाजात आहेत; दुसरीकडे पॉर्नची सहज उपलब्धता थांबवता येण्यासारखी नाही. हिंसा, पॉर्न आणि या दोन्हींचं मिश्रण असणाऱ्या गोष्टी लहान मुलांच्या नजरेस पडू नयेत आणि पॉर्न हे लैंगिक शिक्षणाचं माध्यम बनण्याजागी मुलांना योग्य वेळी योग्य ते शिक्षण मिळावं. अशासारख्या सामाजिक प्रश्नांबाबत या आणि अशासारख्या सर्वेक्षणाचा उपयोग होईलच असं नाही.

लैंगिकता, पॉर्न, लैंगिक शिक्षण, स्त्री-पुरुषांमधले नैसर्गिक आणि सामाजिक बंधनांमुळे असलेले फरक यांबद्दल बऱ्याच गोष्टी समजून घेता येण्यासारख्या आहेत. आंतरजालावर नसणारा प्रचंड मोठा वर्ग भारतीय, मराठी समाजात आहे; त्यांच्यापर्यंत मला पोहोचता येत नाही. पण निदान आंतरजाल परवडू शकणाऱ्या सुखवस्तू घरांतल्या लोकांच्या विचारांचा मागोवा घेण्याचा हा एक छोटा प्रयत्न होता.

तरीही या प्राथमिक अभ्यासातून अनेक उत्तरं हाती आली. पॉर्नकडे पाहण्याची भारतीय मानसिकता काय आहे, स्त्री-पुरुषांच्या पॉर्नविषयीच्या दृष्टीकोनामध्ये काय फरक आहे याबद्दलचं धूसरसं का होईना पण चित्र उभं राहिलं. भारतात स्त्री म्हणजे देवी, पवित्र, लैंगिक विचारांपासून दूर अशी काहीशी कृत्रिम प्रतिमा आहे. तर या सर्वेक्षणातून सुमारे निम्म्या स्त्रिया पॉर्न बघतात हे दिसलं. त्यावरून त्याही हाडामांसाच्या, लैंगिक गरजा असलेल्या व्यक्ती आहेत हे दिसून येतं. 'पॉर्नमुळे नीतिमत्ता ढासळते' किंवा 'पॉर्न न बघणारे उगाच पॉर्नचा बाऊ करतात' अशा दोन्ही प्रकारच्या गैरसमजांना या लेखातून छेद जाईल अशी आशा वाटते.

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

किचकट मांडणीने वाचतांना मेंदुवर ताण आला व निष्कर्षांच्या आसपास मतपेरणीच काँग्रेस गवत जास्तच झाल्याने अजुन चिडचिड झाली.
निष्कर्ष एकीकडे मग मास्टर्स जॉन्सन कंसातले विचार अनावश्यक फाटे मत प्रदर्शन सर्व दुसरीकडे अशी विभागणी केली असती तर बरे झाले असते.
मात्र वरील सर्व सोडुनही
सर्व्हे उत्कृष्ठ झाला चिंतनीय झाला व परीश्रम आवडले आणि हाच परीश्रमपुर्वक जमवलेला विदा जर क्रीस्टल क्लीअर मांडणीचे जन्मजात वरदान लाभलेल्या कुणा घासकडवी /कोल्हटकरांच्या इ. हातात दिला असता तर.......
यु होता तो क्या होता
असा विचारही मनाला चाटुन गेला तो गेलाच
मात्र तरीही
सर्व्हे आवडला हे ही तितकेच खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कष्ट घेऊन मांडणी केलेली आहे. सर्वांगाने विचार केलेला आहे हे लेख वाचून तत्काळ जाणवते. सुरुवातीला सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेचा पाया व्यवस्थित घातल्याने पुढे वाचण्यापूर्वी वाचकाची मनोभूमी तयार होते. काय विचारले त्याबरोबरच काय विचारले नव्हतेहेही मांडल्याने, अवास्तव अपेक्षा निर्माण झालेल्या नाहीत.

आणि पॉर्न हे लैंगिक शिक्षणाचं माध्यम बनण्याजागी मुलांना योग्य वेळी योग्य ते शिक्षण मिळावं. अशासारख्या सामाजिक प्रश्नांबाबत या आणि अशासारख्या सर्वेक्षणाचा उपयोग होईलच असं नाही.

