आधुनिक भारतातल्या मातृदेवता आणि नकाशे - सुमती रामस्वामी

संकल्पना

आधुनिक भारतातल्या मातृदेवता आणि नकाशे - सुमती रामस्वामी

मूळ लेखक - सुमती रामस्वामी

भाषांतर - नंदन

गोषवारा :

नकाशे तयार करण्याचं शास्त्र (कार्टोग्राफी) तसं प्राचीन असलं तरी त्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक संदर्भांची जोड देण्याचा दृष्टिकोण ('क्रिटिकल कार्टोग्राफी') तुलनेने आधुनिक आहे. जॉन ब्रायन हार्ली, ह्या ब्रिटिश भूगोलशास्त्रज्ञांनी, ह्या नव्यानं उदयाला येणाऱ्या क्रिटिकल कार्टोग्राफीच्या क्षेत्रात मोलाची भर घातली. 'एखाद्या भूभागाबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती देण्याचं काम नकाशे करतात; मात्र त्याच वेळी, ज्या भागाची माहिती हे नकाशे पुरवतात, तेथील सामाजिक संदर्भांचा, नकाशात असलेल्या अभावामुळे त्यांत एक पोकळी जाणवू शकते', असं त्यांचं मत होतं.

ह्या पार्श्वभूमीवर, विसाव्या शतकात भारताच्या नकाशाचं स्वरूप 'भारतमाता' म्हणून सामोरं येणं, हे वैकल्पिक नकाशापरंपरेच्या संदर्भात लक्षणीय आहे. तत्कालीन भारतीय जनतेसमोर, आपल्या भावी स्वतंत्र राष्ट्राची प्रतिमा केवळ 'सामाजिक संदर्भांचा अभाव असलेली पोकळी' म्हणून न येता; भारतमातेच्या सशरीर रूपात येते - एक स्त्री, माता आणि देवता म्हणून. भारताच्या नकाशाला ह्या स्त्री-प्रतिमेची जोड देण्यामागे काय उद्देश होते आणि अशा सशरीर नकाशांतून जरी भारतमातेची एक विशिष्ट प्रतिमा जनमानसांत रूढ होत गेली; तरी त्याच वेळी त्यातून 'भारत ही आपली मातृभूमी आहे' ह्या धारणेला कशी बळकटी मिळाली - ह्या गोष्टींचा धांडोळा ह्या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे.

***

१९०५ सालाच्या आसपास, कन्हैयालाल मुन्शींची श्री ऑरोबिंदोंशी गाठ पडली. वयाची विशीही न गाठलेल्या मुन्शींनी, ऑरोबिंदोंना विचारलं, 'एखादी व्यक्ती देशभक्त कशी काय होऊ शकते?'. मंद स्मित करत, ऑरोबिंदोंनी भिंतीवरच्या भारताच्या नकाशाकडे बोट दाखवलं. "'हा नकाशा दिसतोय? हा केवळ नकाशा नाही, तर भारतमातेचं चित्र आहे. शहरं, पर्वत, नद्या, जंगलं या साऱ्यांनी मिळून तिचं शरीर बनलं आहे. तिची सारी लहानथोर लेकरं म्हणजे जणू तिच्या नसा आहेत. देशभक्त व्हायचं असेल, तर प्रत्यक्ष आई समजून भारतमातेची भक्तिभावाने पूजा कर!"

***

यानंतर साधारण दशकभरानं, रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या 'घोरे बाईरे' ह्या कादंबरीत साधारण अशीच संकल्पना मांडली. कादंबरीतलं एक प्रमुख पात्र, संदीप, विमला ह्या नायिकेस उद्देशून म्हणतो, "तुला सांगितलंय ना मी? मी तुला आपल्या देशाचं 'शक्ति'स्वरूप म्हणून पाहतो. केवळ देशाचा भूगोल म्हणजेच संपूर्ण देश नव्हे - फक्त एका कागदावरच्या नकाशासाठी कुणीही आपले प्राण अर्पण करायला तयार होणार नाही. जेव्हा मी तुला प्रत्यक्ष माझ्यासमोर पाहतो; तेव्हाच मला आपल्या देशाच्या सौंदर्याची खरी कल्पना येते."

***

प्रत्येक देशाला आपला नकाशा महत्त्वाचा का वाटतो? विशेषत: स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतात, ह्या जाणिवेचं प्रकटन कुठल्या स्वरूपात होतं, याचा वेध घेताना, हे दोन संवाद - एक प्रत्यक्ष घडलेला आणि एक कादंबरीतला प्रसंग - विचारात घेण्यासारखे आहेत.

आपल्या देशाचं भौगोलिक वास्तव आणि 'भारतमाता' अशी सशरीर मानसप्रतिमा - ह्या दोन वैकल्पिक परंपरांमधलं द्वैत, टागोरांच्या कादंबरीतल्या नायकाच्या उद्गारांतून दिसून येतं. केवळ कागदावर चितारलेला नकाशा असं त्याचं स्वरूप न राहता, त्याला एक जिव्हाळ्याचा मानवी स्पर्श लाभतो. हे कसं साध्य होतं, हे पाहण्यासाठी आपण भारतमातेच्या आणि 'तमिळ'मातेच्या विविध सशरीर नकाशाप्रतिमांचा ह्या लेखाद्वारे मागोवा घेऊ.

सशरीर नकाशे

वैज्ञानिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या हे नकाशे अचूक असले, तरी त्यांच्यात स्थानिक संदर्भांचा अभाव असल्यामुळे एक प्रकारची सामाजिक पोकळी किंवा कोरडेपणा जाणवू शकतो; हे हार्ली यांचं मत आपण वर पाहिलं. हार्ली असंही सुचवतात की, सामान्यत: नकाशे तयार करण्याचं काम हे शासनाचं असल्यामुळे नकाशांची भाषा ही बव्हंशी सत्तेची असते; विद्रोहाची नव्हे. मात्र विसाव्या शतकातले, भारतमातेची प्रतिमा असलेले हे नकाशे, याही संकल्पनेला छेद देऊन जातात.

एक तर हे नकाशे कुठल्याही सरकारी यंत्रणेने छापलेले नसून, सामान्य नागरिकांकडून अथवा राजकीय पक्षांकडून तयार केले गेले होते. दुसरं म्हणजे, त्यांतली विद्रोहाची भाषा उघड नसली तरी 'भारत ह्या देशाचं नकाशात चित्रण कसं करावं', याबद्दलच्या प्रस्थापित नकाशाशास्त्रातल्या संकेतांना निश्चितच आव्हान देणारी आहे. ह्या 'सरकार-बाह्य नकाशासंकेतां'मध्ये काही प्रस्थापित संकेत नक्कीच आहेत - पण एकंदरीतच त्यांची मांडणी आणि सादरीकरण सरकारी कार्यकक्षेच्या बाहेरचं आहे.

उदाहरणार्थ, देशाच्या सीमा अगदी नेमकेपणानं दर्शवण्याकडे सरकारी नकाशांचा कटाक्ष असतो. त्याउलट, ह्या सरकारबाह्य सशरीर नकाशांत, अनेकदा ही बाब विचारात घेतली जात नाही किंवा जाणूनबुजून तिला फाटा दिला जातो. भौगोलिक अचूकतेपेक्षा राष्ट्राबद्दलच्या काव्यात्मक, धार्मिक किंवा लिंगाधारित प्रतिमांचं प्रकटन यांत अधिक महत्त्वाचं असतं.

वास्तविक, सोळाव्या आणि सतराव्या शतकातल्या युरोपियन नकाशांतही पुरुष आणि स्त्री, अशा दोन्ही मानवी शरीरप्रतिमांचा उपयोग आढळून येतो - पण तो मुख्यत: एक कलाकुसरीचा भाग म्हणून. मात्र नकाशात देशाचं प्रतिनिधित्व करताना, अशा शरीरप्रतिमांमागची भूमिका किंवा कारणीमीमांसा फारशी विचारात घेतलेली दिसत नाही. या लेखात, अशा भूमिकेकडे लिंगाधिष्ठित राष्ट्रवादी दृष्टिकोणातून पाहण्याचा प्रयत्न आहे.

विज्ञानाधारित नकाशे

'केवळ देशाचा भूगोल म्हणजेच संपूर्ण देश नव्हे' असं जरी टागोरांच्या कादंबरीचा नायक म्हणत असला तरी, त्याआधी शंभरएक वर्षं ब्रिटिश राज्यकर्ते, विविध सर्वेक्षणांद्वारे भूगोलाचं महत्त्व भारतीय जनतेच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करत होते. अनेक अभ्यासकांनी दाखवून दिलंय, की भौगोलिक माहितीचं प्रमाणीकरण करून तिचा शाळांत आणि विद्यापीठांत एक अभ्यासक्रम म्हणून समावेश करण्यामागेही वसाहतवाद बळकट करणे आणि एकोणिसाव्या शतकातल्या युरोपियन भांडवलशाहीच्या मागण्या पुरवणे, हे हेतू होते. आपण ज्या वसाहतीवर हुकूमत गाजवत आहोत, तिची भौगोलिकदृष्ट्या पूर्ण माहिती हवी हे किमान उद्दिष्ट त्यात अंतर्भूत होतं. एकोणिसाव्या शतकातल्या ब्रिटिश भूगोलशास्त्रज्ञांचा दावा मात्र, आपण भाकडकथांच्या जंजाळात अडकून पडलेल्या भारतीय भूगोलाच्या अभ्यासाला आधुनिक, विज्ञानाधिष्ठित रूप देत आहोत, असा होता. त्यांना जो भारत नकाशाद्वारे उभा करायचा होता तो बेतशुद्ध अक्षांश-रेखांशाच्या ओळींनी वेढलेला, नीटस त्रिकोणी द्वीपकल्पीय आकाराचा तर्कशुद्ध आराखडा. भारतावरच्या ब्रिटिश साम्राज्याचं भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या स्पष्ट आणि सुसंगत असं चित्र उभं करण्यासाठी हे अतिशय गरजेचं होतं.

