विश्वाचे आर्त - भाग ११ - सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट

'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' हा वाक्प्रयोग स्वतः डार्विनने प्रथम वापरला नव्हता. हर्बर्ट स्पेन्सरने उत्क्रांती घडवून आणणाऱ्या नैसर्गिक निवडीचे वर्णन करताना तो वापरला. तो इतका नेमका ठरला की डार्विननेही आपल्या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्त्यांमध्ये वापरायला सुरूवात केली. एखादी कल्पना नेटकेपणाने मांडण्यासाठी अशा मोजक्या, प्रभावी शब्दांच्या वाक्प्रचारांचा उपयोग होतो खरा; पण काही वेळा त्या सोपेपणाची किंमत गैरसमजांतून मोजावी लागते. किंबहुना असे आकर्षक वाक्य मनात ठासून बसले की त्याचे आपल्याला हवे ते अर्थ काढून तोच उत्क्रांतीवादाचा सारांश समजणे साहजिक होते. मराठीत त्याचे शब्दशः भाषांतर 'सर्वात लायक तगून राहातात' असे होईल. पण सर्वात लायक म्हणजे नक्की कशासाठी? तगून राहाणे म्हणजे काय? बळी तो कान पिळी असा अर्थ अपेक्षित आहे का? या जगात शक्तिवान लोकांना दुर्बळांचा नायनाट करण्याची मुभा या वाक्याने दिली आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. या वाक्याचा अर्थ नक्की काय, आणि नक्की काय नाही हे आपण समजून घेऊ.

'फिट' या शब्दाचा अर्थ आपण सुडौल, शक्तिवान, चपळ शरीराशी जोडतो. या अर्थाचा एक थर तसा आहेच. मात्र फिट याचा दुसरा अर्थ 'फिट बसणे' याच्याशीही निगडित आहे. आपल्या सर्वसाधारण वापरात तो विशिष्ट खोबणीत बरोब्बर बसणे या अर्थाने वापरतो. किंवा एखाद्या समूहात इतरांशी मिळतंजुळते घेत आपली जागा बरोबर धरून राहाण्यालाही फिट बसणे म्हणतात. नैसर्गिक निवडीच्या संदर्भात फिटेस्ट म्हणजे सर्वात शक्तिवान किंवा सर्वाधिक सौष्ठव असलेला हा अर्थ कमी असून तत्कालीन परिस्थितीत जगण्यासाठी आवश्यक असे गुण बाळगणारा हा अर्थ होतो. म्हणून मराठीत त्यासाठी लायक हा शब्द वापरला आहे. सर्व्हायव्हल म्हणजे अर्थातच टिकून राहाणे. अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीत मिळतंजुळते घेऊन तगून राहाणे. 'ज्या सजीवांमध्ये आपल्या भवतालाशी मिळतंजुळते घेण्याची सर्वाधिक क्षमता असते ते टिकून राहातात, कमी क्षमता असलेले टिकून राहू शकत नाहीत.' हा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टचा अर्थ आहे. म्हणून सर्वाधिक लायक तगून राहातात हे सोपे भाषांतर. तरीही या वाक्यातून अनेक चुकीच्या अर्थच्छटा स्वीकारल्या जाण्याचा धोका आहे. त्यासाठी आपल्याला ते नीट तपासून घ्यायला हवे.

