वडखळ, पळी, कोर्लई, तिसऱ्या आणि सासवने

'वरच्या' कोंकणात मित्रांना घेऊन जायचे कबूल करून दशके लोटली. एवढ्याएवढ्यात मी एकटाच काही खाजगी कामांनिमित्त पनवेल-पेण-रोहा-पाली-माणगांव अशा चकरा मारतोय म्हणताना गेली एकतीस वर्षे मला झेलणारा उमेश चेकाळला. नुकताच त्याने इनोव्हा नामक मिनि-ट्रक खरेदी केला होता.
"हे बघ, फॅमिलीला नळस्टॉपला नेण्यासाठी इनोव्हा घेतलेली नाहीय्ये. तू भोसडिच्च्या एकटाएकटाच जाऊन येतोस तर पुढच्या वेळेला मीपण येणार. सकाळी चारला निघायचं का, तर तसं सांग. झोपायलाच ये रात्री माझ्याकडे. सेलमध्ये तीन बर्मुडा घेतल्या आहेत त्यातल्या दोन तशाच कोऱ्या आहेत. त्यातली एक वापर, दुसरी घेऊन जा" उम्या बरसला.
बोलणे सोपे होते. कुठल्याही सामूहिक कार्यात येतात त्याच अडचणी इथेही होत्या. प्रश्न पहिला, कुणा(कुणा)ला बोलवावे. विद्यापीठात संगणकशास्त्र विभागात माझ्यासोबत शिकणारे दहाएकजण पुण्यात आहेत. याहूग्रुपवर ईमेल धडकावली. अपेक्षेप्रमाणे 'हा शनिवार नको, पुढचा जमेल', 'पुढचा नको, मी पुढच्या महिन्यात भारतात परत येणार आहे' असली उत्तरे सुरू जाहली. कुठलाही यशस्वी प्रकल्प व्यवस्थापक करतो तेच मी केले - दुर्लक्ष करून बसून राहिलो.
आणि एकदम एके दिवशी सगळ्यांना फोन धडकावले. "उद्या जायचे आहे. तुला जमेल का? " प्रकरण इतके गळ्याशी आल्यावर उमेश आणि राकेश एवढेच उरले. मग फर्ग्युसनमधल्या वसंताला कौल लावला. तोही उजवा मिळाला. चारजण झाले.
इतरांसोबत सकाळी लौकर निघणे म्हणजे माझ्यासाठी उत्तम 'स्ट्रेस टेस्ट' असते. वसंता धनकवडीहून येणार होता. उमेश मयूर कॉलनी आणि राकेश परांजपे शाळेजवळ, म्हणजे दोघेही कोथरूडमध्ये. वसंताने नळ-स्टॉपला यावे, मी प्रभात रस्त्यापासून चालत तिथे पोहोचावे, मग आम्ही उमेशकडे जावे आणि वसंताची दुचाकी तिथे लावून इनोव्हामधून निघावे आणि राकेशला उचलावे असा बेत ठरला.
वसंताचा प्रश्न नव्हता. तसाही तो रोज सव्वापाच वाजता उठून सहा वाजता सायकल मारीत योगासनांना जातो. नियोजित वेळ गाठण्यासाठी त्याला अर्धाच तास आधी उठावे लागले असते.
राकेशचाही प्रश्न नव्हता. पंधराएक देशांत काम करत असलेला हा गडी इंटरनॅशनल उड्डाणांना सरावला होता. त्यामुळे सहाऐवजी तीनला निघायचे असते तरीही त्याचा आक्षेप नव्हता.
विद्यापीठात दोन अख्खी वर्षे उमेशचा रूम पार्टनर असल्याने मी त्याची झोप जाणून होतो. त्यामुळे त्यालाच नव्हे तर त्याच्या बायकोलाही पुनःपुन्हा बजावून मी कसाबसा झोपी गेलो.
सकाळी पावणेपाचलाच उम्याला फोनवरून ढोसायचा प्रयत्न केला. 'स्विच्ड ऑफ'. आयडिया-एअरटेल भांडण असेल म्हणून पाच मिनिटांनी परत केला. तरीही 'स्विच्ड ऑफ'. अजून दोन वेळा केल्यावरही तेच. लगेच त्याच्या लँडलाईनवर केला. नेम बरोबर लागला. चिंतनगृहात गेलेला उम्या धडपडत बाहेर आला नि जागा असल्याचे त्याने जाहीर केले. राकेशलाही हलवून पाहिले. तो जागा होता.
