विश्वाचे आर्त - भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर

----
कधी जन्मली पृथ्वी ? जमल्या
निळ्या वायूच्या लगडी सलग
कधी ?
कधी अन् जडतेला त्या
मनामनाचे आले पोत ?
- बा. सी. मर्ढेकर
----

मर्ढेकरांचा हा प्रश्न कळीचा आहे. ‘काही नाही’ या अवस्थेपासून आपल्याला दिसणार्‍या या जगड्व्याळ विश्वाचा पसारा कसा निर्माण झाला? वायूच्या लगडी जमून त्यांची हवा, पाणी, जमीन तयार झाली याची एक वेळ कल्पना करता येते - साध्या भौतिक आणि रसायनशास्त्राच्या नियमांनी ते समजता येते. पण निर्जीव, अचेतन पदार्थांपासून हाडामांसाचे जीव आणि धडधडणारी हृदये कशी काय झाली? मर्ढेकरांनी ही कविता लिहून साठेकच वर्षे झाली असतील पण शतकांनुशतकांपासून मानवाला या प्रश्नाने झपाटलेले आहे.

'आपण का आहोत?' 'या सृष्टीचे कारण काय?' 'माझ्या जगण्याचे उद्दिष्ट काय?' यासारख्या असाध्य पण पाठ न सोडणाऱ्या प्रश्नांसाठी - विंदा करंदीकरांच्या शब्दांत ‘काही केल्या, काही केल्या न जाणाऱ्या निळ्या पक्ष्या’साठी - 'देव' हे एक सुबक सोपे उत्तर आहे. पण हे उत्तर म्हणजे अनुत्तराचा कळस आहे. "या सर्व रचनांचा अर्थ लावायचा असेल तर मला शरण या. मला असा जादूगार माहिती आहे जो या सर्व रचना केवळ एक कांडी फिरवून करू शकतो." म्हणजे आपल्याला पडलेले सर्व प्रश्न घाऊक पातळीवर एकाच सतरंजी खाली लपवता येतात. या सर्वाचे एकच उत्तर - विधात्याची मर्जी. भाषांतर - माहीत नाही, विचारू नका, आणि विचारही करू नका. पण एक महान अतिप्रश्न शिल्लक राहतोच - जर हे सर्व प्रश्न फेकून ज्या अत्त्युच्च शक्तीच्या भरोशावर फेकून द्यायचे, तर ती कशी निर्माण झाली? याचे उत्तर "ती आहेच". या उत्तराचा ‘फायदा’ असा की फक्त एकच प्रश्न अनुत्तरित राहतो. तेवढा एक सहन केला की बाकी सर्व प्रश्नांची उत्तरे ‘सोपी’ होतात. हे म्हणजे हजार हजारची दहा वेगवेगळी कर्जे विकून टाकून त्या बदल्यात पाच लाखाचे एकच कर्ज (वरचे पैसे न मिळवता!) कबूल करण्यासारखे आहे.

पण मर्ढेकरांनी या ओळी लिहिल्या त्याच्या जवळपास शतकभर आधी या प्रश्नाचे उत्तर - निदान त्या उत्तराचा गाभा - एका शास्त्रज्ञाला सापडला होता. त्याचे नाव चार्ल्स डार्विन, आणि त्याने जे उत्तर दिले ते होते उत्क्रांतीवादाचे. एका नामवंत प्राणी शास्त्रज्ञाने म्हटले आहे "दुर्दैवाने उत्क्रांतीवादाचा प्रॉब्लेम असा आहे की तो आपल्याला कळला आहे असे सगळ्यांना वाटते." ते खरेही आहे. आपल्याला शाळेत शिकवल्यापैकी 'माकडापासून माणूस झाला' 'माणसाची शेपटी न वापरल्याने झिजून गेली' 'जिराफाची मान लांब झाली' 'सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट' 'समूहाच्या भल्यासाठी..' अशा तुकड्यापलिकडे फारसे काही लक्षात नसते. मानवाला सतावणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत हे तर कोणी सांगितलेलेही नसते.