टिकून राहाणाऱ्या अनेक गोष्टी आपण बघतो. खरे तर टिकून राहाणे हे आपण सजीवांपेक्षा निर्जीवांबाबत अधिक सत्य मानतो. 'आयुष्य क्षणभंगूर आहे. माणसाचे जीवन मर्यादित आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव मृत्यू पावतो' या गोष्टी आपण गृहित धरतो. याउलट 'हिमालय पर्वत अचल, अढळ, अमर आहे' म्हणतो. किंवा 'जोपर्यंत आकाशात सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत...' असे म्हणत आपण सूर्य-चंद्राचे कायमचे अस्तित्व अधोरेखित करतो. हिमालय, सूर्य, चंद्र टिकून राहातात. हिमालयावरचे हिम दरवर्षी वेगळे असेल, काही दगड तुटतील, कडे कोसळतील, पण एक पर्वतरांग म्हणून त्याचे स्वरूप बदलत नाही. आपल्या महाकाय आकारामुळे बदलच न घडणे किंवा घडलेले हे एक प्रकारचे स्थैर्य आहे. सजीवसृष्टीमधले स्थैर्य वेगळ्या स्वरूपाचे असते. त्यांचे टिकून राहाणे पर्वत-नद्यांपेक्षा भिन्न असते. एक विशिष्ट हरीण घेतले तर ते त्याचे आयुष्य संपेपर्यंतच टिकून राहाते. पण हरीण ही जमात, ती प्रजाती पिढ्यानपिढ्या टिकून राहाते. हरणांची एक पिढी आपल्यासारख्याच पिढीला जन्म देते आणि मरून जाते. आणि हे चक्र चालू राहाते. त्या विशिष्ट हरणाचे पाडस पाहिले तर ते हुबेहुब आपल्या आईवडिलांप्रमाणे नसते. तसे कुठचेच हरीण दुसऱ्या कुठल्याही हरणासारखे हुबेहुब नसते. मग एका पिढीतून पुढच्या पिढीत नक्की काय जातं? याचे उत्तर आहे - गुणधर्म. आपण हरीण कसे ओळखतो? त्याचा आकार, त्याच्या अंगाचा रंग, त्यावरच्या ठिपक्यांचा पॅटर्न, त्याच्या चेहेऱ्याची ठेवण, गवत खाण्याची सवय, धावण्याचा साधारण वेग, चित्त्याचे अन्न असणे - या सर्व गुणधर्मांचा समुच्चय असलेला प्राणी म्हणजे हरीण. त्यामुळे टिकून राहातात ते विशिष्ट प्राणी नव्हेत, किंवा हुबेहुब तसेच प्राणी नव्हेत; तर त्या प्राण्याच्या व्यवच्छेदक गुणधर्मांचा एकत्रित समुच्चय. या गुणधर्मांचे पिढ्यानपिढ्या टिकून राहाणे हे हिमालय किंवा सूर्य-चंद्र टिकून राहाण्यापेक्षा वेगळे आहे. पर्वत हे एका जागी असतात, किंवा भौतिकदृष्ट्या बदलत नाहीत. याउलट प्राणी जन्मतात-मरतात पण त्यांच्या प्रजातीचे स्वरूप तेच राहाते.

पहिल्यांदा उत्क्रांती शिकताना 'समूह टिकून राहातो' या पद्धतीची मांडणी केलेली मी ऐकली होती. ती पूर्णपणे चुकीची नाही, पण तितकीशी बरोबरही नाही. 'समूहाच्या भल्यासाठी' प्राणी काहीतरी करत असतात किंवा निदान त्यांनी ते करावे तरी अशा काहीशा रोमॅंटिक विचारांचा तीवर पगडा होता. ती मांडणी पुरेशी बरोबर नाही. व्यक्तीही टिकून राहात नाहीतच. म्हणून या टिकून राहाणाऱ्या गुणधर्मांचा विचार करण्यासाठी 'जीन पूल' किंवा 'जनुक समुच्चय' ही संकल्पना आहे. म्हणजे समजा एखाद्या प्रजातीत पंखांचे रंग काळे किंवा पांढरे असू शकतात. काही कारणामुळे १० टक्के काळा रंग असलेले आणि ९० टक्के पांढऱ्या रंगाचे जीव आहेत. याचा अर्थ जनुक समुच्चायात पंखांचा रंग ठरवणाऱ्या जनुकांपैकी काळा रंग निर्माण करणारी १० टक्के जनुके आहेत आणि पांढरा रंग निर्माण करणारी ९० टक्के जनुके आहेत. आता या दोन जनुकांमध्ये फिटेस्ट किंवा तगायला लायक नक्की कुठचं? थोडक्यात पंखांचा रंग काळा असलेला चांगला की वाईट? याला सरळसोट उत्तर नाही. कारण हे परिस्थितीनुसार ठरते. परिस्थिती बदलली की त्याला प्रतिसाद म्हणून या दोनपैकी कुठचा रंग 'चांगला' हे ठरते.

