प्रादेशिक राष्ट्रवादाचे सनई चौघडे

सध्या टेलिव्हिजनवर साऊथ डब चित्रपट मोठ्या प्रमाणात दाखवले जातात. त्यातला एक चित्रपट पाहण्यात आला. एक स्थानिक ‘तेलुगू’ डॉन (नागार्जुन) एका पाकिस्तानी डॉनचा बस्तान मांडण्याचा बेत कसा उधळून लावतो, असं काहीसं कथानक होतं. काही दिवसांनी मला त्या चित्रपटाची ‘तेलुगू’ प्रत बघण्याची संधी मिळाली. मूळ ‘तेलुगू’ सिनेमा बघितल्यावर मला धक्का बसला. कारण ‘डब वर्जन’मध्ये पाकिस्तानमधून आलेला खलनायक, मूळ तेलुगू सिनेमात मुंबईवरून आलेला दाखवला होता. हे धक्कादायक होतं...
भारतासारख्या प्रचंड वैविध्य असणाऱ्या अजस्र देशात एक भारतीय राष्ट्रवाद आहेच; पण प्रत्येक राज्याचा एक प्रादेशिक राष्ट्रवाद पण अस्तित्वात आहे. जसे तामीळ राष्ट्रवाद, पंजाबी राष्ट्रवाद, मराठी राष्ट्रवाद, काश्मिरी राष्ट्रवाद इत्यादी. द्रमुक-अण्णा द्रमुक, शिवसेना-मनसे, अकाली दल हे आक्रमक पक्ष, या प्रादेशिक राष्ट्रवादाच्या वृक्षाला लागलेलीच फळे आहेत. अनेकदा त्यांचा प्रादेशिक राष्ट्रवाद हा राजकीय अपरिहार्यतेमुळे भारतीय राष्ट्रवादाला वरचढ ठरतो. अनेकदा हे प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय धोरणांपासून फटकून संकुचित धोरणाला पाठिंबा देताना दिसतात. सिनेमा हा मनोरंजनाचं साधन तर आहेच; पण प्रपोगंडा करण्याचं पण एक महत्त्वाचं साधन आहे.त्यामुळे प्रादेशिक सिनेमांमधूनही आक्रमक प्रादेशिक राष्ट्रवादाचा उघड पुरस्कार होताना दिसतो.
स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास पाहिला, तर सामाजिक-राजकीय आणि बहुतेक साऱ्या क्षेत्रांत दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय, असे दोन वर्चस्व असलेले प्रवाह आढळतात. आपले वेगळेपण उर्वरित किंवा उत्तर भारतापासून वेगळे ठेवण्याच्या दाक्षिणात्य राज्यांच्या आग्रहात या वेगळ्या प्रवाहांची बीजं आढळतात. मग हिंदीपासून फटकून राहण्याची भूमिका असो, सोशल इंजिनिअरिंग असो, वा तामीळ वाघांसारखे आंतरराष्ट्रीय मुद्दे असो; दाक्षिणात्य राज्यांनी कायम आपली वेगळी भूमिका मांडली आहे. सिनेमा क्षेत्र हे त्याला अपवाद नाही. शुजीत सरकार दिग्दर्शित राजीव गांधी हत्येवर आधारित चित्रपट ‘मद्रास कॅफे’च्या प्रदर्शनाला तामीळनाडू राज्यात जोरदार विरोध झाला होता. कारण, त्यामध्ये त्यांच्या मते, प्रभाकरन या ‘तामीळ ईलम’साठी लढा देणाऱ्या नेत्याचं चित्रण खलनायकी स्वरूपात केलं होतं. राजीव गांधी यांची निर्घृण हत्या घडवून आणणाऱ्या प्रभाकरनबद्दल देशात संतापाची भावना असली, तरी तामीळनाडूमध्ये त्याला मानणारा एक मोठा वर्ग आहे, हे एक उघड गुपित आहे, अगदी करुणानिधी यांचा द्रमुक हा पक्षसुद्धा ‘प्रो-प्रभाकरन’ होता.
मागच्याच वर्षी श्रीलंकेच्या लष्कराने निर्घृणपणे ज्याची हत्या केली होती, त्या प्रभाकरनच्या लहान मुलावर तामीळनाडूमध्ये चित्रपट आला होता. २०१४मध्ये पंजाबमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या ‘कौम दे हिरे’ या चित्रपटावरून मोठं वादळ उठलं होतं. भिंद्रनवाले आणि खलिस्तान चळवळीबद्दल ममत्व बाळगणारा एक मोठा वर्ग आजही पंजाबमध्ये आहे, त्याचंच हे द्योतक. अर्थात, कधी कधी हे प्रादेशिक राष्ट्रवाद एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकतात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बनलेल्या ‘मराठा टायगर्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून चालू असलेला वाद, हे याचे ताजे उदाहरण. या सिनेमाच्या निमित्ताने कन्नड अस्मिता आणि मराठी अस्मिता यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचा बारकाईने अभ्यास केला, तर काही तथ्यं समोर येतात. एकूणच तेलुगू, तामीळ, मल्याळम फिल्म्समध्ये सध्या उत्तर भारतीय आणि मराठी खलनायकांची चलती आहे. आशिष विद्यार्थी, महेश मांजरेकर, राहुल देव, मुकेश ऋषी, प्रदीप रावत, सोनू सूद अशी ही खलनायकांची लांबलचक यादी आहे. या यादीत नवीन नाव म्हणजे, अक्षयकुमार. रजनीकांतच्या पुढच्या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका बजावणार आहे. उंचीने कमी असणारा, फारसा शारीरिकदृष्ट्या फिट नसणारा मिशाळ दाक्षिणात्य नायक जेव्हा आपल्यापेक्षा धिप्पाड ‘उपऱ्या’ खलनायकाला आपटून आपटून मारतो, तेव्हा दाक्षिणात्य प्रेक्षक जबरदस्त खूश होतो. बऱ्याचदा राष्ट्रवादाचा मार्ग हा पुरुषी मनोवृत्तीतून जातो. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सध्या उत्तर भारतीय आणि पंजाबी नायिकांचा बोलबाला आहे. राकुल प्रीत सिंग, तमन्ना, हंसिका मोटवानी, काजल अगरवाल या नट्या दक्षिणेत सध्या खूप लोकप्रिय आहेत. राकट रावडी दाक्षिणात्य नायक जेव्हा हाय क्लास-इंग्रजी झाडणाऱ्या नायिकेला धडा शिकवून नायिकेला त्याच्या प्रेमात पडायला मजबूर करतो, तेव्हा प्रादेशिक राष्ट्रवादाच्या पुरुषी अहंम््ला सुखावण्याचाच तो प्रकार असतो.
हाच कित्ता थोड्याफार फरकाने बॉलीवूड चित्रपटही गिरवताना दिसतात. बॉलीवूड मुंबईमध्ये असलं तरी, त्यांच्या सिनेमांमधून मुख्यतः पंजाबी आणि हिंदी संस्कृतीचा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातो. पंजाबी संस्कृतीचा बॉलीवूड सिनेमांमधून अजीर्ण होईपर्यंत भडिमार केला जातो. म्हणूनच पंजाबी ठेक्याची गाणी, पंजाबी शब्दरचना असणारी गाणी, भांगडा नृत्य, पंजाबी विवाह सोहळे यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव भारतीय समाजजीवनावर पडताना दिसतो. अगदी महाराष्ट्रात पण आपल्या आजूबाजूला होणारे विवाहसोहळे पाहिले तरी याची चुणूक जाणवते. विख्यात पत्रकार आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्राने ‘बॉलीवूडचं पंजाबीकरण’ असं याचं सार्थ नामकरण केलं आहे. या बॉलीवूड सिनेमांनी बिगर हिंदी लोकांची हास्यास्पद ‘स्टेरियोटाइप्स’ तयार केली आहेत. यांच्या सिनेमामधली दाक्षिणात्य पात्र लुंगी नेसणारी, केसाळ, ओंगळ आणि विचित्र हिंदी उच्चार असणारी असतात. ख्रिश्चन पात्र ‘हे मॅन’ असं पालुपद प्रत्येक वाक्यामागे लावून बोलत असतात. गुजराती पात्र कंजूष दाखवलेली असतात. कामवाली बाई हमखास मराठी असते. शिवाय, प्रत्यक्षात ज्यांच्या देशभक्तीवर संशय घेतला जातो, त्या समूहाचं प्रतिनिधित्व करणारं एखादं देशभक्त मुस्लिम पात्र हटकून हजर असतंच. थोडक्यात सांगायचं तर, ‘हिंदी बेल्ट’मधून आलेले लेखक-दिग्दर्शक उर्वरित भारतीय लोकांकडे कोणत्या नजरेने पाहतात, हे हिंदी चित्रपटांमधून कळतं.
मराठी सिनेमांमधूनही आक्रमक ‘मराठी राष्ट्रवादाचा’ पुरस्कार होताना दिसतो. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटामध्ये मराठी भूमिपुत्राविरुद्ध गुजराती-मारवाडी बिल्डरकडून होणारा अन्याय दाखवण्यात आला होता. ‘गर्व नाही तर माज आहे, मराठी असल्याचा’ ही फिलॉसॉफी या चित्रपटात मांडली होती. ‘कॅरी ऑन मराठा’ या महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या प्रेमकथेत मराठी नायक कन्नड नायिकेच्या प्रेमात पडतो, आणि त्याच्या प्रेमाला आडवे जाणाऱ्या सर्व कन्नड खलनायकांना ठोकून काढतो. अवधूत गुप्तेच्या ‘जय महाराष्ट्र, ढाबा, भटिंडा’ चित्रपटात नायक पंजाबमध्ये मराठी ढाबा उघडतो आणि पंजाबी नायिकेच्या प्रेमात पडतो, वगैरे...
भारतासारख्या गुंतागुंतीच्या आणि अंगावर येणारी विविधता असणाऱ्या देशात कुठलाही माणूस अनेक ‘आयडेन्टिटिज’ घेऊन वावरत असतो. त्याची ‘आयडेन्टिटी’ भारतीय म्हणून तर असतेच; पण ती एखाद्या भाषासमूहाची, जातीची, धर्माची आणि राज्याचीही असते. अनेक देशांच्या लोकांना ‘आयडेन्टिटी क्रायसिस’ची समस्या भेडसावत असताना आपल्याकडे मात्र, इतक्या साऱ्या आयडेन्टिटी घेऊन भारतीय नागरिक लीलया वावरतो.
समाजाचा आरसा मानल्या जाणाऱ्या चित्रपट माध्यमात याचे प्रतिबिंब पडणे, स्वाभाविकच ठरते. त्यामुळे जोपर्यंत देशात ही विविधता आहे, तोपर्यंत चित्रपटांमधून पण प्रादेशिक राष्ट्रवादाचे सनई-चौघडे वाजत राहणार, ही काळ्या दगडावरची रेघ ठरते. अर्थात हे चांगलं का वाईट, हे ज्याचं त्यानं ठरवावं.

