राणी

समोरलं फायकसचं झाड उभं आडवं वाढलंय. गर्द निमूळत्या टोकदार पिंपळमुखी पानांनी तिच्या घराच्या भिंती धुरकटल्यात. हिरव्या कच्च पानात नाचणाऱ्या किरणांच्या पांढऱ्या उभ्या आडव्या रेषा थेट खिडकीवरल्या तावदानाशी संगनमत करतात. टीचभर घर झळाळतं.तिनं कौतुकाच्या दाणापाण्यात जगवलेली खुजी रोपटी झाडाच्या फांद्याफांद्यांतून डोकावणाऱ्या निळ्या भोट आभाळाचे तुकडे पाहत उगाच इतरतात. कोपऱ्यात दबा धरलेला बोचरा वारा तुकड्या तुकड्यातनं शिरत झाडाला गुदगुल्या करतो. झाडं हसतं. इतकं हसतं. हसून पार हिंदकळतं. कबुतरं -कावळे लाडं लाडं थिरकतात. चिमण्या मुरडतात. तावदानावर उमटलेल्या आकारांची सरमिसळ नवी चित्रफित प्रोड्युस करतं.

गवऱ्याला काखेत घेऊन राणी खाली उतरलीय. ' गवऱ्या' राणीचं दोन वर्षाचं पोर. 'गवऱ्याचे' कौतुकानं 'गौरव' म्हणून पाळण्यात कान फुकल्यावरही 'गवऱ्या' किंचाळल्यानं त्येला नाव न आवडल्याचा खुलासा राणीच्या सासूनं तिथल्या तिथं करून टाकल्यानं तो 'गवऱ्या' झाला. गवऱ्याची इलॅस्टिकची चड्डी नवी असल्यानं कमरेला करकचून वण उठलेत. घट्ट चड्डीनं पोट पुढं ढुंगण मागं आल्यानं कमरेतल्या घळींत करदुऱ्याबरोबर बांधलेली पेटी चिकटलोळ घामात रुतत गवऱ्याची बेंबी टरारत वर उगवलीय. गवऱ्याला केव्हांचं मुतायचंय. गवऱ्यानं गुढग्यात वाकत दोन्ही हात जांघेत दाबत मूत आवरलाय. राणीला कळतं. घामानं चिकटलेली चड्डी खाली येत नाही. राणी चड्डी खसकन ओढत ढुंगणावर घेते. गवऱ्या कळवळत मुततो. चड्डी ओली होते. तो चड्डी ओढून फेकतो. गवऱ्या नागडा. नागडा गवऱ्या नवा खेळ खेळतो. मुतातल्या चिखलाचा. राणी त्याला आवरत नाही. 'असं करत्येत का? एव्हढंच म्हणत फटकवते. गवऱ्या कळवळतो. रडतो. परत खेळतो. ती बाल्कनीत सादृश्यतेत उभीयं. तिचं निरखणं गवऱ्यापर्यंत पोहोचतयं. तसं त्यानं सलगीचं हसू काढलंय. राणीनं त्याला तसा दम भरलाय. त्यामुळं तो सगळं चुकवतो पण तिच्याकडं बघून हसतोच हसतो. तसा आताही हसला. ती हात हलवते. राणीचं लक्ष तिच्याकडं लागतं. राणीला सांगायचं असतं. कालच्या कडक उन्हात वरचा मजला भाजून निघाल्यानं राणीचं घर अजूनही कोंबाटलेलंय. उघड्या दारा खिडक्यांतून फसफसत आलेलं ऊन सहन होत नाही. राणीनं हाताचा पावा करत अंगठा तोंडाशी नेत उरलेली चार बेवारस बोटं हवेत सोडलीत. तिला समजतं. रात्री टच्चून लावून आलेला राणीचा नवरा तानाजी तसाच पसरलाय. त्याच्या तोंडातून ओघळलेल्या लाळेतनं घरभर दारू पसरलीय. त्याचं तसलं पिणं म्हणजे घरात सतत लावलेल्या, त्याच ब्रॅण्डच्या उदबत्ती सारखं. सवय झालीय नाकाला. लावली काय? नाही लावली काय?. सारखंच. धूर आल्यावर कळतं.तसं त्याचं पिणं. लाळेच्या चिकटमोळ स्त्रावात घराला डुबवणारं. त्याची दारू कधीच धूर काढत नाही. तो कसलाच धूर काढत नाही. दारू पिऊन लालवटलेल्या डोळ्यांनी जिना चढउतरतांना नजरेनं सभ्य माणसांच्या मुस्काटात मारतो. ती त्याला कधीच काही म्हणणार नाही हे माहित असूनही दारूच्या दुकानात तिला पाहिल्यावर नजर चुकवतो. ग्राउंडमध्ये बाटली लपवतो. ती आदरानं गडगडते. तिला तानाजीचं माणूस असणं फार आवडतं. एक दारू सोडली तर त्याच्याकडं नखभर दुर्गुण नाही. तानाजीनं पिऊच नये. तानाजी पिलाचं नाही तर राणी सुखी होईल. तिचं भोळं मन. ती भाबडेपणं राणीच्या मनात ढवळते. तर राणी हसून म्हणते "काकू काय तरीच बा तुमचं". हा प्येतो तो. कोण नाही प्येत ?. सगळं जगच प्येतं. मग त्यानं प्येलं तर काय बिघडलं? राणीच्या नजरेतल्या घट्ट वस्तुस्थितीला ती शरण जाते. राणीनं आपल्या ठेंगण्या हातात तानाजीच्या दारू सकट सगळं उचललंय. याचं त्याला कौतुक आहे. पण ते त्याला राणीला सांगता येत नाही. फारचं लाडात आला तर काय राणीबाई? अशी हाक मारेल. हाक आल्याचा अवकाश राणीची साखर होते. पाण्यात विरघळणारी साखर. राणीचा संसार प्रेमाचा आहे. न बोलता न दाखवता आपापल्या हाताच्या ओंजळीत एकमेकांला सरसकट जागा दिल्यानंचं सगळं टुकीत चाललयं.

