गूढ कथा: "शिकारी रात्र!"

मध्यरात्र उलटून गेलेली असते. वातावरणात खूप थंडी असते. एक बैलगाडी गावाबाहेरच्या निर्मनुष्य मैदानातून चंद्राच्या उजेडात गावाकडे जात असते. अचानक दोन्ही बैलाच्या मधोमध एक भयप्रद कुत्रा येतो आणि गाडीच्या खाली सरकतो आणि दोन्ही चाकांच्या मधोमध चालायला लागतो. बरोबर बैलांच्या वेगात वेग मिसळून तो चालतो. बैलगाडी हाकणारा (नायबा) बैलगाडीवर बसलेल्या दुसर्‍या माणसाला (होयबा) म्हणतो, "या गाडीखाली एक कुत्रा चालत आहे. त्या कुत्र्याला हाकलू नकोस आणि त्याचेकडे बघू नकोस गावची वेस येईपर्यंत! एकदा गावात शिरलो की हा कुत्रा नाहीसा होईल."
होयबा म्हणतो, "मी हे मानत नाही. कुत्र्याकडे समजा मी पाहिले किंवा हाकलले तर काय होईल? "
"सांगता येत नाही काय होईल पण त्यानंतर तू गावापर्यंत पोहोचणार नाही हे नक्की! या रस्त्यावर अनेक प्रकारच्या शिकारी सैतानांचा वास आहे. हा कुत्रा नाहीसा होईपर्यंत मी सुद्धा बैलगाडी मुळीच थांबवणार नाही"
"हॅट. नाही मानत मी. खोटे आहे ते."
"तुझे ते विचार तुझ्या मनात ठेव. फक्त काही विपरीत कृती करू नको."
"हट! मी नाही मानत. चल! गाडी चालव!" असे म्हणून तो आकाशाकडे पाहत बसून राहतो.
"अन काय रे. कुत्र्याला पाहून बैल बिथरत नाही का?"
"गप बस. पडून राहा. फालतू प्रश्न विचारू नको."
"आणि हे कुत्रं अजून एकदाही भुंकलं कसं नाही?"
"गप बस ना. गुमान पडून राहा. या सगळ्या अडथळ्यांकडे लक्ष देऊ नको. हे मैदान संपलं की जंगल लागेल. त्याला पार केले की नदी, पूल आणि मग गावची वेस येणार. मग हे अडथळे संपतील आणि आपण श्रीमंत होणार. विसरलास? "
चंद्राच्या उजेडात ती बैलगाडी पुढे जात राहते. पंधरा मिनिटे बैल, कुत्रा आणि गाडी या व्यतिरिक्त कुणीच हालचाल करत नाही. बैलगाडी वरचे "ते" दोघे अंगावर काळी चादर घेऊन निश्चल पडून असतात. बाजूला एक भरलेली थैली असते आणि एक काठी सारखे काहीतरी त्या थैलीजवळ ठेवलेले दिसते. त्या थैलीत अचानक हालचाल जाणवायला लागते. ती पिशवी हाताशी धरून बसलेला होयबा दचकतो.
"अरे नायबा, थैली हालतेय!"
"गप बस. लय गंमत करायची लहर येते तुला? "
"अरे खरंच सांगतोय!"
"आता गप बसतोस का थांबवू बैलगाडी आणि आणू कुत्र्याला पकडून तुझ्या बोडख्यावर बसवायला? च्या मारी! तूच गोळी घातली होती ना "त्याला" स्वतः च्या हाताने त्या नळीमधून! तूच केली ना शिकार त्याची! पुन्यांदा कसा जिवंत होईल तो? एकदा म्हणतो माझा या गोष्टींवर विश्वास नाय आणि एकदा म्हणतो मेलेला प्राणी जिवंत झाला?"
होयबा काही म्हणणार तेवढ्यात त्या थैलीतून एक विचित्र काळा प्राणी बाहेर निघतो आणि खाली उडी मारतो अन् कुत्र्याच्या मागोमाग बैलगाडी खाली तोही चालू लागतो.
नायबा होयबा वर संतापतो, "एक तर शिकार नीट करता येत नाय अनं एक थैली बी नीट सांभाळता येत नाय?" गमावलं ना सगळं. कसे मिळणार पैसे आता 'त्या'ला विकून?"
