तुम्हाला कोणत्या (प्रमाणेतर) मराठी बोलीभाषा येतात अथवा परिचय आहे? सोबत बोलीभाषांमधील शब्दार्थ चर्चा

मोकळेपणाने सांगावयाचे झाल्यास मला स्वतःला एकही बोलीभाषा येत नाही. परंतु मराठी विकिपीडियाच्या मराठी विक्शनरी या (ऑनलाईन शब्दकोश) बन्धू प्रकल्पासाठी

१) मराठीच्या बोलीभाषांमध्ये असलेल्या पण प्रमाण मराठीत न वापरल्या जाणार्‍या शब्दार्थांची नोंद घेणे.
२) एखाद्या (कोणत्याही) शब्दास प्रमाण मराठीत वापरात नसलेला पण बोलीभाषेत असलेल्या समानार्थी शब्दांची नोंद घेणे

* किमान शब्दार्थ तर नोंदवावेतच पण शक्यतोवर वाक्यात उपयोगाची उदाहरणे आणि जाणकार असल्यास व्याकरण विषयक अधीक माहितीही आवर्जून नमुद करावी.

*हे या धाग्याचा मुख्य उद्देश आहेत. धागा महाराष्ट्र आणि बृहनमहाराष्ट्रातील सर्व बोलीभाषा आणि तदनुषंगिक भाषा विषयक चर्चेसाठी आहे. तेव्हा एखाद्या बोलीभाषेचे नाव यादीत नसलेतरीही चर्चा करता येऊ शकेल तसेच यादीत जोडण्यासाठीही आपण सुचवू शकता.

**खालील यादीत नसलेली या बोली भाषांची नावे मिळाली काणकोणी, नंदीवाले, नाथपंथी देवरी, नॉ लिंग-मुरूड-कोलाई-रायगड,पांचाळविश्वकर्मा, गामीत, ह(ल/ळ)बी, माडीया, मल्हार कोळी, मांगेली, मांगगारुडी, मठवाडी, मावची, टकाडी, ठा(क/कु)री, 'आरे मराठी', जिप्सी बोली(बंजारा), कोलाम/मी, यवतमाळी (दखनी), मिरज (दख्खनी), जव्हार, पोवारी, पावरा, भिल्ली, धामी, छत्तीसगडी, भिल्ली (नासिक), बागलाणी, भिल्ली (खानदेश), भिल्ली (सातपुडा), देहवाळी, कोटली, भिल्ली (निमार),कोहळी, कातकरी, कोकणा, कोरकू, परधानी, भिलालांची निमाडी, मथवाडी, मल्हार कोळी, माडिया, वारली, हलबी, ढोरकोळी, कुचकोरवी, कोल्हाटी, गोल्ला, गोसावी, घिसाडी, चितोडिया, छप्परबंद, डोंबारी, नाथपंथी डवरी, पारोशी मांग, बेलदार, वडारी, वैदू, दखनी उर्दू, महाराष्ट्रीय सिंधी, मेहाली, सिद्दी, बाणकोटी यातील नावे यादीत जोडावी वाटल्यास प्रतिसादात नोंदवावे. (बोलीभाषांची नावे बोलीभाषा या नात्याने आंतरजालावरील जाणत्यांच्या नोंदीतून घेतली आहेत. काही ठिकाणी अपरिहार्यतेने जातींची/समाजांची नावे दिसत असलीतरी येथील उल्लेख केवळ भाषिक उद्देशाने आहेत जातीय उद्देशाने नाहीत.)

*धाग्याचा मुख्य उद्देश विकिप्रकल्पासाठी असल्यामुळे या धाग्यावरील आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील.

* एक पेक्षा अधिक बोलीभाषा येत असल्यास आपणास ज्या बोलीची माहिती अधिक आहे ती नोंदवावी

* सूची:मराठी बोलीभाषांमधील शब्द अद्याप स्वतंत्र सूची तयार न झालेल्या बोलींकरताची सामायीक सूची.

* सूची:कोल्हापूरी_बोली

* सूची:कोकणी भाषा

* सूची:चित्पावनी बोलीभाषा

* सूची:कादोडी बोली/ सामवेदी बोली

* सूची:वाघ्ररी बोलीभाषा/वाघरी

* सूची:कोलामी बोलीभाषा

*एथनालॉग कोड कोकणी [knn], वर्‍हाडी-नागपुरी [vah], गौळण [goj] सामवेदी [smv] अहिराणी [ahr], Bhalay [bhx], Far Western Muria [fmu], गोवळी [gok], Indo-Portuguese [idb], कतकरी [kfu], खानदेशी [khn], कोरकु [kfq], Korlai Creole Portuguese [vkp], Lambadi [lmn], Mawchi [mke], Nihali [nll], Noiri [noi], Northern Gondi [gno], Northwestern Kolami [kfb], Palya Bareli [bpx], Pardhan [pch], Pauri Bareli [bfb], Powari [pwr], Rathwi Bareli [bgd], Seraiki [skr], Tulu [tcy], Vaagri Booli [vaa], Varli [vav], Vasavi [vas], Waddar [wbq].

प्रतिक्रिया

सर्वनाम हे सहसा दुसर्‍या भाषेतील शब्दांनी(सर्वनामांनी) रिप्लेस करून भाषा (सहज) बोलता वापरता येतनाही येत नाही, या दृष्टीने सर्वनामांचे महत्व उल्लेखनीय ठरते. मराठी विक्श्नरी प्रकल्पात सध्या खासकरून सर्वनामांबद्दल काम चालू आहे. विवीध मराठी बोलीभाषेतील सर्वनामांबद्दल माहिती हवीच आहे. तशी सुरवात 'मी' या सर्वनामापासून करतो आहे आणि खासकरून झाडीबोली, नागपूरी, अहिराणी, तावडी, चंदगडी, वऱ्हाडी, देहवाली, बेळगावी, आगरी, तंजावर, जुदाव, लेवा या बोलीभाषांमधले काही पर्यायी समानार्थी शब्द असल्यास हवे आहेत.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मी शब्दाचे "म्या" असेही एक रूप आहे हे मुख्यत्वे कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात अथवा बोलीतील आहे ? या बद्दल माहिती हवी.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

सांगली-कोल्लापुराकडे म्हणतात.
-म्या बोल्लो न्हवतो? -
-म्या काय केलं न्हाय. इत्यादी प्रकारे पटकन आठवलं.

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

"म्या" शब्दाच्या प्रमाणतेबद्दल १९व्या शतकात चर्चा झाली होती, आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे मत चालले असते तर शालेय पुस्तकांत देखील "मी" बरोबर "म्या" आणि "त्वा" प्रमाण ठरले असते. पण तत्कालीन सरकारी ट्रान्स्लेटर आणि शाळांचे सुपरिंटेंडेंट मेजर कँडी यांनी "म्या" च्या वापरास विरोध केला, कारण "म्या" हे कोकणात प्रचलित असून पुण्यात नव्हते असे त्यांचे मत पडले. कृ. भि. कुलकर्णी यांच्या "आधुनिक मराठी गद्याची उत्क्रांती" पुस्तकात या वादाची दीर्घ चर्चा आहे. कँडींनी दादोबांच्या व्याकरणावर लिहीलेल्या रिपोर्टचं छोटंसं चिटोरं (मुंबई पुराभिलेखागारातून साभार):

ग्रेट माहिती, या दोघांमध्ये वाद झाला होता अशी माहिती वाचण्यात होती पण त्याचा म्या आणि त्वा या शब्दांशी संबंध आहे याची पुसटशी कल्पनाही नव्हती. मेजर कँडी हस्ताक्षर माझ्यापुरते अगम्य ठरले तरीही आपण एवढ्या ऐतिहासिक दस्तएवजाचे छायाचित्र उपलब्ध केलेत हे कौतुकास्पद आणि अभिनंदनीयच. दिग्गजांमधला वाद म्हणजे अजून वाचावयास हवे. आपला प्रतिसादवाचून माझ्यापरीने मोल्सवर्थात शोध घेतला तर म्या शब्दाची स्वतंत्र एंट्री दिसली नाही पण असंख्य शब्दांच्या वाक्यात उपयोगामध्ये सामान्य मराठीत म्या शब्दाचा उपयोग आढळला.

प्रमाण मराठीच्या गरजेच्या पाठी मागून एकच बोली लादण्या पेक्षा दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या मार्गाने सामान्यांच्या बोली अधिक प्रमाणात प्रमाण मराठी म्हणून शिक्षणात सामावली जाणे आवडले असते (हे माझे सध्याचे व्यक्तीगत मत)

माहितीपूर्ण प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मॉरिशसमध्ये थोडेफार मराठी भाषिक आहेत असं ऐकून आहे. ही 'मोरस मराठी' कुणी ऐकलेली आहे का? समजायला किती सोपी/अवघड असते?

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

+१ त्याच प्रमाणे तंजावूर व इस्रायलमधील मराठी बोली वेगळ्या आहेत.
पैकी तंजावूरचे लोक त्या भाषेला मराठी म्हणतात म्हणून आपणही म्हणायचे नैतर वेगळीच भाषा आहे ती.
इस्रायलमध्ये ती कशी बोलली जाते याचे कुतुहल आहे. पण तिथे मराठी बोलणारी पिढी आता संपत आलीये.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पैकी तंजावूरचे लोक त्या भाषेला मराठी म्हणतात म्हणून आपणही म्हणायचे नैतर वेगळीच भाषा आहे ती.

सादर असहमत. अ‍ॅक्सेंट सोडला तर शब्दसंपदा फारही वेगळी नाही की ज्यामुळे वेगळी भाषा म्हणावे. त्यांची पॉडकास्ट्स ऐकून तरी ती भाषा साधारणपणे कन्नड लोक बोलतात तशा छापाची मराठी वाटते. काही तमिळ शब्द अधूनमधून येतात तेवढे सोडले तर बेशिक स्ट्रक्चर सेमच आहे. शिवाय सध्याच्या मराठीत लुप्त झालेले पण जुन्या मराठीत असलेले उदंड इ. शब्द आहेत इतकंच.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile
तो प्रतिसाद लिहितेवेळी तुच डोळ्यासमोर होताच. आधी 'बैटमॅन अधिक माहिती देऊ शकेल अशी ओळही लिहिली होती." पण नंतर ती काढली - कारण चुकले असल्यास ती सुधारशील नी नसल्यास पुरवणी जोडशील याची खात्री होतीच!

तेव्हा ओव्हर टु यु! अधिक तपशीलात माहिती येऊ दे. खरंतर वेगळ्या सोदाहरण लेखाची मागणी करतो

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile

लेख लिहिण्याइतपत माहिती नाही, त्यांनी मध्यंतरी काही पॉडकास्टे नेटवर अपलोडवली होती त्यांवरून मी तसे म्हणालो इतकेच. Smile

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यांचे मराठी शब्द जरी खूप सारखे असले तरी उच्चार फार वेगळे असतात. माझे काही मित्र आहेत, त्यांना आम्ही मराठीत काय बोलतो ते कळतं पण ते काय बोलतात हे आम्हाला फारसं कळत नाही. मद्रासला असताना मी जिथे रहायचो तिथे एक मंदीर होतं, जाता येता असं वाटायचं की मराठीत आरत्या चालल्यात. खात्री करावी म्हणून एकदा मंदीरात गेलो. विठ्ठलाचं मंदिर होतं, आरत्या तंजावर मराठीत होत्या पण एकही शब्द कळत नव्हता. मंदिराच्या पुजार्‍याच्या मुलाचं नावंही पांडूरंग होतं.

-Nile

ओह अच्छा. मी तंजावर मराठीची पॉडकास्टे ऐकून मत बनवलेले आहे, बाकी प्रत्यक्षानुभव नाही. पाहिले पाहिजे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आरत्या तंजावर मराठीत होत्या पण एकही शब्द कळत नव्हता

हे ठीकच आहे. अगदी पुणेरी मराठीतल्या आरत्यादेखील जश्या प्रकारे म्हणतात त्या कुणा पुणेकरालातरी कळतात.. ?!! Wink

"वाई वाई जन्म मरणाचे वाई"

किंवा

"साई विवाद कर्ता पडलो प्रवाही, तेथुन भक्तालागे पावस लवलाही" वगैरेचे अर्थ शोधायला मराठीच्या ज्ञानाचा कायपण उपेग नाही त्याकरिता आंतरजालीय तज्ञांचीच मदत लागते.

मुंबै लोकलमधे टणटणटणटणटणटण फास्ट टाळ कुटत आणि त्यात भर म्हणून डॉप्लर इफेक्टने फिस्कटलेल्या आरत्या कोणी ऐकल्या आहेत का? त्या कोणत्या भाषेत असतात ? "कैफ" या एकाच भाषेत बहुधा..

(तेथुन भक्तालागे पावस लवलाही - लहानपणी या ओळी ऐकू आल्यावर मला स्वामी स्वरुपानंद रा. पावस जि. रत्नागिरी यांच्याबाबत काहीतरी ओळ आहे असं वाटायचं. पावसच्या बसमधे आपण बसलो आहोत आणि बस लागतेय असाही भास व्हायचा. बादवे ते शब्द तसे नाहीयेत हे आता कळले आहे.)

Smile

"साई विवाद कर्ता पडलो प्रवाही "

हे "साही विवाद करितां पडली प्रवाही" असे आहे, ह्यातली सहा हि शास्त्रे/दर्शने आहेत.

हो.. "ते पडले" असा मूळ उल्लेख असताना गाणारी व्यक्ती स्वतःच्या लिंगानुसार "पडलो" किंवा "पडले" म्हणते हे यथावकाश समजले. वरील सर्व उल्लेख त्या त्या वेळच्या समजुतीचे आहेत. Smile

श्री हनुमानस्त्रोत्र ऐकतानाही व्यायामशाळेचे सर "हे धरा पंधरा कोटी" असे म्हणायचे. पंधरा श्लोकी किंवा मूळ काय आहे ते कळण्याचा प्रश्नच नव्हता. आपले ज्येष्ठ जे काही गाताहेत ते आपणही तारस्वरात गायचे असा आरतीचा प्रघात असल्याने आम्हीही पंधरा कोटीच म्हणायचो. बरेच पैसे वाटायचे. या स्तोत्राने पंधरा कोटींचा लाभ होतो अशी तेव्हा स्वतःपुरती बालमनाची समजूत होती.

पुण्यात ऐकलेल्या एका कानगोष्टीप्रमाणे एका देवळात अनेक म्हातारे लोक्स अत्यंत तल्लीन होऊन "हरीणकासवापोटी परळात बाळ जन्मला" असे म्हणत होते असं म्हणतात. ही एक गोष्टच, पण मिसहर्ड लिरिक्सचे एक उदाहरण म्हणून बरी आहे.

सुखकर्ता दु:खहर्ता मधले ते वर्ल्डफेमस "संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना" विसरलात की काय ओ? अशा माठ भक्तांमुळेच गणपतीबाप्पा फक्त संकष्टीला पावतो, बाकी कधीही पावत नाही म्हणताना संकष्टीला त्यांच्या दर्शनासाठी तत्काल रिझर्व्हेशनसारखी मोठ्ठी रांग लागलेली असते. आपल्याकडं लोकांना डोकं अंमळ कमीच बघा.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो तर.. संकष्टी पावावे आहेच की लक्षात.

मुळात "सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची.." इथे ओळ तोडून .. उत्तमपैकी ब्रेक घेऊन मग निवांतपणे "नुरवी" हे पुढच्या "पुरवी प्रेम कृपा जयाची" ला जोडून टाकणारी रचना धन्य होय.

हा हा हा, अगदी अगदी!!

पण याचा दोष खुद्द रचनाकार रामदासांकडे जातो. योग्य तितक्या मात्रांत आशय भरावा ते नाही-कसं बसणार मग चालीत ते?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यावरुन,

पठाण हैबत खान पाजी..
पठाण हैबत खान पाजी..
किती तरी पाजी..
विद्यामृत सकलांना..

याची आठवण झाली.

अवांतर होतेय त्याबद्दल क्षमस्व...

हे हैबतखान पठाणाच्या जागी मास्तर घालून वाचलं होतं ओ कुठेशीक. कुठे ते विसरलो.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अपि चः भीमरूपी मध्ये 'वनारी अंजनीसूता' हेही एक असेच प्रकर्ण आहे. व्हाट इज़ वनारी, फॉर मारुतीस्सेक?????? ते वानरी आहे हे लै दिवसांनंतर कळालं.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा हा, मीही आधी असेच म्हणत असे पण आमच्या एका कर्मठ नातेवाईकाने आधी सगळ्यांदेखत लाज काढली आणि मग संथा देऊ केली होती.

गवि म्हणाले त्याप्रमाणे आरत्या ऐकुनच म्हणायला शिकल्यामुळे उच्चारदोष असणे शक्य आहे.

तंजावूर....नैतर वेगळीच भाषा आहे ती.

महाराष्ट्रा बाहेरच्या लोकात मराठीत तेथील स्थानिक भाषेच्या प्रभावाने बदल होणे स्वाभाविक आहे. पण त्या मराठीत शील्लक असलेले मराठी शब्द आणि शैली हा एक अभ्यसनीय भाषिक ठेवा असतो कारण महाराष्ट्रातील काही शब्द वापरातून बाद/कमी झाले असतील पण तेथील मराठीत शिल्लक असू शकतील म्हणून हा अभ्यास महत्वाचा. आपण हे वेगळेपण अधिक सविस्तर मांडल्यास त्याची नोंद मराठी विकिप्रकल्पांमध्ये घेणे सोपे जाईल.

ज्यू लोकांच्या वापरातील मराठीलाच बहुधा जुदाव मराठी म्हणत असावेत (चु.भू.दे.घे.) त्या मराठीचा नमुनातर उपलब्ध नाही. पण मराठी ज्यू लोकांकरीताचे एक तत्कालीन (जुने) पुस्तक मराठी विकिस्रोतावर चढवले गेले आहे. (खरे म्हणजे त्याचे युनिकोडीकरणात साहाय्य हवे आहे.) त्यातील मराठीच जुदाव मराठी आहे का वेगळे याची कल्पना नाही. इन एनी केस ती मराठी जुनी आणि काही शब्दलेखन वेगळे वाटते ते पुस्तक अधिक अभ्यासून कुणी सविस्तर निरीक्षणे नोंदवल्यास स्वागत असेल. (पुस्तक बहुधा अमराठी ज्यू व्यक्तीने विकिस्रोतात इतिहास जपला जावा म्हणून उपलब्ध करून दिले असावे)

काही वर्षांपुर्वी अहमदाबादेत मला एक मराठी (आर्कीटेक्ट) मुलगी भेटली होती तिने स्वतःहून ओळख करून दिली आणि ज्यू असल्याचेही (स्वतःहून) सांगितले, गावाचे नाव आणि कर असे आडनाव होते. स्वतःहून सांगितल्या शिवाय ती ज्यू आहे हे कळण्यासारखे काहीच नव्हते.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

"मोरस मराठी" हा तुमचा शब्द का मॉरिशसच्या मराठी लोकांचा ? (तुमचा असण्या बद्दल हरकत नाही फक्त शब्दाच नवीन इन्व्हेंशन असेल तर माहित व्हाव हा उद्देश) आणि मराठीच्या कोणत्या प्रादेशिकतेचा अधिक प्रभाव आहे अथवा प्रमाणमराठी पेक्षा त्यात कोणकोणते वेगळेपण आहे याची माहिती मिळाल्यास बरे पडेल.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मॉरिशस बेटांमध्ये तयार झालेली साखर म्हणजे मोरस साखर असा अर्थ 'मोरस' ह्या शब्दाचा दाते-कर्वे दाखवितात. येथे पहा. तसेच चीनहून आलेली ती 'चीनी'.

मॉरिशस बेटांमध्ये तयार झालेली साखर म्हणजे मोरस साखर

ही रिफाइन/पांढरी करण्यासाठी अ‍ॅनिमल चारकोल बोले तो प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेला कोळसा वापरत असत, अशी आख्यायिका आहे. जो आमच्या ब्रह्मवृंदाच्या अंगावर अर्थातच शहारे आणणारा. त्यावरून, 'मोर, ससा आणि खर म्हणजे गाढव, यांच्या हाडांचा चुरा म्हणजे मोरस साखर' अशी एक कोटी त्या काळी प्रचलित होती, असे (चिं. वि. जोश्यांचे लिखाण वाचून) समजते.

'मोरस कथा दशावतार' नावाचा मॉरिशसमधील लेखकांनी त्यांच्या मराठीमध्ये लिहिलेल्या कथांचा संग्रह येथे उपलब्ध आहे. तो पहावा.

अरेव्वा धन्यवाद, मोरस मराठी अधिकृत बोलीभाषा नाव आहे तर. अर्थात कथासंग्रहातील सर्वच साहित्य मोरस मराठीत आहे का ? कारण एक दोन अपवाद वगळता प्रमाण मराठीच्या जवळ जाणारे वाटते आहे. कदाचित मॉरिशस मध्ये शिक्षण प्रमाण मराठीत दिले जात असावे अशी शक्यता असू शकेल का ?

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

धन्यवाद नक्की वाचतो.

अवांतर : पुस्तकात महाराष्ट्र राज्य साहीत्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्ष महोदयांच आडनाव मोठ्ठं रोचक आहे Wink

मोरस आणि प्रमाण मराठीमध्ये फरक तितकासा जाणवत नाहीय. पहिली 'महादू' की कथा माझ्या सगळयात मोठ्या बहिणीला/आईला अभ्यासक्रमात होती. लहानपणी पाहिलेल्या त्या पुस्तकातली सगळी चित्रे हिरवट रंगात रंगवलेली होती. कथेचं नांव 'हीच खरी दौलत' त्यातल्या पात्राचे दौलती हे नांव पण सेम आहे.

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

इस्रायलमध्ये सुद्धा बरेच मराठी भाषिक आहेत, पण ते प्रमाण मराठी वापरतात की बोलीभाषा वापरतात, याची कल्पना नाही. लहानपणी आयझॅक नावाचा माझा ज्यू मित्र होता, त्याचे बाबा उत्तम मराठी बोलत असत. (सांगितले नाही तर चित्पावन वाटतील, असे दिसायला होते.) ते इस्रायलमध्ये सहज स्थलांतरित होऊ शकले असते, पण तिथे गेलो तर मित्राला काही वर्षे सक्तीने सैन्यात जावे लागेल, म्हणून ते तिथे गेले नाहीत, असे त्याच्याकडून ऐकले होते. इस्रायलमधील मराठी लोकांबद्दल माहितीचा लेख इथे वाचता येईल.

प्रकाटाआ (उगाच अवांतर होऊन चर्चा भलतीकडेच जायची म्हणून)

होऊ द्या चर्चा, झालंच अवांतर तर धागा वेगळा काढता येईलच!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या विषयावर सर्वसाधारण चर्चा तशा मराठी संकेतस्थळांवर झालेल्या दिसतात पण साधारणतः कोकण पट्ट्यातील बोलींबद्दल आधीक नेमकी भाषिक आणि शब्द विषयक माहिती चर्चातून उपलब्ध होते. इतर बोली भाषेबद्दल वरवर चर्चा होताना दिसते. अनुषंगिक अवांतरा झाले तर हरकत नाही पण वरवरची चर्चा होण्या पेक्षा त्यातून काही प्राप्त होईल असे झाल्यास बरे पडेल असे वाटते.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

बेळगावी आणि चित्पावनी बोलीचा परिचय/येत असल्याचे कौलात दोघांनी नोंद्वले आहे. मंडळी बेळगावी मराठी हा लेख मराठी विकिपीडियावर आहे पण त्यात एकच ओळ आहे. या लेखात भर घालण्यास साहाय्य करावे अथवा येथेही माहिती दिल्यास हरकत नाही. चित्पावनी या लेखाबद्दलही अशीच स्थिती आहे.


सामवेदी बोली
हा लेख नंतर चालू करूनही त्यात अधिक माहिती आहे. एवढी चित्पावन मंडळी आंतरजालावर असून चित्पावनी बोली बाबत फारच कमी माहिती आंतरजालावर दिसते. (उद्देश टिकेचा नाही माहिती देण्याचे आवाहन आहे हे वेगळे सांगणे न लगे)

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

वसईचे कोळी ज्यांचं सक्तीने धर्मांतर करण्यात आलं, त्यांची मराठी वेगळीच आहे. माझ्या कलीगला तिला काय म्हणतात ते विचारले. भाषेला वेगळे नाव नाही, वडवळी म्हणू शकता असं ती म्हणाली. म्हणजे ती नक्की वडवळी की तिच्या आसपास जाणारी दुसरी भाषा आहे हे काही कळाले नाही.

थोडंसं अवांतर- त्यांना म्हणे ईस्ट इंडियन म्हणतात . माझ्या एका कलीगच्या माहितीनुसार, प्रत्येक ठिकाणच्या धर्मांतरीतांना वेगळं काहीतरी म्हणतात आणि तिने वसईच्या मुलीला तू ईस्ट इंडियन आहेस का म्हणून विचारलं. वसईकरणीला त्या दुसर्‍या मॅडमना ही माहिती कशी म्हणून आश्चर्य वाटलं होतं.

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

त्यांच्या भाषेला वाडवळ भाषा असे म्हणतात.

बहुधा त्याला क्रिओल पोर्तुगीज म्हणतात. ते कोळी वसईचे की कोर्लईचे?

http://en.wikipedia.org/wiki/Korlai_Indo-Portuguese

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मौजे मुरूड-कोलाई/कोर्लाई-जि. रायगड अशी एंट्री मला दुसरीकडे नऊ लिंग या नावाने दिसली इंग्रजी विकिपीडीयावर आपण दिलेल्या लेखातही नऊलिंग नावाचा उल्लेख दिसतो. आपण दिलेल्या इंग्रजी विकिपीडिया दुव्यावर खालील वाक्य आहे.

So, basically Korlai Christians are NOT and should not be confused with East Indians of Mumbai / Bassein (Vasai).

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

आह ओक्के. थन्क्स फोर च्लरिफिचतिओन!

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Nou Ling ("our language" in the language itself).

इंग्रजी विकिपीडियावरील लेखात वरील प्रमाणे उल्लेख आहे. दक्षिणी भाषात 'नान' म्हणजे मी; 'आमची' ला काय म्हणतात माहित नाही समजा जर नो हे आमची या अर्थाने आले असेल आणि लिंग हे लँग्वेज शॉर्टपॉर्म असेल तर 'नऊ लिंग' हे माझे देवनागरी लेखन चुकीचे असू शकते.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

नो-नौ-नाउ इ. शब्द इंडोयुरोपीय भाषांत 'आमचे' या अर्थी वापरले जातात. त्यामुळे नौ लिंग म्ह. आमची भाषा हा पोर्तुगीज प्रकार योग्यच आहे. खुद्द संस्कृतमध्येही 'अस्मद्' च्या षष्ठी विभक्तीच्या अनेकवचनाचे वैकल्पिक रूप 'नः' असेच आहे. रशियन भाषेतही आमचे म्हणायला 'नाश्' आणि तुमचे म्हणायला 'वाश्' असेच शब्द आहेत. (संस्कृतमध्ये 'युष्मद्' च्या षष्ठी अनेकवचनाचे वैकल्पिक रूप 'वः' आहे.) दक्षिणी भाषेत ना/नान् = मी म्हणतात हे बरोबरे, पण इथे ते कनेक्शन लागू होणार नाही असे वाटते.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्रेट! (ये हुईना बात म्हणतात तसं) (बाकी आपल्या शब्दात:) थन्क्स फोर च्लरिफिचतिओन!

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

होय.
लहानपण अश्याच शेजार्‍यांसोबत गेल्याने त्यांची बोली मला कळते. मात्र बोलता (वाक्यरचना) नीटशी करता येत नाही.

काही गमतीशीर वाकक्प्रयोग असे:
(तुला)बोलावलेयः (तुला) वारलेय (माझ्या एका पेठीय भावंडाला 'तुझी आईस वारतेय' म्हटल्यावर घाबरून घरी गेल्याचे चांगलेच आठवते. त्या बिचार्‍याने 'वारणे' चा प्रमाणार्थ घेतला)
(तुझ्या)पासून : (तुया)ढिक्षान
तेव्हाचं तेव्हा: तवाचं तवा (तवाच का? भांडं का नाही वगैरे पांचट विनोद होणे ठरलेले Wink )
आलोयः आयलंव Smile

मात्र "आय लव यु" ला 'आलेवयु' म्हन्ला नं तो! Blum 3

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वारलेय-वारतेय

-वार्ता या शब्दाशी संबंध असावा ?

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

म्हैत नै.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यावरून आठवलं; अस्मादिकांनी नवीन लग्न झाल्यानंतर घारातून सांबार आणण्याची फर्माईश झाली तर तडक साऊथ इंडीयन भोजनालयातनं सांबार आणल. आणल्या नंतर उलगडा झाला सांबार म्हणजे कोथिंबीर (विदर्भ/उत्तरमहाराष्ट्रात काही ठिकाणी वापरला जात असावा). चिमटा आणि कडची या दोन श्ब्दात लय वेळा घोळ केला (माझ्या करता दोन्ही सारखेच Smile ).

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

चिमटा आणि कडची या वस्तूंचे फोटो टाकता येतील काय?

चिमटा म्हणजे गरम पातेलं उचलण्यासाठी वापरलं जाणारं उपकरण, त्याबद्दलच बोलताय ना? यातल्या छोट्या प्रकरणाला सांडशी असाही शब्द आहे असा माझा समज आहे. हे प्रकार वापरताना ते प्रकरण आडवं का धरतात मला समजत नाही, विशेषतः भौतिकशास्त्र शिकल्यानंतर. पापड वगैरे भाजायला चिमटा आडवा असेल तर ठीक आहे, पापडाचं वजन फार नसतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विदर्भात,
चिमटा म्हणजे जो फक्त पोळी/फुलका शेकायला वापरतात तो
सांडशी = पकड म्हणजे पातेलं/भांड/गंज उचलायला वापरतात ते
कोथिंबीर = सांबार
अमरावतीत घरी सांडशी व सांबार हेच शब्द प्रचलित आहेत.

अमरावतीतच नाही तर जवळ जवळ संपूर्ण विदर्भात प्रचलित असावे. तसेच, उलथनं ह्यालापण पर्यायी सराटा हा शब्द नागपूर्-यवतमाळ भागात प्रचलित आहे.

-अनामिक

बरोबर उलथनं = सराटा कदाचित हे संपूर्ण विदर्भात प्रचलित असावं.
अजून नारळाच्या पानाचा झाडू = खराटा.

सदर प्रतिसादकर्तीचा पातेली चिमटे वगैरेंशी संबंध क्वचितच आला असणार हे स्पष्टच दिसते. Blum 3

माझा अनुभव असा आहे की गरम पातेले उभ्या चिमट्याने उचलून त्या पातेल्यातला पदार्थ दुसर्‍या भांड्यात ओतताना (उदाहरणार्थ दूध कपात ओतणे) चिमटा धरलेल्या हातावर वाफ येऊन चटका बसतो.

मी आडवा चिमटा हलके चहाचे वगैरे पातेले उचलायला वापरतो. चहासाठी दांडीचे पातेले म्हणूनच वापरतात.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फारतर दोन कप दूध, चहा ओतणे वगैरे प्रमाणांकरता उभा चिमटा असला तरी वाफेचा चटका बसत नाही. (विभक्त कुटुंबसंस्थेचा विजय असो.) पण दोन लिटर दूध तापवून, गॅसवरून बाजूला करणं, लोखंडी कढई गॅसवरून खाण्याच्या जागी आणणं वगैरे कामांना आडवे चिमटे वापरताना पाहून मला बरेचदा असे प्रश्न पडायचे. (बहुदा दोन व्हेक्टरांचा स्केलर प्रॉडक्ट शिकताना मी बराच वेळ त्या चिमट्यांचा विचार करत होते.) शिवाय कोपरा ते तळहात या भागातले स्नायू मुख्यत्त्वे वापरण्यापेक्षा दंडाचे प्रामुख्याने स्नायू वापरणं अधिक सोयीचं, कारण ते स्नायू अधिक ताकदवान असतात.

(यापेक्षा सरळ उच्चभ्रू कॉफी प्यावी. चिमटे वापरण्यापेक्षा उच्चभ्रूपणा मिरवून लोकांना चिमटे काढणं सोपं!)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यापेक्षा सरळ उच्चभ्रू कॉफी प्यावी. चिमटे वापरण्यापेक्षा उच्चभ्रूपणा मिरवून लोकांना चिमटे काढणं सोपं!

कॉफी करताना चिमटा लागत नाही?

उच्चभ्रू आहेत ना, मग चिमटा नाही मायक्रोवेव्ह लगतो त्यांना कॉफीसाठी Wink

-अनामिक

कडचीने कढई उचलता येत नाही.
चिमट्याने पातेले व कढई दोन्ही उचलता येतात.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चिमटा आणि कडची या वस्तूंचे फोटो टाकता येतील काय?

चर्चा रोचक आणि माहितीपूर्ण होतीए खरी (त्याबद्दल सर्वांनाच धन्यवाद) पण अदिती म्हणतात तसे, फोटू असतील तर नेमकेपणाच्या दृष्टीने अधीक बरे पडेल.

खालील छायाचित्र माझ्या माहितीनुसार चिमटा आणि कडचीत फरक करणारी मंडळी खालील चित्रातील चिमट्यास चिमटा म्हणत असावीत.(दुजोरा हवा) या उपकरणाचा मूळ उद्देश चुलीतील गरम निखारा वगैरे पकडणे असा सुद्धा असावा असे वाटते. कडची आणि सांडशीची सुद्धा छायाचित्रे मिळाल्यास बरे पडेल शक्यतोवर नवी छायाचित्रे काढून प्रताधिकारमुक्त स्वरूपात चढवल्यास विकिप्रकल्पांना वापरता येतील.

(खालील छायाचित्र सौजन्य: http://lalitdotcom.wordpress.com/ चर्चेसंपन्नतेनंतर अथवा प्रताधिकारमुक्त छायाचित्र उपलब्ध झाल्यानंतर खालील छायाचित्र वगळण्यास संपादकांनी कृपया साहाय्य करावे.)


कडचीचेही मला वाटते दोन प्रकार असावेत एका प्रकारात चिमटीच्या आधी दोन्ही कडून अर्ध गोलाकार आकार असतो आणि एका प्रकारात एक बाजू सपाट असते आणि दुसरी बाजू अर्धगोलाकार असते.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

चिमटा (तो) - १. पापड / फुलका भाजायला वापरतात तो २. पातेले उचलायला वापरतात तो

कडची (ती) - ?

सांडशी (ती) - पातेले उचलायला वापरतात ती

पक्कड (ती) - १. पातेले उचलायला वापरतात ती २. तांत्रिक कामात वापरली जाते ती (हिच्या तोंडाशी आडवे घट्टे असतात, बहुधा खिळा नीट पकडीत यावा म्हणून)

गावी (ती) - पातेले उचलायला वापरतात ती

आता यात आडवे, उभे (उभ्यात एक बाजू अर्धगोलाकार आणि एक बाजू सपाट असलेले, आणि दोन्ही बाजू गोलाकार असलेले) असे प्रकार आहेत. आता फोटूपण टाका कुणीतरी आणि कुठल्या भागात कशाला काय म्हणतात, तेपण सांगा.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझ्या आजोळी मागच्या बाजूस मोठे दोन अर्धवर्तुळ व पुढच्या बाजूस एकीकडे सपाट-एक अर्धवर्तुळ अशी सांडशी होती. वैलावरचे पातेले मागच्या दोन अर्धवर्तुळांत बसवून सहज उचलले जायचे. समोरची लहान पकड खिळा 'खिळखिळा' झाला असल्यास दगा देते आणि आतला पदार्थ सांडू शकतो. त्यासाठी आणि मजबूत पकडीसाठी मागची बाजू सहसा वापरली जात असे.

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

सांगली कोल्हापूरकडे पण केव्हा-तेव्हा, इकडे-तिकडे असं न म्हणता ग्राम्य भाषेत कवा-तवा, इकडं/हाकडं-तकडं म्हटलं जातं.

लहानपणी कुणी चुकून कवा म्हटलं की 'चिचंखाली (तुझा) बोचा आपटला तवा' असं म्हणून चिडवत असू. पाडवा म्हटल्यावर 'नीट बोल गाढवा' च्या पलीकडे कवा चा आणि पार्श्वभाग आपटण्याचा संबंध नाही. पण तेव्हा हा छोटासा शब्दही मजेदार वाटे. स्थित्यंतर, दुसरं काय? Wink

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

इकडं-तिकडं हे तर मला वाटतं सगळीकडंच बोललं जातं. बाकी तकडं इ.इ. रूपे सांगलीकोल्लापुरात प्रचलित आहेत. चिंचोका या शब्दाचे चिच्चुका हे रूपही आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्तन-आगरी (त्याला तुम्ही वसई म्हणता ती 'वसय'ची बोलीभाषा मुळात उत्तनची असा त्याचा दावा असतो) बोलीभाषेत इकडं-तिकडं चं अवार-तवार होते Smile

"आवर आवर, अवारलं नैस तर तवार पोचणार कसा, मग आवरूनही अवारच र्‍हावं लागेल" असा एक ड्वायलाग मी गणेशोत्सवाच्या हौशी नाटुकल्यात ल्हिला व्हता ते ही आठवले.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वारलेय हे खरे तर आवारलेय आहे. त्याचा आव्हयति (सं.) आणि आफयता/आपयता (कोंकणी)शी संबंध आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे बोली लूप्त आहेत, यावरदेखिल एक उपचर्चा होऊ शकते!

माय फेअर लेडी मध्ये संस्कृत भाषेचा अभ्यास असणार्‍या कर्नल पिकरिंग या पात्राच्या संवादात भारतात १४७ बोलीभाषा असल्याचा उल्लेख आहे. त्यातल्या एकाच भाषेच्या (आणि आता मराठीच्या) किती असतील हा विचार करतेय.

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

एकाच भाषेच्या किमान ५-६ तरी धराच. तेवढ्या होतातच.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

The results of People's Linguistic Survey (PLSI), a community-driven documentation of Indian languages by Vadodara-based Bhasha Research and Publication Centre, will be out in August. And Maharashtra scores pretty well with its tally of 12 varieties of Marathi and 38 other languages spoken by adivasis, tribals, nomadic tribes and denotified communities.

संदर्भ : टाईम्स ऑफ इंडीया वृत्त Jul 14, 2013, 02.21AM IST

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

अनेक बोलीभाषांना लिपीचा प्रश्न असतो. त्यामुळे देवनागरी लिपीचा आधार बोलीभाषा लिहिताना घेतला जातो, ज्यात अनेक अडचणी येतात हेदेखील बोलीभाषेत साहित्यलेखन न होण्याचे कारण आहे.

काल ह्या लेखाकरता माहिती शोधताना संथालीवर गेलो तर त्यांनी देवनागरी न वापरता काही नवीनच लिपी बनवून वापरण्याचा प्रयत्न दिसला कारण काय तर वर नमुद केलेले. खरतर देवनागरीत मराठीत न वापरली जाणारी असंख्य अक्षरचिन्हे उपलब्ध आहेत जी युनिकोडात सुद्धा उपलब्ध आहेत. बोली भाषा वापरणार्‍यांनी मराठी लिपीत कमी पडणार्‍या चिन्हांची मोकळेपणाने चर्चा केल्यास देवनागरी चिन्हे सुचवता येऊ शकतील असे वाटते पण तत्पुर्वी बोलीभाषेतील कोणत्या उच्चारणांकरता मराठीत वर्णचिन्ह नाही याचीही चर्चा केली जाणे जरुरी आहे.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

भौ, अहिरानीनाकरता काई मदद लागनी, तर मी शे आठे. मी ले मीच म्हन्तत अहिरानीमा.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मी ले मीच म्हन्तत अहिरानीमा.

भौ, नेमक्या आणि माहितीपूर्ण प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद.

अहिरानीनाकरता काई मदद लागनी, तर मी शे आठे.

हो खर म्हणजे थोडी मदत हवी आहे. अहिराणी भाषेतील जात्यावरल्या ओव्या असा मराठी विकिपीडियावर सध्या लेख आहे (तो मराठी विकिस्रोत बन्धूप्रकल्पात हलवला जाण्याची शक्यता आहे, पण मराठी विकिस्रोतावर कॉपीराईटफ्री असण्याची अधीक दक्षता घ्यावी लागते) त्या ओव्या लोककाव्याच्या आणि कॉपीराईट फ्रीच असाव्यात असे वाटते एका अहिराणी तज्ञांनी सुद्धा कॉपीराईट फ्री असण्याची शक्यता नोंदवली आहे. तरीही अजून एखादा दुजोरा मिळाल्यास बरे पडेल. सोबत सवडीनुसार त्यांचे अनुवाद सुद्धा हवे आहेत ( अर्थात काही महिने अगदी वर्षे लागली तरी हरकत नाही, सांगण्याचा मुद्दा घाई नाही पण हवे आहे.)

पुन्हा एकदा धन्यवाद आनी शुभेच्छा

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

चित्पावनी ही स्वतंत्र बोली आहे?
माझ्या माहितीप्रमाणे चित्पावन बोलतात ती भाषा प्रमाण मराठी'' ( बाल्भार्ती अणि इतर शालेय पुस्तके ज्या भाषेत/ बोलीत छापतात, ती ) म्हणून जी समजली जाते तिच्यात सामावली जाऊ शकते. माझा अनेक चित्पवनांशी अगदी जवळून संबंध आला आहे. देशस्थ, कर्‍हाडे, देवरुखे, सारस्वत, दैवज्ञ इ इ बोलत असलेल्या मराठीपेक्षा चित्पावनांची मराठी मला खूप विशेष वेगळी वाटली नाही. प्रादेशिक फरक धरूनही, वेगळी बोली गणण्याइतका वेगळेपणा जाणवत नाही.
सर्वात परीचित बोली म्हणून मालवणीला मत दिले असते, चित्पावनी ही वेगळी बोली नसावी.

चित्पावनी ही स्वतंत्र बोली आहे?

Smile या धाग्यावर चर्चा होई पर्यंत मॉरीशस मधील मराठीला मोरस मराठी असे स्वतंत्र नाव आहे हे मला माहितच नव्हते. पण याच धाग्यावर संदर्भासहित दुवा दिला गेला तसेच काहीसे हे झाले. चित्पावनांची चित्पावनी हि स्वतंत्र बोली होती हे खरेच आहे, चित्पावनांच्या नवीन पिढ्यांनाही कल्पना नसेल एवढी ती मागे पडली असावी हा भाग वेगळा (चू.भु.दे.घे. मलाही काही वर्षांपुर्वी पर्यंत याची कल्पना नव्हती). चित्पावनी बोलीचा (प्रमाण) मराठी भाषेवर काही वेगळा प्रभाव पडला का आणि तो नेमक्या कशा स्वरूपाचा ? आणि चित्पावनीचा मराठीवर पुरेसा प्रभाव पडला नसेल तर का पडला नसावा? याबद्दल जाणकारांकडून अधिक जाणून घेण्यास आवडेल.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

होय ती पूर्ण वेगळी बोली आहे. कोकणी/मालवणीच्या जवळ जाणारी.
माझी पणजी(वडिलांच्या आईची आई) त्या भाषेत बोलत असे अमजते(अन् आता पश्चातबुद्धीने आठवतेही).
मी तिला पाहिले तेव्हा मी ७-८ वर्षाचा असेन नी ती नव्वदीला. तिचे बोलणे आम्हाला कळत नसे. आता तिच्या नातसुनांनाही येत नाही. माझ्या आजीला समजे पण वाक्यरचना जमायची नाही. ज्या मोठ्या मामा-आजोबा / मावशी-आजी मंडळींना ती भाषा येत असे ते आता हयात नाहीत. धाकट्या मामा-आजोबा मंडाळींना नीटशी येत नाही.

थोडक्यात आता त्याबद्दल नीट माहिती देऊ शकेल असे कोणी हयात नाही. मात्र ती बरीच वेगळी भाषा होती. प्रमाण मराठी नक्कीच नव्हती.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला वाटते चित्पावनी प्रमाणेच बर्‍याच बोलीभाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. चित्पावनी आणि इतर बोलीभाषांतील ध्वनीमुद्रणे करता आल्यास तसेच अतीजुने बोलीभाषेतील पत्रव्यवहार (कौटुंबीक) सुद्धा नमुन्यांदाखल स्कॅन अथवा छायाचित्रीतस्वरूपात आंतरजालावर खास करून मराठी विकिस्रोताच्या माध्यमातून चढवता आल्यास जतनाचे थोडेफार प्रयत्न केल्याचे समाधान लाभण्यात भर पडू शकेल असे वाटते.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

>> चित्पावनी आणि इतर बोलीभाषांतील ध्वनीमुद्रणे करता आल्यास तसेच अतीजुने बोलीभाषेतील पत्रव्यवहार (कौटुंबीक) सुद्धा नमुन्यांदाखल स्कॅन अथवा छायाचित्रीतस्वरूपात आंतरजालावर खास करून मराठी विकिस्रोताच्या माध्यमातून चढवता आल्यास जतनाचे थोडेफार प्रयत्न केल्याचे समाधान लाभण्यात भर पडू शकेल असे वाटते. <<

माझ्या मते हे काम चालू आहे. गणेश देवींच्या 'भाषा' प्रकल्पाअंतर्गत पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे ते (महाराष्ट्रापुरतं) करत आहेत.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझ्या मते हे काम चालू आहे. गणेश देवींच्या 'भाषा' प्रकल्पाअंतर्गत पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे ते (महाराष्ट्रापुरतं) करत आहेत.

मी जिथ पर्यंता या बद्दल वाचलय गणेश देवींच्या 'भाषा' प्रकल्प एक सर्वेक्षण म्हणून खरच महत्वाचा आहे; पण त्या प्रकल्पांतर्गत बोलींच्या (बर्‍याच) मर्यादीत शब्द संग्रहचीच नोंद घेतली जाते(गेली) आहे (जसे कि काही मर्यादीत विशीष्ट शब्दांना, रंगांना प्रत्येक बोलीत काय म्हटले जाते एखादे गाणे इत्यादी) म्हणजे बोली भाषेतील शब्द संग्रहाची आणि दस्तएवजांची विस्तृत नोंद प्रकल्पात अभिप्रेत नसावी, अशी माझी समजुत (ग्रह) आहे (चु.भू.दे.घे.) . अरुण जाखडे व्यक्तीगत पातळीवर हौशी अथवा व्यवसायिक दृष्टीकोणातून अधिक काम करत असतील तर कल्पना नाही.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

रोचक माहिती, धन्यवाद.
मी बघितलेल्या कोकणस्थांपैकी शंभर वर्षांआधी जन्मलेल्या व्यक्तीदेखील चित्पावनीत बोलू शकत नसत. त्यामुळे अशी काही बोली आहे / होती याची कल्पना नव्हती.
वरील कौलात कही सभासदांनी चित्पावनी बोली सर्वाधिक परीचित असल्याचे नोंदवलेले दिसते. त्यांना परीचयाची असणारी चित्पावनी बोली ही आपण उल्लेखलेली बोली की आजचे चित्पावन बोलतात ती प्रमाण मराठीला जवळ असलेली, असे कुतूहल वाटते. जुनी चित्पावनी जाणणार्यांनी उदाहरणादाखल काही दिले तअर आवडेल

माझ्या परिचितांपैकी काही वयस्कर (६०+) चित्पावन हे केलेनीत, आणलेनीत अशी रुपे वापरतात. ही त्या जुन्या चित्पावनीचीच रुपे असावीत काय?

त्यानंतरच्या पिढीतील शहरी चित्पावन मात्र अशी रुपे वापरताना ऐकले नाही.

आणलेनीत, केलेनीत ही रूपे रत्नागिरी, चिपळूण भागातले नॉन-चित्पावन लोक सुद्धा वापरतात. तेव्हा ती प्रादेशिक रूपे आहेत असे म्हणता येईल.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्या आजीआजोबांच्या तोंडूनसुद्धा अशी रूपे ऐकलेली आहेत खरी. आणि दे वेअर एनीथिंग बट चित्पावन्स. पण इंपोर्ट्स फ्रॉम जिल्हा सिंधुदुर्ग इंटू मुंबई होते खरे.

गूगल शोध दिल्या नंतर खूप नाही पण नेहमीच्याच मराठीत केलेनीत, आणलेनीत ची काही उदाहरणे आढळली

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

असेच

>> चित्पावनी ही स्वतंत्र बोली आहे?
माझ्या माहितीप्रमाणे चित्पावन बोलतात ती भाषा प्रमाण मराठी म्हणून जी समजली जाते तिच्यात सामावली जाऊ शकते. <<

ती वेगळी आणि चित्पावनी बोली वेगळी. वसुधा भिडे ह्यांनी 'चित्पावन आणि चित्पावनी' म्हणून पुस्तक लिहिलं आहे. त्याबद्दल इथे थोडक्यात माहिती मिळेल.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वसुधा भिडे ह्यांंच्या 'चित्पावन आणि चित्पावनी' पुस्तका विषयी बुकगंगा डॉटकॉमवर येथे जरा अधिक माहिती वाचन उपलब्ध आहे. मी अद्याप वाचतो आहे

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

हो.. चित्पावनी ही स्वतंत्र बोली आहे. काही वर्षांपूर्वी ऑर्कुटवर एक ग्रुप पाहिला होता ज्याची माहिती चित्पावनीमध्ये देवनागरी लिपीत लिहिली होती. भाषेला 'भाखा' असा शब्द होता. वाचून संदर्भाने अर्थ लागत होता, पण मराठी आणि चित्पावनीमध्ये खूप फरक आहे. आता प्रयत्न करूनही तो ग्रुप सापडला नाही.

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

मूळ धाग्याच्या उद्देशाशी किती म्याच होतेय ठाऊक नाही पण श्यामची आई हे पुस्तक कोंकणातल्या अनेक शब्दांचा खजिना आहे. खजिना शब्द घिसापिटा वाटत असेल तर लाडूंचा डबा म्हणू.

मी कोंकणातला असल्याने माझ्या वापरात, ऐकण्यात, वाचनात आलेले काही शब्द: (यातले अनेक "श्यामची आई" मधे आलेले आहेत. काही आता कालबाह्य झाले असतील.)

-डोण (घराबाहेर अंगणात असलेली पाण्याची एकाच दगडातून बनवलेली गोल पॅराबोलिक आकाराची टाकी)
-गडगा (अन्यत्र कट्टा, कुंपणाची भिंत या नावाने ओळखली जाणारी गोष्ट. गडगा जनरली जांभ्या दगडांचा एकेका चौकोनाइतकी गॅप सोडून नीट बांधलेला किंवा ओबडधोबड जांभे दगड एकमेकांवर तसेच चढवून केवळ ते पडणार नाहीत इतपत रचना करणे. या दुसर्‍या प्रकारातले गडगे पोरांनी त्यावर चढण्याच्या प्रयत्नात कोसळू शकतात आणि ढोपरे फुटू शकतात)
-चिरा (जांभ्या दगडाचा कोरुन बनवलेला आयताकृती घनाकार. पण एकूण जांभ्या दगडाला उद्देशून देखील चालतो. उदा. जमीन खणताना पहार मारुन मारुन घामाघूम झालेला कोणी पावसकर "कांय खरों नसा.. चिरो असां खाली.." असे म्हणू शकतो.)
- झळंबणे (चिकटणे, लगटणे)
- बोळू (पदार्थाचे स्पेसिफिक तोंडीलावणे, उदा. पानगीवर लोणी)
- रातांबा (कोकम)
- कापा आणि बरका (फणसाच्या जाती)
- साकव (कच्चा पूल)
- ठाकुली (लहान मुलांना शी करण्यासाठी दगडांची तात्पुरती रचना)
- कसरुंड (सुरवंट, घुला)
- जनावर (साप)

>>साकव (कच्चा पूल)

साकव म्हणजे ओढ्यावर झाडाचे खोड आडवे टाकून बनवलेला पूल.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धन्यवाद.

अवांतरः http://www.saakava.com/index.aspx येथे साकव नावाची इंग्रजी मराठी मशिन अनुवाद प्रणाली आहे. त्यांनी साकव हा शब्द का वापरला या बद्दल कुठे तरी वाचले होते ते मिळत नाहीए.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

झाडाचे खोड ऐवजी माडाचे खोड जास्त ऑथेंटिक होईल असे वाटते.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मूळ धाग्याच्या उद्देशाशी किती म्याच होतेय ठाऊक नाही

अगदी मॅच होते आहे. अशीच माहिती येत राहू द्यात. प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

पाने