(पुर्व प्रकाशित)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

भारीच! बहुत आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

भारीच! बहुत आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मुळात कुठली तरी अस्मिता व कोणाला तरी विरोध दाखवल्याशिवाय यांना तुंबड्या भरता येत नाहीत. शिवाय सतत काहीतरी भडक दाखवायला हवे असते त्यांना.
बाकी बॉलिवूड म्हणजे 'पंजाबडे' हे समीकरण रूढ होण्यास यश चोप्रांसारखेही जबाबदार आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतासारख्या गुंतागुंतीच्या आणि अंगावर येणारी विविधता असणाऱ्या देशात कुठलाही माणूस अनेक ‘आयडेन्टिटिज’ घेऊन वावरत असतो. त्याची ‘आयडेन्टिटी’ भारतीय म्हणून तर असतेच; पण ती एखाद्या भाषासमूहाची, जातीची, धर्माची आणि राज्याचीही असते. अनेक देशांच्या लोकांना ‘आयडेन्टिटी क्रायसिस’ची समस्या भेडसावत असताना आपल्याकडे मात्र, इतक्या साऱ्या आयडेन्टिटी घेऊन भारतीय नागरिक लीलया वावरतो. समाजाचा आरसा मानल्या जाणाऱ्या चित्रपट माध्यमात याचे प्रतिबिंब पडणे, स्वाभाविकच ठरते. त्यामुळे जोपर्यंत देशात ही विविधता आहे, तोपर्यंत चित्रपटांमधून पण प्रादेशिक राष्ट्रवादाचे सनई-चौघडे वाजत राहणार, ही काळ्या दगडावरची रेघ ठरते.

शॉल्लेट.