पहिल्या भेटीतच राणी तिच्याकडं पहात पसाभर उमलत्या रुईच्या पानासारखं हसली होती. खरं. तुम्ही बघा हं. रुईचं पान सतत आनंदी असतं. उगाच का त्याची माळ सतत आगपाखड करणाऱ्या शनीच्या गळ्यात पडते. शनीला ते पटलंय. रुईचं आनंदी असणं. तसंच राणीचंही. राणीचं ओठावरलं हसू हळूहळू चेहऱ्यानं खाल्लं. राणीचा चेहराच आता वीतभर हसतो. राणीच्या पाठ - मानेच्या शिरा टच्च फुगल्यानं तिची काळ्या मण्याची पोत घट्ट होत गळ्याच्या खोलगटात मंगळसूत्राच्या झिजलेल्या वाट्या उभ्या राहतात. एरवी नाही पण राणी बोलायला लागली की ते जास्त जाणवते. ते तिला राणीला सांगता येत नाही. त्या दोन वाट्यात राणी रोज तीळतीळ मरते. मंगळसूत्राच्या वाट्यात मरणाऱ्या बायका सगळीकडं. राणीला त्या बायकांत सोडून वेगळं होता येत नाही तिला. ती राणीला चिटकते. राणी तिला चिटकवून घेत नाही हे कळूनसुद्धा तिला राणीला सोडून देता येत नाही. राणी राणी राणी. राणीनं नुसतं घेरलं. नाही. राणी तिला व्यापून उरलीय. राणीच्या पाठीतल्या फाकेनं खोली गाठत पाठीवर हाडंचं हाडं उमटवलीत. राणीचा ब्लाऊज अंगभर फिरतो. तो शिवलाच तसा. राणी गावाकडं ब्लाऊज शिवते. ते तिला बरं पडतं. राणीनं तिच्याकडली तिसरी साडी पंधरा दिवसापासून पत्र्यावर पसरलीयं. खरं तर ती वाऱ्यानं पडलीय. पण राणीनं दुर्लक्षिलं. साडी उन्हानं कडक झालीच पण कबुतरांनी शिंटून त्यावर धुरकट पांढरे छापे काढलेत. राणीला साडी काढायची नाही. नाहीच काढणार राणी ती साडी.तिला माहित आहे. ती राणीला साडी काढ असं सांगत नाही. आलटून पालटून काळ्या - पांढऱ्या ब्लाऊजात राणी त्या दोनच साड्या नेसते. राणीनं आयुष्याला काळ्या पांढऱ्यात विभागलंय. कटकट नको. राणीला आता कोणत्याच रंगाशी काही देणं घेणं नाही. राणीच्या पाठीत एक दिवसाच्या फेऱ्यानं रुतणाऱ्या काळ्या पांढऱ्या ब्लाऊजचं आयुष्य एखाद्या दुसऱ्या धुण्याचं उरलंय. राणीनं आता ब्लाऊज शिवायला हवेत. ब्लाऊजचं का शिवायचे ? सगळ्या जगानं घालून चोथा केलेले गाऊन आणि लेगिन्स राणीला मिळाले पाहिजेत. हा तिचा हक्क आहे. राणीनं किती सोसावं. स्त्री मुक्तीवाल्याना राणी माहित नाही. राणीपासून स्त्रीमुक्ती वाल्या फार दूर आहेत.त्यांना राणी कळलीच पाहिजे राणी सगळ्यापासून दूर आहे. तिला स्त्रीमुक्ती कळत नाही. सांगितलं तरी काय की बाई? म्हणून विरून जाईल. राणीकडं कोण लक्ष देणार. राणी तिचं ऐकत नाही. राणी कोणाचंच काही ऐकत नाही. ते काही नाही, राणीला स्त्री मुक्तीवाल्यांकडं गेलं पाहिजे. त्या राणीच्या प्रश्नांना समजू शकतील. त्यांना नाही जमलं. तर सरकार आहेच. सरकार स्त्रियांच्या प्रश्नांबाबत फार दयाळू आहे, असं रोज ऐकू येतयं. राणीच्या प्रश्नाला सरकारकडं नेलं पाहिजे. . नाही तरी रिकामचोट लोकं सरकारला कसं वागावं याचे सल्ले देतायेत, त्यांना राणीकडं वळवलं पाहिजे. ते सरकारकडं राणीची कैफियत गुदरतील. सरकार जागं होईल. सरकारनं जागं व्हायला पाहिजे. राणीकडं लक्ष दिलं पाहिजे. राणीचा प्रश्न ज्वलंत आहे, असे प्रश्न सरकारनं लावून धरले पाहिजे. सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. राणीवर असा अन्याय तिच्या डोळ्यादेखत होता कामा नये. राणीसाठी काहीतरी केलंच पाहिजे.

दहा वाजलेत. देवळातली आरती संपली. देव खाजगीत गुंतलेत. राणी आता देवळातयं. राणीचं देवळात येणं, देवळाच्या दारात बांधलेल्या घंटीसारखं.तटस्थ. श्रद्धेशी संबंध नसणारं. नागड्या गवऱ्याच्या हागण्या- मुतण्याला चड्डीचाही बंध उरला नसल्यानं त्यानं देवळात रांगोळ्याच रांगोळ्या काढल्यात. त्या आंबटओल्या वासात देवळात लावलेली उदबत्ती विरघळत चालली आहे. राणीचं आयुष्य असंच विरघळतंय. कडेला सांडलेल्या पिठाळ राखेसारखं. ते दिसत नाही. फक्त कणाकणानं सांडतं ..टिकटिकीच्या गोल वर्तुळातल्या मोठ्या काट्याची एक परिक्रमा संपूनही राणी ढिम्मं. राणीला आता उठलं पाहिजे.उठ राणी उठ. सगळं आवरलं पाहिजे. उशीर झाल्यावर तुझीच धावपळ होईल. देवळात कोणी बसावं? ज्याला वेळ आहे त्यानं. देवानं सुद्धा देवळात बसणारी माणसं वाटून घेतली. तू नाही बाई त्यात. राणी उठ. तिच्या वाढलेल्या येरझाऱ्यानं राणी उठते. नागड्या गवऱ्याला उचलत थेट नळाखाली धरते . स्वच्छ धुते. राणी आंघोळ म्हणत नाही. त्यापेक्षा अंग धुणं बरं पडतं तिला. राणीनं गवऱ्याला पायऱ्यावर उभं केलं. नागडा गवऱ्या पायऱ्यांवर उभ्या उभ्याच सुकतो. उन्हात अंग सुकल्यानं सगळं शरीर तडतडतं. अंग निथळलेलं पाणी पायात उरतं. शाळेतल्या पोरांच्या जवळकीत गवऱ्या चेकाळत रंगतो. राणीचं बादलीभर पाण्यात देऊळ बुचकळवणं. पोरांचं रिक्षाकडं धावणं. गवऱ्याचं हात हलवणं. एक अध्याय संपतो. राणी गवऱ्याला काखेत अडकवत इरेनं घर गाठते . सकाळी गवऱ्याच्या मागं वेळ गेल्यानं. तानाजीचं फावलं.त्याची दारू थंड पाण्यात उतरली. राणीनं केलेली भाजी भाकरी न विसरता घेत कामावर पोहोचलाय. पसाऱ्यानं व्यापलेल्या घराला शून्यतेत मोडत राणीनं पदर खोचला. राणीनं इथलं आवरलं की गवऱ्या तिथलं काढतोय. कावलेल्या राणीनं मुस्काडल्यानं भोकाड पसरुन फुंदत झोपी गेलेल्या गवऱ्याच्या कपाळावरल्या घामानं नक्षी काढत नाकाच्या शेंड्यावर केलेलं तळं गवऱ्याच्या कूस बदलण्यानं नाकाओठाच्या मध्यात तुंबत खाली ओघळतं.

