फादर्स डे स्पेशल -मिक्स पनीर भाजी (झणझणीत नागपुरी स्टाईल)

रविवारचा दिवस होता तरी सकाळी योग पाहण्यासाठी सकाळी ६ वाजताच उठलो. योग संपण्याचा आधीच आमच्या भागात पाऊस सुरु झाला. सकाळी ९ वाजता आमच्या चिरंजीवाने ‘हैप्पी फादर्स डे’ केले. संध्याकाळी बाजारातून २५०ग्रम पनीर घेऊन आलो होतो. आल्यावर सौ. ला म्हंटले आज फादर्स डे आहे. शाही पनीर करते का? सौ. उतरली, मिक्सर खराब झाले आहे. मोटर कामातून गेली आहे. गेल्याच वर्षी ठीक केली होती. आता नवीन ‘फूड प्रोसेसर’ घेऊन मगच अश्या ग्रेवीवाल्या भाज्या करायचा ऑर्डर करा.
सौ.चा मूड पार बघडलेला पाहून, सौ.ला खुश करणे गरजेचे होते. मी म्हणालो, आता पनीर आणले आहे, तर मीच करतो काहीतरी. फादर्स डेला फादरने काहीतरी केलेच पाहिजे. फ्रीज उघडला, त्यात शिमला मिरच्या (ढोबळी मिरची) होत्या ४ उचलल्या (१५० ग्रम), थोड्या हिरव्या शेंगा (काय म्हणतात ते फ्रेंच बिन्स) उरलेल्या होत्या त्या सर्व घेतल्या. मला कधी-कधी कळत नाही, बायका थोडी भाजी उरवून का ठेवतात? चिरताना आळस येतो कि बायकांना अशी सवयच असते. कारण एक दिवस आधी फ्रेंच बिन्सची भाजी केली होती. आकारानुसार हिरवी मिरची (३-४), टमाटर (३-४), लसूण (७-८ पाकळ्या), आले एक तुकडा आणि कांदा (२ मध्यम आकाराचे).


आधी हिरवी मिरची, लसूण आले, बारीक चिरून घेतले. नंतर साबणाने हात धुऊन घेतला. हात नाही धुतले तर चुकून मिरचीचा हात डोळ्यांना हा लागतोच. (नवऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू निघाले कि बायकांना खुश होण्याचा मौका मिळतो). हिरव्या शेंगा बारीक चिरून घेतल्या. जमेल त्या आकृतीचे कांदे, टमाटर आणि शिमला मिरची चिरून घेतली. आपल्यालाच भाजी खायची आहे कशीही चिरली तरी चालते.

आता झणझणीत नागपुरी स्टाईलची पनीरची भाजी बनविण्याचे ठरविले. चांगले ३-४ टेबल स्पून तेल कढ़ाईत टाकले,(तेल भरपूर टाकले कि भाजी आपसूक चांगली बनते, अनुभवाचे बोल आहेत हे, खास करून वांगे [मुटे साहेबांच्या शेतातले मिळाले तर अति उत्तम]). तेल गरम झाल्यावर मोहरी टाकली, मोहरी फुटल्यावर, तमालपत्र, दालचिनी आणि २ लवंग टाकल्या नंतर बारीक चिरलेली मिरची, आले आणि लसूण टाकले. १-२ मिनिटे परतल्यावर ३ वाळलेल्या लाल मिरच्या टाकल्या (आमच्या साळीने खास मध्यप्रदेशातून पाठविलेल्या, भयंकर जळजळीत आहेत त्या मिरच्या). नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या शेंगा टाकल्या. शेंगा तेलावर परतल्यामुळे भाजीत त्यांच्या स्वाद ही मस्त आला. त्या थोड्या परतल्यावर, हळद, तिखट (झणझणीत पाहिजे असेल तर ३-४ चमचे ही चालतील), २ चमचे धने पूड, १ चमचा गोड मसाला टाकला. नंतर बारीक चिरलेले टमाटर आणि पनीरचे तुकडे त्यात टाकले. (पनीरचे तुकडे कापत असताना ते ५० ग्रम कमी झाले, कसे कळले नाही). चवीनुसार मीठ ही त्यात टाकले. गॅस मध्यम करून ४-५ मिनिटांसाठी झाकण ठेवले. नंतर त्यात शिमला मिरची मिसळी. पुन्हा २ मिनिटे झाकण ठेवले आणि गॅस बंद केला. (शिमला मिर्च जास्ती शिजवली तर तिचा स्वाद बिघडतो).