हे रोखठोक पॉइन्ट केलेले आवडले.
फक्त आकडेवारीने चटकन काम झाले असते पण अपूर्ण. हे जे सविस्तर लिहीले आहे त्यामुळेच खरं तर लेख रोचक झालेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला, पण दोन टप्प्यात वाचावा लागला. क्लिष्ट झाला आहे.

अधिक नेमके ग्राफ्स किंवा तत्सम डोळ्यांना सोप्या फॉर्म मध्ये विदा आला असता तर अधिक वाचनीय झाला असता.

अशा लेखात नुसतेच खूप शब्द असले की मजा जाते, नंबर्स शुड स्पीक अँड लीड द आर्टिकल.

आणि हो अगदी मलाही दिसणार्‍या प्रमाणलेखनाच्या चुका आहेत. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उर्दू शायरिचा तास घेतल्याचा फिल आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

बादवे - हौशी विदा-डायवरांसाठी मूळ विदा उपलब्ध करणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ह्यातून अजूनही काही करता येईल ह्याबद्दल मला अजिबात शंका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कष्ट घेऊन मांडणी केलेली आहे. सर्वांगाने विचार केलेला आहे हे लेख वाचून तत्काळ जाणवते. सुरुवातीला सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेचा पाया व्यवस्थित घातल्याने पुढे वाचण्यापूर्वी वाचकाची मनोभूमी तयार होते. काय विचारले त्याबरोबरच काय विचारले नव्हतेहेही मांडल्याने, अवास्तव अपेक्षा निर्माण झालेल्या नाहीत.>>> +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पार्श्वभूमी तयार करण्याचं काम काहीसं पसरट झालं आणि त्यामुळे वाचताना दमछाक झाली. यासोबत सुटवंग विदाबिंदूही असते तर फार बरं झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एक अत्यंत स्तुत्य आणि यशस्वी उपक्रम. सुमारे ५५० लोकांचा विदा गोळा करणं, त्याचं विश्लेषण करणं, आणि त्यातले तर्कशुद्ध निष्कर्ष मांडणं ही सोपी गोष्ट नाही. व्यावसायिक संस्थादेखील ५०० ते १००० पेक्षा फार अधिक विदा क्वचितच गोळा करतात. तिथे एकट्याने हे सगळं करणं कौतुकास्पद आहे.

मला यातून काही मुख्य मुद्दे जाणवले ते म्हणजे असे -

१. पॉर्न बघणं ही विकृती नसून प्रकृती आहे. जवळपास दोन तृतियांश ते तीन चतुर्थांश लोक पॉर्न बघतात. न बघणारेही नैतिक युक्तिवाद न करता - मला गरज नाही, किंवा आवडत नाही असं सरळसाधं युटिलेटिरियन कारण देतात. त्या अर्थाने बहुतांश लोकांचा पॉर्नकडे पाहाण्याचा दृष्टिकोन गंडविरहित आहे.
२. पुरुष जास्त प्रमाणात पाहातात आणि स्त्रिया कमी प्रमाणात पाहातात. हे आपल्याला साधारणपणे अंदाजाने सांगता येत असलं तरीही स्त्रियांमध्ये पाहाण्याचं प्रमाण सुमारे पन्नास टक्के आहे हे या सर्वेक्षणामुळेच कळलं.
३. पॉर्न पाहाणारांपैकी व्यसन लागणारांचं प्रमाण अगदी कमी आहे. गेली दहाएक वर्षं मुक्त उपलब्धता असल्यामुळे जर 'पॉर्न पाहाणं - गरज तीव्र होत राहाणं - विकृतीकडे वळणं - व्यसनात रूपांतर होणं - जीवनाचा सत्यानाश होणं' ही आजगावकरांनी मांडलेली साखळी खरी असती तर कितीतरी जास्त लोकांना व्यसन लागलेलं दिसलं असतं. सुदैवाने हा घसरता निसरडा उतार नसून चढण्याच्या पायऱ्या आहेत. आणि बहुतांश लोक अलिकडच्या पायऱ्यांवर थांबलेले दिसतात. अनेक लोक पहिली पायरी चढून पाहून प्रवास सोडूनही देतात.

या तीन महत्त्वाच्या गोष्टी कळल्याने पॉर्नचा समाजावर होणारा परिणाम किती गंभीर आहे, किंवा खरा तर तो तितका गंभीर नाही हे कळतं. माझ्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा विदाबिंदू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा सारांशच अधिक नेटका आहे. हाच लेखात चढवायला हवा Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!