आणखी - एक बिहारी सौ पे भारी, सन ऑफ सरदार लक्षणीय वगैरे आहेतच. परंतु हे सगळे प्रादेशिक-ओळखवाद प्रचलित व्हायच्या आधी ( १९८० ते १९९९ या कालात) हिंदी चित्रपट सृष्टीने आणखी एक प्रबल वाद आणला होता. त्या वादाचे नाव धनवंत-निर्धन-द्वैतवाद. त्याचे रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट या सगळ्या प्रादेशिकतावादांच्या कैकपट होते. बक्कळ कमवलनीत. त्यानंतर आला हिंदु-मुस्लिम-अचिंत्य-भेदाभेद-वाद. तो आजही प्रचलित आहे. X is not equal to Y but X is equal to Y - हे या वादाचे प्रमुख सूत्र. धर्माचा दहशतवादाशी काहीही संबंध नाही असा कंठशोष करायचा आणि वर दाखवताना धार्मिकता हीच कशी दहशतवादास प्रेरक वातावरण निर्मीती करत आहे ते दाखवायचे असा ह्या चित्रपटांचा खाक्या. त्यानंतर याच वादाचे एक अपरूप बाजारात आले - ज्याला आपण चार्वाक-चित्रपटवाद म्हणूया. यात मुख्यत्वे शीख समुदाय (क्वचित ख्रिश्चन समुदाय) हे एक्सेप्शन आहे आणि म्हणून तुमचा थिसिस खरा ही नाही व खोटा ही नाही असा प्रवाद आपल्यासमोर ठेवला गेला. म्हंजे X can be equal to Y but it can also not be denied that X is not equal to Y. याचा परिणाम म्हंजे असे चित्रपट काढणार्‍यांनी पैसे कमी मिळवले पण अ‍ॅवॉर्ड्स मात्र खंडीभर मिळवली. सामाजिक स्थितीबद्दलचे तुम्ही केलेले कोणतेही आर्ग्युमेंट हे - It is not that simple - असं म्हणून झिडकारून आपल्यालाच काय ते सत्य अतिशय व्यवस्थित समजलेले आहे असा आभास निर्माण केला गेला. या सगळ्याच्या जोडीला आणखी एक वाद आहे. त्याचे नाव हिंदुस्तान-पाकिस्तान-अद्वैतवाद. X is not equal to Y only because of Z हे त्याचे मूल सूत्र. याचे ठळक उदाहरण म्हंजे सरफरोश. ह्या चित्रपटांनी पैसे चांगलेच कमवले, अवॉर्‍ड्स फारशी नाहीत. पण वेल-मेड चित्रपट असे बिरुद मिरवले. भारतातले अनेक प्रॉब्लेम्स (पोलिस-भ्रष्टाचार, ड्रग्स, वीरप्पन, दहशतवाद) हे एकाच धाग्यात (आय-एस-आय) गुंफुन त्या "त्या सर्व समस्यांमधले अद्वैत" लोकांच्या नजरेसमोर आणले. (हे "चिडलेला स्थितप्रज्ञ" हा धर्तीवर वाचावे.).

येत्या काही दिवसातच एक नवीन वाद उदयास येईल. विशिष्टाद्वैत-चित्रपट-वाद. परवा आरेसेस चे मोहनराव भागवत असं म्हणाले की विविधता हेच भारताचे सर्वात मोठे बलस्थान आहे. ते असे ही म्हणाले की आरेसेस नेहमी धर्मनिरपेक्ष भूमिका घेत आलेली आहे आणि आरेसेसचे विरोधकच आरेसेस वर धर्मनिरपेक्षताविरोधी असल्याचा आरोप करतात. ही दोन वाक्ये या विशिष्टाद्वैतचित्रपटवादाच्या उदयाची सूचक आहेत. विशिष्टाद्वैतवादाचे मूलतत्व काय ? It is a school of Vedanta philosophy which believes in all diversity subsuming to an underlying unity. हे चित्रपटावादात कसे ट्रान्सलेट होणार ते लवकरच दिसेल अशी आशा करूया.

(जय बाबा गब्बर...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणीतरी मराठीत भाषांतर करेल का वरील अगम्य भाषेतील प्रतिसादाचे? Wink

धनवंत-निर्धन-द्वैतवाद. त्याचे रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट या सगळ्या प्रादेशिकतावादांच्या कैकपट होते. बक्कळ कमवलनीत.

हाहाहा. हे मात्र कळलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आडदांडपणा म्हणजे सबकुछ, मग त्यातून ललित लेखनातून पिळून काढणं असो वा राष्ट्रवाद, प्रांतवाद काहीही सुटत नाही.

