फुसके बार – १० फेब्रुवारी २०१६ - सियाचेनचा चमत्कार, भुजबळ व त्यांचे गुरू आणि झैदींचे पुस्तक

फुसके बार – १० फेब्रुवारी २०१६ - सियाचेनचा चमत्कार, भुजबळ व त्यांचे गुरू आणि झैदींचे पुस्तक

१) अनेकदा गाण्याच्या शब्दांपेक्षा चालीकडेच अधिक लक्ष जाते. ‘रंगीला रे’ या गाण्याबाबतीतही माझे तसेच झाले. विशेषत: ‘दिया तो झुमे है, रोये है बाती’ या ओळीच्याबाबतीत. एरवी निस्वार्थपणे जळण्याबद्दलच बोलले जाते.
‘आग मै पिऊं रे जैसे हो पानी’ अशा अनेक ओळी या गाण्यात आहेत. शब्दांची कंजुषी नाही किंवा निर्मात्याने पैसे कमी दिल्यामुळे म्हणा किंवा इतर कारणामुळे तेच कडवे पुन्हापुन्हा म्हणण्याचाही प्रकार नाही. अशी गाणी क्वचित पहायला मिळतात.
नीरज यांचे शब्द.

२) भ्रष्टाचारशिरोमणी छगन भुजबळ हे अमेरिकेतून परत आले. अशा हलकट व्यक्तीच्या स्वागतासाठी विमानतळावर जमलेले लोक पाहिल्यावर खरोखर कलियुगात आहोत हे लक्षात येते.

तरी एक बरे, आयबीएन लोकमतवर सांगत आहेत की ते काही कोणता पराक्रम गाजवून आलेले नाहीत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, याच्याशी त्यांच्या समर्थकांना घेणेदेणे नाही.

छगन भुजबळ पळून गेलेले आहेत असा दावा कोणीही केलेला नव्हता. तरीही आजच्या पत्रकारपरिषदेमध्ये त्यांनी सुरूवातीला यावर काही वेळ घालवला. आम्ही चौकशीमध्ये सहकार्य करत आहोत, पण अटक करणे आम्हाला मान्य नाही असे त्यांचे म्हणणे होते.

माझ्यामागे पवारसाहेबांचा आशीर्वाद आहे हे ते अभिमानाने सांगत आहेत. याबाबतीतले त्यांच्या गुरूचे कर्तृत्वही सर्वांना माहित आहे. गुरू काही महाराष्ट्र सदन वगैरे किरकोळ गोष्टींमध्ये अडकणारे नाहीत. स्वत: भुजबळ तेलगी प्रकरणातूनही त्यांच्यामुळेच सुटले, एवढेच नाही तर तेलगीने त्यांचे नाव येऊनही स्वत: पवारसाहेबही त्यातून सुटले हे आपल्याला माहित नाही का? तेथे साहेब स्वत: गुंतलेले असल्याने त्यांना वाचवायचे तर त्यांचे कोणी बगलबच्चे अडकून चालणारच नव्हते. येथे मात्र साहेबांचा थेट संबंध नसल्याने यांना त्यांचा केवळ मॉरल सपोर्ट असल्याचे दिसत आहे.

एरवीही सगळे करूनसरूनही साहेब कोठे अडकत नाहीत असे जे सांगितले जाते कारण ते खूप हुशार आहेत असे जे सांगितले जाते ते तितकेसे खरे नाही हे लक्षात घ्यायला हवे. एक तर तेलगी प्रकरणात त्यांचा सहभाग स्पष्ट झाला होता. त्यानंतर राजकारण व नोकरशाहीच्या गुन्हेगारीकरणासंबंधीच्या वर्मा कमिटीच्या अहवालातही त्यांचे नाव आहे असे निश्चितपणे सांगितले जाते. त्यामुळे साहेब कोठे अडकत नाहीत असे कोणी म्हणाले तर ही दोन तरी ठळक उदाहरणे द्यावीत.

३) परवा विद्यार्थ्यांच्या चर्चेत एकाच्या बोलण्यात डेव्हिड हेडली हा कोणी तरी भारतप्रेमी आहे म्हणून तो भारताला मदत करत आहे असे ऐकले. त्याच्या मित्राने लगेच ‘असे तसे नाही, तोही टेररिस्टच आहे’ असे सांगितले. ‘टेररिस्ट असेल, तर मग तो असे का सांगत आहे?’ या त्याच्या प्रश्नावर मात्र या मित्राकडे उत्तर नव्हते. नववी-दहावीतील असावेत. असा विषय त्यांच्या बोलण्यात आला हेच विशेष वाटले.

हुसेन झैदी या पत्रकारांच्या पुस्तकामध्ये हेडलीच्या एका बायकोने तो किती भारतद्वेष्टा आहे याबद्दल सांगितल्याचा उल्लेख आहे. त्याला चिडण्यासाठी भारतीय हिंदूच लागत असे नाही तर भारतीय मुस्लिमही चालत. तिच्या मते तो पाकिस्तानात असताना आर्मीच्या शाळेत असल्यामुळे तेथे पढवल्या जात असलेल्या भारतविरोध या एककलमी कार्यक्रमामुळे त्याच्या मनात एवढी चीड निर्माण झाली असावी. पुढे त्याचे खरे स्वरूप लक्षात आल्यावर ती वेगळी झाली.

त्याने भट यांच्या राहूलला ‘त्या’ ठराविक काळात दक्षिण मुंबईत जाऊ नकोस असे सांगितले होते असाही उल्लेख आहे. याच्या पासपोर्टवर वडलांच्या नावाचा उल्लेख नाही हेदेखील आपल्याकडील इमिग्रेशन ऑफिसरच्या लक्षात आले नाही. त्याच्यासमवेत बुरखा घातलेली त्याची (दुसरी) मोरक्कन पत्नी असूनही याच्या मुस्लिम असण्याची शंका त्याकाळात त्याच्याशी संपर्कात असलेल्या कोणाला आली नाही. कारण याच्या एकूण दिसण्यामुळे सगळे त्याला ‘गोरा’ अमेरिकीच समजत होते.

सेनाभवनाची माहिती काढण्याच्या हेतुने त्याने एका शिवसैनिकाशी संपर्क साधला तर आपल्याशी कोणीतरी परदेशी व तोही गोरा माणूस संपर्क साधतो आहे हे पाहून तो माणूस इतका हुरळून गेला की त्याने मागितलेली माहिती भडाभडा सांगून टाकली. इतकेच नव्हे, त्याच्या स्वत:साठी अमेरिकेत काही नोकरीची संधी शोधता येईल काय याचीही विचारणा केली. हे भारतीय लोक अमेरिकेला जाता येण्याची नुसती शक्यता वाटली तरी कसे वागतात यावरून त्याला फार आश्चर्य वाटले.

तेव्हा हेडली जे आता सांगतो आहे ते सारे झैदी यांच्या पुस्तकात आहे. त्याचे मराठी भाषांतरही उपलब्ध आहे. ते पुस्तक जरूर वाचा.

काल टीव्हीवरील चर्चेत उज्जवल निकम त्यांची सध्या चालू असलेल्या साक्षीबाबतची त्यांची पुढील काळातली स्ट्रॅटेजी सांगत होते. मी अमुक करणार आहे, तमुक करणार आहे असे चालू होते. कमीत कमी ही काही दिवस चालू राहणार असलेली साक्ष संपेपर्यंत तरी त्यांनी त्यांचे तोंड बंद ठेवण्याची अपेक्षा ठेवणे चूक आह का?

४) गेले सलग तीन दिवस माझ्याकडे अजमेरच्या दर्ग्याच्या संस्थेकडून देणगीसाठीचे पत्र येत आहे. पत्त्यासह. तिथल्या उरूसासाठी.

अनेक हिंदूही आवर्जून या दर्ग्याला भेट देतात हे माहित आहे, तरीही कोणता डेटाबेस कोणाच्या हातात कसा पडत असेल, व तो अशी पत्रे पाठवण्यासाठी कसा वापरला जात असेल याचे हे एक उदाहरण ठरावे!

५) माझे फेबुमित्र राजेन्द्र मणेरीकर यांची खालील पोस्ट पहा. रूबी हॉलचे हे डॉक्टर कुठल्या हेल्मेट कंपनीचे कमिशन एजंट आहेत असे कोणी म्हणणार नाही. परदेशामध्ये कारमध्येदेखील लहान मुलांना, ज्यांना स्वत:चा सीटेबेल्ट पुरेसा पडत नाही त्यांच्यासाठी वेगळे बेबीसीट घ्यावे लागते. ते बेबीसीट गाडीच्या सीटबेल्टने बांधायचेव बेबीसीटचा बेल्ट त्या बाळाला बांधायचा. आपल्याकडे अशा लहान मुलांनाच नव्हे तर ब-यापैकी मोठ्या मुलांना पालक स्वत:जवळ समोरच्या सीटवर बसवतात. स्कूटर-मोटरसायकलवर पालक मुलांना सीटवर उभे करतात. सरकारने यामध्ये म्हणजे हेल्मेट घालावे की नाही यात ढवळाढवळ करू नये असे म्हणणारेही कदाचित आमच्या मुलाचे बरेवाईट झाले तर आम्ही पाहू असेच म्हणत असावेत. पादचा-यांनीही वाहतुकीपासून संरक्षण मिळवण्यासाठी हेल्मेटच नव्हे तर चिलखतही घालावे का हा युक्तिवाददेखील या प्रकारातलाच आहे. मूळ विषयावरून लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रकार. नेहमीप्रमाणेच.

