द्विधा मनस्थिती

द्विधा मनस्थितीतून बाहेर कसे पडायचे?

मागच्या काही दिवसातील आपल्यावर गुजरलेल्या द्विधावस्थांचे काही प्रसंग तरी आपल्याला नक्कीच आठवत असतील. बर्थ डे पार्टीच्या वेळी ब्लॅक फॉरेस्ट केकचा डोंगर पाहून खाण्यासाठी आपले हात शिवशिवले असतील. त्याच वेळी वाढत्या वजनाची, (वा मधुमेहाची) आठवण झाल्यामुळे स्वत:ला शिव्या देत काढता पाय घ्यावे लागल्याचे आपण विसरणार नाही. अशा प्रकारचे कित्येक छोटे मोठे प्रसंग आपल्या आयुष्यात अनेक वेळा येवून गेले असतील. आजकाल त्यांची आठवणही नकोशी झालेली आहे. ओल्या पार्टीच्या वेळी, चोरून सिगरेट ओढताना, चोरून प्रेम करताना, विवाहबाह्य संबंध ठेवताना, नेटवर लैंगिक संस्थळांचे सर्फिंग करताना, ... इ.इ वेळी एकीकडे मनाला या गोष्टी हव्याहव्याशा वाटत असतात व दुसरीकडे आपला 'आतला आवाज' या प्रकारातील धोक्यांचा इशारा देत असतो.

हा आपला 'आतला आवाज' आपल्याला स्वस्थ बसू देत नाही व समोरच्या गोष्टींचा मनसोक्त आनंद घेवू देत नाही. गंमत म्हणजे हा आपल्याला या द्विधा मनस्थितीतून बाहेर काढण्यास धड मदतही करत नाही. आपण जर दृढनिश्चयी नसल्यास करू की नकोची ही जीवघेणी कसरत खरोखरच एके दिवशी जीव घेणारी ठरू शकेल. मनाच्या या दोलायमान स्थितीतून बाहेर पडण्यासाठी नेमके काय करावे याचा अंदाजच येत नाही. त्यामुळे शेवटी वैतागून, कुठलाही निर्णय न घेता, जे होईल ते होऊ दे म्हणत गोष्टी हाताबाहेर जाऊ देणे हा एकच पर्याय आपल्यासमोर राहतो. परंतु हा पर्याय कुठल्याही दृष्टीने योग्य आहे असे म्हणता येणार नाही.

शक्य असल्यास अशा अटीतटीच्या वेळी आपण एखादी यादी करू शकतो. एका रकान्यात त्याच्या बाजूचे व दुसर्‍या रकान्यात त्याच्या विरोधातील मुद्दे नोंदवू शकतो. हवे असल्यास अल्पकालीन व दीर्घकालीन फायद्या-तोट्यांचा हिशोबही ठेवू शकतो. परंतु एवढ्यावरच हे भागणार नाही. कारण हे फायदे तोटे, वा अनुकूल - प्रतिकूल मुद्दे तुमच्या दृष्टीने त्या क्षणी बरोबर असतीलही. परंतु त्यातील काही कदाचित गैरसमजुतीवर आधारलेलेही असू शकतील. तुम्ही नोंदविलेल्या मुद्द्यांचे कठोर परीक्षण करणे, अपवादात्मक परिस्थितीचा आढावा घेणे, विवेकी विचारांशी त्यांची पडताळणी करणे, काही चुकींचे assumptions आहेत का याचा शोध घेणे गरजेचे ठरतील. आपल्याला ती वस्तू खरोखरच हवी का? किंवा आपल्या अशा वर्तनामुळे कुणीतरी दुखावतील का? वा आपल्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम तर होणार नाहीत ना? यांचाही विचार करावा लागेल. तुम्ही यादी करताना सर्व facts व figures लक्षात घेतलेले आहेत का? याचीसुद्धा तपासणी करावे लागेल.

कुठलाही निर्णय घेत असताना तो पहिल्या झटक्यात चुकीचा ठरू नये व पुन्हा पुन्हा तेथेच घुटमळत राहू नये याची काळजी घ्यावी लागेल. कदाचित तुमचे निष्कर्ष बरोबर असतील. परंतु कारवाई चुकीच्या पद्धतीने होत असेल. अशा वेळी तुम्हाला अवलंबिलेली पद्धत बदलावी लागेल. अडचणीवर मात करावे लागेल. आपण मृगजळाच्या (dead goal) मागे तर धावत नाही ना याचाही अंदाज घ्यावा लागेल. व एवढे करूनही हाती काही लागत नसल्यास निर्णय बदलण्याची कणखरता आपल्यात असायला हवी.

द्विधा स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे कुठलिही जादूची कांडी नाही. आपल्याला पुढे नेण्यासाठी वाटेत कुठलेही दीपस्तंभ नाहीत. काही वेळा आपल्याकडे पुरेशी माहिती नसते. असलेली माहिती चुकीची असू शकते. मूल्यांचा तिढा असतो. कुठलाही निर्णय घेतला तरी आपण जिंकू हा आत्मविश्वासही नसतो. अशा प्रसंगी योग्य निर्णयापेक्षा समाधानकारक निर्णय घेणे समस्येला उत्तर असू शकेल. परंतु द्विधा स्थिती आल्यास त्याचा सामनाच करायचा नाही हे योग्य नसेल.