ब्रिटिश शिक्षणपद्धतीतून याच आखीवरेखीव कागदी नकाशाचा प्रसार जोमाने केला गेला. अगदी १८३० साली, म्हणजे ब्रिटिश साम्राज्याची पाळंमुळं भारतात रोवली जाण्यापूर्वीच्या काळातही, ही निकड ब्रिटिशांनी ओळखली होती. (#२३). संपूर्ण भारतीय उपखंडात, शाळांमध्ये पृथ्वीचे गोल आणि भिंतीवर टांगण्यासाठी नकाशे उपलब्ध केले गेले आणि भूगोलाच्या शिक्षकांना त्यांचा उपयोग करण्याची सूचना देण्यात आली. पृथ्वीचा गोल उपलब्ध नसेल तर संत्रं किंवा कवठाचं फळ वापरा असंही सांगण्यात येई.

अर्थात, या धोरणाचा भारतीय जनतेवर किती परिणाम झाला?, तत्कालीन जनता कितपत नकाशासाक्षर होती आणि दैनंदिन जीवनात नकाशा कितपत वापरला जात असे? राष्ट्रवादी भूमिकेतून नकाशांच्या वापराचं प्रमाण नेमकं किती होतं? यासारख्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत नाहीत. असं असलं तरी, विसाव्या शतकाच्या प्रारंभी, नव्यानं उदयाला येऊ लागलेल्या राष्ट्रीय चळवळींच्या पत्रांच्या शीर्षभागी (लेटरहेडवर) किंवा वृत्तपत्रांच्या प्रतीकचिन्हांत, भारताच्या नकाशाचा वापर केलेला तुरळक प्रमाणात आढळून येतो.

अशी नकाशासाक्षरता, आधुनिक नागरिकत्वाच्या दृष्टीनं महत्त्वाची का आहे? आपल्या देशाचं भौगोलिक अस्तित्व इतक्या सुलभपणे दृग्गोचर झाल्याचं पाहण्याचं नकाशासारखं साधन यापूर्वी नागरिकांना उपलब्ध नव्हतं. आपल्या देशाचा आकार, त्याचा विस्तार (विशेषत: अन्य देशांच्या तुलनेत) आणि सीमा डोळ्यांसमोर उभ्या करण्यासाठी हे एक आवश्यक साधन आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जगात शब्दश: आपलं स्थान कुठे आहे, हे जाणण्यासाठी आणि राष्ट्राच्या अमूर्त संकल्पनेशी सांधा जोडण्यासाठी, आधुनिक नकाशासारखं दुसरं साधन नाही. पण हा सांधा नेमका कसा जोडला जातो? ते जाणून घेण्यासाठी आपण काही सशरीर नकाशाप्रतिमांकडे पाहू.

राष्ट्र आणि मातृदेवतेची संकल्पना

टागोरांच्या नायकानं जेव्हा नायिकेत भारतमातेचं शक्तिस्वरूप पाहण्याचे उद्गार जेव्हा काढले, त्या काळापर्यंत - म्हणजे साधारण १९१५-१६ च्या सुमारास - देशाची 'भारतमाता' ही दृश्यसंकल्पना देशभक्तांमध्ये चांगलीच रुळली होती. ह्या प्रतिमेबद्दल बरंच लिहिलं गेलं असलं, तरी भारताच्या नकाशाला ह्या सशरीर प्रतिमेची दिलेली जोड, ह्या विषयाबद्दल फारसं संशोधन झालेलं दिसत नाही. सरला देवी ह्या टागोरांच्या भाचीनं, आयोजित केलेल्या एका आंदोलनात बंगाली तरुणांनी भारतमातेच्या अशाच एका नकाशाप्रतिमेसमोर, आपलं आयुष्य भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या एकमेव उद्दिष्टासाठी, अर्पण करण्याची शपथ घेतल्याचा उल्लेख आहे (#३६). तसंच, १९०५ साली कलकत्त्यात सुरू झालेल्या 'अँटी-सर्क्युलर सोसायटी'चं वर्तुळाकार प्रतीकचिह्न म्हणजे भारताचा नकाशा आणि भोवताली विविध घोषणा ('स्वातंत्र्य, समता, बंधुता'; 'देशासाठी आणि मातृभूमीसाठी' - आणि सर्वांत महत्त्वाची म्हणजे 'वंदे मातरम्') - असं होतं.

१९०९च्या सुमारास जेव्हा उत्तर भारतात ब्रिटिशविरोधी निदर्शनांनी जोर पकडला, तेव्हा ही भारतमातेची ही सशरीर नकाशाप्रतिमा व्यासपीठावर आणि 'वंदे मातरम्', 'भारतमाता की जय' अशा घोषणा देत रस्तोरस्ती निघालेल्या मोर्चांच्या अग्रभागी होती. (#३८) सॅन फ्रान्सिस्कोत १९१४-१६ ह्या काळात, गदर पार्टीने प्रसिद्ध केलेल्या देशभक्तीपर अंकांमध्ये, तत्कालीन ब्रिटिश भारताच्या नकाशावर हाती तलवार घेतलेली आणि पार्श्वभूमीवर सिंह असलेली पश्चिमाभिमुख भारतमाता पहायला मिळते. गदर पार्टीच्या, १९२०च्या दशकातल्या इंग्रजीतल्या अन्य प्रकाशनांमध्ये, पृथ्वीच्या गोलातून उदयाला येणारी आणि परिधान केलेली साडी आणि मोकळा केशसंभार यातून देशाच्या सीमा दर्शवणारी भारतमातेची नकाशाप्रतिमा पहायला मिळते. (#४०)
गदर पार्टी भारतमाता
गदर पार्टीची भारतमाता

१९२० आणि १९३०च्या दशकापर्यंत, विविध प्रकारच्या देशभक्तीपर वाङ्‌मयामार्फत भारताचा नकाशा आणि मातृदेवतेची प्रतिमा हे समीकरण इतकं पक्कं झालं होतं की, जेव्हा १९३६ साली बनारसमध्ये भारतमातेचं पहिलं मंदिर उभं राहिलं, तेव्हा त्यात मूर्तीऐवजी अखंड भारताच्या संगमरवरी नकाशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. (#४१)
बनारस मंदिर भारतमाता
मंदिरातली नकाशा-मूर्ती - भारतमाता

भारतमातेची ही सशरीर नकाशाप्रतिमा १९२०च्या दशकात रूढ झाली कारण लक्ष्मी, दुर्गा यांसारख्या अन्य देवतांपेक्षा निराळी अशी - भूभागाशी आणि राज्यसंस्थेशी संबंधित देवता म्हणून - भारतमातेची प्रतिमा तोवर सामान्य जनतेच्या मनात ठसत गेली. विसाव्या शतकात, उत्तरोत्तर भारतमातेची प्रतिमा भारताच्या भूभागाशी अभिन्नपणे जोडली गेली - 'भारत' या संकल्पनेचा राष्ट्रीय अवकाश तिनं व्यापला. आजच्या काळात, हिंदू राष्ट्रवाद्यांच्या, नाना प्रकारच्या दृश्य प्रसारचिन्हांत (पोस्टकार्डं, स्टिकर्स, बॅनर्स, पोस्टर्स, पुस्तकांची मुखपृष्ठं, इत्यादी) भारतमातेची हीच प्रतिमा बोकाळलेली दिसते, यामागचं कारण हेच असावं. (#४२)
हिंदुत्ववादी भारतमाता
हिंदू राष्ट्रवादी भारतमाता

आधुनिक जगात नकाशांचं काम हे त्यात दाखवलेल्या भूभागावरची मालकी आणि सार्वभौमता दाखवण्याचं असतं; आपलं राज्य हे अधिकृत आहे हे दाखवून देण्याचं असतं. भारतमातेच्या अशा सशरीर नकाशाप्रतिमांच्या सर्रास प्रचारामार्फत हिंदू राष्ट्रवाद्यांना हे उद्देश साध्य करायला मदत होते.

तमिळभाषक प्रदेशाकडे याच विषयाच्या संदर्भात पाहिलं तर, 'विजया' नावाच्या तमिळ वृत्तपत्राच्या जाहिरातीसाठी १९०९ साली भारतमातेची सशरीर नकाशाप्रतिमा वापरलेली पहावयास मिळते. ह्या प्रतिमेत, भारतमातेच्या चित्राचा पार्श्वभूमीवर जरी भारताच्या नकाशाची बाह्यरेखा असली, तरी त्यात तत्कालीन भारताच्या सीमा फार काळजीपूर्वक दाखवलेल्या नाहीत. हातांत चार बाळं (त्यातली दोन अंगावर पिणारी), काश्मिरात विसावलेलं डोकं आणि दक्षिण भारतात पाय असे अन्य तपशील आहेत. ही जाहिरात ज्या महाकवी भारतियार (सुब्रह्मण्य भारती) यांच्या 'इन्तिया' नावाच्या जाज्वल्य साप्ताहिकात पाहावयास मिळते; त्यांच्या भारतमातेची थोरवी सांगणाऱ्या अनेक कविता १९२०च्या दशकात दक्षिण भारतात लोकप्रिय झाल्या होत्या. पुढच्या दशकात तर भारतमातेची ही नकाशाप्रतिमा इतकी लोकप्रिय झाली की, भारतींच्या साप्ताहिकातील जाहिरातीच्या शीर्षकासारखं मुद्दाम वेगळं असं 'भारतमाता' हे शीर्षक द्यायची गरज तोवर भासेनाशी झाली.

स्वातंत्र्यानंतरच्या दशकात भारतमातेची ही नकाशाप्रतिमा तमिळ पाठ्यपुस्तकांत आढळून येऊ लागली - भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांत नव्हे, तर स्वतंत्र भारताची विद्यार्थ्यांना ओळख करून देणाऱ्या तमिळ भाषेच्या धड्यांत. १९४८ सालातल्या, इयत्ता तिसरीच्या, तमिळ विषयाच्या पुस्तकात, याच नकाशाप्रतिमेखाली छापलेली कविता फाळणीपूर्व अखंड भारतातल्या प्रांतांचा उल्लेख तर करतेच, पण त्यासोबतच ध्वजाच्या खांबाचा पाया श्रीलंकेत रुतवून, लंकेवरही आपला दावा ठोकते. तेव्हाच्या पाठ्यपुस्तकांतली नकाशाचित्रं बव्हंशी कृष्णधवल आहेत. १९५८ सालात, इयत्ता तिसरीच्या तमिळ पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावर भारतमातेचं दुर्मीळ, रंगीत नकाशाचित्र सापडतं. या चित्रातल्या भारतमातेचा पेहराव अधिक आकर्षक आहे; तिचं कमनीय शरीर सूचकपणे पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानाकडे निर्देश करतं आहे - शिवाय अंगावरच्या हिरव्या उत्तरीयाचा काही भागही त्या प्रदेशांना व्यापून राहिला आहे; अन्य नकाशाचित्रांप्रमाणेच तत्कालीन सीमा एकतर धूसर आहेत किंवा पूर्णपणे गैरहजर.