मणेरीकरांची पोस्ट खाली.
“अनेक वर्षांपूर्वी माझा एक तरूण उद्योजक मित्र, वय ३२ हेल्मेट न वापरल्याने गेला, मागे बसलेला चुकून वाचला. त्यांच्या कुटुंबाचे, व्यवसायाचे पुढील करूण वर्णन मी करीत नाही. समजून घेता येईल.
असे झाले तरी विषय नीट कळला नव्हता. मागील वर्षी रूबी हॉलच्या न्यूरॉलॉजी विषयाचे डायरेक्टर डॉ. राजस देशपांडे यांनी हा विषय मला समजावून सांगितला. वॉर्डमध्ये नेऊन पेशंट दाखविले.
शहरात सायकल चालवितानाही हेल्मेट हवे असे त्यांचे मत आहे!
ह्या मताला वैयक्तिक अनुभवाचीच केवळ जोड नसून जागतिक पातळीवर झालेल्या संशोधनाचा आधार आहे.
आपल्याला सर्वच विषयांतील सर्वच कळते असे ज्यांना वाटते त्यांना शहाणे म्हणत नाहीत!
जाणत्यांचे ऐकावे, त्यात आपले आणि इतरांचे भले असते.”

तर दीपक पाटील यांची आजची ही पोस्ट.
“काल गेला तो.. आई वडिलांचा एकुलता एक होता.. अंगावर साध्या खरचटल्याच्या खुणा पण नव्हत्या, फक्त डोक्याला मार लागून मेंदूत अंतःस्राव झाला होता. त्याला बघून असं वाटत नव्हतं कि अपघातात गेला म्हणून.
ज्या रस्त्यावर अपघात झाला त्यावर एकही खड्डा नव्हता. स्पीडब्रेकर्स नियमाप्रमाणे होते. रस्त्यावर मार्गदर्शक पट्टे होते आणि वस्तीतीला रस्ता होता. त्याची चुकही नव्हती तशी. मागून भरधाव येणाऱ्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटून ट्रकची धडक बसली. त्यांचं नेमकं डोकं रस्त्यावर आपटलं.
परवाच त्याने हेल्मेटसक्तीचा हिरीरीने विरोध केला होता. सुचतील ती सर्व कारणे दिली होती. हेल्मेट कंपन्यांचा पैसे कमावण्याचा डाव, केस गळतात, मानेवर प्रेशर येते, हेल्मेट घेऊन कुठे फिरत बसणार, visibility कमी होते, आधी रस्ते नीट करा, ट्रॅफिक पोलीस घालतात का हेल्मेट, पावसात काचेवर पाणी येते.. एक ना अनेक.
त्याच्या आई वडिलांना या कारणांशी काही देणे घेणे नव्हते. त्यांच्या मुलासोबत ही सर्व कारणेही त्यांच्यासाठी अनंतात विलीन झाली, उरली एक पोकळी.”

अंजली दीक्षित सांगत आहेत की “कवटी ची हाडे मेंदूच्या रक्षणासाठी नाहीतच मुळी, ते केवळ एक कंटेनर/पात्र आहे.मेंदूचे रक्षण हा हेतू असता तर कवटीच्या हाडाची मजबुती मांडीच्या हाडाएवढी असायला हवी नायका.तर ती तशी नाही, म्हणून हेल्मेट घालावे हे उत्तम.”

सौरभ गणपत्ये म्हणतात, “हेल्मेट सक्तीला विरोध करणारे रस्ते, फेरीवाले, सिग्नल यंत्रणा यावर उलट सवाल करणाऱ्या लोकांना एकच सल्ला. विमानात सीट बेल्ट बांधायला सांगितला की विमानतळ नीट का नाही किंवा विमान दोन तास उशीरा का सुटलं ही कारणे विचारत बसाल का? अपघात अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे होतात आणि चांगल्या रस्त्यावरही नक्की होतात.
बदली डोकं मिळायला कोणी गणपती बाप्पा नाही.”

६) सियाचेनमध्ये २५ फूट बर्फाखाली गाडला गेलेला लान्स नाइक हणमंतप्पा हा जवान ही घटना झाल्याच्या सहा दिवसांनंतर जिवंत सापडला.

यासंबंधीचा भानुदास उकरंडे यांच्या फेबुपेजवरून घेतलेला व्हिडियो खाली दिला आहे. जरूर पहा. हा व्हिडियो टीव्हीवर दाखवलेला दिसला नाही. त्या जवानाची थोडीशी हालचाल पाहिल्यानंतर सुटकेसाठी गेलेल्या जवानांच्या आवाजातील आनंद पहा. तरीही सध्या त्याची स्थिती चिंताजनक आहे व तो कोमामध्ये गेल्याचे कळते आहे. त्याच्या तब्येतीत लवकर सुधारणा होवो.
https://www.facebook.com/bhanudas.ukarandesolapurkar/videos/vb.100001667...