बचपन के दिन भुला न देना

बचपन के दिन भुला न देना आज हसे कल रूला न देना -------------------------

एक सामान्य लेख बालपणाच्या आठवणीवर लिहित आहे.

बालपणीच्या आठवणी हा निश्चितच प्रत्येकासाठी एक अनमोल ठेवा असतो. मग मी त्याला अपवाद कसा?

आज नोकरी , ऑडीट ,मिटींग अप्रैजल अशा रुक्ष गोष्टीनी आपल जग व्यापून गेले असताना या आठवणी निश्चितच आपल्याला एक सुखद गारवा देउन जातात.

प्राथमिक शाळेत असतानाचे वय म्हणजे , आई बाबांच्या लाडात तसेच तितक्याशा महत्त्वाच्या नसलेल्या शाळेत (त्या काळी ८० च्या दशकात) बागडण्याचे दिवस. (हल्ली मुल ३ वर्षाचे झाल्याबद्दल शाळेबद्दल बाऊ करण्यास सुरुवात होते.) तर या कालखंडात आम्ही खुप धमाल केली. माझे गाव मिरज तेथे भारत भूषण विद्यालय नावाच्या एका छोट्या मराठी माध्यमाच्या शाळेत जिथे एका वर्गात एका लांबुडक्या लाकडी पाटावर आम्ही शाळेचा आस्वाद घेत असू . या शाळेतही खूप मजा होती. जितकी छोटी शाळा तितकेच छोटे शाळेचे मैदान. पण आम्ही पुरेपूर या मैदानाचा खेळण्यासाठी वापर करायचो.
पु ल देशपांडे यांनी चितळे मास्तरांच्या लेखात लिहिल्याप्रमाणे त्याकाळीही (१९८०) आमच्या शाळेत माझ्यासकट बरीच मुलेमुली अनवाणी शाळेला येत असत. (आज आमच्या कन्यारत्नाला ५ वी पासून शाळेत दोन बुटाचे सेट आहेत. (कालाय तस्मै नम:) ) चप्पल बूट त्याकाळी चैनीची वस्तू होती.

इयत्ता चौथी पर्यंत या शाळेत मी होतो. शाळेतल्या अप्रतिम आठवणॆंपैकि एक म्हणजे दसऱ्याला होणारे पाटीपूजन. यादिवशी भल्या सकाळी आम्ही पाटीवर सरस्वतीचे
पारंपारिक चित्र काढून शाळेत जात असू. मग सुंदर फुले वाहुन पाटीची पूजा व स्तोत्रपठण होऊन घरी येउन सुट्टी साजरी करत असु. इतके पवित्र वाटायचे की विचारू नका.

दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात फराळाची तयारी आई करीत असताना हळूच फराळ नैवेद्य दाखवायच्या आधीच तोंडात टाकणे व आईचा ओरडा खाणे हे नेहमीचेच! दिवाळीचा पहिला दिवस सकाळी उठून अभ्यंगस्नान नंतर देवदर्शन हे नेहमि प्रमाणेच पण तो दिवस संपल्यावर आता हाच दिवस परत येण्यासाठी ३६५ दिवस वाट पाहावी लागणार हे मनात आल्यावर मन हळवे व्हायचे!

पापड तयार होत असताना पापडाचे ओले पीठ खाणे नेहमीचेच!

गणेशोत्सवात गणपती बघायला सांगलीला जाणे आणि भल्या मोठ्या रांगेत रात्रभर उभे राहून सर्व सजावटी पाहणे आम्ही कधीही चुकवले नाही. लतादिदिंच्या पवित्र आवाजातील सुखकर्ता दुखहर्ता ही आरती
गणेशोत्सवात ऐकताना जणू आपण देवांच्या राज्यात आहोत असे वाटायचे ! अजूनही वाटतेच!

आईबरोबर चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाला मी केवळ भिजवलेले हरभरे आणि डाळीची कोशिंबीर गट्ट्म करण्यासाठी सगळीकडे जात असे. तेथे कित्येक वेळा मुली मला अगोब अगोब (ऑल गर्ल्स वन बॉय ) म्हणून चिडवत असत
पण मी दुर्लक्ष करत असे.