डार्विनच्या काळात प्राण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मुख्यत्वे मानवकेंद्रित होता. बायबलमधल्या विचारांचा त्या दृष्टिकोनावर मोठा पगडा होता. देवाने मानवासाठी ही सृष्टी बनवली, आणि त्याच्या सुखासाठी प्राणी, पक्षी, फुले, फळे, झाडे निर्माण केली. अर्थातच देवाने एकदा प्राणी बनवले की ते बदलतील कसे? घोडा हा घोडा राहाणार, माकड हे माकडच राहाणार. त्यांच्यात बदल होणे शक्य नाही. पण हे तितकेसे खरे नाही हे हळूहळू उघड होत होते. आता अस्तित्वात नसलेल्या पण एके काळी पृथ्वीवर वावरत असलेल्या प्राण्यांचे अवशेष सापडत होते. एकाच लांडग्यासारख्या प्रजातीपासून शेकडो प्रकारचे कुत्र्यांची माणसांनीच पैदास माणसांनी केलेली दिसत होती. डार्विन गॅलापेगोस बेटांवर गेलेला असताना 'केवळ याच बेटांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फिंच आणि इतर अनेक प्राणी निर्माण करण्यामागे देवाचा काय बरे हेतू असेल?' असा प्रश्न त्याला पडला. आणि अर्थातच या बेटांवर दिसणाऱ्या प्रजाती मुद्दामून वेगळ्या केलेल्या नसून, त्या त्या बेटावरच्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या आहेत - तेव्हा परिस्थितीप्रमाणे प्राणी बदलतात हे त्याच्यासाठी उघड झाले.

पण परिस्थितीमुळे प्राण्यांचे गुणधर्म कसे ठरू शकतील? त्याचे उत्तर आहे प्राण्यांमध्ये होणाऱ्या जगण्यासाठीच्या स्पर्धेत. या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठीचे गुणधर्म ज्या प्राण्याकडे अधिक असतात त्यांना अधिक संतती जोपासता येते, आणि ज्यांच्याकडे नसतात त्यांना कमी संतती होते. आईवडिलांचे गुण पुढच्या पिढीत उतरत असल्यामुळे हे गुणधर्म पुढच्या पिढीत अधिक संख्येने दिसतात, आणि ते गुणधर्म नसलेल्या प्राण्यांची संख्या कमी झालेली दिसते. हरणे पकडण्यासाठी चित्त्यांना त्यांचा पाठलाग करावा लागतो. अशा वेळी ज्या चित्त्यांचा पुरेसा वेग असतो अशांना अन्न मिळते, आणि त्यांना आपली पिलावळ जपता येते. ज्यांचा पुरेसा वेग नसतो त्यांना कमी अन्न मिळते, आणि त्यांना पुरेशी पिले जगवता येत नाहीत. दरम्यान हरणांच्या बाबतीतही हेच होते. अधिक वेगवान हरणे जगण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एखाद्या जंगलातली चित्त्यांची आणि हरणांची एक लाख वर्षांपूर्वीची पिढी आणि आजची पिढी यांच्या वेगाची तुलना केली तर आजची पिढी अधिक वेगवान असू शकते. थोडक्यात, हरणांमध्ये आणि चित्त्यांमध्ये बदल होण्यासाठी त्यांची परिस्थिती कारणीभूत ठरते.

मात्र 'हे चित्ते वेगाने धावतात. आणि वेग वाढवणे चांगले आहे, तेव्हा यांना ठेवूया. आणि जे कमी वेगवान आहेत त्यांना मारून टाकूया' असे कोणी म्हणत नाही. कमी वेगवानदेखील लगेच मरून जात नाहीत. वेगवान चित्त्यांचे लोकसंख्येतले प्रमाण पुढच्या पिढीत एखाद दोन टक्क्यांनी जास्त, त्याच्या पुढच्या पिढीत अजून एखाद दोन टक्क्यांनी जास्त असे होत होत शेकडो पिढ्यांनी कमी वेगवान चित्त्यांचा मागमूसही राहात नाही. नैसर्गिक निवड ही डोळस नाही, त्यामुळे काळी-पांढरीही नाही. पण त्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे कोणा व्यक्तीने, शक्तीने करण्याची गरज पडत नाही. वरून सोडलेली वस्तू आपोआप गुरुत्वाकर्षणाने खाली यावी त्याप्रमाणे विशिष्ट परिस्थितीत उपयुक्त असणारे गुणधर्म टिकून राहातात, आणि निरुपयोगी गुणधर्म नाहीसे होतात. अन्न मिळवण्याच्या गरजेतून चित्त्यांचा सरासरी वेग पुढच्या पिढ्यांमध्ये वाढतो. म्हणजे निवड करणारा कोणी नसला तरी निसर्गात असलेल्या परिस्थितीचा परिणाम म्हणून ते होते. म्हणूनच याला 'नैसर्गिक निवड' म्हणतात.

