मराठी बोलींचे काही नमुने

मागे एकदा मराठी भाषा शिकण्यासाठी डॉ. दत्तात्रय पुंडे, जोशी , कालेलकर इ.ची पुस्तके घेतली होती. ती वाचत असतांना त्यात दिलेले बोली भाषेचे काही मजेदार नमुने आढळले. ते वाचुन बोली भाषांचे महत्व नव्याने लक्षात आले. या व इतर भाषातज्ञांच्या मते साधारण असे मानण्यात येते की. एकभाषक समाजाच्या एका गटाकडुन किंवा एकभाषक समाजाच्या एखाद्या विशीष्ट प्रदेशातील लोकांकडुन देवाणघेवाणीसाठी, दैनंदिन व्यवहारांसाठी वापरल्या जाणार्‍या विशिष्ट भाषिक रुपास बोली असे म्हणतात. संपुर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर मराठी समाजाकडुन बोलल्या जातात त्या मराठीच्या विवीध बोली. त्यातील एक बोली प्रमाण बोली आहे इतर बोली या प्रमाण बोलींपासुन स्वनिमप्रक्रिया, व्याकरणप्रक्रिया, आणि शब्दसंग्रह यांच्या बाबतीत कमीअधिक दुर आहेत. तथापि प्रमाण बोली इतकेच या प्रत्येक बोलीला महत्व आहे. कारण बोली ह्या त्या त्या भाषकांचा सामाजिक-सांस्कृतिक वारसाच असतो. त्यामुळे महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, त्याच्या संस्कृतीचा परिचय करुन घेण्याचे एक साधन म्हणुन मराठीच्या बोलींकडे पाहिले पाहीजे. बोली संदर्भात डॉं. ना.गो. कालेलकर म्हणतात " बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन आहे. परीस्थीतीला अनुरुप अशा भाषिक सामग्रीचा ती उपयोग करते. मुखपरंपरेने आल्यामुळे तिच्या अंगी एक प्रकारचा जिवंतपणा असतो. ती साधी पण परीणामकारक असते. तिची स्वाभाविकता हेच तिचे वैशिष्ट्य असते."

मराठी बोलींचा पद्धतशीर अभ्यास जॉर्ज ग्रिअर्सन या इंग्रज आय.सी.एस. अधिकार्‍याने सर्वात अगोदर केला. त्याच्याकडे संपुर्ण हिन्दुस्थानच्या भाषिक पाहणीचे काम इंग्रज सरकारने सोपवले होते. ते त्याने अनेक वर्षे चालवुन लिंग्वीस्टीक सर्व्हे ऑफ़ इंडीया या ग्रंथात एकुण १२ खंडात प्रकाशित केले. त्यात एकुण १७९ भाषा व ५४४ पोटभाषांचा तपशीलवार अभ्यास सादर केलेला आहे. या महाग्रंथाच्या ७ व्या खंडात मराठी व तिच्या बोलीं संदर्भातील अभ्यास समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत असा एकत्रित मराठी बोलींचा अभ्यास झालेला नाही. तुरळक व तुटक तुटक असा एकेका बोलीचा अभ्यास मात्र वेगवेगळ्या भाषाशास्त्रज्ञांनी केलेला आहे. उदा.खानदेशी चा विजया चीटणीस यांनी अरे-मराठी चा (कर्नाटकात व आंध्रप्रदेशात अरे-मराठी ही बोली बोलणारा काही शतकांपुर्वी तिथे स्थलांतरीत झालेला मराठी समाज आहे. ) डॉ. श्री.र. कुलकर्णी यांनी केलेला आहे. तर ग्रिअर्सनच्या या अभ्यासातील बोलींचे नमुने खाली दिलेले आहेत. हा अभ्यास आता अर्थातच फ़ार जुना झालेला आहे आज या बोलीभाषा देखील मोठ्या प्रमाणावर बदललेल्याच असतील मात्र तरी हे बोलींचे वैविध्य बघणे मला तरी रोचक वाटले म्हणुन इथे शेअर करत आहे एवढेच. या विवीधतेतुन भाषेची श्रीमंती संपन्नता तर जाणवतेच व कुठेतरी भाषेकडे बघण्याचा संकुचित दृष्टीकोण दुर होतो कदाचित. बाकी फ़ार रोचक माहीती पुंडे जोशी इ. च्या पुस्तकांतुन मिळते ती मुळातुनच वाचण्यासारखी आहे तुर्तास एक नजर या विवीधतेवर व गमतीजमतीवर टाकु. खालील दोन मुलांची गोष्ट वाले नमुने जॉर्ज ग्रिअर्सन चे आहेत. व त्यानंतर इतरांचे काही दिलेले आहेत.

