कामिनीचं ४१ वं प्रकरण

तब्बल ४१ व्या वेळी तेच फेमस , नेहमीचं, पाचवीला पुजलेलं वाक्य ऐकून माझ्या पोटात ते ऐकल्यावर येतो तस्साच गोळा आला, काहीही फरक नाही. चहाचा एकेक घुटका सावकाश घेत आणि डोळ्यात तेच हरीणीचे भाव आणून कामिनी सांगत होती
"यावेळेस हटके आहे गं. मी यावेळेस १००% प्रेमात पडले आहे."
.
मला कळून चुकले होते की आता कमीत कमी १ तासाची तरी वाट लागलेली आहे आणि पुढील कदाचित एक महीना तरी याच विषयावर आपले कान किटणार आहेत.
खुर्चीचा आधार घेत मी यांत्रिकपणे म्हटलं - "वेगळं म्हणजे नक्की काय आहे?"
माझ्या एवढ्याशा प्रतिसादास, प्रोत्साहन समजून कामिनी उत्साहाने दात काढत म्हणाली - "अगं यावेळेस माझी खात्रीच आहे. की हा म्हणजे "तो"च ज्याच्याकरता मी इतकी वर्षं वाट पाहीली. ज्याची वाट पाहून, मी म्हातारी व्हायची वेळ आली आहे."
.
निदान एक वाक्य तरी सेन्सिबल बोलली या आनंदात मी माझा चहाचा कप ओढत म्हटलं -"अगं पण मागच्या आणि त्याच्या मागच्या वेळेसही तुला अगदी अस्सच वाटलं होतं. आठवतं? आठवतं? तब्बल १ महीना टिकलं होतं बघ."
यावर विनाकारणच चवताळून कामिनी उद्गारली -"उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला करु नकोस. गेल्या वेळेचं अगदीच वेगळं होतं. एक तर ते एकतर्फी होतं शिवाय एक नाही दीड महीना टिकलं होतं अन शिवाय शुक्राच्या वक्री दशीत सुरु झालेलं होतं. I should have had better sense not go into it in that inauspicious period"
मुद्दा विंग्रजीत सांगीतला की नीट आणि लवकर पटतो असे कामिनीचे मत आहे.
.
"अगं काय म्हणतेस यावेळचं एकतर्फी नाही? म्हणजे त्यानेही रिस्पॉन्स दिला?" आनंदाने चकली मोडत, मी बहुतेक जास्तच आश्चर्याने विचारले असावे कारण कामिनी हिरमुसून म्हणाली "एवढं काहीनवल वाटायलानकोबर्का"
फणकारा आला की ती स्वर-व्यंजन सर्वांची माता-भगिनी एक करुन टाकते, "म्हणजे आमचं बोलणं असं काहीच झालेलं नैय्ये पण मी कविता टाकताच लगेच त्याचीच लाइक येते एवढच काय पहीली कमेंट त्याचीच येते, मी जेव्हा लॉग इन होते तेव्हा तोही लॉग इन होतो"
खरं पाहता कामिनी चेपुवरच पडून असते. तो काय कोणीही लॉग इन होतं तेव्हा ती असतेच.
.
मी आल्याचा चहा संपवून आता सरसावून बसत म्हटलं - "अगं पण हे काय प्रेमाचं लक्षण झालं का? लाइक शिवाय कमेंट कोणीही देईल. लाईक द्यायला वाचावं थोडीच लागतं. ती तर प्रतिक्षिप्त क्रिया असते." (दात काढत)
यावर माझी कीव करत कामिनी उवाच- "ते काहीच नाही गं, त्याला सांगू नकोस पण मी www.astrononsense.org वर जाऊन आमचा कंपॅटिबिलिटी चार्टही काढलाय. त्याचा नेपच्युन-माझा शुक्र आणी त्याचा चंद्र-माझा सूर्य दोन्ही अनुक्रमे मीन व सिंहेत संलग्न असून गुरु चौघांवर बारीक नजर ठेऊन आहे म्हणजे बघ आम्ही "एक दुजे के लियेच्च..... सारी दुनिया एक तरफ लेकिन हमे कोइ जुदा .....".
मी तिला अडवून मध्येच कपाळ बडवत म्हटलं - "अगं मागच्या च्या मागच्याच्या मागे एकदा बघ असच कोणाचा तरी मिथुन तुझ्या शुक्रावर पडून मंगळ संलग्न झालेला ना? तेव्हाही असच हीर-रांझा योग ..."
यावर फिदीफिदी हसत कामी बोलती झाली "इश्श्य काहीतरीच काय शुक्र काय रास आहे का? ग्रह आहे तो त्याच्यावर कसं कोणी पडेल. उगाच काहीतरी तारे तोडू नकोस."
.
एकंदरच तिच्या डोळ्यातील १०० सशांचे भाव बघत आणि दोघींचे कप सिंंकमध्ये टाकत मी समजले की नेहमीप्रमाणे आत्ताही होप्स नाहीत. म्हटलं, "बरं, समजा अगदी तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर तो तुझा सोलमेट का स्टेलमेट का काय आहे मग पुढे?"
यावर आनंदाने चित्कारत कामिनी म्हणाली "आंगाश्शी! आता आलीस मुद्द्यावर! मला वाटतं तो या पुढच्या महीन्यात व्हॅलेन्टाइन डे ला मला प्रपोझ करेल बघ (स्माईल) मग मी आढेवेढे घेत कशी शेवटी हो म्हणेन असं झालय मला."
मी आढेवेढे आपलं आवंढा गिळत तिला म्हटलं "बाई गं, मग तू थांबतेसच कशाला? तूच करुन टाक की इजहार." (डोळा मारत)
मला खरं तर असं झालेलं की या बाईच्या भ्रमाचा भोपळा कधी एकदा फुटतोय अन ती माणसात येतेय.
यावर कामिनी झेपेल तितकं लाजत म्हणाली "नको ग! फार उतावीळ झाल्यासारखं दिसतं ते"
यावर हसू दाबत मी म्हटलं "आहेस डेस्परेट तर दिसू देत की त्यात काय?"
यावर काही न सुचून पण सात्विक संताप येऊन कामिनी म्हणाली "हेच ते म्हणूनच तुला मी काहीही सांगायला जात नाही. पुरुषांप्रमाणे तू विचारलेले नसतानाही सोल्युशन देऊन मोकळी होतेस. ऐकून अशी घेतच नाहीस" Sad
.
एक तास कान किटलेल्या मला, यावर हसावं की रडावं तेच कळेना. शेवटी तिचा खून माझ्या हातून होऊ नये या विशुद्ध हेतूने, व विषय बदलायचा म्हणून मी म्हटलं "बरं यावर परत आल्यावर चर्चा करु. आधी बाहेर तर पडू." आणि पर्सला हेलकावे देत आम्ही दोघी बाहेर पडलो.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

हा हा. मस्तय. अकरावीपासूनची एक मैत्रिण आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर जन्मापासूनची अति जुनी एक मैत्रिण आठवली Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त झाले आहे शुचि. तु दिलेली युआरएल पण क्लिक करुन बघितली इतके खरे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin
असं असतंय होय ते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!