१९५२ सालातल्या, तमिळ माध्यमाच्या, इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकाच्या (शीर्षक : मातृभूमीचा इतिहास) मुखपृष्ठावरचं रेखाटन मात्र निराळं आहे. इथे भारतमाता देशाचा नकाशा व्यापून नव्हे, तर पृथ्वीच्या गोलावर उभी असलेली दिसते. ह्या पृथ्वीवर भारताची बाह्याकृती उठून दिसते (पूर्व, पश्चिम, उत्तर सीमा मात्र नेमानुसार धूसर आहेत), जिच्यावर तिचे चरण विसावलेले आहेत. स्वातंत्र्यानंतर लगेचच प्रसिद्ध झालेली ही सशरीर नकाशाप्रतिमा, भारतमातेला केवळ देशाच्या सीमांच्या आत न रेखाटता, शब्दश: जगाच्या शिखरावर विराजमान दाखवतं. अन्य राज्यांतही याचसारख्या भारतमातेच्या नकाशाप्रतिमा आढळल्या आहेत.

पुढल्या भागाकडे वळण्यापूर्वी, आपण १९३०च्या दशकात, मद्रासमधल्या अनेक शालेय पुस्तकांत आढळणारी भारतमातेची एक रोचक नकाशाप्रतिमा पाहू. यात तीन माणसं, भारताच्या नकाशाच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेल्या भारतमातेला आदरांजली वाहत आहेत. अर्थात, अशी आदराची भावना दर्शवणारी भारतमातेची अनेक नकाशाचित्रं आहेत. १९६२ साली चीनबरोबर झालेल्या युद्धाच्या काळातल्या एका भित्तिपत्रकात शहीद भगतसिंग आपलं मस्तक भारतमातेला अर्पण करत आहेत; त्या रक्ताचं देवीच्या पायाशी थारोळं जमलेलं आहे; मुखमंडलाभवती प्रभा असलेलं देवीचं मस्तक काश्मिरात स्थिरावलं आहे आणि पत्रकाच्या तळाशी सैन्याच्या गणवेशातले तरुण-तरुणी ह्या नकाशाप्रतिमेपासून आणि भगतसिंगांच्या बलिदानापासून जणू स्फूर्ती घेऊन, शत्रूच्या निर्दालनासाठी युद्धभूमीवर निघाले आहेत.

म्हणजेच, भारतमातेच्या अशा सशरीर नकाशाप्रतिमांचा उपयोग हा एरवी केवळ प्रेक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या नागरिकांच्या मनात, देशभक्तीचं स्फुल्लिंग चेतवणं हाही आहे का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण पुन्हा टागोरांच्या नायकाकडे वळू. 'फक्त एका कागदावरच्या नकाशासाठी कुणीही आपले प्राण अर्पण करायला तयार होणार नाही', असं म्हणणारा संदीप पुढे आपल्या प्रेयसीला म्हणतो, 'जर ह्या लढाईत माझ्या प्राणांची आहुती पडली तर ती कुठल्यातरी निर्जीव नकाशात दाखवलेल्या जमिनीच्या तुकड्यावर नसेल; तर मायेनं पसरलेल्या पदरावर असेल. तो पदर कसा असेल, माहीत आहे? तू ज्या विटकरी लाल रंगाची, रुंद रक्तिमरंगी काठाची साडी परवा नेसली होतीस ना - त्यासारखाच. ते दृश्य मी कधी विसरेन, असं वाटत नाही. जगण्याला उमेद आणि मृत्यूतही आनंद देणारी प्रतिमा आहे ती!'