याचे एक उदाहरण आपल्या डोळ्यांदेखतच, म्हणजे गेल्या दोनशे वर्षांत घडलेले आहे. औद्योगिक क्रांतीच्या आधी काळ्या रंगाचे पतंग (मॉथ) हे अतिशय कमी प्रमाणात आढळत असत. सुमारे नव्व्याण्णव टक्के पतंग हे पांढऱ्या रंगाचे व त्यावर काळे ठिपके असलेले असत. पांढुरक्या रंगाच्या झाडांच्या बुंध्यांच्या पार्श्वभूमीवर ते दिसायला अवघड होते, याउलट काळे पतंग चटकन उठून दिसत. आणि भक्षक पक्षी त्यांना खाऊ शकत. मात्र औद्योगिक क्रांतीमुळे ही परिस्थिती बदलली. अनेक ठिकाणी नवीन झालेल्या गिरण्यांच्या धुरामुळे झाडांच्या बुंध्यांवर काळे थर जमले. आता या काळ्या रंगांवर पांढरे पतंग उठून दिसायला लागले. याउलट काळ्या पतंगांना पार्श्वभूमीत मिसळून जाता आल्यामुळे संरक्षण मिळाले. त्यामुळे औद्योगिक क्रांती चालू असतानाच्या काळात - एकोणिसाव्या शतकात - काळ्या रंगांच्या पतंगांचे प्रमाण प्रचंड वाढले. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात प्रदूषण हळूहळू कमी झाले. त्यामुळे पुन्हा परिस्थिती बदलली. आता झाडांवर काळ्या रंगाचा थर नाहीसा झाला. औद्योगिक क्रांतीपूर्वीचीच परिस्थिती परत आली. आणि त्याचबरोबर जनुकसमुच्चय बदलून त्यामुळे काळ्या रंगाच्या पतंगांची संख्या कमी झाली, पांढऱ्या रंगांच्यांची संख्या वाढली.

या उदाहरणावरून एक मुख्य गोष्ट दिसून येते ती म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट मधला फिटेस्ट किंवा तगण्यासाठी लायक हा काही आधीच ठरलेल्या गुणांचा संच नसतो तर ते गुणधर्म कुठचे हे परिस्थितीनुसार ठरते. म्हणजे काहीसे असे - अधिक वेग, अधिक शक्ती, अधिक चपळता हे गुणधर्म आपल्याला 'फिट' असण्याशी जोडलेले वाटतात. पण उत्क्रांतीच्या बाबतीत हे नेहेमीच बरोबर असेल असे नाही. वेगवान ससा हा जसा उत्क्रांत आहे, तसंच हळूवार चालणारे कासव हेही उत्क्रांत आहे. त्या दोघांकडेही आपापल्या परिस्थितीत, आपापल्या पद्धतीने जगण्यासाठी आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक अशा जनुकांचा समुच्चय आहे. यापैकी कुठचा चांगला अथवा कुठचा वाईट असे आपल्याला म्हणता येणार नाही. मनुष्याला बुद्धी आहे, त्याला भाषा बोलता येतात, त्याने तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवले आहे, म्हणून आपल्याला असे वाटू शकते की मनुष्य हा सर्वोत्तम, किंवा उत्क्रांतीच्या सर्वोच्च पायरीवर असलेला प्राणी आहे. पण ते खरे नाही. इतर प्राणीही आपल्याप्रमाणेच त्यांच्या त्यांच्या जीवनपद्धतीत टिकून राहिलेले आहेत. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून अमुक गुणधर्म चांगला, किंवा तमुक गुणधर्म कमी दर्जाचा असे काही नाही. कारण नैसर्गिक निवड ही आंधळी असते. कोणी ती विशिष्ट दिशेने प्रवास व्हावा म्हणून करत नाही. पतंगांच्या उदाहरणावरून दिसते की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या वाक्प्रयोगात काळे वाईट - पांढरे चांगले असा काळापांढरा, ठरीव विचार नाही. ज्या परिस्थितीत जे गुणधर्म विशिष्ट प्राण्याला जगून राहायला, टिकून राहायला, आणि पुनरुत्पादन करून आपले गुणधर्म पुढच्या पिढीत पाठवायला मदत करतात त्या गुणधर्मांचा समुच्चय टिकून राहातो.

(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

याही वेळेला उदाहरण एकदम चपखल. पतंगांचं. लेख आवडला.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !