विचित्र वीणा

काल रामदास यांचा जंम्बोजेट धागा वाचला आणि बऱ्याच दिवसांनी डोक्यात अनेक जुन्या कवितांचा कल्लोळ सुरू झाला. त्यातही काही कविता अश्या असतात की आपली नाळ त्या कवितेशी लगेच जुळते.. आपण आपल्याला त्या कवितेत बघू शकतो. बा. भ. बोरकरांच्या अनेक कविता छान आहेत मात्र त्यांची 'विचित्र वीणा' आपल्याही मनात अलगद झंकारते हे खरं.

निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याच्या कारंजीशी कुठे गर्द बांबूची बेटे

दुपारची वेळ असली तरी निळेशार तळे.. एखादा वेडा काळा ढग त्या तळ्यात न्याहाळतोय.. भोवतीची हिरवीकंच शेते सूर्यस्नान करताहेत.. अशावेळी दूरवर एखादे बांबूचे बेट... त्याच्याकडे बघूनच शांत वाटू लागते. अश्या गच्चपुच्च बांबूच्या छायेत आम्ही गावाला गेलो की बसायचो - खेळायचो तेही आठवतं.. गावातल्या गरम वातावरणात ही 'कारंजीशी' बेटे कवितेच्या सुरवातीलाच थंड करून टाकतात.

गाव म्हटलं की माळरान आलंच. त्यावर वेडंवाकडं वाढलेलं गवतही वाढतं मोठ्या मजेने हे सूर्यस्नान घेत असतं.. जवळच्या तळ्यावर जसं हे झुळझुळतं तसंच तसंच एखाद्या भिंतीवरही उगवायला कमी करत नाही.. गाव म्हटलं की अशी तळी, हिते, बांबूची बेटे याबरोबर जिथेतिथे मजेत उगवलेले गवतही खास आठवले नाही तरी जमेत धरलेले असते आणि कवीच्या पुढल्या ओळी येतात आणि मग त्या ओळींच्या नजाकतीबद्दल बोलायला शब्दच थोटे पडतात.

जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतिच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होउनी अनावर

आता दुपार कलली आहे. दुपार कलल्यावर साऱ्या स्थिरचर सृष्टीत बदल होतो. गाई-म्हशी, बकऱ्या यांच्यासोबत ही होऊ घातलेली संध्याकाळ अनुभवताना कवी खूप काही चित्रदर्शी लिहितो-

तारांमधला पतंग कोठे भुलून गेला गगनमंडला
फणा डोलवित झोंबू पाहे अस्त-रवीच्या कवचकुंडला

कुण्या पोराच्या मांज्यातून निसटून आभाळाला भुलून ते आकाश गाठू पाहणारा एक पतंग दुर्दैवाने तारांच्या जंजाळात अडकला असेल पण त्याचे आकाशाचे स्वप्न विरले आहे का? तर नाही! कवीला तो लटपटत्या पतंगातही आकाशातील सूर्यबिंबाशी झोंबणारा फणा वाटतो आहे. तारेत अडकलेला पतंग आणि पार्श्वभूमीवर सूर्यबिंब असताना त्याच्या फडफडण्याला 'झोंबणं' म्हणून त्याची फडफड कवी अलगद वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो.

उंचवट्यावर म्हशी गोठल्या तसेच कोठे कातळ काळे
वर्ख तृप्तीचा पानोपानी बघून झाले ओले-ओले

कोठे तुटल्या लाल कड्यांवर चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला सटीन कांती गोरे गोरे

फुलपाखरी फूल थव्यावर कुठे सांडली कुंकुंमटिंबे
आरस्पानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

या कडव्यातील 'नेमकी' विशेषणे कवितेला उठाव तर देतातच पण प्रसंगातही जिवंतपणा आणतात. 'गोठलेल्या' म्हशींचा अनुभव तर आपल्यातील प्रत्येकाने घेतला असेल. क्वचित एखादा कान हलला तर हलला अश्या स्तब्ध म्हशींना एका 'गोठलेल्या' मध्ये कवी अख्खे चित्र डोळ्यापुढे उभे करतो बघा. याशिवाय कड्यांवरून तुरुतुरु चालण्याला बकऱ्या व तिची पाडसे हे देखील असेच रमणीय दृश्य.. कवी बघतोय ती पाडसे धीट तर आहेतच एका पिलू गोरे तर आहेच पण त्याची कांती 'सटीन' आहे. अशीच ही कविता वाचताना कुंकुंमटिंबे या मोहक शब्दावरही मी नेहमी असाच थबकतो. फुलांच्या ताटव्यावर - गालिच्यावर- बसलेली फुलपाखरे आणि फुलपाखरांच्या पंखांवरली नक्षी या दोन्हीचं वर्णन या 'कुंकुंमटिंबे' मुळे भन्नाट चित्रदर्शी होतं. तसंच 'आरस्पानी' पाणी काय 'तरते' बगळे काय.. अगदी देखणे वर्णन.. मला लहानपणी हे प्रतिबिंब बघून बगळ्यांचे पाय कितीही लांब होऊ शकतात असे वाटायचे त्याचीही एकीकडे आठवण होत असते आणि हे 'तरते' बगळे वाचले की अंतरातले इतरांनाही पटल्याचा-वाटल्याचा आनंद गवसतो.

कुठे आवळीवरी कावळा मावळतीचा शकुन सांगे
पूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे

क्या बात है! 'ळ' चा प्रास केवळ ज्ञानेश्वरांनीच वापरला आहे असे नाही तर यातही किती 'सौंदर्याने' त्याचा वापर केला आहे. त्यातही कवितेत उगाच अनवट- भारदस्त पक्षी न वापरता कावळा (वर बगळे) असे अगदी नेहमीचे पक्षी वापरून कवी त्याचे अनुभवणे आपले करून टाकतो. दुसऱ्या ओळीकडे विशेष बघा (एकीकडे सूर्य मावळत असताना) पूर्वेला चंद्र उगवला ही कल्पना कवीने किती खुबीने उलगडली आहे. उगवणारे नितळ शुभ्रतम चंद्रबिंब हे जणू इंद्राचे कोरीव काम आहे.. बरं इतकंच नाही तर त्याचा रंग कसा आहे तर शुभ्र नव्हे तर 'संगमरवरी'. क्या बात है!

हे सगळं वाचताना प्रश्न पडतो की कवी कुठे बसून इतक्या विविध गोष्टी एकत्र टिपतो आहे? त्याचं उत्तर शेवटच्या कडव्यात मिळतं..

घाटामध्ये शिरली गाडी अन रातीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्र वीणा अजून करिते दिडदा दिडदा

इतकंच नव्हे तर ते कडवं वाचल्यावर पुन्हा एकदा कविता वाचा..(त्यासाठीच तर माझी बडबड करड्या ठशात दिली आहे) आणि मग विचार करा आपण मुंबईला चाललो आहोत... आपलं शहर मागे पडलं आहे आणि वाटेत लागणारी इटुकली -पिटुकली गावे न्याहाळत प्रवास चालला आहे.. वाटेत निळ्याशार तळ्याचं गाव लागतं.. तर कुठे गवतांनी भरलेलं माळरान लागतं.. मध्येच एखाद्या गावातून गाडी जाताना तारांमधला पतंग दिसतो तर दूरवरच्या डोंगरांवर, डबक्यांमध्ये, फुला-पानांवर बहरलेला सुंदर निसर्ग आणि त्या निसर्गचित्रात जिवंतपणा आणणारे प्राणी-पक्षी यांचे निरीक्षण करता करता घाट लागतो.. आता मुंबई जवळ आली आहे. रात्रही झाली आहे आणि 'ती सूर्यालाही जिवंततेचे अर्घ्य देणारी' गर्दी आता लवकरच भेटणार आले मात्र त्या आधी शांत गडद अंधारातून जाताना जी तितक्याच शांत सुंदर चित्रांनी सजलेली 'विचित्र वीणा' झंकारत राहते त्याला तोड नाही. हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात अशी कविता शांतपणा देते नाही का?

field_vote: 
3.9
Your rating: None Average: 3.9 (10 votes)

