धुंडाळलेली रानं

भीमाशंकर किंवा इतर अभयारण्य हा विषय खरडफळ्यावर चर्चेत आला. तिकडे फार नको म्हणून वेगळा धागा काढत आहे.

रान म्हटलं की अभयारण्य किंवा जंगलच नाही. कराड सांगली भागात शेताला रानच म्हणतात. लहानपणी मामाच्या गावाला सांगली जिल्ह्यातल्या गावात जात होतो. एप्रिल मे महिन्यात शेतकऱ्यांची कामं आटपलेली असायची. शेतात ऊस सोडून काही नसले तरी बांधावरती ,आजुबाजुस आंबा, लिंबोणी, भोकर,गोंदणी ( भोकराचाच एक लहान प्रकार) , बोरं, बाभुळ, करंज,चिंच,कवठ,बेलफळ,,सागरगोटे ही झाडे असायचीच प्राणीपक्षांना आश्रयासाठी. कोरडे पडलेले ओढे हे मोरांसाठी खास जागा. दोन्ही बाजुंच्या काठावरची झाडं ओढ्यात रेलून सावली धरलेली. मोरांना ऊन चालत नाही. त्यामुळे ते तिथे दुपारीही दिसायचे. दगडगोट्यांखालचे किटक, सरडे वेचत मोर फिरायचे. शेतकऱ्यांना ते घाबरत नाहीत पण नवखा कुणी दिसल्यास लगेच मोठा पिसारा संभाळत जवळच्या मोठ्या आडव्या फांदीवर बसत. लांडोरी दूर पळायच्या. काही मोरांना पिसारा नसतो. त्यांन भुंडे मोर म्हणतात हे कळले होते. एकदा असेच वळणावर अचानक मोरांसमोरच आलो अन मोर पांगले फडफड करत. तेव्हा कुठूनतरी दुरून आवाज आला "कोणेरे?" "आम्ही आहोत." अमचा मुलांचा आवाज ऐकून तो मनुष्य कावला ( रागावला) "का रे त्रास देताय मोरान्ला?" रानात फिरताना भुकेचा प्रश्न नसतो. काहीना काही खायला सापडायचे. परत आल्यावर वर्णन केल्यावर आजी रागवायची. "कुठे रे फिरता उन्हातान्हाचं?" नाही, आम्ही सावलीतूनच ओढ्यातून फिरतो." अरे धोंड्यात साप असतात हां. तसे नाग आणि मण्यार पाहिलेले पण पुन्हा जायला देणार नाही म्हणून घरी सांगायचो नाही. दुसरी एक गोष्ट आजीने सांगितलेली ती आम्हाला नवीन होती. ती म्हणजे इकडच्या ओढ्याला अचानक 'लोट' येतो. मुंबईकडे कसं पाऊस 'लागतो' आणि सगळीकडेच पाऊस पडतो तसं नाही. दुपारी तीनपर्यंत अगदी ल्हाइल्हाइ उन आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटून( मे महिन्यात ) कुठेतरी आकाशात ढग गोळा होऊन तेवढ्याच दोनचार किमि भागात एक तासभर प्रचंड पाऊस पडतो. ते पाणी वेगात ओढ्यातून पुढे वाहते. आपण जिथे असतो तिथे कड ऊनही असते. तर जरा सावध राहावे लागते. लोक वाहून गेल्याची घटना होतात.

आमचं कोकणात कुणी नव्हतं. काजु,फणस,कोकम (रातांबे),जाम,तोरणं,केवड्याची बनं,उंडीण,पपनस,बकुळ ,माड,पोफळीच्या वाड्या ऐकूनच माहिती. हां तसे नारळ होते सांगली जिल्ह्यात. तर कोकणातल्या टेकड्या,ओढे,रानं आणि समुद्र थोडे उशिराच लहानपण सरल्यावर पाहिलं. बरंचशी घरं आपली नळीची कौल संभाळून असतानाच. आता मात्र झपाट्याने बदलत आहे. पण तो विषय नाही. सांगायचा मुद्दा असा की रान हे शेताभोवतीही असायचं, आपलं जीवन निर्धोक जगणारं. फक्त बघायचं आणि अनुभवायचं.
ऐंशीच्या दशका अगोदर ठाणे जिल्ह्यातल्या जागा फिरू लागलो. ठाणे - घोडबंदर रस्ता -या रस्त्याच्या एका बाजुस खाडी. आजुबाजुस केतकीची बनं, आमराई आणि जांभळाईसुद्धा. अगदी प्रत्येक आंब्या जांभळाला पार बांधून शेणखत वगैरे दिलं जात असे. वसईकडे गेल्यावर सातिवलीचे अरण्य, खाडीपलिकडे तुंगारेश्वराचे डोंगर आणि अभयारण्य. हे मात्र अजुनही तसेच आहे. उत्तरेला आटगाव स्टेशनच्या पश्चिमेला वाडा रस्त्यावरच तानसा तलाव क्षेत्र. संरक्षित असलं तरी या रसत्याने जाऊन अरण्य अनुभवता येतं. खरडी स्टेशनच्या पश्चिमेला वैतरणा तलाव ( मोडकसागर). इथे एकदा जाऊन राहता आलं '७८मध्ये. मोह, पळस,साग,अर्जुन,साल,शिवण यांचे मोठमोठे वृक्ष. नंतर खलिस्तान प्रकरण देशात उगवलं आणि एकेक तलाव पाहण्यास बंद झाले. दक्षिण भाग म्हणजे विहार तुळशी तलावाभोवतालचे संजय गांधी रा० उद्यान किंवा संरक्षित भाग. इकडे आत भटकायला मिळालं एकाच्या ओळखीने. आरेचा गोरेगावचा भागही मस्त. इकडे साप भरपूर असायचे. गोठ्यांच्या परिसरात गवत(चारा) लावलेला, शेणामुताची दलदल त्यामुळे बेडुक ,किडे,साप असायचेच. ठाणे जिल्हा असा समृद्ध तलाव आणि रानाच्या बाबतीत.

कर्जत पट्ट्याला सह्याद्री जवळ. इथे सपाटीला, चढावर आणि घाटमाथ्यावर (५००-६००मिटरस) तीन प्रकारची रानं पाहायला मिळतात. मला गड किल्ले पाहण्याचं वेड नव्हतं. डोंगरात रानात भटकणे एवढंच. कधी शिवप्रेमी भेटले राजमाची, लोहगड,माहुली वगैरे ठिकाणी की चर्चा होत असत. मग ती माहिती मी शिवचरित्रातून लिहूनच घेतली. माथेरान किंवा भीमाशंकर, हरिश्चंद्रगड हे गड नाहीत, रानं आहेत. पण राबता असल्याने वाहनं, खाणं , राहणं याची सोय होते. इथे घुसायला फार खटपट, आरक्षण वगैरे लागत नाही. इतर ताडोबा,आंबोली,कोयना, ही घोषित अभयारण्य किंवा पर्यटक अभयारण्य इथे जाण्यात मला आवड नाही. दोनचार प्राणीपक्षी दिसले नाहीत तरी चालतील माझी रानं मला स्वातंत्र्य देतात,आनंद देतात.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान. थोडा जंत्रीवजा झालाय पण ठीक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅम्रे नव्हते पण रेखाचित्रे काढता येत असती तर मजा आली असती,जुन्या आठवणींना पितांबरी पालिश मारता आले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लिहिताय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठवाड्यात त्याला गोण्णीचं फळ झाड म्हणत. माकडं फार आवडीनं खात असत. फार छान वाटलं गोंदणीचा उल्लेख इतक्या वर्षांनी वाचून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0