"अरे थांबव की गाडी! मी उतरतो आनं आणतो त्याला पुन्हा पकडून. मी नाय घाबरत त्या कुत्र्याकडं बघायला! "
"खबरदार. मी गाडी थांबवणार नाही."
"अरे थांबव की मूर्खा! " असे म्हणून होयबा बैलांचा दोर हातात घेऊन थांबवण्याचा प्रयत्न करतो पण नायबा त्याला बैलगाडीच्या खाली फेकतो. खाली पडल्यावर क्षणभर होयबा ची त्या कुत्र्याशी नजरानजर होते. कुत्रा पांढरा फटक असतो आणि करुणपणे रडत असतो. त्याचे लालजर्द डोळे प्रखरपणे चमकत असतात. पण होयबा कडे बघितल्यावर तो हसतो आणि होयबा चे डोळे कुत्र्याच्या डोळ्यांत काही क्षण बांधले जातात. तो विचित्र प्राणी कुत्र्याच्या मागे चालत असतो. अचानक होयबाला दूरवर बैलगाडी च्या मागच्या बाजूला दोन दिवे हालताना दिसतात. बहुदा एखादी कार असावी! तेवढ्यात तो प्राणी पुन्हा बैलगाडीवर उडी मारतो. होयबा त्या प्राण्याला पकडायला जाणार तेवढ्यात बैलगाडी बरीच पुढे निघून जाते. तो जिवाच्या आकांताने बैलगाडी मागे धावायला लागतो आणि बंदूक काढून घेण्यात तो यशस्वी होतो. पण प्राणी बैलगाडीवरच राहतो. त्यानंतर मात्र बैलगाडी अचानक बैलांना पंख फुटल्यासारखी वेगात धावायला लागते.
"थांबव गाडी लेका! "
"मला जान प्यारी आहे. पैसा नाय!"
"अरे पण त्यो प्राणी बैलगाडीवर आलाय. थांब माझ्यासाठी. एकट्यानेच पैसा खायचा विचार हाय का?"
नायबा आश्चर्याने मागे त्या प्राण्याकडे पाहतो....पण बैलगाडी थांबण्याच्या पलीकडे गेलेली असते. बैलांचे डोळे हिरवे झालेले असतात...
दूरवरच्या त्या कार मध्ये मागच्या सीटवर बसलेला मनुष्य साबू हा बाबू ड्रायव्हरला म्हणतो," अरे बाब्या, आपला बाॅस पण ना, किती काय काय करायला लावतो. आता पन्नास हजारासाठी हे डिक्की मधले प्रेत नदीत फेकाया लावतो ना तो. एकादा खून बीन केला असता ना मी. पण हे ओझं घेऊन जाऊन नीस्तं फेकून यायचं हे काम किती दिस करायचं काही कळंना! बाकी हे मात्र झ्याक झालं की आपल्या बॉस ला त्याची शिकार लई लवकर गावली. एकाच पिस्तुलाच्या गोळीत तो मेला आणि आता आपल्या डिक्कीत आहे बघ!"
बाबू म्हणतो, "गप बस साबू. एक तर हा ईलाका लई डेंजर हाय. मैदान पार केलं की एक जंगल लागंल. मग एक पूल. त्या पुलावरून हे पोतं खाली फेकायचंय. आपण नंतर बघू हे काम परत करायचं की नाय ते. आता या सुनशान इलाक्यातून लवकर पार व्हायचं. बास!"
"का रं? काय इशेष हाय या इलाक्यात?"
"आरं, आता नको ईचारू! रातच्याला सैतानाचं नाव घेतलं तर त्याला ताकद मिळते. या रस्त्यावर लई शिकारी सैतान असत्यात! गप बास! गप गुमान. शांती ठेव!"
"आरं, शांतीची कशाला याद दिली रे बुडख्या? कधी तिला भेटतो आसं झालंय!"