प्रतिक्रिया

रसग्रहण आवडलं. बोरकरांच्याच एका कवितेतली 'ओळखीचेसे अनोळखी कुणी नकळत अंतर मंतरणारे, भेटावे मज वळणावरती' ही ओळ आठवावी तशी ही सुरेख चित्रदर्शी कविता आहे. कडेवर गवत वागवणारी म्हातारी भिंत हे चेतनागुणोक्ती अलंकाराचं उदाहरण आणि कातळासारख्या गोठून स्तब्ध राहिलेल्या म्हशी हे त्याच्या अगदी विरूद्ध उपायोजन एकाच कवितेत बेमालूमपणे येऊन जातं. पडदा पडल्यानंतरही मनात वाजत राहणारी वीणा वर्डस्वर्थच्या डॅफोडिल्सची (They flash upon that inward eye) आठवण करून देणारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितांचा आणि आमचा ३६ चा आकडा आहे, पण हे रसग्रहण आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

रसग्रहण आवडलं. मला ही कविता लहानपणापासून खूप आवडते. आईकडून बोरकरांचं खूप कौतुक नेहमीच ऐकत आलो ती बर्‍याचदा त्यांच्या कविता म्हणून दाखवायची आम्हाला. आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या मुलांच्या गोव्याच्या शालेय अभ्यासक्रमातल्या मराठीच्या पुस्तकांतल्या कविता/धडे मोठ्या आवडीने वाचायचे. तेव्हा एकदा त्यांच्या मराठीच्या पुस्तकात ही कविता वाचली होती. मला खूप आवडली. मी वहीत लिहून घेतली. पण ती कळायला बरीच वर्षे लागली. या नादमय, मोहकशा शब्दांची जादू अशी काही झाली होती की त्या नादाच्या धुंदीत त्या शब्दांमागे काय अर्थ दडलेला आहे याचा विचार कधी करावासाच वाटला नाही.

कॉलेजात असताना एकदा असाच गावातल्या देवळावर जाऊन बसलो होतो. अचानक देवळाशेजारी असलेल्या निर्मळ तळ्यावरून बगळ्यांचा एक थवा उडत गेला आणि तेव्हा नेमकी ही कविता आठवली. मला अजून नीट आठवतं कारण "आरस्पानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे" कशी दिसतात आणि 'अंबरात फुललेली बगळ्यांची माळ' या दोन्ही गोष्टी मी तेव्हा अनुभवल्या होत्या. दिवसभर या दोन्ही कविता डोक्यात घुमत राहिल्या. 'बगळ्यांची माळ' तेव्हा व्यवस्थित अनुभवू शकलो नाही कारण प्रेम वगैरे गोष्टी तेव्हा केवळ पुस्तकांत आणि चित्रपटांत वाचल्या/पाहिल्या होत्या तेवढ्याच. पण विचित्रवीणेची एकेक ओळ त्या दोन दिवसांत अनुभवली. पानांवरला तृप्तीचा वर्ख, कुंकुमटिंबं, सटीन कांती सारंच! संध्याकाळला "पूर्वेला राऊळ इंद्राचे.." या सुंदर ओळीत चंद्राचे उगवणे दडलेले आहे कळले तेव्हा बोरकरांना तिथल्या तिथं आपसूकच दंडवत घातला गेला.

कदाचित गोव्यातल्या त्या निसर्गातच बोरकरांची कविता वाढली असल्याने ओळन् ओळ तिथं नेमकेपणाने अनुभवता येते! म्हणजे कुठंही यावीच इतक्या चित्रदर्शी आहेतच त्यांच्या कविता पण गोमंतकात ओळखीची खूण पटते!

माझ्या मनात जपून ठेवलेल्या कवितेचे इतक्या नेटक्या शब्दांत केलेले सुंदर रसग्रहण वाचून तू म्हणतोस तसा अंतरातले इतरांनाही पटल्याचा-वाटल्याचा आनंद मलाही गवसला. एक जेवणाची पार्टी हुंडी म्हणून लागू तुला. कुठेही कधीही वटवू शकतोस! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमके असेच मला पहिल्यांदा मर्ढेकरांची 'माघातली मुंबई' (अर्थात "पितात सारे गोड हिवाळा") भेटल्यावर झाले होते. अगदी मुंबईकर असूनही अश्या गोष्टी कधी लक्षातच आल्या नव्हत्या - ती कविता वाचेपर्यंत. (त्यातही गंजदार वगैरे शब्द खासच आहेत.) त्यानंतर काही गोष्टी पाहिल्या की त्या गोष्टी चांगल्या आहेत की अश्या चित्रदर्शी कवितांतील ओळी आठवल्याने त्यांना चांगले बनवत आहेत हे कधी कळले नाहि - अजुनही सांगता येत नाही.. अश्या ओळींनी काहि साध्या भासणार्‍या गोष्टीतील सौंदर्य उलगडवलेच नाही तर मनावर बिंबवले आहे (जसे या कवितेतला उगवता चंद्र, तारेवरील पतंग.. )

अर्थात अश्या अनेक चित्रदर्शी कविता आहेत पण काहि (उगाच) हळव्या करतात -- आतल्या 'विचित्रवीणेच्या तारांना' छेडतात झालं!

आणि हो! हुंडीची नोंद केली आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थंडाव्याच्या कारंजीशी कुठे गर्द बांबूची बेटे

तारांमधला पतंग कोठे भिडू लागला गगन मंडला

वर्ख तृप्तीचा पानोपानी बघून झाले ओले-ओले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गगन मंडला एकदा पुस्तकात बघुन क्न्फर्म करून बदलेन
बाकी टंकनदोष सुधारले आहेत. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण चित्रांची विचित्र वीणा अजून करिते दिडदा दिडदा

कुणी पाहिली किंवा ऐकली आहे का खरंच ती विचित्र वीणा???
ते खरंच वाद्य आहे बरं का एक!
vv
राजा केळकर म्युझियम आहे पुण्यात एक. तिथे जाऊन बघा. तिथे विचित्रवीणा आहे. कुठे सापडला नेटावर विचित्रवीणेचा आवाज तर नक्की ऐकवीन!
नेटावर विचित्रवीणा असा आयडी भेटलाय मला कधी काळी त्या काकू खरंच वाजवीत असत ते वाद्य.. पण त्याला बरीच वर्षं झालीत अन तेंव्हा डायलअप असे.. अन रेकॉर्डींग करण्याची अक्कल नव्हती..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

चित्र जालावरून साभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यात एक कासव सुद्धा दिस्तंय Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मला वाटतं ती चक्रं दाखवली आहेत शरीरातील. आणि अनाहत चक्र (हृदय) , वीणेसमान झंकारतं असा काहीसा अर्थ आहे. कासव म्हणजे मेरुपृष्ठ असा काहीसा अर्थबोध मी माझ्यापुरता करून घेतला. जसे समुद्र मंथन कासवावरती मेरु पर्वत ठेऊन झाले तद्वत मूलाधार चक्रापाशी हे कासव दाखविले आहे. म्हणजे मला काहीसा अर्थ लागतो आहे. पण कोणी जर विषद केला तर आवडेल.

सापडलं -
Veena has been compared to human body. The human back-bone (Spinal Chord) stands straight from the Mooladhara (the seat of the body) up to the head.In the top of the head exists the Brahma Randhra. Just like the 24 frets of the Veena, human back bone has 24 divisions.

According to the anatomy, the back bone has 7 cervicles, 12 thorasic and 5 lumbar vertibrays.In Veena the distance between each fret is broad in the lower octaves and becomes less while proceeding towards the higher octaves.Similarly the back bone is thick at the Mooladhara and the distance between each ring becomes less while proceeding towards the Brahma randhra.The Mandara Sthaayi Swara starts from the seat point of the human back bone and as it proceeds towards the Brahma Randhram situated in the Sahasraram, the pitch or sruti increases. It is here, where the life of music is situated.The nada born out of the union of prana (life) and agni (fire) starts from the Mooladhaara at low sruti and reaches the Sahasrakamala crossing the Swaadhisthana, Manipoora, Anaahata, Visuddha, Aagna, the Shadchakras. In this course the sruti (pitch) increases.This shows the resemblance between the Daivi Veena and man made Veena. So it is definite that to attain Moksha nada yoga is a correct path, and for practising nada yoga Veena is an appropriate instrument.