भारतमातेच्या जवळजवळ सगळ्याच सशरीर नकाशाप्रतिमांमध्ये, तिच्या वस्त्रांना - आणि विशेषत: तिच्या साडीला, महत्त्वाचं स्थान आहे. बऱ्याच प्रतिमांत (अगदी स्वातंत्र्योत्तर काळातल्या आणि अगदी अलीकडच्या अशा, हिंदू राष्ट्रवाद्यांच्या प्रचारवाङ्‌मयातल्या) ती अखंड, फाळणीपूर्व भारताचा भूभाग व्यापून आहे. शिवाय, तिच्या वस्त्रांचा रंग साधारणत: लाल असतो - हिंदू धर्मातील शुभकार्यांत आढळणारा. १९३७ सालांत प्रसिद्ध झालेल्या, कोईमतूरमधल्या एका वैशिष्ट्यपूर्ण भित्तिचित्रात मात्र तिनं तिरंगी वस्त्रं परिधान केली आहेत (प्लेट ५). तिच्या देहाची बाह्याकृती आता भारताच्या सीमारेखांच्या वळणांशी आतापर्यंत इतकी तादात्म्य पावली आहे की, ती भारतमाता आहे हे दर्शवण्यासाठी नकाशाची गरजच नाही - तिच्या वस्त्रप्रावरणांनी, भावी स्वतंत्र भारताचे विविध प्रांत व्यापले आहेत.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात, कापडाचं महत्त्व - विशेषत: राष्ट्रीय भावनेतून, सामान्य जनतेने जाणीवपूर्वक निवडलेले कपडे, हा अभ्यासाचा आणि विश्लेषणाचा विषय आहे. त्या संदर्भात, आधुनिक पद्धतीने नेसलेल्या साडीकडे (पोलकं, परकर यांसहित नेसलेली सहावारी) एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहावं लागेल. अगदी अस्सल भारतीय हिंदू परंपरेतली, मर्यादशील अशी ही साडी हे खऱ्या भारतीय परंपरेचं प्रतीक आहे. या पार्श्वभूमीवर, बहुतांश प्रतिमांमध्ये भारतमातेचा हाच पेहराव आहे, यात काही आश्चर्य नाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच, ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी जनतेला आवाहन करताना, भारतमातेच्या ह्या वेशभूषेचा उल्लेख होत आला आहे. मँचेस्टर आणि लँकेशर येथील आधुनिक कापडामार्फत जणू ब्रिटिश साम्राज्यानं भारतमातेच्या साडीला हात घातला आहे आणि भारतीय जनतेने एकत्र येऊन व स्वदेशीचं धोरण अंगीकारून, तिची प्रतिष्ठा पूर्वपदावर आणली पाहिजे. एका अर्थी, भारतमातेची साडी हा तात्पुरता टेकू न राहता; स्वातंत्र्यलढ्याच्या आर्थिक बाजूचं (भारतीय उद्योगांचं खच्चीकरण आणि परिणामी इंग्लंडकडे वाहणारा संपत्तीचा ओघ) प्रतीक बनलं. एकीकडे नकाशातील रिकाम्या जागांना भरीव जिवंतपणा आणताना ही अर्थव्यवस्थेच्या संदर्भातली प्रतिमाही ध्यानी घ्यायला हवी.

तमिळताय तमिळताय तमिळमाता

डावीकडे तमिळताय, उजवीकडे उपखंडावर दावा करणारी तमिळताय

१८९० नंतर, तमिळभाषक भागांत, भारतमातेला अजून एक प्रतिस्पर्धी उभी राहिली - तमिळ भाषेचं प्रतीक असणारी 'तमिळताय' (तमिळमाता). प्रसंगी भारतातून फुटून निघण्याची भाषा करणाऱ्या, द्रविड चळवळीत तर तमिळमातेच्या प्रतिमा, विसाव्या शतकाच्या मध्याच्या आसपास, विशेषत्वानं दिसून येतात. भारतमाता आणि तमिळमाता यांच्यातली ही चढाओढ नकाशे आणि सशरीर नकाशाप्रतिमांतही दिसून येते. १९४० आणि ५०च्या दशकात, स्वतंत्र द्रविड राष्ट्राचे ('द्रविडनाडू') नकाशे, पत्रकं, वृत्तपत्रांतील व्यंगचित्रं आणि भित्तिपत्रकं यांच्यात आढळतात (डावीकडची आकृती). त्याच सुमारास, उर्वरित भारताचे नकाशे जाळण्यापर्यंतही द्रविड चळवळीची मजल गेली होती. त्याआधीही, म्हणजे १९३५च्या सुमारास, तमिळमातेचे सशरीर नकाशे क्वचित शालेय पाठ्यपुस्तकांत आणि मोठ्या प्रमाणावर, फुटीरतावादी प्रकाशनांत दिसून येतात. ह्या बव्हंशी प्रतिमांमध्ये, तमिळमातेनं संपूर्ण उपखंडावर दावा केला आहे (उजवीकडची आकृती). काही वेळेला तमिळमाता, भारतीय उपखंडाच्या पार्श्वभूमीवर, पृथ्वीच्या गोलावर विराजमान झालेलीही दिसून येते (खालची आकृती)
पृथ्वीगोलावर तमिळताय
पृथ्वीगोलावर विराजमान तमिळताय

भारतमातेप्रमाणेच, भारताचा नकाशा हे तमिळमातेसाठी केवळ भाषिक देवतेपासून भौगोलिक आणि राजकीय संदर्भातील देवताप्रतिमा बनण्याचे साधन आहे. त्यामुळे, नकाशात तमिळमाता जो भूभाग व्यापते, तो तमिळभाषक प्रदेशापेक्षा कितीतरी मोठा आहे (दक्षिण भारत, भारतीय उपखंड आणि कदाचित संपूर्ण जगही). तमिळमातेच्या ह्या अतिशयोक्त सशरीर नकाशाप्रतिमा हेच दाखवून देतात की वसाहतवादी नकाशांप्रमाणेच, राष्ट्रवादी वा उपराष्ट्रवादी नकाशाशास्त्राच्या मुळाशीही भौगोलिक आणि राजकीय आकांक्षा असतात - मग त्या कितीही अवास्तव असोत. ज्या आसेतूहिमाचल भारताच्या संकल्पनेला आव्हान द्यायचा प्रयत्न द्रविड चळवळीने केला, त्याच राष्ट्रवादी चळवळीचा कित्ता नकाशांच्या आणि अन्य संदर्भात, गिरवायचा प्रयत्न तिनेही केला, असं म्हणता येईल.

सशरीर नकाशाप्रतिमा आणि राष्ट्रीय अवकाश

आपल्या देशाला अशा मातेच्या समूर्त रूपात पाहणं, याचं व्यापक राष्ट्रीय संदर्भात नेमकं महत्त्व काय? वसाहतवादी शक्तींशी लढण्यासोबतच सामान्य जनतेच्या भावनांना हात घालण्याचं आव्हानही राष्ट्रवादी चळवळीपुढे असतं. केवळ भौगोलिकदृष्ट्या अचूक असा कोरडा नकाशा या उद्दिष्टात कुचकामी ठरला असता, हे उघड आहे - वर लेखात दिलेली रवींद्रनाथ टागोरांच्या कादंबरीतली आणि श्री ऑरोबिंदोंची वक्तव्यंही यास बळकटी देतात. याउलट, तमिळमाता असो वा भारतमाता - दोहोंच्या सशरीर नकाशाप्रतिमा, ह्या कोरड्या नकाशाला एक जिवंत, मानवी परिमाण देतात. त्या प्रतिमांसोबत बहुतेक वेळेला येणाऱ्या मातृभूमीच्या महत्तेचे गोडवे गाणाऱ्या कविता याचीच साक्ष देतात. शिवाय, जेव्हा भारतीय स्वातंत्र्याची वा स्वतंत्र द्रविडनाडूची चळवळ वैचारिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या किंवा अगदी नकाशाशास्त्राच्या दृष्टीनंही गोते खाऊ लागली - तेव्हा ह्या मातृदेवतांच्या प्रतिमांनी एकता, समग्रता आणि स्थैर्याचं वरदान (मग ते सीमारेषांच्या काटेकोरपणाकडे काणाडोळा करून का असेना) ह्या चळवळींना दिलं. ह्या नकाशाप्रतिमांतून जो भारत उभा राहतो; त्याच्या सीमारेषा भौगोलिकदृष्ट्या धूसर आहेत. त्यांतल्या स्त्रीप्रतिमांची वस्त्रप्रावरणं, अलंकार आणि उभं राहण्याची ढब हे अद्यापही पुरातन प्रतिमाबंधांना धरून आहे. आपलं नवोदित राष्ट्र हे वास्तविक अनादिअनंत आणि शाश्वत आहे हे ठसवण्यासाठीची ही अजून एक क्लृप्ती.

राष्ट्रीय अवकाश जिवंत करणाऱ्या, समूर्त स्वरूपात सादर करणाऱ्या, त्याचं प्राचीनत्व ठसवणाऱ्या ह्या नकाशाप्रतिमा हटकून स्त्रीशरीराच्या असतात. देशाच्या अशा स्त्रीप्रतिमांमुळे, भूभागाशी एक 'पुरुषी' दृष्टिकोनातून नातं जोडता येतं; अशी एक भूमिका स्त्रीवादी भूगोलतज्ज्ञांनी मांडली आहे. अशा सशरीर नकाशाप्रतिमा आणि त्यांच्यासोबत बहुतेक वेळेला असणाऱ्या कविता यांतून, पुरुषांच्या ऑड्यन्सला 'संकटात सापडलेल्या माझ्या देशाच्या अबला मातेला मी माझ्या पराक्रम आणि बलिदानाद्वारे वाचवलं पाहिजे!' असा संदेश देण्याचा प्रयत्न असतो. एक प्रकारचा हवाहवासा मालकीहक्क मग देशाच्या भूभागांवर या प्रतिमांमार्फत गाजवता येतो. देश आणि त्याचे नागरिक यांच्यातलं नातं जरी मातेचं आणि लेकरांचं आहे असं वारंवार ठसवलं जात असलं; तरी त्यात एका वैषयिक इच्छेच्या सुनियंत्रित प्रतलाचा धागाही गुंफला जातो. टागोरांच्या कादंबरीत, संदीपच्या उद्गारांना उत्तर देताना विमला म्हणते:
"संदीपच्या डोळ्यांत अंगार पेटला होता. पण त्यामागे भक्तिभाव होता की विषयवासना, ते मला सांगता यायचं नाही.... जेव्हा संदीपच्या आवाहनांत, देशभक्तीच्या भावनेत अलगदपणे माझ्यावरच्या प्रेमाचा धागा गुंफला जातो; तेव्हा माझंही चित्त थाऱ्यावर राहत नाही.... माझ्यातल्या तेजस्वी स्त्रीत्वामुळे मी खरंच देवी झाले आहे की काय, असं मला वाटून गेलं!"

वैषयिक, देशभक्तीपर आणि नकाशाशास्त्रीय प्रतलांच्या ह्या एकमेकांना छेदणाऱ्या प्रतलांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या संवादातून मग भारतमातेची (आणि तमिळमातेची) सशरीर नकाशाप्रतिमा आकारास येते - अशा राष्ट्राची प्रतिमा, ज्याच्यासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला लोक तयार होतात.