समोर दूरवर एक अंधुक मनुष्य आणि त्यासोबत एक अंधुक कुत्रा बघून बाबू करकचून ब्रेक दाबतो. दरम्यान साबू च्या उजव्या खांद्यावर एक खरबडीत हात पडतो आणि तो दचकून मागे पाहतो तर काहीच दिसत नाही. तेवढ्यात कुत्र्याच्या लाल डोळ्यांत बघून बाबूचे डोळे थिजतात. तो अंधुक माणूस बाबूला बंदुकीचा धाक दाखवून गाडीत बसू द्यायची "विनंती" करतो..."त्या बैलगाडीचा पाठलाग कर. चल लवकर!"
बाबू गाडी सुरू करतो आणि साबूला मदतीची विनंती करतो पण साबू निश्चल पडून असतो. कारच्या मागच्या सीटवरचा तो साबू त्या जिवंत झालेल्या प्रेताच्या हल्ल्यात मृत झाल्याचे बाबूला माहीत नसते.
चंद्राच्या उजेडात त्या मैदानावर सुसाट वेगाने धावणारी बैलगाडी, बैलगाडी खाली धावणारा तो जिवंत झालेला विचित्र प्राणी, त्यामागे धावणारी कार आणि कारमागे सुसाट धावणारा पांढरा कुत्रा!
हा विचित्र पाठलाग अर्ध्या तासानंतर जंगलात शिरतो. तो पाठलागाचा वेग आणि आवाज जंगलातील झाडांवर आरामात पहुडलेल्या घुबड आणि वटवाघुळे याना सहन होत नाही. ते एकमेकांकडे बघू लागतात, चिडतात आणि त्या बैलगाडी अन कार यावर झेपावतात. चंद्रप्रकाश जंगलातल्या झाडांमुळे क्षीण होत जातो. जंगलातल्या रस्त्यातून वरून तो काळ्या पक्ष्यांचा फक्त थवा सरकताना दिसतो एवढे त्या बैलगाडी आणि कारला झाकले जाते. पुढे अरुंद पुलावरून वेगामुळे बैलगाडी आणि नायबा पाण्यात खाली पडतात. तो विचित्र प्राणी पुलावरच असतो. नंतर त्यामागोमाग पक्ष्यांना घाबरलेला बाबू, साबू आणि होयबा हे सर्व कारवरचे नियंत्रण सुटल्याने कारसह त्या थंडगार पाण्यात पडतात. ते जिवंत झालेले प्रेत मात्र पुलावरच राहते. तो विचित्र प्राणी पुलाच्या कठड्यावर चढतो आणि आनंदाने पाण्यात पडलेले माणसं पाहून हर्षभरित होतो. दोन्ही बैल पाण्यातून निघून काठावर येतात आणि गावाकडे जायला लागतात. ते प्रेत सुद्धा वाकून पाण्यात बघत हसते. तो प्राणी आणि प्रेत एकमेकांकडे पाहून हसतात आणि पुन्हा जंगलाकडे चालू लागतात. लवकरच पांढरा कुत्रा त्याना येवून मिळतो आणि ते सज्ज होतात पुढच्या शिकारीसाठी. प्रेत, घुबड आणि वटवाघळे झाडांवर जाऊन बसतात. तो प्राणी आणि कुत्रा पुन्हा त्या चन्द्रप्रकाशाताल्या मैदानात येतात! दुरून एक शववाहिनी येत असतांना त्याना दिसते. कुत्रा आणि तो प्राणी त्या शववाहिनीच्या समोर येवून थांबतात..!!
(समाप्त)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काहीही कळलं नाही.. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राम गोपाल वर्मासोबत स्पर्धा करायचा लेखकाचा हेतु दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

आड्यन्सला घाबरवायला म्हणून आमच्या जातीचं नाव घेतलंय फुकट. आमी प्रोटेस करनार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थुकरट आणि फालतू कथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खास नाही वाटली. सटलटी नाही.
धारपांच्या कथा आवडत. विशेषतः समर्थांचे पात्र (बहुतेक समर्थच नाव होते. आठवत नाही आता)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

शेवटला प्यारेग्राफ जाम आवडला (खरंच!) बाकी पास..
पण कथा "गूढ" आहे. नक्कीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण पुढचे प्रयत्न अजून चांगले होतील अशी आशा आणि शुभेच्छा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....