भाजी खरोखरच मस्त आणि झणझणीत झाली होती. जेवण झाल्यावर चिरंजीवाने बाजारातून आणलेल्या खास अमूल मिक्स फ्रुट आईसक्रिमला कापून फादर्स डे साजरा केला. (अमूलच्या मिक्स फ्रुट आईसक्रिमचा स्वाद चांगला आहे, लहान मुलांना निश्चित आवडेल).

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

चुकून मिरचीचा हात डोळ्यांना हा लागतोच. (नवऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू निघाले कि बायकांना खुश होण्याचा मौका मिळतो).

ROFL कसली हसते आहे. आई ग्ग!
.

खास करून वांगे [मुटे साहेबांच्या शेतातले मिळाले तर अति उत्तम])

खी: खी:
.

जेवण झाल्यावर चिरंजीवाने बाजारातून आणलेल्या खास अमूल मिक्स फ्रुट आईसक्रिमला कापून फादर्स डे साजरा केला. (अमूलच्या मिक्स फ्रुट आईसक्रिमचा स्वाद चांगला आहे, लहान मुलांना निश्चित आवडेल).

अरे मस्त झाला की फादर्स डे Smile
मला ना नॅचरल चं कॉफी-वॉलनट आइस्क्रीम फार आवडत असे. एकदम बिटर-स्वीट. अन नवर्‍याला कोकोनट किंवा प्लेन व्हॅनिला (यक्स!!!) आइस्क्रीम आवडे. मला तर ते खोबरट्/नारळट आइस्क्रीम अज्जिबात आवडत नसे. मला जिथे डार्क चॉकलेट आवडतं तिथे याला मिल्क चॉकलेट. आता मिल्क चॉकलेट काय मोठ्यांनी खाण्याची गोष्ट आहे का Wink
मागे आइस्क्रीम फ्लेव्हर्स आवडीवरुन स्वभाव ओळखण्याचा लेख (http://wtop.com/news/2012/06/what-your-favorite-ice-cream-flavor-says-ab...) वाचला होता. माझा तरी परफेक्ट आलेला. Wink
.

बायका थोडी भाजी उरवून का ठेवतात? चिरताना आळस येतो कि बायकांना अशी सवयच असते.

अति अन्न झालं की माज आल्यासारखं टाकवतही नाही अन दुसर्‍या दिवशी चव उतरलेलं खाववतही नाही. म्हणून लागेल तेवढच बनवावं न काय तर.
.
टोमॅटो चे तुकडे जरा मोठे चिरले गेलेत. माझेदेखील असेच चिरले जातात अन मग भेळ खाताना नवर्‍याला त्रास होतो ROFL ROFL
कोणी चोथा न करता टोमॅटोचे पातळ काप/तुकडे करु शकत असेल तर मी त्या व्यक्तीच्या पाया पडायला तयार आहे. Wink
.
अर्रेच्च्या फक्त टोमॅटोच नाही तर भोपळी मिरची अन कांद्याचे तुकडेही मोठे आहेत की.
असा कंटाळा करायचा नाही पटाइतजी .... हाहाहा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाजी खासच बनलेली दिसते आहे. मी इतकं झणझणीत खाऊ शक्णार नाही, पण जमेल तेव्हा याचं मवाळ रूप बनवून बघेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्यांदा हिरवी मिरची+आले, नंतर तीन सुक्या मिरच्या, नंतर तिखट पूड, नंतर भोपळी मिरची
आणि या सगळ्या जाळात फक्त पाव किलो पनीर आणि थोड्याश्या फरसबी शेंगा. रेसिपी वाचूनच घाम फुटला.
लोक खरंच इतकं तिखट खातात?
नागपुरी तडका म्हणतात तो हाच काय?
बाकी ज्यांना चालतं त्यांच्यासाठी छान सोपी कृती आहे.
फादर्स डे छान साजरा झाला असेल! (आयतं मिळाल्यावर घरात शांती राहून कुठलाही डे छानच साजरा होतो म्हणा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायका थोडी भाजी उरवून का ठेवतात?

अगदी. बघावं तेव्हा हाताला विंचू डसलेला.

-----

बेत मात्र मस्त दिसतोय.
-----

या भाजीत "नागपुरी" विशेष काय हे मात्र समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राही यांच्याप्रमाणे वाचूनच घाम फुटला! तिखट खाणार्‍यांसाठी उत्तम रेशिपी दिस्तेय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(पनीरचे तुकडे कापत असताना ते ५० ग्रम कमी झाले, कसे कळले नाही)

हा मिष्किलपणा नीट वाचणार्‍यालाच कळतो. एकदम मस्त झालीये ही पाकृ. लिहीत रहा प्लीज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0