निवड हा शब्द काहीसा गोंधळात टाकणारा आहे. कारण त्यामागे 'कोणीतरी निवड करतो' असा छुपा अर्थ आहे. पण आपोआप होणाऱ्या निवडीची इतर उदाहरणंही आपल्याला दिसून येतात. पृथ्वीकडे बघितले तर सर्व जलसमुदाय एकीकडे आणि जमीन एकीकडे अशी बऱ्यापैकी रेखीव आखणी झालेली दिसते. ही आखणी कोणी ठरवून केली का? अर्थातच नाही. पृथ्वीच्या भूखंडांचा आकार विशिष्ट प्रकारे उंचसखल आहे ही नैसर्गिक परिस्थिती आणि पाणी उंचावरून वाहात खाली जाते एवढा भौतिक नियम, यामुळे अशी विभागणी आपोआप होते. ते कोणी घडवून आणावे लागत नाही. त्याचप्रमाणे पुरेश्या पिढ्या गेल्या की हरणे आणि चित्ते हे त्यांच्यातल्या भक्ष्य आणि भक्षक या नात्यामुळे आपोआप बदलताना दिसतात.

कालांतराने, परिस्थितीनुरुप बदल घडत वेगवेगळ्या प्रजाती निर्माण होतात, हे ठीक आहे. पण यातून जीवसृष्टीचा उगम कसा सांगता येतो? याचे उत्तर काही शब्दांत सांगणे सोपे नाही. पण आपल्याला जर रेणूंपासून पेशी कशा तयार झाल्या हे सांगता आले, तर त्या पेशींपासून द्विपेशीय जीव, त्यांच्यापासून 'सुधारित' अनेकपेशीय जीव कसे झाले हे समजून घेता येते. चित्ते आणि हरणांचा वेग जसा एकमेकांमुळे वाढत गेला, तसा सर्वच प्राण्यांचा विकास अगदी साध्या सुरूवातीपासून ते आत्ता दिसणाऱ्या वैविध्यापर्यंत कसा झाला हे समजू शकते. याचे काही टप्पे आपण पुढच्या काही लेखांत खोलवर जाऊन तपासून पाहू.

पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे सजीवसृष्टी जन्मण्यासाठी कोणा उच्च शक्तीच्या नियंत्रणाची गरज नाही. पुनरुत्पादनाची प्रक्रिया असली की नैसर्गिक निवडीतून आपोआप हे चराचर फुलून येते. या सत्याच्या जाणीवेत जगाकडे, स्वतःकडे आणि मानवांमधल्या परस्परसंबंधाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात क्रांती करण्याची शक्ती आहे. माझ्या देवाने जग निर्माण केले की तुझ्या देवाने हा प्रश्नच या सत्यापुढे विरघळून जातो, आणि सर्व धर्मयुद्धे निरर्थक ठरतात. 'मी या जगात का आहे?' या प्रश्नाचे साधे सोपे उत्तर - 'माझ्या आईवडिलांनी मला जन्माला घातले म्हणून' हे स्वीकारता येते. आणि त्यांचे आईवडील, त्यांचे आईवडील असे मागे जात जात आपल्या सगळ्यांची नाळ चार अब्ज वर्षांपूर्वीच्या कुठल्यातरी एकपेशीय जीवापर्यंत पोचवता येते. मी अमुक जातीचा, आपण तमुक धर्माचे, त्या हरामखोर परधर्मीयांचा नायनाट केला पाहिजे वगैरे विचार मग पोकळ ठरतात. अवकाशाच्या गहन पोकळीत साडेचार अब्ज वर्षांपूर्वी एक ग्रह नैसर्गिकरीत्या निर्माण झाला. त्यावर नैसर्गिकरीत्या प्राणीसृष्टी तयार झाली. आपण मनुष्य म्हणून जे काही लाख वर्षे आहोत, आणि सुसंस्कृत म्हणवत जी काही हजार वर्षे जगतो आहोत, ती या काही अब्ज वर्षांच्या आवाक्याच्या नखाचे टोक आहे. आपणही इतर प्राण्यांप्रमाणेच आहोत, फक्त जास्त हुशार आहोत, कपडे घालतो आणि वेगवेगळ्या भाषा बोलतो इतकंच. आपल्याला बनवणारे कोणी नाही, आपण बनलो. हा निसर्ग, हे प्राणी, ही सृष्टी आपल्यासाठी बनवलेली नाही - ती फक्त आहे. आपल्याप्रमाणेच या नैसर्गिक निवडीतून आणि भौतिकी-रासायनीच्या नियमांनी घडलेली, उत्क्रांत झालेली. हा विचार स्वतःला अनेक पाशांपासून, पूर्वग्रहांपासून मुक्त करणारा आहे.