बुलढाणा जिल्हा

कोणा एका माणसास दोन मुलगे होते । त्या-पैकी धाकटा बापास म्हणाला, बाबा माझ्या हिशाची जिनगी मला द्या। म्हणून बापाने आपली जिनगी दोघां-मध्ये वाटून दिली । थोड्याच दिवसांनी धाकटा मुलगा आपली सर्व जिनगी घेऊन देशांतरास गेला, व तेथे त्याने चैनबाजी-मध्ये आपली सर्व जिनगी उडविलीं। त्याचा सर्व पैसा ह्या रीतीने खर्च झाल्यावर त्या देशात एक मोठा दुष्काळ पडला। व त्यामुळे त्यास फ़ार ददात पडू लागली । नंतर तो एका गृहस्थाकडे जाऊन राहिला । त्या गृहस्थाने ह्याला आपले शेतात डुकरे राखण्यास ठेविले ।

कोळी बोली मुंबई प्रांत

एका मानसाला दोन सोकरे होते । त्यामनचा धाकला सोकरा बापासला आपला । बापुस माजा धनाचा वाटा माना देस । तदं बापास जून धन वाटिलं । तदं थोड्या दिसांशी धाकल्या सोकर्‍यान त्याच्या वाट्याला जवरं आलतं तवरं जकलं कवलिलं आन दूर बिजा गांवा जेला आन तटे रेला न त्याचे मेरे जवरं होत नोतं तवरं जकलं उदलिलं । याचे मेरे अर्दी पुन नोती नी त्या गांवांत मोठा दुष्काळ आयला नी तदं त्यातो खावाचे हाल होवं लागले । मगशीं तो तनचेच एका सावकाराचे घरा जेला न त्याचे जवळ ह्‍राला । तदं त्या सावकारान त्याला धारलन शेतावर डुकरं चारायला ।

कुणबी बोली पुणे जिल्हा ग्रामीण

कोणा एका मनुक्शाला दोन मुलग व्हत । त्यातला धाकला बापासनी म्हंगाला, बाबा, जिनगानीचा वाटा माला यायचा त्यो दे । मंग त्यांनी त्याला जिनगानी वाटुन-शानी दिली। मंग थोड्या दिसानी धाकला मुलगा सर्वे जमा करुन-शानी दुर देशामंदी गेला, आणि तिथं उधळपणानी राहून आपली जिनगानी उडवली। मंग त्यानी समद खरचल्यावर त्या देशामंदी मोठा काळ पडला । त्यामुळं त्याला आडचन पडू लागली । तव्हा तो त्या देशामंदील एक गिरस्ताप जाऊनशानी राह्यला । त्यानी तर त्याला डुकर चाराया आपल्या शेतामंदी पाठवलं।

कोंकणी -कुडाळी बोली सावंतवाडी

‍अ‍ॅका माणसाक दोन झील होते । ते तुरलो न्हानगो बापाशीक म्हणूक लागलो बाबा, माका येतलो तो जिंदगेचो वांटो माका दी । मगे तेणी तॅका आपली जिंदगी वाटून दिली । मगे पुस्कळ दीस जांवचे आदीच न्हानग्या झिलान सगळा एकठंय कॅलां, आणि दुर दॅशाक जांवक गेलो आणि थैंसर मौज मारुन हॉतां सगळा घालयलां । तेचे कडला सगळा सरल्यार थैंसर एक थोर दुकळ पडलो; आणि तॅका कठीण दीस आयले । मगे तो थैंसरल्या अ‍ॅका गिरेस्ता थैं जावन रवलो । तेणी तॅका आपली डुकरा चरवक आपल्या शॅतांत धाडलो ।

कोंकणी मुसलमान बोली ठाणे जिल्हा

कनच्या एका मानसाला दोन सोकरे होते । त्यांशी धाकला बापासला बोलला, बाबा, जो मिलकतीचा वांटा मा-ना येवाचा तो दे। मंग त्यानि त्याला मिलकत वाटुन दिल्ली । मंग थोर्‍या दिसाशी धाकला सोकरा सगला जमा करुन लांबच्या मुलखाला गेला, आणी तवार उधळेपणाशी चालुन आपली मिलकत उरवली । मंग त्यानीन सगळा करचले-वर त्या मुलखात मोठा दुकाल पडला। त्या सबब त्याला अरचन पराली लागली । तवान तो त्या मुलखान येका मानसाच्या नजीक जाऊन ह्रेला । त्या-नी- तवा त्याला डुकरान चाराला आपल्या मुलखाला धारला ।