आमची दरवर्षी एक सहल जात असे सहल म्हणजे , मिरजे तून सांगली या ८ किमी वरच्या शहरात गणपतीचे दर्शन आणि बागेत फेरफटका. या छोट्याशा सहलीचेही आम्हाला खूप अप्रूप असे. तुडुंब भरलेल्या सिटी बसमध्ये सीट शिवाय फ्लोअर वर बसून आम्ही सहलीला जायचो

शाळेला जाताना रडणारा मी नॉर्मल मुलगा होतो. आणि काही ठराविक बाई (टीचर) खूपच खडूस आहेत असा माझा पक्का समाज होता. तेव्हा त्या बाइंना आज खोकला ताप यावा व त्या गैरहजर राहाव्यात असे मला रोज वाटे. इतकेच नव्हे तर असे होण्यासाठी मी बाप्पाला साकडे घालत असे. एक दोनदा हा योगायोग खरा ठरला.

शाळेत जितकी मजा तितकीच शाळेहुन आल्यावर मित्रांबरोबर खेळताना धमाल. त्याकाळचे अनेक सुंदर खेळ आता कालबाह्य होउ लागले आहेत. त्यांची जागा अनारोग्यदायी टीव्ही व मोबाईलने घेतली आहे.

रुमाल पाणी , चोर पोलीस , लपंडाव ह्या नेहमीच्या खेळांबरोबरच तेव्हा आम्ही “अडमिट किडा” हा खेळ
खेळत असु.

या खेळात नेहेमीप्रमाणे एकावर राज्य असायचे आणि बाकी सर्व म्हणायचे “अडमिट किडा किसका घर ?” मग राजा एक रंग सांगणार उदा … “हिरवा” मग हिरव्या रंगाच्या कुठल्याही वस्तूला सर्वांनी हात लावायचा. कुणीही हात लावायच्या आत त्याला जर राजाने शिवले तर तो आउट आणि मग त्याच्यावर राज्य! असा हा खेळ !

त्याचप्रमाणे लगोरी , चिंचोके आणि गोट्या हे खेळ तर होतेच.

बऱ्याच खेळात आणि इतर गोष्टीत “उल्लू बनाविंग “ हा प्रकार असायचा.

एक उदाहरण म्हणजे विलायती चिंचेची बी सोलणे आणि ती विकून पैसे मिळवणे हा प्रकार .
ही काळी बी असते आणि ती सोलल्यास वरचे काळे आवरण निघून आत तपकिरी आवरण दिसते. पण सोलताना नखाचा थोडा जास्त दाब पडल्यास ते तपकिरी आवरण मोडून आतले पांढरे आवरण दिसू लागे. तर हे पांढरे आवरण न लागू देता पूर्ण बी सोलून तपकिरी आवरणाची बी एका ठिकाणी दहा पैशाला एक याप्रमाणे विकत घेतली जाते असे आम्हाला सांगायचे. मग काय आम्ही तन मन लावून बी सोलायचो पण पांढरे आवरण लागायचे आणि बी बाद! नंतर आम्हाला मात्र अशी कोणतीही बी खरेदी केली जात नाही हे कळले आणि हा “उल्लू बनाविंग “ चा प्रकार असलेचे समजले.

हेच “उल्लू बनाविंग “ मी मग इतरांना चोर पोलिस खेळात करत असे, चोर बनल्यावर हळुच दुपारच्या वेळी घरी जाउन दोन तास निवांत झोप काढत असे आणि पोलीस आमच्या मागावर भर उन्हात गावभर! नंतर कंटाळून खेळ बंद. एकदाही हि माझी लपण्याची जागा मी पोलिसांना कळू दिली नाही!
एखादा राजा राज्य करतो म्हणजे त्याच्याकडे किती ऐश्वर्य असते त्याचे पण खेळात राज्य कोणालाही का नको असते हे
प्रश्न तेव्हा मला वारंवार पडायचे!

त्याकाळचे छंद तर औरच! काडेपेटीचे छाप साठवणे हा छंद आम्हाला लागला होता त्यासाठी गावभरचे कोपरे आम्ही धुंधाळत असू!