या फोनाफोनीदरम्यान सकाळची आन्हिके उरकून मी पाच वीसला घराबाहेर पडलो नि पाच अठ्ठावीसला नळस्टॉपला दाखल झालो.
कधीनव्हत वसंतानेच पंधरा मिनिट उशीर केला. त्याच्या मागे टांग टाकून बसलो नि उमेशच्या घरी पोहोचलो. उमेशभाऊ फक्त पंधरा मिनिटांत खाली आले. सहा वाजून गेले होते. एकंदर परिस्थितीचा राकेशला घरबसल्या अंदाज आला बहुधा. कारण त्यानेही दहा मिनिटे खाल्ली.
साडेसहाच्या जरा आधी का होईना, निघालो.
शनिवारच्या सकाळी आणि एवढ्या लौकर गर्दी अशी लागली नाही. टोलवेवरच्या सीसीडीला एक थांबा घेतला. गेली चारेक वर्षे मी महिन्यातून सरासरी एकदा तरी या सीसीडीला जातो. कधीही मी सोडून तीनपेक्षा इतर गिऱ्हाईके दिसलेली नाहीत. निम्म्या वेळाहून जास्त मी एकटाच असतो. त्यामुळे तिथल्या सोफ्यांवर रेलून बसत कॅपुचिनोची वाट पाहणे सुखद वाटते.
मात्र उशीर झालेला असल्याने सगळ्यांची ऑर्डर 'टू गो' करायला भाग पाडले नि निघालो. खोपोलीमध्ये 'रमाकांत'चा बटाटेवडा सर्वांना खाऊ घालावा असे डोक्यात होते. साडेसातला पोहोचलो तो कळले की 'रमाकांत' आज बंद आहे. का कुणास जाणे.
तत्परतेने पेण रस्ता घेतला. गोडसे भटजींचे वरसई ओलांडून पेणेत शिरलो आणि न थांबता पुढे होऊन वडखळ नाक्यावरचे लवाट्यांचे 'क्षुधाशांतीभुवन' गाठले. चाळीसेक वर्षांपूर्वी इथे पहिल्यांदा आलो होतो. त्यानंतर अधूनमधून खंड पडत का होईना, जाणेयेणे होते. एवढ्याएवढ्यात जाणे झाले नव्हते. म्हटले त्या निमित्ताने QC तरी होईल.
'क्षुधाशांतीभुवन' random QC check अगदी सहजगत्या पार करून गेले. वडा-उसळ झकास. मिसळ नि पोहे उत्तम. आणि कोथिंबीरवडी सगळ्यात फर्मास. खाण्याचा सोडा न घातलेली कोथिंबीरवडी पुण्यात मला तरी कुठे गावली नाही.
तृप्त होऊन ढेकरा देत सगळे बाहेर पडले. नऊ वाजून गेले होते. माझ्या बेताप्रमाणे सकाळच्या खाण्याचा टप्पा पार झाला होता. 'रमाकांत' ऐवजी 'क्षुधाशांतीभुवन' एवढेच.
वडखळपासून अलिबागचा रस्ता वेगळा होतो. धरमतरची खाडी ओलांडून पोयनाड करीत पळी गाठले.
या भागात ज्यू लोकांची वस्ती पूर्वीपासून होती. त्यातले बरेचजण इस्रायलला रवाना झाले, पण अजूनही काहीजण टिकून आहेत. त्यात इथल्या सॅम्सन दिघावकर ऊर्फ डी. सॅम्सन या गृहस्थांनी साधारण १९३५ च्या सुमारास सोडा फॅक्टरी सुरू केली. वेगळेपण एवढेच की सोडा करण्यासाठी ते त्यांच्या विहिरीचे पाणी वापरीत. विहिरीचे पाणी थोडे जड असते, त्यामुळे सोडा फार फसफसत नाही. पण नेहमीच्या बेचव सोड्यापेक्षा वेगळी आणि चांगली चव लागते. दुकान अजूनही जुन्या पद्धतीचे आहे. लाकडी बाकडी अन टेबले. साधा सोडा आणि फ्लेवर्ड सोडा. आईस्क्रीम सोडा, लेमन सोडा, जिंजर सोडा आदि. मुंबैहून गाड्या उडवीत येणाऱ्या लोगसाटी दुकानात (आणि दुकानाबाहेरही) पाटी आहे "आमची गाडीपर्यंत सर्व्हिस नाही".