नागपुरी बोली

कोन्या एका मानसास दोन पोर होते । त्यापैकी लहान बापास म्हनाला कि , बाबा जमेत माहा जो हिस्सा असेल तो मज दे। त्याने धन वाटुन देल्ल। थोड्या दिवसान लहान पो‍र्‍या सर्व घेऊन दूर देशी गेला । आनि तेथ उधळपट्टी करुन आपलं धन उडवलं। त्याने सर्व खर्चल्यावर त्या देशात मोठा दुकाळ पडला त्यामुळे त्यास अडचन पडली । तेव्हा तो तेथल्या एका गृहस्थाजवळ जाऊन राहिला । त्यान त्यास डुकर चारायास आपल्या वावरात पाठवलं।

डांगी बोली ( गुजरात व महाराष्ट्र यांच्या सीमेवर पश्चिमेस असलेल्या डांग भागातील )

कोणता येक गोहाला दोन पोंसा व्हतात । त्याहुन लाहाना पोंसा बांसला म्हणु लागना, बा, जी आपली आमदानीना वाटा देणा व्हवा तो माला दे । मंग बांसने त्यासला आपली आमदनी वाटी दीधी । मंग थोडाच दिवसमा लाहाना पोंसा आपली वाटानी आमदानी सगळी गोळा करीसनी । येखांदी मुलुख वर निंधी गया । तठे उधाळपणा- खाल वागना, व आपली आमदानी सगळी पण सगळी कुल उडवी टाकी । त्यापासन सगळ खर्ची गया । मंग त्या मुलुख वर मोठा काळ पडा त्या पासीन त्याला मोठी येळा पडी । मंग तो त्या मुलुख-मा येक गोहो पान जाई रहिना। त्या गोहोनी त्याले आपला डुकरा चारुला खेतमा लावा ।

बालाघाट म‍र्‍हेटी बोली

कोन्ही माणसाचे दोनं लेकरा होते । त्याच मधुन नाहन्याने बापास मनला, हे बाप, धना-मधुन जो माझा हिस्सा आहे तो माले दे । तव्हा त्यानी त्याले आपला धन वाटुन दिले । बहुत दिवस नाही झाले कि नाहन लेकरु समदा काही जमा करुन परदेशात निघुन गेला आनी तेथी छिचोरी-बाजी मधी दीवस गुमाऊन-सन्या आपला पैसा खोऊन देल्ला। जव्हा त्याने सर्व काही खोऊन बसला तव्हा त्या देशामधी मोठा कंताळ पडला। अनीख तो कंगाल झाला। अनीख तो जाऊन-सनि त्या मुलकाचे येकाचे घरी राहु लागला । त्याने त्यास आपले वावरात डुकर चारावास पाठवला ।

खानदेशी बोली ( अहिराणी )

" तुम्हीनं ज्ये पत्र धाडलत त्ये मल्ये कालदी मंगळवारी भेटलं, मांगो दुला आठी कालदी उतवा. त्याले मीनं सांगलं की वावरात पळह्यामधून सन तूरनी शेंग प्येरी दे. औंदां कपाशील्ये भाव नाही आन गेल्या वरसी मेघराजाकन कपाशीच येक बोंडबी भेटलं नाही. माझी अवस्था मले मालुम की देवाल्ये मालुम. कसा तरी दिवस काढी राहिनो आहे बरे. रववाराच्या बाजाराल्ये दोन गोर्‍हे घेइसन टाकतो. नवरीच्या चितांग आन वाकरवाळ्या गहान टाकीसन रुपये कहाडीन".