याशिवाय गावभर पळत स्वत:ची एस टी बनवायची आणि ड्रायवर कंडक्टर ची भूमिका करायची हा वेडेपणा! टिंगणिंग टिंगणिंग ………. भृं भृं भुर्र भुर्र sssssssssss पांव पांव पांव पांव असे म्हणत मुठी वळवत गावभर पळायचे ! चला मिरज सांगली सातारा……... लगेज जादा भाडे नाही वगेरे ओरडत! देहभान विसरून आम्ही हा खेळ खेळायचो . आजू बाजूचे हसत असतील याची काहीही पर्वा न करता!

एकदोन प्रसंग सांगतो .

तेव्हा आमच्या घराजवळ खरे वाचन मंदीर म्हणून एक वाचनालय होते आणि ते विस्तारित करण्यासाठी बांधकाम चालू होते. तेथे पेवासारखे १० फूट खोलीचे खड्डे खणले होते. हे बांधकाम बघायला जाणे हा आमचा नित्याचा उद्योग . मग एकदा तिथे खेळता खेळता मी त्या खड्यात धाडकन पडलो. मला तर एका अतिशय खोल खाणीत पड्ल्याचा भास झाला आणि वाचवा वाचवा म्हणून जोराने ओरडू लागलो. दुपारची वेळ असलेने बघ्यांची ही गर्दी जमली. मग एका गवंड्याने मला उचलून बाहेर काढले. हा प्रसंग सर्वांना सांगुन कित्येक दिवस माझ्यावर विनोद चालायचे !

दुसऱ्या एका प्रसंगाने तर मला कोणाच्याही शारीरिक व्यंगावरून त्याची चेष्टा करू नये हा धडा दिला.

तो असा :

आमच्या शेजारच्या गल्लीत एक गलेलठ्ठ काका राहायचे ते नेहमी आमच्या घराबाहेरून चालत जायचे. आमच्या वाड्यातील आमचा कंपु त्यावेळी खिडकीत उभे राहून ते समोर येताच खाली वाकुन “ढोल मामा आला ढोल मामा आला” असे ओरडत असे. हे बरेच दिवस चालले होते. त्या काकांनी आम्हा सर्वांना पाहून ठेवले असावे. मग एकदा अचानक बाहेर खेळताना पाठीमागून कुणीतरी माझी कॉलर पकडली. मागे पाहतो तर ते काका. इतरांनी केव्हाच घरी पोबारा केला होता आणि मी त्यांच्या तावडीत सापडलो. मग काय रे पोऱ्या मोठया माणसांची थट्टा करतोस? करशील आजपासून ? म्हणून दोन थोबाडीत माझ्या गालाखाली दिल्या. कानाबजुला सुई …… आवाज.,मी नाही नाही म्हणत गयावया करू लागलो तेव्हा मला पुढे ढकलून ते काका निघून गेले. त्या दिवसापासून हे ढोल मामा प्रकरण बंद झाले ते कायमचे,

असे अनेक प्रसंग घडले . आठवतात तेवढेच लिहिले आहे.

तर असे होते माझे बालपण. इतरांसारखेच पण त्याच्या आठवणीने किती सकारात्मकतेने भरून जाते जीवन! कधी कधी तर जीवनाची ही फीत परत उलटी फिरावी व संथपणे परत हे सर्व प्रसंग घडावेत असे वाटते! खरच शक्य आहे का हे artificial intelliigence ने?

पुढील भागात माध्यमिक शाळेतील बालपणाबद्दल! आणखी मिश्कील आठवणीनबद्दल !

अर्थात त्यावेळी आम्हाला वाटायचे की मोठ्या माणसांना काय अभ्यास परीक्षा या कटकटी नाहीत. फक्त पैसा मिळवणे आणि मजा करणे!

आपण ज्या परिस्थितीत जगात असतो त्यात समाधानी नसतो हेच खरे!

(क्रमशः)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

प्रत्येकाला बालपणात घेउन जाणारा लेख. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

लेख आवडला.
___
आम्ही टिपी टिपी टिप टॉप - व्हॉट कलर डु यु वॉन्ट या नावाने तो खेळ खेळायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0