माझी बोली भाषा

मिसळपाव वर बोली भाषेत भाषेत साहित्य पाठविण्याचा संदेश मिळाल्यावर विचारात पडलो माझी बोली भाषा कुठली. घरात हि हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा बोलली जाते. एकांतात विचार सुद्धा कधी हिंदीत तर कधी मराठीत करतो. शालेय शिक्षण हिंदीत आणि पुस्तके वाचून शिकलेली मराठी. या दोन्ही निश्चित माझ्या बोली भाषा नाही. कारण मला हिंदीतली कुठली हि बोली भाषा अवगत नाही. मराठीतील बोली भाषेचा प्रश्नच येत नाही.

आमचे आजोबा दिल्लीत स्थायिक झाले होते. वडिलांचे शिक्षण हि दिल्लीतलेच. आमच्या वडिलांची भाषा म्हणजे उर्दू, हिंदी, मराठीचे मिश्रण. जुन्या दिल्लीत ज्या वाड्यात आम्ही भाड्यावर राहायचो तिथे पंजाबी, गुजराती, बंगाली, हिंदी भाषी आणि मराठी भाषी असे ८-९ भाडेकरू होते. शेजार बनिया आणि मुसलमान. आमचे घरमालक कडक शिस्तीचे होते. वाड्यात राहणाऱ्या कुणा मुलाच्या तोंडून ‘साला’ शब्द जरी बाहेर पडला तर श्रीमुखात फडकावयाला कमी करत नसे. संध्याकाळी वडील घरी आल्यावर तोंड-हात धुवायचे आणि नंतर आई देवासमोर दिवा लावायची. रामरक्षा आणि शुभंकरोती म्हणायचो. (आंम्हाला तीच मराठी वाटायची, नंतर कळले रामरक्षा आणि स्त्रोते इत्यादी संस्कृत भाषेत असतात).

जुन्या दिल्लीत मराठी परिवार हि होते. रविवारच्या दिवशी सर्व मराठी मुले, महाराष्ट्र समाजात खेळायला जमत असू. आपसांत बोलताना सुरुवात मराठीतून व्हायची आणि नंतर केंव्हा हिंदीत बोलू लागू कळत नसे. कुणी मोठ्यानी टोकले ‘जरा मराठीच बोला’ तेंव्हा लक्ष्यात यायचे. अश्यारितीने अधकचरी मराठी बोलायला शिकलो. माझ्या बोली भाषेवर - उर्दूची अदब आणि तहजीब, शुद्ध हिंदी (शालेय शिक्षक) आणि घरची मराठी या सर्वांचा परिणाम झाला. वर्ष-दोन वर्षांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही नागपूरला जायचो. तिथे गेल्यावर वाटायचे इथली मुले किती असभ्य. यानां बोलण्याची तमीज सुद्धा नाही. मोठ्याशी हि अरे-तुरे करतात. तिथे आमची, “काका आपल्या साठी पाणी आणू का?(चाचाजी आपके लिये पानी लाऊं क्या).” काका वैतागून म्हणायचा हे काय आप, आपण लावून ठेवले आहे, अरे मला तू म्हणत जा. पण मला, आपल्यापेक्षा मोठ्यांना तर सोडा, लहान मुलांना हि, ‘तू’ म्हणणे आजगयात जमले नाही.

आई भंडार्याची होती. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यात एक दोन वेळा आजोळी गेलो होतो. तेही ८-१० वर्षाचा होतो तेंव्हा. एवढे आठवते, आम्हा भावंडांचे बोलणे ऐकून, तुम्ही मुसलमान आहात का? अशी विचारणा केल्या गेली. नंतर एकदा लहान मामाच्या मुलीच्या लग्नात गेलो होतो. नुसती मुंडी हलविण्याचे काम केले, कारण लोक काय बोलत आहे काहीच कळत नव्हते. असो.

पुन्हा प्रश्न आलाच, माझी बोली भाषा कुठली. मला आठवले, एकदा माझ्या भावाला एक शेजारच्या मुलाने शिवी दिली, दगड हातात उचलीत तो म्हणाला, “मनोजजी, इज्जत से बात कीजिएगा, आइन्दा बत्तमीजी की तो हमसे बुरा कोई नहीं होगा, हमारा निशाना सटीक है, तुम्हारा डोक फोड़ दूंगा. समझे.” बहुधा हीच माझी बोली भाषा. कारण भांडताना आपण आपली खरी भाषा लोकांसमोर उघडी करतो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

ऋंनी एका धाग्यावर म्हटले आहे तसेच म्हणते - आपल्या भाषेचा लहजा वाचायला फार मजा येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0