चित्पावनी बोली

कोणतीच बोली हेंगाडी नाही नी आमची हेंगाडी कशी सेल. ऊलटी आमचीच बोली संस्कृताजवळ से असां शास्त्रीबावाच म्हणचत. एतां इतलां खरां की, ह्या बोल्यांत ल्येहंलेले ग्रंथ नी पुस्तकां आमला के आढळत नाहीं, असां पुष्कळ म्हणचत. पण हेवर ठी फ़ारत चांगले शिकले सवरलेले विद्वानांची ही व्यवहारभाषा नसेवी. एतां ही बोली कें नि केंवेरीं बोलचत तां सांगचा. रत्नांगिरीचेउत्तरा जयगड उत्तराहार ही नाही. पण जयगड पाष्टीं दक्षिंणाहार, रत्नंगिरी, राजापुर, देवगड, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, गोवा, एठांपावत सेच. पण तेचेय दक्षिणाहारी कदाचित चालत सेल.

वर्‍हाडी बोली चा एक नमुना

"कोन ? मोठी माय ? "
’व
कोठी जाते माय ?
" दंडाक जातो बये सदबाले भाकर घेऊन श्यानी ."
"काऊन ? सदबादादा घरी नाई आला कावो ?"
" कसा येईल ब्ये ? वावरात जोह्यडाचा चुरना चालला हाये. पाखराच्या मारे उसंत नाई, नईच्यान ढोरावासराचा आदरा, कोनाच्या भरोश्यान कोठ चुरना होते ? दादल्यावानी माणसाच्या उरावर राहाव लागत तेवा कोठ दाणा दिसते डोर्‍याल."
"खरा आहे माय तुझा म्हणन. आजकाल पोटच्या पोरावर इश्वास राह्यला नाई, तुले त माहीत आहे."

एक आदिवासी बोली्तील गीत

दरियांत मचवा झुलताय लाडके । सांवला दीर तुझा येताय गो
पायांत सांकल्या आनताय लाडके । सांवला दीर तुझा येताय गो
नाकांत मोती आनताय लाडके । सांवला दीर तुझा येताय गो
दंडात येला आनताय लाडके । सांवला दीर तुझा येताय गो
कागदी पलंग मांगल्या दारा । काढ गो चोली घाल गो वारा
काढतांय चोली घालतांय वारा । हात नको लावूं मेल्या फ़जित खोरा
दरियांत मचवा झुलताय लाडके । सांवला दीर तुझा येताय गो

अजुन एक नमुद करण्यासारखी बाब म्हणजे थोर भाषा अभ्यासक डॉ.ना.गो.कालेलकर म्हणतात " जेव्हा आपण प्रमाणभाषा हा प्रयोग करतो, तेव्हा प्रत्यक्ष जीवनात, व्यापक सामाजिक व्यवहारात अनेक परस्परसदृश्य भाषिक परंपरा रुढ आहेत हेच आपण मान्य करतो. प्रमाणभाषा हे सोयीसाठी मानलेले, लेखनाशी आणि त्यामार्फ़त शिक्षण, राज्यकारभार, वर्तमानपत्रे, ह्यांसारख्या माध्यमांशी संबंधित असलेले एक भाषिक रुप आहे. सर्व प्रचलित भाषिक रुपांशी संबंधित असलेले, पण ह्यांतल्या कोणाशीही पुर्णपणे एकरुप नसलेले, व्यक्तीने केलेल्या प्रयोगापेक्षा व्याकरणात्मक संहितेतल्या नियमांनी ज्यातल्या प्रयोगांची शुद्धाशुद्धता ठरवता येते, असे ते एक आदेशात्मक भाषिक रुप आहे. ती एक सोय आहे. तिची एक वेगळीच सवय करुन घ्यावी लागते."

अजुन बरेच नमुने विवीध बोलींचे आहेत असंख्य बोलींचे प्रकार आहेत एकट्या कोंकणी त अनेक प्रकार आहेत.विवीध बोलींचे शब्दसंग्रह , शैली वेगळेपण फ़ार सुंदर रीतीने उलगडुन दाखवलेले आहे मात्र आता टंकाळा आला म्हणुन थांबतो.
जिज्ञासुंनी मुळ पुस्तके वाचावीत व आनंद घ्यावा अशी अपेक्षा.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