मानसिक चलबिचलता हा एक न टाळता येणारा माणसांचा गुणविशेष आहे. त्याच्या जास्त खोलात शिरल्यास तो आपल्याला तारू शकतो किवा मारूही शकतो. आपल्या मनात फक्त त्याची एकच बाजू दिसत असल्यास आपली दिशाभूल होण्याची शक्यता जास्त. आपल्या मनस्थितीला वस्त्राची उपमा दिल्यास आपले हे वस्त्र अखंड नसून वेगवेगळ्या कापडाचे तुकडे वापरून केलेल्या गोधडीसारखे ते असेल. काही ठिकाणी ते उसवलेलेसुद्धा असू शकेल.

सामान्यपणे आपण कधीच एका साच्यात वा एका मुशीत तयार झाल्यासारखे नसतो. आपण रोबो नाही. आपण विविधांगी असतो. परिस्थितीनुसार आपल्या इच्छा - आकांक्षा बदलत असतात. आपल्या अपेक्षा कमी जास्त होत असतात. काही वेळा आपण फारच कमकुवत ठरतो व काही वेळा असामान्य धैर्यही दाखवू शकतो. (हे बळ कुठून आले हेही आपल्याला सांगता येत नाही) मित्रांच्या घोळक्यातून जात असताना त्यातील काहींच्या बाबतीत आपण विशेष सावधानता बाळगत असतो. नाते संबंधात काहींच्या बाबतीत टोकाचा विश्वास व इतरांच्या बाबतीत मात्र नको तेवढ्या शंका. आपण कुठे धोका पत्करतो व कुठे नाही याचा नेम नाही. त्यामुळेच आयुष्याचे वस्त्र विणताना या वेगवेगळ्या धाग्याना एकत्र करत असतो व विणलेल्या वस्त्रानी आपल्या स्वत्वला आच्छादण्याच्या प्रयत्नात असतो. फक्त असे करताना काही धागे/तुकडे नीटपणे बसलेले असतात व काही उसवलेल्या स्थितीत असतात.

ज्या प्रकारे व्यक्ती तितक्या प्रकृती त्याच प्रमाणे आपण जोपासत असलेल्या मूल्यातही विविधता जाणवते. याचे एक ठळक उदाहरण म्हणून स्वातंत्र्य व सहकार्य या मूल्यांचे देता येईल. आपण स्वतंत्रपणे विचार करू शकतो; आपण कळपातील शेळी - मेंढ्यासारखे वागत नाही, याचा आपल्याला रास्त अभिमान असतो. त्याच वेळी एकमेकाशिवाय आपण राहू शकत नाही, हे सहकार्य मूल्यावरील आपला विश्वास दर्शविते. आपण कुटुंब व्यवस्थेपासून, समाज व्यवस्थेपासून दूर पळू शकत नाही. अशा वेळी आपले मुक्त स्वातंत्र्य संकुचित होत असल्यास आपण ते स्वीकारतो. सहकार्याचाच वसा उचललेला असल्यास सदासर्वकाळ आपण मान खाली घालून ओझ्याचे बैल होत नाही. केव्हा तरी स्वातंत्र्याची उर्मी उफाळून येते व आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. पूर्णार्थाने आपल्याला स्वातंत्र्य वा सहकार्य कधीच उपभोगता येणार नाही. एखादा जास्त असेल व एखादा कमी. एखाद्याला या गोष्टी फायदेशीर ठरतील तर दुसर्‍याला हानिकारक. किंवा त्याच व्यक्तीला दुसर्‍या प्रसंगात तीच गोष्ट हानिकारक ठरेल.

त्यामुळे द्विधा मनस्थिती म्हणजे काही तरी भयंकर, अपायकारक अशी समजूत करून घेण्यात अर्थ नाही. याही स्थितीतून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग आहेत. फक्त या स्थितीची योग्य जाणीव ठेवूनच आपले वर्तन हवे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

द्विधा मनस्थिती हे एका अर्थाने बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. गुरुत्वाकर्षणाने खाली पडणाऱ्या दगडाला द्विधा मनस्थिती उद्भवत नाही. जेव्हा आपली वर्तणुक आपल्या (थोडीफार का होईना) कह्यात असल्याची जाणीव असते तेव्हाच हे करू की ते करू असा प्रश्न पडतो. त्यातही मर्यादित प्रमाणात दोन्ही कृतींचे फायदेतोटे आपल्याला दिसत असतात, हेही बुद्धीमत्तेचंच लक्षण.

त्यामुळे शेवटी वैतागून, कुठलाही निर्णय न घेता, जे होईल ते होऊ दे म्हणत गोष्टी हाताबाहेर जाऊ देणे हा एकच पर्याय आपल्यासमोर राहतो.

कधीकधी काहीच निर्णय न घेता स्वस्थ बसणं हा तिसरा पर्याय, दोनपैकी चुकीचा निर्णय घेण्यापेक्षाही तोट्याचं असतं.

या लेखात मांडलेला 'प्रत्येक माणूस वेगळा असतो त्यामुळे चूक की बरोबर हेही व्यक्तीप्रमाणे ठरतं' हाही विचार आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्विधा असणं हे विचार करणार्‍याचं लक्षण आहे. आपल्या व इतरांच्या कृतीबद्दल विचार करणाराच द्विधेमधे सापडू शकतो. अन्यथा डोळ्याला झापडं लावलेल्या घोड्याप्रमाणे दिसणार्‍या एकमेव रस्त्यावरून चालणार्‍या प्राण्याचे स्वछंदी-सशक्त 'घोडे'पण नष्ट होत असते तसेच द्विधेत न सापडलेला माणूस आपलं माणूसपण हरवून दुराग्रही बनत असेल का?

नीरक्षीरविवेक हा द्विधेवरचा उपाय असला तरी तो कमवावा लागतो.. उपजत फार क्वचित दिसतो!

हे लेखन आवडले असे म्हणताना मात्र द्विधा जाणवत नाहीये Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!