हा विचार डार्विनने मांडला त्याला दीड शतक उलटून गेले. दुर्दैवाने अजूनही जगाच्या लोकसंख्येचा प्रचंड मोठा भाग या मुक्तीदायी सत्यापासून वंचित आहे.

(मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

लेखमाला फारच छान चालली आहे. प्रतिवाद करण्यासारखे काहीच नाही आणि रसग्रहणात्मक याहून अधिक चांगले लिहिणेही शक्य नाही. त्यामुळे 'छान', '+१', '+१००' असेच प्रतिसाद लिहिणे प्राप्त आहे.
(आणि दरवेळी प्रतिसादात चांगले, छान असे किती लिहिणार?)
(आणि चारही लेखांत विदा नाही त्यामुळे विनाविद्याचे लेखक अशी प्रतिमा ठाम होण्यासही मदत होत आहे. विद्याविनाss अशी एक सीरियल लिहिण्याचे मनावर घ्यावे.)

चारही लेखांत विदा नाही त्यामुळे विनाविद्याचे लेखक अशी प्रतिमा ठाम होण्यासही मदत होत आहे.

ही लेखमाला लिहितानाच माझ्यासमोर 'सोप्या भाषेत, जार्गनशिवाय, कोणाचं तरी म्हणणं चूक आहे हे दाखवण्यापेक्षा आत्तापर्यंतच्या संशोधनातून दिसणारं चित्र किती जगड्व्याळ आणि सुंदर आहे हे दाखवणं' हा हेतू होता. कशाची तरी परखड सिद्धता करण्यापेक्षा थोडंसं निरूपण करण्याचा प्रयत्न आहे. इतकं करूनही ग्राफेश चार्टकाढवी वगैरे नावं जाणार नाहीतच.

विद्याविनाss अशी एक सीरियल लिहिण्याचे मनावर घ्यावे.

ही विद्या कोण?

नावांचं मरू दे हो गुर्जी. पण मस्त चालू आहे मालिका. तुम्ही म्हणता तसं जगड्व्याळ चित्र पाहून भारून गेलेला सूर या लेखमालेतून अचूक प्रतिबिंबित झाला आहे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाचतोय.

तीच ती विद्या हो, जी 'विनयेन शोभते'.
[आता हा विनय कोण हा प्रश्न विचारू (वि)नये.]

आणि चारही लेखांत विदा नाही त्यामुळे विनाविद्याचे लेखक अशी प्रतिमा ठाम होण्यासही मदत होत आहे.

२००७ ते २०१५ (ऑगष्ट) या कालावधीत रा.रा.रा. घासकडवी यांनी लिहिलेले लेख एकत्रित करुन मंथवाईज कंपॅरिझन करुन एका चार्टमधे त्यांचे प्रतिमहिना विदायुक्त लेख विरुद्ध विदाविरहीत लेख किती प्रमाणात होते आणि ते गुणोत्तर या कालावधीत कसं बदलत गेलेलं आहे हे कोणी प्लॉट करुन दाखवू शकेल का?

+१

नाईस!
शेवटचा परिच्छेद विशेष सुरेख!!
लेखमाला वाचतोय, जरी प्रत्येक भागावर अभिप्राय लिहिणे जमले नाही तरीही...

उपक्रम/मिसळपाववरची मालिका अधिक चांगली होती.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी अमुक जातीचा, आपण तमुक धर्माचे, त्या हरामखोर परधर्मीयांचा नायनाट केला पाहिजे वगैरे विचार मग पोकळ ठरतात.

बरोबर आहे. पण हे उघड्या डोळ्यांनी वास्तवाकडे बघणार्‍यांनाच समजू शकेल. निव्वळ आपल्या धर्माचा नाही म्हणून शिरच्छेद करणार्‍या आयसिस वाल्यांना हे कोण समजावणार ? तसेच वैचारिक प्रतिवाद करता न आल्याने हत्या करणार्‍या कट्टर हिंदुत्ववाद्यांना कोण समजावणार ?

पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे सजीवसृष्टी जन्मण्यासाठी कोणा उच्च शक्तीच्या नियंत्रणाची गरज नाही.

तुम्ही वर एका साहित्यिकाचा उल्लेख केलेला आहे. तसाच दुसर्‍याचा करण्याचा मोह आवरत नैय्ये. गदिमा.

या वस्‍त्रांतें विणतो कोण?
एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या
हात विणकर्‍याचे

काही केल्या न जाणाऱ्या निळ्या पक्ष्या’साठी - 'देव' हे एक सुबक सोपे उत्तर आहे. पण हे उत्तर म्हणजे अनुत्तराचा कळस आहे.

अगदी.. स्टीफन हॉकिंग्जच्या द ग्रँड डिझाईनमधे म्हटल्याप्रमाणे गॉड इज नॉट द आन्सर, इट इज ओन्ली ट्रान्सफरिंग द क्वेश्चन"

बाकी

पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे सजीवसृष्टी जन्मण्यासाठी कोणा उच्च शक्तीच्या नियंत्रणाची गरज नाही. पुनरुत्पादनाची प्रक्रिया असली की नैसर्गिक निवडीतून आपोआप हे चराचर फुलून येते.

यावरुन गेम ऑफ लाईफची आठवण झाली.

A

सुरेख रीत्या उलगडत जाणारे कोडे..!

दरवेळी वा वा छान छान असे लिहिणे क्रमप्राप्त आहे.
एका वेगळ्या लेखात उत्क्रांतीमध्ये स्त्रीमुक्ती 'नैसर्गिकरित्या' कशी बसते ते लिहिलेत तर काही चर्चा संभवेल. तोवर निरूपणाला आम्ही माना डोलावतोच आहोत

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नेहमीप्रमाणेच छान.

लेखास कोणता वाचकवर्ग अपेक्षित आहे?उत्क्रांती माहित असणाय्रांसाठी लिहिलेले वाटतेय,विचार आणि संदर्भ बदाबदा ओतल्यागत वाटताहेत.सतरंजीखाली ढकलणे हे sweep under the carpetचे स्वैर भाषांतरअसावे.

या लेखमालेचा वाचकवर्ग हा उत्क्रांती माहीत नसलेला आहे. हे लेखन वर्तमानपत्रात करत असल्यामुळे हजार शब्दांची मर्यादा आहे. पण तरीही शक्य तितक्या सोप्या शब्दांत, तांत्रिक शब्द न वापरता प्रत्येक लेखात एक संकल्पना मांडण्याचा माझा हेतू आहे. या लेखात मांडलेली कल्पना थोडक्यात -

'आपण का आहोत?' 'या सृष्टीचे कारण काय?' 'माझ्या जगण्याचे उद्दिष्ट काय?' - या प्रश्नाचं उत्क्रांतीने दिलेलं उत्तर म्हणजे आपल्याला कोणा अज्ञात शक्तीने काही कारणासाठी निर्माण केलेलं नसून आपण नैसर्गिक निवडीतून अगदी अणू-रेणूंपासून सुरूवात होऊन बदलत बदलत तयार झालेलो आहोत.

ही संकल्पना समजण्यासाठी जड जातील असे संदर्भ, किंवा क्लिष्ट भाषा असलेले परिच्छेद दाखवून दिलेत तर मला हवे आहेत. मला पुढच्या लेखांत त्याविषयी काही करता येईल.

हा विषय माहित नसलेला वर्तमानपत्राचा वाचक आणि शब्द मर्यादा एक हजार हे ठीक आहे.आता या लेखातच पहा -मर्ढेकर-विंदा -डार्विन-पाचपाच हजारांची कर्जे-चित्ता आणि हरीण -गलापगोस बेटावरचे फिंच -विधात्याच्या हातात सर्व आहे.
मध्येच "पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे सजीवसृष्टी जन्मण्यासाठी कोणा उच्च शक्तीच्या नियंत्रणाची गरज नाही. पुनरुत्पादनाची प्रक्रिया असली की नैसर्गिक निवडीतून आपोआप हे चराचर फुलून येते. या सत्याच्या जाणीवेत जगाकडे, स्वतःकडे आणि मानवांमधल्या परस्परसंबंधाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात क्रांती करण्याची शक्ती आहे." कठीण आहे.