संपादक मंडळ
एकच लेख चुकुन दोनदा प्रकाशित झाला
कृपया एक लेख उडवुन टाकावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही बोलींच्या नमुन्यांवर प्रमाणभाषेची छाप जरा अधिक दिसतेय. 'होते' हे रूप नेहेमी व्हते, हुते असे येते. 'होते' असे प्रमाणभाषेतले रूप सहसा नसते. दुसरे म्हणजे दमणगंगेपासून कारवारपर्यंतच्या कोंकणी बोलींत अनुस्वार उच्चारले जातात. नमुन्यांत खूपसे अनुस्वार उडवलेले आहेत. ही कदाचित मराठी शुद्धलेखनाची छाप असावी. बोलीभाषांत 'ठ', 'ढ', 'ध', वर्ण शब्दाच्या सुरुवातीला नसतील तर बहुतेक वेळा महाप्राणविरहित असतात. 'कुटं जातीस', 'आबाळ आलंय' असे शब्द आपण ऐकतो. कधी कधी महाप्राणाची आधीच्या वर्णाबरोबर अदलाबदलसुद्धा होते. 'मोठी'चे 'म्होटी' होते, 'अंथरली'चे 'हंतरली' होते.
ग्रीअरसन यांच्या वर्गीकरणानंतर बर्‍याच बोली या स्वतंत्र भाषा बनल्या आहेत. भौगोलिक पुनर्रचनेमुळे बोलींचे स्वरूप बदलले आहे. कारवार जिल्हा कर्नाटकात गेल्यावर तिथल्या कोंकणीवरचा कानडी प्रभाव वाढला आहे तर मराठवाड्यात तेलुगु आणि कन्नडचा प्रभाव कमी झाला आहे. दीव, दमणची बोली ठाणे जिल्ह्यातल्या वारली बोलीला जवळची होती आणि त्यावर गोव्याच्या कोंकणीचा प्रभाव होता. आता या बोलीचे गुजरातीकरण झाले आहे. डांग उंबरगाव बाबतही हेच म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राही जी
तुम्ही महाप्राण संदर्भात जे म्हणाला त्यात केवळ एकच अपवाद पटकन आठवतोय तो खान्देशी अहिराणी तला त्यात अठे-तठे हे शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जातात असे वाचल्याच आठवतय.
नाद महाप्राण च्या बाबतीत ही असेच असते का ? म्हणजे बोलींमध्ये ते देखील असेच टाळलेले असतात का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचून गंमत वाटली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह.मो.मराठे लिखित 'बालकांड' ह्या त्यांच्या बालपणाच्या दिवसांवर लिहिलेल्या पुस्तकामध्ये संवादांसाठी बहुशः चित्पावनी बोलीच वापरली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान माहिती. आवडला लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्पावनी बोली म्हणून जी लिहिली आहे (तशीच साधारण जगन्नाथ दीक्षित यांच्या चित्पवनांवरील पुस्तकात दिलेली आहे) ती मी कुठल्याही चित्पावनाला गेल्या ५० वर्षांत बोलताना ऐकलेली नाही. मी चित्पावनांना शुद्ध भाषा नावाची पुणेरी बोली बोलताना ऐकले आहे. कोकणातील (चिपळूण) आमचे नातेवाईक त्यापेक्षा थोडी वेगळी बोली बोलतात पण ती ऑलमोस्ट पुणेरी शुद्ध बोलीसारखीच (एक्झॅक्टली अंतु बर्वा स्टाइल) असते.

वर दाखवलेली भाषा कोणत्या चित्पावनांची बोली आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अलीकडे (गेल्या पन्नास वर्षांत) ही बोली जवळजवळ अस्तंगत झाली आहे. पण अजूनही गोवा, सिंधुदुर्ग, कारवारमधल्या चित्पावनांच्या काही पॉकेट्समध्ये थोडीफार बोलली जाते. चिपळूणकडे अजूनही क्वचित ठिकाणी वृद्धांकडून 'आणत्ये, आणतो' ऐवजी 'हाडत्ये, हाडतो' असे बोलले जाते. काही जुन्या मराठी पुस्तकांत या बोलीचे नमुने सापडतात. सुमारे तीस-चाळीस वर्षांपूर्वी कारवारमधली चित्पावनांची एक छोटी वस्ती केवळ या जुन्या चित्पावनीशी साम्य दाखवणार्‍या त्यांच्या बोलीमुळे चित्पावन म्हणून जगाला कळली असे वाचले आहे. महादेवशास्त्री जोशींचे आत्मचरित्र, ह.मो.मराठे यांचे बालकांड, आणि 'चित्पावन' हे चित्पावनांवरील लेखांचे संकलित पुस्तक यांत या बोलीचे नमुने सापडतात. त्यात 'बालकांड' मधील भाषा अस्सल, भेसळरहित चित्पावनी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळ्या बोली वाचायला नेहेमीपेक्षा बराच जास्त वेळ लागला. वाचताना गंमत वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.