(जालावरून (http://divine-instrument-veena.blogspot.com) साभार)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रसग्रहण आवडल, कविता तर आवडतीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

अतिशय आवडत्या चित्रदर्शी कवितेतली चित्रं खुलवून दाखवणारं रसग्रहण.

शेवटच्या कडव्याने कवितेला एक वेगळीच पातळी प्राप्त होते. मग ती नुसती मनोरम चित्रांविषयी रहात नाही. आयुष्याच्या प्रवासातले मनात कोरून राहिलेले अनुभव तो प्रवास संपत आला, ती चित्रं दिसणं थांबलं तरी मनात झंकारत रहातात असं सांगते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोरकर, मर्ढेकर आणि बालकवी यांच्या कवितांचं शब्दात रसग्रहण करणे अत्यंत अवघड आहे. त्यांच्या कवितांमधले अतिशय साधे पण तरीही नादमय, लडिवाळ पण चित्रदर्शी शब्द इतके छान असताना त्यावर आपल्या शब्दांची मलमपट्टी बर्‍याचदा खूप कोरडी, कृत्रिम वाटते. असे असतानाही हे रसग्रहण खूप छान वाटले. उगाच आधीच चित्रदर्शी असलेल्या ओळींचा अर्थ सांगणे किंवा समासालंकाराची चिरफाड करणे वगैरे गोष्टी साफ टाळल्याने लेखातून खरोखरीच रसग्रहण झाले.
छान लेख.

मुंबईला चाललोय, गर्दी भेटणार आहे अशी कल्पना का करावी वाटली हे मात्र कळले नाही. सिलीगुडी/दार्जिलिंगसुद्धा चालले असते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच घरी येताना बाणस्तारीच्या पुलावरून दूरवर एक गायीम्हशींचा कळप पाहिला, आणि मनात 'उंचवट्यावर म्हशी गोठल्या' ही ओळ अचानकच लखलखून गेली. आता हा लेख उघडला आणि बाकीबाबचं दर्शन! धन्यवाद रे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोरकर न वाचल्याची खंत अधिक बोचरी झाली.
कुणी तरी समग्र बोरकर द्या रे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण आहे रे तिकडे?
जरा खजिन्यातल्या ३नं. कपाटातून समग्र बोरकर काढून आण पाहू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पत्ता पाठवा. तेथून समग्र बोरकर नेण्याची व्यवस्था करतो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पत्ता माहित आहेच तुम्हाला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रसग्रहण छान झालेले आहे. कवितेतील निसगचित्र श्रावणातले आहे काय? म्हणजे कधीकधी काळे ढग दिसतात, थोडासा पाऊस पडल्यामुळे निसर्ग भिजलेला असतो, पण कधीकधी तेजस्वी सूर्यही दिसतो. (किंवा असे आहे काय, की सूर्याचे कवच म्हणजे ढगांचे आच्छादन? मग पावसाळ्यातील कुठलाही काळ असू शकतो.)

काही शब्दांचा अर्थ समजावून सांगितला तर मला हवा आहे :
१. दुधावर ("दुधावर आली शेते")

२. कारंजीशी ("थंडाव्याच्या कारंजीशी") कोकणी पद्धतीने "कारंजी-शी=कारंजी-जशी" प्रत्ययाचा "कारंजी-जणू" असा अर्थ घेतला तर मला अन्वय लागतो. गर्द बांबूची बेटे थंडाव्याच्या कारंजासारखी आहेत. (उंच बांबू कारंजांतील पाण्याच्या झोतासारखे दिसतात.) परंतु बहुतेक मराठी वाचकांना "कारंजी-शी=कारंजी-जशी" प्रत्ययाचा "कारंजी-जणू" असा अर्थ लागतो का? बोरकरांना मराठी वाचकांसाठी तो अर्थ अभिप्रेत होता काय?

३. सुखासवे ("म्हातारी थरथर कापे सुखासवे होउनी अनावर") याचा अर्थ "सुखाची आसवे/अश्रू" असा आहे काय?

- - -
*>मग त्या ओळींच्या नजाकतीबद्दल बोलायला शब्दच थोटे पडतात.
या ओळीत सदस्य विसोबा खेचर आठवले. अशी वाक्ये जवळजवळ नेहमीच रसग्रहण कमजोर करतात. कुठल्याही कलाकृतीचे वर्णन हे त्या कलाकृतीच्या अनुभवापेक्षा वेगळे असते. रसग्रहणाच्या वाचकाला तशी अपेक्षाही नसते, आणि लेखकाची तशी महत्त्वाकांक्षाही नसते.
*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता पाऊस कमी झालेल्या काळातील आहे, याचं कारण म्हणजे "कुठे दुधावर आली शेते" हा उल्लेख, भाताच्या लोंब्यांमधे दाणे भरतात त्या कोवळ्या दाण्यांबद्दल आहे. आणखी काही उल्लेख, जसे की 'राऊळ इंद्राचे' हा इंद्रधनुष्याबद्दल आहे. या कविततला फक्त एकच उल्लेख वेगळा आहे, तो म्हणजे पतंगाचा. पतंग साधारण संक्रातीला उडवतात, कदाचित हा पतंग कोणा अवखळ मुलाने पाऊस थांबल्यावर उडवलेला असेल!

'थंडाव्याची कारंजीशी' हे सरळच 'कारंज्यासारखी'या अर्थाने आहे. जुन्या मराठीतही 'शी' हा प्रत्यय वापरात होता.

सुखासवे हे सुख्+आसवे असंच आहे. म्हातार्‍या भिंतीच्या अंगाखांद्यावर कोवळे नातवंडसे गवत बागडते आहे त्यामुळे भिंतीच्या डोळ्यात सुखाची आसवे (दवबिंदू किंवा गवतावर साचलेले पाण्याचे थेंब)आली आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> परंतु बहुतेक मराठी वाचकांना "कारंजी-शी=कारंजी-जशी" प्रत्ययाचा "कारंजी-जणू" असा अर्थ लागतो का?
--- याचे उत्तर होकारार्थी आहे, असं वाटतं. मराठी वाचकांनाही याचा तोच 'प्रत्यय' यावा :). मूळ कवितेत थंडाव्याची कारंजीशी असे असावे.

>>> ३. सुखासवे ("म्हातारी थरथर कापे सुखासवे होउनी अनावर") याचा अर्थ "सुखाची आसवे/अश्रू" असा आहे काय?
--- येथे कदाचित श्लेष अभिप्रेत असू शकेल. 'सुखासह' आणि 'सुखाचे अश्रू' अशा दोन अर्थांनी.

पैसा ह्यांनी म्हटल्याप्रमाणे, कवितेतला काळ हा साधारण सरत्या पावसाळ्यातला/दिवाळीआधीचा 'भाते पिकली'पूर्वीचा काळ वाटतो. 'क्षेत्र साळीचे राधा, संसिद्ध' ह्या रेग्यांच्या उपमेची आठवण करून देणारी ही ओळ आहे.

ता. क. 'दुधावर आलेली शेते' ही प्रतिमा बोरकरांच्याच एका निराळ्या कवितेत येऊन गेल्याचं आठवत होतं. त्या ओळी आता आठवल्या -

उभार साळी भरून दूध, हवेत सजणी कापूरऊद
शेरवडाच्या ढवळ्या पानी, उधळे ऋतुचे लक्ष बिरूद

लावण्याचा लागुनि बाण, तृप्तीलाही फुटे तहान
मला खोवू दे तुझ्या कुंतली, एकच यातील पान लहान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हा काळ श्रावणातला वाटत नाही. पावसाळा सरल्यानंतर लगेचचा वाटतो. एखादा काळा मेघ.. एरवी लख्ख उन वगैरे वगैरे..

दुधावर ("दुधावर आली शेते")

भाताच्या लोंब्या आल्या आणि लख्ख उन असलं कि शेतांमधे हिरवा रंग दिसण्याऐवजी, लख्खता किंवा तेजाळलेली शेते दिसतात.. अर्थात त्या चकाकणार्‍या शुभ्रतेवरून मंद हवेची झुळूक गेल्यावर जे तरंग उठतात त्याला तोड नाही. तर त्यामुळे शेते दुधावर आली असे म्हटले असावे.

२. कारंजीशी ("थंडाव्याच्या कारंजीशी") कोकणी पद्धतीने "कारंजी-शी=कारंजी-जशी" प्रत्ययाचा "कारंजी-जणू" असा अर्थ घेतला तर मला अन्वय लागतो.

मलाही तोच अर्थ लागतो.

३. सुखासवे ("म्हातारी थरथर कापे सुखासवे होउनी अनावर") याचा अर्थ "सुखाची आसवे/अश्रू" असा आहे काय?

मला याचा अर्था सुखाने-सुखा 'संगे' असा लागतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकीबाब गोव्याच्या भूमीतील असल्याने त्यांच्या कवितेत तेथील निसर्गाचे प्रतिबिंब उमटणे स्वाभाविक आहे. पण असा निसर्ग पुण्याहून मुंबईला येतानाही आढळतो. कवीवर्य बोरकरांचे पुणे व मुंबईत नित्य येणे असल्याने त्यांना ही कविता पुणे-मुंबई प्रवासातही स्फुरली असणे शक्य आहे. 'कोठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे' या ओळीत लाल कडा म्हटले आहे म्हणजे लाल मातीचा डोंगर. गोव्याची माती लाल, पण लोणावळा-खंडाळा येथील, तसेच कोकणातील मातीही लालच आहे. मला स्वतःला दाट शक्यतेने असे वाटते, की हे कोकणच्या भूमीचेच वर्णन असावे कारण शेवटी 'घाटामध्ये शिरली गाडी, अन सार्‍यावर पडला पडदा' असे म्हटले आहे. म्हणजे हे दृश्य बघून झाल्यावर वळणावळणाचा घाट लागला आहे. गोव्यात फारसे तीव्र वळणाचे घाट नाहीत. ते सुरु होतात कोकण-देश या मार्गावर (फोंडा, आंबोली)

'कुठे दुधावर आली शेते' या शब्दांतून भातशेतीच प्रतित होते, असे नाही. पावसाळ्यानंतर ज्वारी, बाजरी, तांदूळ या पिकांचे दाणे भरु लागतात म्हणजेच या कोवळ्या दाण्यांत दूध भरु लागते. ज्याअर्थी 'जिकडे तिकडे गवत बागडे' ही ओळ आहे त्याअर्थी हा नक्कीच पावसाळा संपल्यानंतरचा हंगाम आहे. कारण त्यावेळेस गवत दाट असते आणि जनावरांना चरायला हिरवा चारा जिकडेतिकडे विपुल असतो.

ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊनी अनावर, या ओळीतील सुखासवे म्हणजे सुखाची आसवे, हे पटते कारण 'आसवे अनावर होणे', हा समर्पक शब्दप्रयोग आहे. इथे म्हातारी अनावर झालेली नाही. ती थरथर कापतेय आणि सुखाचे अश्रू अनावर झालेले आहेत. सुखासवे म्हणजे सुखाने (सुखासह) असा अर्थ घेतला तर सुखाने अनावर झालेली म्हातारी थरथर कापतीय, असा गंमतीशीर वाटू शकणारा अर्थ होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कविता जुन्या मराठीच्या अभ्यासक्रमात होती. मोठ्या भावंडांचे ऐकून आम्हीही लहानपणी ती पाठ केली होती आणि चालीत म्हणण्याचा आनंद काही औरच असायचा. या कवितेतील काही शब्द तेव्हा पुरते कळले नव्हते. सटीन कांती म्हणजे नक्की कशी? दिडदा दिडदा म्हणजे काय? असे प्रश्न पडत. (आमचे एक सर गमतीने 'अरे दिडदा दिडदा म्हणजे तीनदा कारण दीड + दीड = ३, असा विनोद करायचे.) तर या दिडदा दिडदाचे कोडे मोठेपणी मी सतार शिकायला गेलो तेव्हा उकलले. सतार वाजवताना बोटात जी नखी घालतात तिने तारेवर पुढे-मागे असा आघात केला जातो तो संगीतलेखनाच्या भाषेत 'दिड' असा नोंदवला जातो. एका बाजूचा अर्धा स्ट्रोक 'दा' तो अलंकार साधारण असा पाठ करावा लागे. (आता माझ्या अचूक लक्षात नाही कारण संगीतसाधना नशिबात नव्हती. तस्मात चू. भू. दे. घे.)

दा दिड दिड दा
दा दिड दिड दा
दा दा दिड दिड
दिड दिड दा दा
दिड दिड दाड दाड दा
दिड दिड दाड दाड दा
दिड दिड दाड दाड दा

सतार, वीणा, सरोद अशी तंतुवाद्ये नखीने वाजवतात तेथे हीच 'दिड, दा, दिडाड, दाड' अशी भाषा असते.
त्यावेळी बाकीबाबांची ही ओळ मनात रुंजी घालत असे
'पण चित्रांची विचित्रवीणा अजुनी करते दिडदा दिडदा'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान रसग्रहण व चर्चा.
कवितेतला गर्भीत अर्थ काही निराळाच असावा असा कयास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आवडले. प्रतिसाद देखील उत्कृष्ट. बोरकरांच्या कवितेतले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शब्दाशब्दातली नादमयता. कसबी व्हायोलिन वादकाने गज तारेवर अलगद फिरवून स्वरांबरोबर शब्दही निर्माण करावेत तसे काहीतरी. तेही या कवितेत जाणवले. या कवितेतल्या नादमयतेच्या अनुभवाने तर मी अवाक झालो. ती कसबाच्या पलीकडे गेलेली कलात्मकता व्यक्त करायला माझ्या शब्दांचे हातोडे नक्कीच तोकडे पडतील.

प्रतिसाद द्यावासा वाटला म्हणून आत्ताच सदस्यत्व घेतले.

एका सुरेख कवितेची नव्याने ओळख करून दिलीत, धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा धागा निसटला होता..

बोरकर, मर्ढेकर, बापट वगैरे नावं आपुलकीची वाटणारी इतर मंडळी बघून आनंद झाला..

'सटीनकांती' - सॅटीन च्या तुकतुकीत कांतीची उपमा सुचून पुन्हा त्याचा संधी वापरणारे बोरकर म्हणजे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेमधे असताना ही कविता वाचायला गोड लागत असे पण प्रश्नोत्तरे व रसग्रहणाच्या भानगडींमुळे शत्रुपक्षात जात असे. आज या सरळ सोप्या रसग्रहणामुळे मित्रपक्षात आली आहे..
विचित्रवीणा अन साधी वीणा यात फरक दिसतो. हे वाद्य कालबाह्य झाले असावे. बाकी हल्ली इलेक्ट्रॉनिक युगामुळे सगळीच वाद्ये हळुहळू कालबाह्य होऊ लागली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेमधे असताना ही कविता वाचायला गोड लागत असे पण प्रश्नोत्तरे व रसग्रहणाच्या भानगडींमुळे शत्रुपक्षात जात असे. आज या सरळ सोप्या रसग्रहणामुळे मित्रपक्षात आली आहे..>>>>

असेच म्हणतो. बाकी बाकीबाबांची प्रत्येक कविता मनसोक्त आनंद देवुन जाते हे मात्र पक्के. धन्यवाद ऋषिकेशजी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परत वाचली व फार आवडली. नंदन यांचा प्रतिसाद देखील माहीतीपूर्ण आहे. वर काढते आहे.
___
ऋषीकेश गेलेत कुठे Sad खरं तर काल त्यांचेच लेखन वाचत होते किती विविध विषयांवर सकस लेखन केले आहे.
___
सटीन म्हणजे सॅटीन का?
अजुन एक अस्त-रवीची "कवच-कुंडले" - अप्रतिम उपमा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर रसग्रहण
व एकाहुन एक सुरेख प्रतिसाद
फार आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0