सर्व सोबत्यांना पळीचा सोडा आवडला. राकेशने तर तत्परतेने दुसऱ्याच पेपरला मला सगळ्या परीक्षेत पास करून टाकले. म्हटले थांब, अजून कोर्लई, खेकडे नि सासवने बाकी आहे!
तिथून गाडी हाणली ती अलिबागला थोडास्सा बायपास करून रेवदंड्याच्या मार्गाला लावली. अलिबाग रेवदंडा अंतर आहे वीसेक किलोमीटरच. पण रस्ता एकेरी, वाटेतल्या सगळ्या गावांच्या थेट मध्यातून जाणारा आणि शिवाय खड्ड्यांनी भरलेला. रंग न दिलेले स्पीडब्रेकर्स आहेतच. तसे ते वडखळ अलिबाग रस्त्यावरही भरपूर आहेत. एकूण काय, पाऊणेक तास लागतो.
रेवदंड्याची खाडी ओलांडली की डावीकडे बिर्लांची स्टील फॅक्टरी, जी आता बहुधा बंद आहे, आणि रोह्याला रस्ता जातो. उजवीकडे जंजिऱ्याचा रस्ता. त्या रस्त्यावर एखाददोन किलोमीटर गेल्यावर लगेच उजव्या हाताला कोर्लई गाव लागते. तसा उजवीकडे वळल्यावर लगेचच उजव्या हाताला कोर्लईचा किल्ला दिसू लागतो. कोर्लई गावातला रस्ता अगदीच चिंचोळा आहे. इनोव्हा घातल्यावर सायकलीलाही जागा उरणार नाही असा. पण उमेशभाऊ निर्धास्त होते. "इनोव्हा माझी आहे. भीती/धास्ती वाटायची असेल तर दुसऱ्याला वाटायला हवी" हे त्याचे तत्त्वज्ञान.
कोर्लई गावापासून किल्ल्यावर चढून जायचीही वाट आहे. किल्ला अगदीच बुटका आहे, साधारण वेताळटेकडी एवढा. पण समुद्राकडच्या बाजूने एक कच्चा रस्ता निम्मे अंतर चढून दीपगृहापर्यंत पोहोचतो. त्या रस्त्याला एका बाजूला समुद्र नि दुसऱ्या बाजूला टेकडी असे रमणीय दृष्य अनुभवता येते.
दीपगृह काही विशेष नाही. किल्ला दीपगृहापेक्षाही उंच आहे. फक्त कधी आतून बघितलेले नसेल तर जाऊन यायला हरकत नाही. माणशी वीस रुपये अशी रखवालदाराची धन करावी लागते एवढेच. डांबर फासलेल्या (गंजू नये म्हणून) लोखंडी जिन्यावरून वर चढणे जरा कष्टाचेच आहे. उमेश आता किलो सोडून क्विंटलमध्ये गेला असल्याने त्याला बरेच जड गेले.
तिथून बाहेर पडून मागच्या पायऱ्यांनी किल्ला गाठला. किल्ला फार चिंचोळा आहे. जास्तीत जास्त शंभर फूट रुंद असेल. लांबीला बरा आहे. वरती कुणीच नव्हते. दोन गोमातेचे पुत्र चरत होते पण आमच्या वाट्याला गेले नाहीत. 'गोवंशहत्याबंदी विधेयक' पारित झाल्याने माणसांवर खूष असावेत. एक कुत्रे आले नि हाड केल्यावर बिचकले. परत हाड केल्यावर पळूनच गेले.
राकेशबुवांनी किल्ला चढल्यावर बैठक मारली. मी उमेश आणि वसंता हिंडायला लागलो. उमेश नि वसंताने फोटो काढून व्हॉटसॅपवर चढवायचा राष्ट्रीय महत्त्वाचा कार्यक्रम धूमधडाक्याने चालू केला. मी आदिमयुगातला असल्याने माझ्या सेलफोनवर कॉल, मेसेज आणि सकाळचा गजर या तीनच गोष्टी करता येतात म्हणून मी मोकळेपणाने हिंडत बसलो.
ऊन चटकायला लागले होते म्हणताना तासाभरात खाली उतरलो. आता अलिबागेत 'पतंग'मध्ये जेवण.
उन्हाच्या चटक्याने डोके तावले होते. वाटेत एक बिअर शॉपी (ही 'शॉपी' भानगड कुठून आली कुणास ठाऊक. पुण्यात पंचवीसेक वर्षांपूर्वी रूपालीच्या तिरके समोर 'सुपर शॉपी' नामक दुकान उघडले होते त्याची आठवण झाली) गाठली, दोन बडवाईजर घेतल्या नि सारथ्य राकेशकडे सुपूर्द करून मी नि उमेश मागल्या बाकावर गेलो. राकेश नि वसंता दोघेही चहा-गणक. निवांत मांडी घालून बसल्यावर बॉटल ओपनर नसल्याचे शुभवर्तमान कळाले. तोंडाने बूच उघडण्याचा प्रयत्न एकदा अंगाशी (गालाशी) आला होता. कीचेनने उघडायचा प्रयत्न केला पण कीचेनच वाकली. मग एका खाणावळीपाशी गाडी थांबवून चौकशी केली तर अंगावर वस्कन एक कुत्रे आले. कोर्लईवरच्या कुत्र्याचा नातेवाईक की काय कोण जाणे. पण सुदैवाने बांधलेले होते. आतमधून एक काळीसावळी देखणी बाई बाहेर आली. तिच्याकडे बॉटल ओपनर होता तो उधारीवर घेऊन गाडी गाठली नि दोन्ही बाटल्या उघडून घेतल्या. जाऊन ओपनर परत केला.
ओपनर बिअर शॉपीवाल्याकडे नव्हता हे कळल्यावर मी कॅन्स न घेता बाटल्याच का घेतल्या? कळत नाही. बडवायजर पिऊन चढत नाही, बहुधा पिण्याआधी चढली असावी.
अलिबागेत 'पतंग' रेस्टॉरंट गाठेपर्यंत एकेक बिअर झाली आणि उन्हाने तावलेला जीव थंड झाला. गाडीतल्या एसीमुळे थंड झाला असे काही संशयात्मे म्हणतील. देव त्यांना सद्गती देवो.
इथले खेकडे उत्तम असतात हे माहीत होते. पण नेमके त्याच्याकडे तेव्हा खेकडे नव्हते. तिसऱ्या होत्या. माझा तिसऱ्यांचा अनुभव तोवर फारसा चांगला नव्हता. मातकट चवच बाकीच्या चवींवर मात करते. पण त्याने जे काही 'तिसऱ्या मसाला' म्हणून दिले त्यामुळे मला माझे मत तातडीने बदलावे लागले. बाकी रावस, सुरमई आणि मांदेली झकासच होती.
तिथून बाहेर पडल्यावर मला अचानक बाळपणाची आठवण दाटून आली आणि मी 'लेविस डेविस'चे आईस्क्रीम कुठे मिळेल याची चौकशी सुरू केली. ते पंधराएक वर्षांपूर्वीच बंद झाल्याचे कळले.
तिथून गाडी मारली रेवस रस्त्याला. रेवसच्या आधी, अलिबागेहून वीसेक किलोमीटरवर डाव्या हाताला सासवने-आवास असे जोडगाव आहे. शिल्पकार विनायक करमरकर इथले. कुणाला आठवत असेल तर कुलाब्याच्या कलेक्टर रॉथफील्डने कसे त्यांच्यातले गुण हेरले यावर मराठीच्या पुस्तकात धडा होता.
करमरकरांचे राहते घर त्यांच्या सूनबाईंनी होते तसे जतन केले आहे आणि करमरकरांची शिल्पे नि स्केचेस एका ठिकाणी ठेवून छोटेखानी संग्रहालय केले आहे. पुण्यातला 'एसएसपीएमएस'च्या आवारातला शिवाजीराजांचा पुतळा करमरकरांनी केलेला एवढी माहिती (बहुतेक) सगळ्यांना असते. पण तिथे मांडलेल्या त्यांच्या कलाकृती पाहिल्यावर ती ओळख किती त्रोटक आहे ते कळते. गांधीजींच्या एका 'बस्ट'साठी खुद्द गांधीजींनी सिटिंग दिले होते.
सुरुवात आवाराच्या दारापासूनच होते. पायऱ्या चढल्याचढल्या एक नोकर उकिडवा बसून मालकाच्या हाकेची वाट पाहताना दिसतो. ते शिल्प आहे. कोपऱ्यात एक म्हैस बसली आहे. तेही शिल्प.
त्यांच्या सूनबाईंचेही एक शिल्प त्यात आहे. त्यांच्या सूनबाईंना मागे एकदा भेटलो होतो. आज परत भेटलो‍. त्यांचे वय आता चौऱ्याएंशी आहे. मुलगा रीतीप्रमाणे अमेरिकेत. बाई खमक्या आहेत. आणि त्यांच्या हातातही कला आहे. सर्व पुतळ्यांची देखभाल नि दुरुस्ती त्या स्वतःच्या हातांनी करतात.
माझ्या यादीवरची पाचही ठिकाणे टिकमार्क करून झाली होती. बाहेर पडून परतीचा रस्त्याला लागलो. अलिबागला न जाता थेट कार्लेखिंडीत अलिबाग-वडखळ रस्त्याला जुळता येते. रस्ता भयानक भिकार आहे नि आपल्या राष्ट्रीय धोरणानुसार पाट्या कुठेही लावल्या नाहीयेत. माझ्यावर विश्वास म्हणूनच सगळ्यांनी मौन पाळले आणि कार्लेखिंड आल्यावर सुस्कारा सोडला.
परत पळी. पर्लपेटच्या बाटल्यांत इथले सोड्याचे प्रकार घरी नेता येतात. त्याप्रमाणे मनसोक्त खरेदी झाली. मद्यानंदी मंडळींसाठी एक सूचना. विशेषतः जे जिनांचे वा विद्याताईंचे भक्त असतील त्यांच्यासाठी. इथल्या आईस्क्रीम सोड्यात पाण्याच्या रंगाच्या त्या मद्यांची मिसळण अगदी सुंदर होते. आणि त्यामुळेच घात होण्याची शक्यता दाट असते. आईस्क्रीम सोड्याच्या चवीमुळे नक्की किती मद्यार्क पोटात जातो आहे याचे भान सुटते!
परतताना पेणेत शिरलो आणि सहावे बोनस ठिकाण सगळ्यांना दाखवले. पेणचे पापड.
पेणचे गणपती प्रसिद्ध. त्याखालोखाल पोहे नि पोह्याचे पापड. मग पांढरे कांदे. आता पोह्यांचे विशेष उरले नाही. पण पापड अजून आहेत. मुख्यत्वे पापडांचे आगळेवेगळे प्रकार. नाचणीचे पापड, कोथिंबीरीचे पापड, बिटाचे पापड, पालक पापड इ इ. शिवाय सांडगी मिरची, दह्यातली मिरची, ताकातली मिरची इ प्रकार. रामधरणे पन्नासेक वर्षे प्रसिद्ध आहेत. एवढ्याएवढ्यात सान्यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. सान्यांकडेच मंडळींना घेऊन गेलो आणि त्यांच्या (आपापल्या) बायकांच्या खाती त्यांचे गुण वाढवून दिले.
गाडीकडे परत येताना चावडीनाक्यापासच्या व्यायामशाळेशेजारी प्रभात बेकरीतून खमंग पावाचा सुवास दरवळत होता. मुकाट्याने पाव, वाटी केक आदिंची खरेदी झाली.
मग मात्र गाडी पुण्याच्या दिशेला हाणली. वाटेत विनोबा भाव्यांचे, पण इंद्राणी मुकर्जी या महानायिकेमुळे प्रसिद्धीस आलेले, गागोदे लागते. तिथून टोलवे गाठायला फार वेळ लागत नाही. सुदैवाने टोलवेवर गर्दी दाटलेली नव्हती.
सकाळी सहा म्हणून साडेसहाला निघालेलो तो रात्री साडेआठला परतलो.