'नेमक्या कोणत्या अंत:प्रेरणेमुळे, राष्ट्र या तशा मर्यादित संकल्पनेसाठी लोक आपला जीव ओवाळून टाकायला तयार असतात?', ह्या प्रश्नाचा वेध बेनेडिक्ट अँडरसन यांनी त्यांच्या आधुनिक राष्ट्रवादाबद्दलच्या मननीय निरीक्षणांत घेतला आहे. या सशरीर नकाशाप्रतिमा हे केवळ दृश्य साधन नव्हे - त्यांच्यामुळे नागरिकांना कोरड्या, रिकाम्या भौगोलिक जागेकडे एक जिवलग व्यक्ती, इष्टदेवता, अबला माता आणि कदाचित प्रेयसी म्हणूनही पाहता येतं. या प्रक्रियेतून, जे देशाच्या भूभागाशी मातेसारखं जिव्हाळ्याचं नातं जोडलं जातं; ते भौगोलिकदृष्ट्या अचूक नकाशांना साध्य होणं अशक्यप्राय आहे. टागोरांच्या कादंबरीतल्या संदीप ह्या नायकाचे शब्द उसने घेऊन सांगायचं झालं तर: "फक्त एका कागदावरच्या नकाशासाठी कुणीही आपले प्राण अर्पण करायला तयार होणार नाही. जेव्हा मी तुला प्रत्यक्ष माझ्यासमोर पाहतो; तेव्हाच मला आपल्या देशाच्या सौंदर्याची खरी कल्पना येते. ह्या प्रतिमांनीच जगायला उमेद मिळते आणि मरणातही हर्ष!"

ताजा कलम:

स्त्रीप्रतिमा, राष्ट्र आणि नकाशा यांबद्दलच आधुनिक भारतात मांडली गेलेली ही एकमेव भूमिका नव्हे. १९८०च्या दशकात महाश्वेतादेवीनी लिहिलेली 'सुंदर दौलती' ही एक मार्मिक कथा. महाश्वेतादेवींसारख्या स्त्रीवादी लेखिकांनी कुपोषित, खंगलेली आणि रोगग्रस्त अशी स्त्रीशरीरप्रतिमा मांडून नेहमीच्या सुडौल, निरोगी प्रतिमेला आव्हान दिलं. त्यांच्या कथेत, दौलती ही वेठबिगार मजुराची मुलगी कुटुंबाची देणी फेडण्यासाठी जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलली जाते. पुढे, पुरेशा वैद्यकीय मदतीच्या अभावापायी, गुप्तरोगांनी तिचं शरीर पोखरलं जातं आणि अखेरीस ती ओसाड जमिनीवर पडून मरणाची वाट पाहत राहते. कथेच्या अखेरीस, तिचा मृतदेह आढळतो तो स्वातंत्र्यदिनानिमित्त, जमिनीवर शाळामास्तरांनी काढलेल्या भारताच्या नकाशाच्या आत. महाश्वेतादेवी या भेदक ओळींनी कथेचा समारोप करतात:
"आसेतूहिमाचल पसरलेल्या भारतीय द्वीपकल्पाच्या ह्या संपूर्ण आकृतीवर, दौलती नागेशियाचं - त्या वेठबिगार-वेश्येचं - निष्प्राण प्रेत अस्ताव्यस्त पसरून पडलं आहे. गुप्तरोगांनी पोखरून काढलेलं, खंगलेल्या फुफ्फुसांतून सारं रक्त उलटून पडलेलं. आज पंधरा ऑगस्ट. दौलतीच्या प्रेतानं मोहनसारख्या (शाळामास्तर) देशबांधवांना झेंडा फडकावायला एक इंचही जागा सोडलेली नाही. आता मोहन काय करेल? दौलती तर साऱ्या देशभर पसरली आहे!"

महाश्वेतादेवींनी कथेचा शेवट करताना, भारताच्या अधिकृत नकाशाचं जे एका अर्थी पुनर्लेखन केलं आहे (आजवर सामावून न घेतलेली अशी दौलतीच्या शरीराची किमान दखल), त्याच्याकडे गायत्री स्पिवॅक लक्ष वेधतात (#६६). माझ्या मते, दौलतीच्या ह्या अखेरच्या कृतीतून, महाश्वेतादेवींनी गेली शतकभर प्रचलित असलेल्या स्त्रीशरीरकेंद्रित नकाशाप्रतिमांचा भेदक उपहास केला आहे - अशा नकाशाप्रतिमा, की ज्यांत स्त्रीच्या शरीराचा उपयोग हा भूभागाकडे पाहण्याच्या खास पुरुषी अशा स्वामित्वभावनेच्या जोपासनेसाठी केला गेला आहे. कथेतली अशी नकाशाप्रतिमा, जिच्याद्वारे पुरुषकेंद्री राज्यव्यवस्थेला जाब विचारला गेलाय - मात्र त्याचवेळी कथानायिकेची भूमिका संपुष्टात येऊन तिची जागा आदर्श, सालंकृत पण अखेरीस निष्क्रिय अशा भारतमातेच्या सशरीर प्रतिमेने घेतली आहे.

संदर्भ इथे सापडतील.
मूळ लेख इथे सापडेल.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बरंच संशोधन केलय.
(( भारतमातेची हीच प्रतिमा बोकाळलेली दिसते, शब्द खटकतोय.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0