ज्ञानेश्वरांचे अभंग

ऐसी अक्षरे वर सदस्य झाल्यापासून प्रत्येकवेळी लॉगिन होताना ज्ञानेश्वरांची ही ओवी आठवायची -
माझ्या म-हाठीचिये बोल कवतिके।
परि अमृतातेहि पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके ।
मेळवीन।
अचानक ज्ञानेश्वरांच्या अभंगात अशी एखादी ओळ येते की आपण (म्हणजे मी तरी) क्षणभर थांबतो, कमाल वाटते, कसे सुचले असेल? जसा अळुमाळू शब्द (अळुमाळू म्हणजे बहुतेक मन). तसेच आत्तापर्यंत कानडा वो विठ्ठलु या अभंगातील “क्षेम देऊ गेले तव मी ची मी एकली” अशी ओळ मी ऐकत होतो. पण नुकताच ते “एकली’ नसून “ऐकली” आहे असे वाचले. काही का असेना एक शब्द बदलला तरी अर्थ तशीच कसरत करवून घेतो.
ज्ञानेश्वरांच्या असंख्य अभंगांपैकी नेहमी ऐकण्यात असणारे खालील प्रसिद्ध अभंग माझ्या आवडीचे आहेत. प्रसिद्ध म्हणण्याचे कारण लता, आशा, किशोरी आमोणकर यांनी गायलेले हे अभंग ऐकण्यात येतात.

अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू
मी म्हणे गोपाळू, आला गे माये
चांचरती चांचरती बाहेरी निघाले
ठकचि मी ठेलें काय करु
तो सावळा सुंदरु कासे पितांबरु
लावण्य मनोहरु देखियेला
बोधुनी ठेलें मन तव जालें आन
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये
बाप रखुमादेवी वरु विठ्ठल सुखाचा
तेणें काया मने वाचा वेधियेलें
---------------------------
घनु वाजे घुण घुणा, वारा वाहे रुणझुणा
भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का?
चान्दु वो चान्द्णे चापे वो चन्दने
देवकीनंदनेवीण नावडे वो
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी
कान्हो वनमाळी वेगी भेटवा का
दर्पणी पहात रूप न दिसे वो आपले
बापरखुमादेवीवरे मज ऐसे केले
--------------------------------------

पैल तो गे काउ कोकताहे
शकुन गे माये सांगताहे
उड उड रे काउ तुझे सोनेने मढवीन पाउ
पाहुणे पंढरीराऊ घराकै येती
दहीभाताची उंडी लावीन तुझे तोंडी
सत्य सांगे गोठी, विठू येइल कायी?
-------------------------------------

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले
अवघेची झाले देह ब्रह्म
आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले
नवल देखिले नभाकार गे माये
बापरखुमादेविवरु सहज निटू झाला
ह्रदयी न दाविला ब्रह्माकारे
---------------------------------------
आजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु
हरि पाहिला रे हरि पाहिला रे
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी
दृढविटेवनमुळी, विराजीत वनमाळी
बरवा सन्तसमागमु, प्रगटला आत्मारामु
कृपासिंधू करुणाकरू, बाप्रखुमादेवीवरु
---------------------------------------
रंगा येई वो ये, रंगा येई वो ये
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई
वैकुंठवासिनी, विठाई जगत जननी
तुझा वेधू माझे मनी, रंगा येई वो ये
कटी कर विराजित, मुगूट रत्न जडित
पीतांबरु कासिला, तैसा येई का धांवत
विश्र्वरुप विश्र्वंभरे, कमळ नयनें कमळाकरे वो
तुझे ध्यान लागो, बाप रखुमादेवीवरे वो
----------------------------------------
मोगरा फुलला मोगरा फुलला
फुले वेचिता बहरु कळियासी आल
इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलु गेल गगनावेरी
मनाचीये गुंफी गुंफियला शेला
बापरखुमादेवीवरे विट्ठले अर्पिला
-----------------------------------------
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
रत्नकिळफाकती प्रभा
अगणित लावण्य तेज पुंजाळिले
न वर्णवे तेथीची शोभा
कानडाउ विठ्ठलु करनाटकु येणे मज लावियेला वेधु
खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी आळविल्या नेदी सादु
शब्देविण संवादू दुजेविण अनुवादू
हे तव कैसे निगमे
पर ही परते बोलणे खुंटले
वैखरी कैसे मी सांगू
पाया पडू गेले तव पाउलची न दिसे
उभाची स्वयंभू असे
समोरकी पाठीमोरा न कळे
ठकचि पडिले कैसे
क्षेमालागी जीव उताविळ माझा
म्हणवूनी स्फूरताती बाहू
क्षेम देऊ गेले तव मी ची मी ऐकली (एकली)
आसावला जिव राहो
कानडाउ विठ्ठलु
बाप रखुमादेवीवरू हृदयीचा जाणुनी
अनुभव सौरसू केला
दृष्टीचा डोळा पाहो गेलीए
तव भितरी पालटू झाला
मी माझे मोहीत राहिले निवांत
एकरूपतत्व देखिले गे माये
छाया माया काया हरीरूपी ठायी
चिंतिता विलया एक तेजी
ज्ञानदेवा पाहा, ओहं-सोहं भावा
हरीरूपी दुहा सर्व काळ
द्वैताच्या गोष्टी हारपल्या
शेवटी विश्वरूपे मिठी देत हरी
---------------------------------------
आणि हरिपाठातील हा अभंग. प्रभातच्या संत ज्ञानेश्वर मध्ये बहुतेक मास्तर विनायक यांनी हा अभंग गायला आहे. गाण्याच्या शेवटी खूप छान गजर आहे. हा अभंग मी पहिल्यांदा “”माझी आवडती गाणी”” या नावाने HMV ने काढलेल्या लताच्या ४ कॅसेट आल्या होत्या त्यात ऐकला.

एकतत्व नाम दृढ धरीं मना । हरीसि करुणा येईल तूझी ॥१॥
तें नाम सोपें रें राम कृष्ण गोविंद । वाचेसीं सद्‌गद जपें आधीं ॥२॥
नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जाशी झणें ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरीं । धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥

अर्थ, भक्ती, शब्द अशा अनेक मार्गाने ज्ञानेश्वरांचे अभंग वाचनीय वाटतात. फारसे प्रसिद्ध नसलेलेही / कमी माहित असलेले बरेच अभंग आहेत, वाचकांनी भर टाकावी.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचून फार आनंद झाला. शांत वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१००% ज्ञानेश्वरांच्या शब्दांची कमाल.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला