थ्री डिग्रीज ऑफ सेपरेशन

शाळा सुटली आणि आम्ही घरी न जाता सरळ शरयूआज्जींकडे गेलो. एकतर त्यांच्याकडे पौष्टिक लाडू असतात, आणि दुसरं म्हणजे त्या मस्त गोष्टी सांगतात.

"विजू, मोना, अरे आईला सांगून आलायेत का? नसेलच. थांबा, मीच सांगते तिला," म्हणत शरयूआज्जी आरामखुर्चीतून उठल्या आणि हळूहळू चालत इंटरकाॅमकडे गेल्या. "तुझी बाळं इथे आहेत गं," एवढंच बोलून त्यांनी फोन ठेवला.

"आज्जी, आज्जी, आमच्या शाळेत ना आज एक इतिहासतज्ञ आले होते," मोना एक्साईट होऊन सांगू लागली. "१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाबद्दल ते सांगत होते. आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाबद्दलसुद्धा!"

"छान, छान. मग आज त्याचीच गोष्ट सांगते तुम्हाला," शरयूआज्जी लाडूंची बशी आणि दुधाचे ग्लास ठेवत म्हणाल्या. आम्ही पटकन लाडू खाल्ले, दूध प्यायलो, पांढऱ्या मिशा पुसल्या आणि तयारीने बसलो. आज्जी त्यांच्या फेवरेट आरामखुर्चीत बसल्या आणि सांगू लागल्या:

"मी नऊदहा वर्षांची होते. दुसरं महायुद्ध चालू होतं. जपानी हल्ला करतील अशी भीती होती म्हणून ब्लॅकआऊट होता. म्हणजे दिवे लावायचे नाहीत. मग मला यायचा कंटाळा, आणि मी जाऊन बसायचे शेजारच्या बिऱ्हाडात.

तर एकदा अशीच गेले होते मालतीकडे. तिचे पणजोबा पडवीत बसले होते. मी त्यांना म्हणाले, "मोठे आजोबा, तुम्हाला भीती नाही वाटत युद्धाची?"

ते हसून म्हणाले, "नाही बाळा, भीती नाही वाटत. पण हे विमानातनं आणि रणगाड्यातनं युद्ध करायचं, यात कसला आलाय पराक्रम? तलवारीने हातघाईची लढाई केलीय कधीकाळी मी."

मी विचारलं, "म्हणजे पहिल्या महायुद्धात का?" "नाही गं, तेव्हा मी होतो पंच्याहत्तर वर्षांचा. मला कोण घेणार सैन्यात? आणि ज्या इंग्रजांविरूद्ध लढलो, त्यांच्या बाजूने कसा लढणार?"

"म्हणजे?" मालती आणि मी एकदमच विचारलं.

"अगं, सत्तावन्न सालचा उठाव झाला तेव्हा नेमका मी काशीला होतो. अचानक देश पेटून उठला. मी पुण्याला परतायला निघालो, पण ते काही शक्य झालं नाही. मग दुसरा रस्ता पकडून झाशीला गेलो.

तिथे सैनिकांना वाटलं की मी टोपीवाल्यांचा हेर आहे. मग काय? केलं मला जेरबंद आणि घेऊन गेले किल्ल्यात. पण माझं सुदैव असं, की खुद्द राणी लक्ष्मीबाईंना माझी दया आली, आणि माझी सुटका करून त्यांनी मला त्यांच्या सैन्यात रूजू करून घेतलं.

काही महिन्यांनी इंग्रजांनी किल्ल्याला वेढा घातला. तुंबळ युद्ध झालं. अखेरीस पराभव होणार हे दिसू लागलं तेव्हा राणीसरकारांनी किल्ला सोडून तात्या टोपेंच्या सैन्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या धुमश्चक्रीत मीसुद्धा किल्ल्यातून निसटलो. आम्ही काही जण बरेच दिवस जंगलात राहिलो. इंग्रजांना टिपून टिपून मारत होतो. पण इंग्रज सैन्याची नवीन कुमक आली तेव्हा आम्ही भूमिगत झालो.

मी राजपुतान्यात जाऊन एका संस्थानिकांच्या दरबारी रूजू झालो, पण ते विलासी आयुष्य मला आवडेना. मग कराचीला जाऊन कारकुनी सुरू केली, आणि लग्न करून संसारी झालो."

"मोठे आजोबा, हे कधी बोलला नव्हतात मला," मालती फुरंगटून म्हणाली. "एवढ्या ऐतिहासिक घटनेत तुम्ही होता, राणी लक्ष्मीबाईंना प्रत्यक्ष पाहिलंत, आणि मला आत्ता सांगताय?"

तिचे पणजोबा हसले. "हे कधीच कोणालाच सांगितलं नव्हतं. पण आता, जायच्या आधी कोणालातरी सांगितलं पाहिजे असं वाटलं."

तीन महिन्यांतच मालतीचे पणजोबा गेले, आणि सत्तावन्नच्या उठावाचा तो अखेरचा, अनपेक्षित दुवा तुटला."

मोना आणि मी शरयूआज्जींकडे बघतच बसलो. मी आवंढा गिळला, आणि म्हणालो, "म्हणजे, राणी लक्ष्मीबाईंना प्रत्यक्ष भेटलेल्या त्या आजोबांना तुम्ही भेटला होता? म्हणजे राणी लक्ष्मीबाई आणि आम्ही यांत फक्त थ्री डिग्रीज ऑफ सेपरेशन?"

शरयूआज्जींनी फक्त मान डोलावली. एवढं बोलून त्या दमल्या असणार, असं आम्हाला वाटलं. आम्ही खाऊची बशी आणि दुधाचे ग्लास विसळून ठेवले, आणि भारावलेल्या मनस्थितीतच घरी गेलो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

पहिले महायुद्ध बोले तो १९१४-१८. १९१४ साली जर पणजोबा ७५ वर्षांचे असले, तर शरयूआज्जींना गोष्ट सांगताना दुसऱ्या महायुद्धातल्या हिंदुस्थानावरच्या जपानी विमानांच्या हल्ल्याच्या भीतीच्या वेळी (बोले तो १९४३ साली?) त्यांचे वय असणार... १०४??? अगदीच अशक्य नाही, पण...

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका नेटिव्ह अमेरिकन व्यक्तीची (खरी) गोष्ट वाचून हे सुचलं. १८५७ ला आता १६२ वर्षं झाली, म्हणजे पणजोबांच्या जन्माला १८०. त्यामुळे पणजोबांना (किंवा शरयूआज्जींना) शतायुषी बनवणं आवश्यक होतं.

https://www.google.com/amp/s/amp.theguardian.com/us-news/2016/apr/04/nat...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान... आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं. शरयूआज्जींना 'थ्री डिग्रीज ऑफ सेपरेशन' फार समजलं नसावं; ही संकल्पना आपल्याकडे तरी तशी नवीन आहे.

अशा जुन्या गोष्टी ऐकायला मजा येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.