(हा लेख वृत्तपत्रासाठी लिहिला असल्यामुळे आखूड असावा. या विषयावर तपशीलात मोठा लेख लिहावा असं वाटतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फारच छान. आवडले. चपखल शब्दात मांडले आहे. हे असं कायबाय कळतं पन लिवता येत नाय वो Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिनेमा हा मनोरंजनाचं साधन तर आहेच; पण प्रपोगंडा करण्याचं पण एक महत्त्वाचं साधन आहे

हे यातील सर्वात कळीचे वाक्य ठरावे.
यासाठी प्रेक्षकांचे शिक्षण हाच प्रभावी मार्ग आहे. चित्रपट हा केवळ "एक दृष्टीकोन" 'दृक-श्राव्य' माध्यमतून सांगणारी एक कलाकृती किंवा गेलाबाजार 'मनोरंजनाचं साधन' आहे व त्यापलिकडे त्यात दाखवल्या जाणार्‍या गोष्टी या "पूर्ण सत्य" नसून केवळ दिग्दर्शकाचा दृष्टीकोन आहे याचे प्रेक्षकांचे शिक्षण झाले की त्याचा वापर प्रपोगांडासाठी होण कमी होऊ लागेल.

मात्र तोवर केवळ प्रपोगांडा शक्य आहे म्हणून माध्यमावर बंदी/बंधने घालणे स्वीकारार्ह नाही.
मला सेन्सॉर सर्टिफिकेट देण्याची पद्धत म्हणून आवडते. (मात्र सेन्सॉरने केवळ सर्टिफिकेट द्यवे. दुसर्‍या सर्टिफिकेटसाठि आय करावे हे सुचवू नये. ) "अ‍ॅडल्ट", "युनिव्हर्सल", "सिगारेटची चेतावनी" आदी गोष्टी आधीच स्पष्ट केलेल्या असल्या की मग दिग्दर्शक आपली अभिव्यक्ती पूर्णपणे वपरायला मोकळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

* आवडला लेख. आमच्या एका मित्राने मागे एक घोषणा केली होती 'रामसिंग गाडी निकालो' नावाच्या लेखाची, त्याची आठवण झाली. या मित्राच्या मते, जुन्या - नव्या, समांतर - पॉप्युलर सगळ्या प्रकारच्या बंगाली सिनेमांत नोकर= बिहारी असं समीकरण हमखास सापडतं. सिनेमातले भद्रलोक पूर्ण सिनेमाभर बंगाली बोलत असताना नोकराला उद्देशून म्हणायची वाक्ये मात्र हिंदीत बोलतात (जसे की रामसिंग गाडी निकालो), त्यावरून हे समीकरण अजूनच ठळक होतं.
* चित्रपटच नाही, तर कुठल्याही कलाप्रकारात (जाहिरातीही यात अंतर्भूत) त्या त्या समाजाच्या विचारांचं (उदा. प्रादेशिक राष्ट्रवाद) प्रतिबिंब दिसत असतं. एवढंच नव्हे, तर समाजातल्या प्रथा (/विचार /वाद) कलाकृतीत सारख्या सारख्या दिसत राहिल्या तर त्या आणखीनच दृढ होतात. माझी एक चित्रकार बहीण वर्तमानपत्रांसाठी, मासिकांतल्या कथांसाठी वगैरे चित्रे काढताना 'स्वयंपाकघरात बाई, पेपर वाचणारा बुवा' किंवा 'सुंदर, बारीक, नटलेली तरुण स्त्री' अशी टिपिकल चित्रे काढायची. तिला टोकलं, तर म्हणाली, समाज बदलायची जबाबदारी मी घेतलेली नाही, समाजात जे दिसतं तेच मी चित्रांत काढते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.
मुळात कला म्हणजे आपल्या समज-गृहीतक-श्रद्धा इत्यादींना आव्हान देणारं काहीतरी असावं असं खूप कमी लोकांना वाटतं. बहुसंख्य भारतीय चित्रपट तर फार क्लिशेड असतातच. त्यामुळे एखादा विषय चालला की तोच उगाळत बसतात.
या प्रादेशिक वादामागे प्रत्येक समाजाचा न्यूनगंड दिसतो आणि ज्यांच्याकडून न्यूनगंड येतो ते त्यात खलनायक असतात. म्हणजे "मी शिवाजीराजे.. " मध्ये गुजराती/मारवाडी बिल्डर्स खलनायक असणे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सगळीकडेच असते, भारतात तर इतका फरक आहे की भारतात पण असणारच.

इंग्लंडात पण नॉर्थ, साऊथ आहेच, ग्रामिण आणि लंडनर भेद आहेच. स्कॉटीश , आयरीश तर विचारुच नये.
हाम्रिकेत २०० वर्ष राहुन सुद्धा आयरीश आणि स्कॉटीश भेद न विसरणारे आहेतच.
त्यात टेक्सन, बे एरीया वाले, न्युयॉर्कर वगैरे प्रांतिक भेद आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यात टेक्सन, बे एरीया वाले, न्युयॉर्कर वगैरे प्रांतिक भेद आहेतच.

हास्यकल्लोळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0