गवऱ्या खिडकीत उभायं. खिडकीतनं सगळं दिसतं. खेळणारी पोरं. कावळं कोकीळ खबुतरं. खबुतरं राणीचा शब्द. गवऱ्या घरातलं सगळं खिडकीतून फेकतो.अंगावरले कपडे सुद्धा फेकतो. त्यानं पत्र्यावर फेकलेलं राणी काठीनं खाली सारते . ते मातीत मिसळतं. राणी सकाळची भाजी भाकरी एकत्र करत नाष्ट्या जेवणातलं अंतर मिटवत गवऱ्यापाशी सरकते. राणीला गवऱ्याला चारायचं आहे. राणी भरवते. जेऊ घालते. ते बघ काऊ, चिऊ, हा शेवटचा घास. असं काही न म्हणता एका मागोमाग घास गवऱ्याच्या तोंडात कोंबते. गवऱ्या तोंडात घास फिरवत पत्र्यावर थुकतो.त्याला ते फार आवडतं. एकदा तर त्यानं राणीच्या हातातली ताटली खिडकीतनं फेकली. पत्र्यावर पडल्याच्या आवाजानं हिरकून टाळ्या वाजवत उभा राहिला. परवा राणीनं खपून त्याच्यासाठी पुऱ्या केल्या. गवऱ्यानं तोंड लावलं नाही. सगळ्या फेकल्या. काही पत्र्यावर आहेत. उरलेल्या खाली आल्यात. मातीत लोळतात.राणीनं गवऱ्याच्या जेवणाचा नाद सोडत आपली खळगी भरण्याकडं लक्ष केंद्रवलंय. गवऱ्याचा कालवा चालूयं. गवऱ्यानं खिडकीतनं धार सोडली. खिडकीतनं लांब उडत पत्र्यावर पडणारी गवऱ्याच्या मुताची पिवळीकच्च सरपटणारी धार, त्यामागं राणीनं बदाबदा ओतलेल्या कळशीभर पाण्याचा गरम मातकट मुतेरी दर्प नाकातोंडाशी घासत गवऱ्याचा मूत तिच्या मोगऱ्या- गोकर्णाला कवेत घेतो.