(सहप्रसिद्धी: मनोगत)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

व्वा! छानच प्रवास!

इथेही भरपूर दिवसांनी परतलात, आता येत रहाल ही अपेक्षा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झक्कास. आवासचं संग्रहालय पाहिलं आहे. फार आवडलं होतं.

मला एकदा गेटवेपासून सुरू करून गोव्यापर्यंत कोकणप्रवास समुद्रमार्गे करायचा आहे. टप्प्याटप्प्याने. हा उद्योग कोणी केला आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मस्तं. आमच्या उनाड दिवसांची आठवण झाली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

प्रवासवर्णन व खाद्यंती वर्णन आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चौकस स्टाइल लेख. नेहमीप्रमाणेच आवडला. करमरकरांचे शिल्पसंग्रहालय पाहिले आहे. सूनबाई मोठ्या धडाडीने एव्हढे सारे सांभाळीत असतात.
खरे तर अलिबाग, वडखळ, सासवने ह्या परिसराची (प्रवासवर्णणांच्या) अतिपरिचयाने अवज्ञा झाली आहे. पण आपल्या चौफेर आणि चमकदार तरीही अलगद फटकेबाजीमुळे हे छोटेखानी प्रवासवर्णन रंजक झाले आहे. गालांशी आलेला प्रयत्न आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खास चौकसशैलीतला लेख आवडला.
(पेण म्हटलं की आईस्क्रीम सोडे न आठवता, निराळेच सोडे आठवतात - पण ते एक असो!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छोटेखानी, धावते प्रवासवर्णन आवडले.

ह्या परिसरातून असंख्य वेळा जा-ये केली आहे. अगदी अलिकडचे सांगायचे तर परवाचाच दिवाळीनंतरचा विकांत हा काशिदच्या समुद्रकिनार्‍यावर घालवला. दिवाळीत गोडावलेली जीभ थोडी खारवणे जरूरीचे होते! तेव्हा बांगडा, रावस, सुरमई, पापलेट अन् कोलंबीला पर्याय नव्हता. सोबतीला खारा वारा आणि रंगीत पाणी!! (शनिवारी रात्री रामदासांचा फोन आला तेव्हा रथ दंशागुळे वरच होता! )

सॅम्सन यांचा सोडा प्रसिद्ध आहेच तसेच पतंगचे जेवणदेखिल. पतंगची तंदळाची भाकरीही मस्त. तसे अलिबाग गावात सन्मान म्हणून एक खाणावळ आहे पण तिथे गाडी घेऊन जाणे थोडे मुश्किल आहे. बाकी पापड, पोहे, मसाले इत्यादी पदार्थांसाठी नागाव-अलिबाग रस्त्यावर ठिकठिकाणी स्टॉल्स लावलेले दिसतात.

ठाण्याहून एखाद दिवसाची चटकन ट्रिप करून यायला हा भाग उत्तम. रत्नागिरी-सिंधुदुर्ग-गोव्यासाठी आधी प्लॅनिंग करावे लागते.

तुम्ही कोरलई आणि सासवण्याचा विषय काढलाहेत तर थोडी झैरात करून घेतो!

अलिबागहून मुरुड-जंजिर्‍याकडे जाताना वाटेत रेवदंड्याची खाडी लागते. ती पार करून, मुरुडला जाण्यासाठी उजवीकडे वळले, की पहिलेच गाव लागते - कोरलई.

मुरुडकडे सुसाट न पळता थोडे ह्या गावात रेंगाळा. फार मजेशीर गोष्टी समजतील. हे गाव बहुतांशी ख्रिस्ती. गावकर्‍यांचा तोंडावळादेखिल थोडा वेगळा. आणि भाषा? ती तर फारच वेगळी!! म्हणजे तुमच्या-आमच्याशी अगदी व्यवस्थित मराठीत बोलतील पण आपापसात ती मंडळी काय बोलतात याचा तुम्हाला थांगपत्ता लागणार नाही! कारण ती भाषा आहे जुनी पोर्तुगिज - मराठी मिश्रित.

चौल ही चिमुकली पोर्तुगिज वसाहत. १६८३ साली संभाजी महाराजांनी एका झडपेत चौल काबीज केले. त्यावेळी चौलमधिल काही पोर्तुगीज कुटुंबे जीव वाचवण्यासाठी खाडी ओलांडून कोरलईला आली आणि तिथेच स्थायिक झाली. उत्तरेला वसई आणि दक्षिणेला गोवा येथे मोठ्या पोर्तुगिज वसाहती होत्या पण त्यांचा कुणाशीच संबंध राहिला नाही आणि एक चिमुकला पण वेगळाच समाज निर्माण झाला!

(स्त्रोत - http://misalpav.com/node/6322)

अलिबागजवळ सासवणे नावाचे एक गाव आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार करमरकर यांचे ते गाव. त्यांच्या राहत्या घराचे आता "शिल्पालय" ह्या नावाने एका प्रदर्शनरुपी संग्रहालयात रुपांतर करण्यात आले आहे. तीन-साडेतीन वर्षांपूर्वी तेथे जाण्याचा योग आला होता. तेव्हा काढलेली ही छायाचित्रे.

१) बसलेली म्हैस
२) आदिवासी मुलगा
३) कुत्रा आणि मुलगी

(स्त्रोत - http://aisiakshare.com/node/1200)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास.नेहमीच्या प्रवासवर्णनात बसण्यासारखे आहे.त्याचे एक टेम्प्लेट करावे आणि त्यात थोडी नावे टाकली की झाले.
टेम्प्लेट:
फोन केलो--**हो म्हणाले--**इतके टांगारू--*अमुक उठला नाही--तमुक **विसरला--वाटेत **खाल्लं-- पोहोचलो एकदाचे--फोटो--दमणूक आणि कावळे ओरडू लागले--**इथे खाल्लं--फोटो--**प्यायलो--टायर पंक्चर/ट्राफिक जाम/यसटी नाही पैकी एक--**वाजता पोहोचून तंगड्या वर करताना--आठवणी--फोटो मिळाले की टाकतो **अमक्याकडे आहेत.

बर्मुडाची घडी कुठल्या किनाय्रावर मोडली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त खुसखुशीत भटकंती वृत्तांत !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रवासवृत्तांत आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोर्लईतील वांगी फार चांगल्या चवीची म्हणून प्रसिध्द आहेत. आणि त्या भागात असं सांगतात की कोर्लईचे गावकरी ते बियाणं चुकूनही बाहेर कुणाला देत नाहीत.
नो ओपन डोअर पॉलिसी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0