भर दुपारचं जहरी ऊन गर्द गहिरं पसरलंय. फायकसच्या अंगाखांद्यावरून पसरलं.फायकसच्या दाट सावलीनं राणीच्या घरावर छत्र धरलं. राणी त्या सावलीत नाही. घराच्या सावलीत राणीनं बसू नये असा सटवाईचा नियम आहे. राणी तो अंखड पाळते. भर दुपारी राणी झोपत नाही. राणी आता समोरच्या घरात आहे. गवऱ्या मागं राणी पुढं. तानाजी कामावर गेला की राणी इथलीच कामं करते. इथं गवऱ्याला नेण्याची मुभा आहे. नसती तरी राणीनं जुमानलं नसतं. ते तिला जमलेलं. भल्याभल्याना न सुटलेलं राणीला हातासरशी सुटतं. समोरच्या घरात कामं करतांना टिव्हीतल्या मालिकेच्या तुकड्यात सौताच्या आयुष्याचा सिनेमा विसरणं राणीलाच जमतं. राणीचं, समोरचीचं पात्रात गुंगून जाणं रोजचंच. त्या दोघी टीव्हीच्या आत आहेत. बाहेरचा संपर्क तुटलाय. गवऱ्या पंख्याच्या वाऱ्यात सोफ्यात रैलावलाय. तो नेहमीचा आडदांड गवऱ्या नाही.साजिरं गोंडस गुणी बाळ. गवऱ्याला सोफ्यानं सभ्यता कशाशी खातात ते वाटीतल्या लाडवासह शिकवलंय. गवऱ्याचा लाडू संपला. गवऱ्यासमोर पोळी भाजीचं ताट सरवल्यानं गवऱ्या टीव्हीत घुसत न सांडता लवंडता नेटकंपणं भाजी पोळी संपवतोय. 'गुणाचं गं बाई माझं गौरू' राणीच्या पोटातली माया हातभर वर सरकते. राणी गवऱ्याचे गाल कुस्करत पापी घेण्याचा आखूडत्या प्रयत्नात गवऱ्या निसटतो. कामाचं एक घर संपतं. राणीचं त्या दिवसातलं एक काम कमी झालं.ती सुस्कारा सोडते. राणीच्या मनावरुन पहिलं घर अलगद पुसतं. राणी तिच्या पुढ्यातल्या दुसऱ्या घरात उतरलीय. राणीची नजर तिच्या नजरेत मिसळते. कपड्याच्या बोळ्यात मिटलेल्या राणीचा चेहरा वीतभर हसतो. राणीनं जेवल्या का ? असं खुणावल्यानं तिच्या मानेतनं होकार सुटतो. दुसरं घरही राणीच्या हातातनं निसटतं. ही वेळ गवऱ्याच्या दुकान फेरीची. राणीनं आपले हात गवऱ्याच्या हातात शाबूत अडकवत त्याला चालतं केलंय. भर रस्त्यात गवऱ्याच्या पाठीला कंड सुटलाय. गवऱ्यानं अंगावरल्या शर्टाला फेकत राणीकडं पाठ करून उभं राहिला. हटवादीपणं. पाठीची खाज. ती तशीच असते. स्थळ वेळ काळ न बघणारी.राणी हलक्या हातानं पाठीला घासते. तिच्या खरखरीत तळव्याच्या स्पर्शानं गवऱ्याची खाज सुखावते. गवऱ्या, राणी दुकानाच्या आतत्येत. काचेच्या काऊंटरवर बसलेल्या गवऱ्यानं दुकानात धुमाकूळ घातलाय.राणीनं सगळं दुकानच्या दुकान जरी पिशवीत बांधत आणलं असतं तरी गवऱ्याचं समाधान झालं नसतं. राणीनं अचलपणं केशरी रंगाच्या तीन पेपश्यावर समेट घडवत, गवऱ्याच्या तोंडात एक, दोन्ही हातातल्या घट्ट मुठीत दोन देत, गवऱ्या राणीची जोडगोळी फायकसच्या बुंध्याशी स्थिरावते. थंडगार पेपशीच्या पुंगळ्या गवऱ्याच्या उघड्या पोटाला गुदगुल्या करतात.गवऱ्या खिदळतो. राणी हसते. फायकसच्या उभ्या दुपार सावलीत सगळं पुसटून एकमेकांत रमलेल्या गवऱ्या राणीचं चित्र गडद उमटतं. गवरीची रिक्षा येईलंच इतक्यात. 'गवरी' राणीची शाळेत जाणारी मुलगी गौरी. राणीला गौरीचं कोण कौतुक. गौरी सगळ्या शाळेत पहिली येते. ती हुशारच. गौरीच्या पोयम म्हणणं. गौरीचं भाषण करणं. गौरीच्या फ्रेंड. मागच्याच महिन्यात शाळेतल्या इन्स्पेक्शनदिवशी गौरीचं नाणं खणखणीत वाजलंय. पंचवीसच्या पंचवीस इंग्रजी शब्द स्पेलिंग न चुकवता काढता आलेत. राणीनं हे तिला सांगितलं नाही. राणीनं हे मुद्दाम केलं असं तिला वाटण्याचा प्रश्नचं डोकं न काढणारा. राणी मुद्दाम करत नाही. राणीला हे सुचलंच नसल. तशी ती जिन्यात राणीला आडवी जाते. राणीच्या पुढ्यातला दत्त होत. राणी प्रश्नचिन्हांच्या भवऱ्यात अडकते. सुटण्याची धडपड करते. तिनं गौरीचं नाव घेताचं ' ते व्हय ! काकू किती दिस झालेत त्येला'. म्हणत चेहराभर हसते. राणी ही अशी. सगळं सगळं वाहू देणारी. गुंतायचं नाहीच नाही पण ते वरच्यावरचं सोडायचं.याक्षणीही समोर बेंचवर बसलेली साधी सरळ राणी पाहून तिला भडभडतं. राणीचं साधं सरळ असणं खोलवर दुःखतं.सगळं जग बदललं. घासून पुसून चकचकीत झालं. राणी तिथंच. गौरीची रिक्षा वाजते. गवऱ्याची राणीच्या तावडीतनं सुटका झाल्यानं,त्यानं गौरीकडं झेप घेताच, राणी ढिली पडते. पाय वर घेत गुढघ्याला हाताचा विळखा घालत एकटी होते. काही क्षणांतच मधल्या दुराव्याच्या तासांचा बळी देत गौरी- गौरवची रडारड राणीच्या हातातली काठी शांतवते. एका हाताचा अंगठा तोंडात, दुसऱ्या हातात पेपशीच्या प्लस्टिक पुंगळ्या घेत राणीच्या मांडीवर डोकं ठेवत झोपलेल्या अर्धनागड्या गवऱ्याची छाती वरखाली होतांना कफानं वाढलेली घरघर अलगद ताल धरते. एक हात गवऱ्याच्या छातीवर, दुसऱ्या हातात गवरीला ओढत मिटत्या डोळ्यांच्या कपारीतलं सुखाचं दुपटं झोपेच्या मायरानात उतरवतांना हिरव्यागार मायेच्या फायकसच्या गर्द गहिऱ्या फांद्यात राणी दिसेनाशी होत्ये.

तिच्या तिसऱ्या खिडकीतल्या फायकसच्या उतरत्या दांडेऱ्यात दूरवर पसरलेल्या कोऱ्या करकरीत ढगांच्या तुकड्यात, केबलाच्या जंजाळात घारींच्या आवर्तनांचा खेळ रंगलाय. शेंड्यातल्या मौनी कावळ्याच्या उडणहुक्कीत झाड क्षणभर हिंदकळतं. थरथरत स्थिरावतं. कोकिळेचं कंठ दाटतो. रिकामटेकडा ऋषी चेकाळतो. तशाच ताना घेतो. कोकीळ गांगरत लाजेनं चूरतं. काही क्षणात ते ही पेटतं. ऋषी परवडला अशा ताना घेतं. कोकीळ. ऋषी. गरगरा फिरवतात. थकवतात. कोकीळ कंटाळ्यानं गप्पं होत ऋषीला घरात पिटाळतं.सगळं चिडीचूपतं. क्षणभराच्या पॉवरनॅपीत अडकत. स्थितप्रज्ञ कावळा शेंड्याशी. कबुतरं डक्टच्या अंधाऱ्या गारेल्या वळचणीशी. मायलेकरांचं त्रिकूट फायकसच्या बुंध्याशी. इजळत्या दुपार नशेचा कोरा करकरीत क्षण तिला गिळत, तिची साक्ष काढत पुढं सरकलाय.

लांबल्या दिवसानं सूर्याला बिल्डींगीआड ढकललं असलं तरी त्याच्या लख्खं शेंदऱ्या तिरीपेत देवळाच्या कळसानं कात टाकताच, वैशाख दुपारीची भगभगीत धग मवाळ होत , राणीच्या गाभुळत्या डोळ्यात जाग येते. मांडीच्या क्षणिक चुळबुळीत गौरी पाठोपाठ गवऱ्या जागल्यानं, बाटलीतल्या कोंबटढ्यान पाण्यात गोडमिट्ट पेपशीनं आकसलेलं गवऱ्याचं तोंड खंगाळताच. गौरीला नळाचं थंडगार पाणी आणायला पिटाळते. पिशवीतली कापडं गवऱ्याच्या नागड्या कोमट अंगावर अडकवत, टाळू खरडून टाकणाऱ्या कंगव्याच्या टोकानं गवऱ्याच्या कपाळातून रेघ काढत थेट गळ्याला भिडवते.. तोंडाला पावडरीचा थर बसवत, गवऱ्याला बेंचावर टेकवत, गवऱ्याचे आवडते पकपक वाजणारे बूट पायात खुपसवत, गौरीनं आणलेलं थंडगार पाणी तिघं आळीपाळीत रिचवत, गवऱ्याला मोकळा सोडत गौरीचा होमवर्क सुरु होतो.गवऱ्याच्या बुटाच्या पकपकीत फायकसची पिंगट पिवळी बारकी फळं टचटचल्याच्या नखरेल नादात रवंथलेल्या सांजेचा उरला -सुरला प्रकाश गिळल्यानं, दिव्याच्या झळाळत्या प्रकाशात फायकस जडावल्यानं, गवऱ्याला काखेला मारत, गौरीला फरफटत, गच्च ढेकळानं भरलेल्या वावरात,भक्कम पावलं घट्ट रुतवत निघाल्यासारखी राणी घरी निघाली. राणी आजही तशीच चालते. दहा वर्षांपूर्वी नवी नवरी होऊन आली होती तशीच. तिच्या पाय रोवत चालण्यानं मधली दहा वर्ष मिटवून टाकलीत.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

देवळात कोणी बसावं? ज्याला वेळ आहे त्यानं. देवानं सुद्धा देवळात बसणारी माणसं वाटून घेतली. तू नाही बाई त्यात. राणी उठ.

.

घराच्या सावलीत राणीनं बसू नये असा सटवाईचा नियम आहे. राणी तो अंखड पाळते.

.
प्रभावी आहे व्यक्तीचित्रण. खूपच आवडलं शुभांगी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

मुंबईत मी एकटी रहात असे कारण नवरा जहाजावरती होता. तेव्हा 'शुभांगी' (सॉरी पण तेच नाव होतं) नावाची एक पोरसवदा कामवाली होती. तिचे मी लाड करत असे. लाड म्हणजे काय तर खाणं-पिणं-जुनेरं पानेरं आणि सुट्ट्या. छान होती. माहेरी तरी त्यातल्या त्यात सुखी होती. पुढे लग्न झालं तरी यायची माझ्याकडे कामाला पण ओढावल्यासारखी दिसायची. Sad
एकदा मनात आलं तर महीन्याला १० रुपये तिच्या नावाने वेगळे टाकावे व कामावरुन ती (कायमची) जाताना एकगठ्ठा द्यावेत. तिचा प्रॉव्हिडंट फंड म्हण ना. पण ती कल्पना अंमलात आलीच नाही. Sad आय विश मी तीवर (त्या कल्पनेवर) अंमल केला असता.
शनिवारी मी एका मस्त कुल्फीच्या दुकानातून भरपूर मलई कुल्फी आणत असे. रविवारी कुल्फीचाच ब्रेकफास्ट Smile शुभांगीचाही व माझाही Smile तिला आवडे बहुतेक. कधी म्हटली नाही पण ....
.
दुसरी एक कामवाली नंतर होती. एकदा रडत रडत मला म्हणाली ते अमके अमके शहा आहेत ना त्यांनी माझ्यावर चोरीचा आळ घेतला. तुम्हीच शब्द टाका की मी प्रामाणिक आहे. मी ही तेव्हा तरुण असल्याने बऱ्यापैकी भडक डोक्याची (हाहाहा) होते. मी गेले पोलिस स्टेशनात आणि सांगीतलं हिने माझ्या वस्तूंना कधी हात लावलेला नाही. प्रामाणिक आहे. नंतर त्या शहांकडेही जाउन तीच ग्वाही दिली. नंतर ते बालंट गेलें वाटतं.
नवरा होता तिचा हडकुळा, रापलेला Sad तो कधीमधी तिच्याऐवजी यायचा. ससूबाई त्याल फार कामाला लावायच्या - हे टेबल तिकडे सरकव, तो पलंग हलव अमकं न टमकं . मला मात्र दया येई. त्याचा जीव केवढा त्या टेबलाचं वजन केवढं. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिहीती रहा शुभांगी. व्यक्तीचित्रणच नाही तर निसर्गवर्णनही फार छान करतेस. चित्रमय असतात तुझ्या कथा. अगदी डोळ्यासमोर जस्सेच्या तसे चित्र उभे रहाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारिका धन्यवाद आपल्या लेखनाला कोणी दाद दिली छान वाटतं. तुला आलेला शुभांगीचा अनुभवही छानचं आहे. खरं तर आपल्या अवतीभवती खूप काही पेलणारी माणसं असतात. त्यांच्या निराळ्या अंदाजात ते खूप छान जगतात. राणीचं जगणं निर्थतक व विनोदी मुळीच नाही. ते जगायला राणीचं पाहिजे. एवढ्या तेवढ्यानं निराश होणारी माणसं वैफल्यात मिटतात.तेव्हा राणीसारखे असंख्य जीव किती सहजतेनं पुढं जातात. परत एकदा सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारिका धन्यवाद आपल्या लेखनाला कोणी दाद दिली छान वाटतं. तुला आलेला शुभांगीचा अनुभवही छानचं आहे. खरं तर आपल्या अवतीभवती खूप काही पेलणारी माणसं असतात. त्यांच्या निराळ्या अंदाजात ते खूप छान जगतात. राणीचं जगणं निर्थतक व विनोदी मुळीच नाही. ते जगायला राणीचं पाहिजे. एवढ्या तेवढ्यानं निराश होणारी माणसं वैफल्यात मिटतात.तेव्हा राणीसारखे असंख्य जीव किती सहजतेनं पुढं जातात. परत एकदा सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तु लिहलेल्या प्रतिसादाला विनोदी व निर्थतक असं लाईकलं म्हणून लिहलयं. तुला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

अर्रे श्रेणी फार सिरीअसली घेउ नकोस. काहीजण विनोदानेही एकदम भलत्याच श्रेणी देतात. तर काही खरच आकसाने देत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

नाही घेतलंय. आपण मागे बोललो आहोत. मला खरडफळा वापरता आला नाही. व्य. नि. मध्ये निरोप पाठवलेला. मी खूप दिवसांनी आले इकडं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'निर्थतक' म्हणजे नक्की काय? नाही म्हणजे, 'आजतक', 'कयामतसेकयामततक' वगैरे ऐकून होतो; 'निर्थतक' नवीन आहे.

की, एखादी वस्तू ज्याप्रमाणे 'निर्जंतुक' करतात (बोले तो तिच्यातील जंतूंचे निर्मूलन करतात), किंवा, परशुरामाने ज्याप्रमाणे पृथ्वी 'निःक्षत्रिय' केली (यानी कि पृथ्वीवरून क्षत्रियांचे निर्मूलन केले), तद्वत, (पृथ्वीवरून किंवा जेथून कोठून असेल तेथून) थत्त्यांचे निर्मूलन करण्याच्या एखाद्या योजनेस वा क्रियेस 'निर्थतक' म्हणत असावेत?

(इन एनी केस, थत्तेचाचांनी इतःपर या प्रकरणी जपून राहिलेलेच इष्ट.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

चित्रदर्शी झालय.
( धागा दिनांक ११ मे दिसतो आहे. प्रकाशित आज केला?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही हा धागा फार पूर्वी प्रकाशित झालेला आहे च्रट्जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखिकाताई, तुम्ही टचस्क्रीनच्या बटणाला चुकून दोनदा ढकलता किंवा तिकडे लिहिता लिहिता स्पर्श होतो आणि पटापट प्रतिसाद पडतात. आणि नेट स्पीडही फारच असावा.
अमच्याकडे दोन -पाच Mbps एवढाच असतो. बटण जोरदार दाबून 'जा' म्हटल्याशिवाय प्रतिसाद जात नाही.
आता जियो 150स्पीड देणार तेव्हा बघू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बटण जोरदार दाबून 'जा' म्हटल्याशिवाय प्रतिसाद जात नाही.

बटणाच्या कुल्ल्यावर लाथ हाणावी लागते ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा मोबाईलही नवायं. आणि मला फारसं ज्ञान नाहीये. शिकत आहे हळूहळू. बाकी नेट साधारण गतीचं आहे . जोडाक्षरं येत नाहीत वेगळाचं गोंधळ होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0