जेव्हा नाटक संगीतकाचं रूप घेतं (तीन पैशांचा तमाशा - ४० वर्षांपूर्वी) - चंद्रकांत काळे

संकल्पना

जेव्हा नाटक संगीतकाचं रूप घेतं...

तीन पैशांचा तमाशा - ४० वर्षांपूर्वी - चंद्रकांत काळे

- अबापट

५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी पावणेदोनशे वर्षांची झाली. त्यातच २०१८-१९ हे पुलंचं जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या इतर नाटकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने सादर झालेल्या 'तीन पैशांचा तमाशा'ला याच वर्षी चाळीस वर्षं झाली. त्यातले एक प्रमुख कलाकार, गायक आणि साहाय्यक दिग्दर्शक चंद्रकांत काळे यांच्याशी या नाटकाविषयी अबापट, डॅशी आणि चिंतातुर जंतू यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या.

डॅशी : 'तीन पैशांचा तमाशा' हे नाटक थिएटरमध्ये आलं कसं?

चंद्रकांत काळे : मला आठवतंय, पुलंनी ते स्वतः वाचलं होतं.. बहुधा नंदा नारळकरांकडे. आम्ही 'थिएटर अॅकेडमी'चे काही लोक होतो. जब्बार (पटेल) म्हणाला, "नवीन नाटक आहे, म्युझिकल आहे." संगीतक आणि भाईंचं नाटक म्हणून आम्ही वाचनासाठी गेलो होतो. तेव्हा खूपच वेळ वाचन सुरू राहिलं, असं मला आठवतंय. त्यांनी प्रदीर्घ लिहिलेलं असणार. नाटक उभं राहीपर्यंत असं वाटत होतं, 'अरे बाप रे हे इतकं मोठं नाटक आहे, तर कसं होणार याचं!'. आणि त्यांच्या डोक्यात संगीतक म्हणजे फक्त लोकनाट्याच्या अंगानं जाणारं, म्हणून त्यांनी तसंच लिहिलं होतं. 'तमाशा'त सांगीतिक म्हणून जे घडतं, ते त्यात काही नव्हतं. काही काव्य होतं, काही पात्रांच्या तोंडी गाणी होती; पण संपूर्ण संगीतक म्हणायचं, तर तसं ते तेव्हा नव्हतं. संगीत नाटक इतपत होतं.

ते करायचं असं ठरल्यावर मग जब्बार-पुलंचं काय बोलणं झालं ते मला माहीत नाही. नाटक बसवण्याच्या प्रक्रियेत जब्बारची मुख्य कल्पना अशी होती की, हे संगीतक तीन भागांत करायचं. एक मध्यमवर्गीय, लोकप्रिय नाट्यसंगीताचा बाज, अध्येमध्ये भावगीत असं ठेवायचं. दुसरा भाग, ती एक वेश्यावस्तीतली बाई आहे, तर मग ठुमरी वगैरे बाज असेल. आणि तिसरा मुख्य भाग रॉक म्युझिकसारखा, गँगस्टरच्या अंगानं जाणारा. संगीत अशा तीन पातळ्यांवर आहे. तेव्हा नंदू (भेंडे)च्या गाण्यांचा प्रश्न आला. त्याची एखाद-दोन गाणी होती पूर्ण नाटकात. संगीतक म्हणून ट्रीट करायचं तर त्याला पूर्णत्व येत नव्हतं, कारण नायकालाच फार गाणी नव्हती.

भास्कर चंदावरकरांनी संगीताची प्रील्यूडपासून सुरुवात केली. पुढे वग सुरू करायच्या उद्देशाने मग त्यात गण, गवळण आणले, पण ते चवीपुरते. मग गझलसारखं, मग अन्वर कुरेशीची 'तीन पैशांचा तमाशा' अशी सुरुवात व्हायची.संपूर्ण नाटकभर संगीत म्हणून जे काही रसायन आहे, त्याची झलक यात होती.पुढे जे येणार आहे त्याचा (म्हणजे म्युझिकलचा) संगीताचा फॉर्म त्यात एस्टॅब्लिश व्हायचा.पहिला गद्य शब्द तब्बल १५-२० मिनिटांनी येईल एवढं लांब प्रील्यूड होतं. व्हिज्युअल्स खूप होती.


पारंपरिक थाटात गण , गवळण आणि बतावणी झाल्यावर येणाऱ्या प्रील्यूडची झलक

संगीताबद्दल हे तीन विचार झाल्यावर कलाकारांची निवड आली. तिथे माधुरी (पुरंदरे) आणि मी नक्की झालोच होतो. प्रश्न रॉकस्टारचा होता. त्या पद्धतीचं गाणं जब्बारला हवं होतं. नंदूचं अलेक पदमसींनी बसवलेलं 'जीजस ख्राईस्ट सुपरस्टार' जब्बारनं बघितलं होतं. तो नंदूविषयी बरंच बोलायचा; प्रत्यक्ष भेटेस्तोवर मला नंदू माहीत नव्हता. त्याच्या आवाजाची जात बघावी म्हणून जब्बार म्हणाला, "आता नंदू गाणं गाऊन दाखवेल." तर तो वेस्टर्न गाणी गाऊ लागला! मला काही कळेचना. 'त्यातलं चांगलं गातोय, पण आपलं काय होणारे!'

तीन पैशांचा तमाशा
चंद्रकांत काळे

आता कसं हिंग्लिश, मिंग्लिश म्हणतात, तो तसं बोलत होता. जब्बार म्हणाला, "त्याला मराठी शिकवायचं. आत्माराम भेंड्यांचा मुलगा आहे." आता त्याचे वडील कोण हे काही त्याचं मराठीसाठीचं क्वालिफिकेशन नाही. त्याचं उच्चारण फार पाश्चात्त्य होतं. लिंगभेद, ष-श, चा-ची-चे, सगळे राडे होते अक्षरशः! पण आवाजाचं एक्स्प्रेशन कमाल! फक्त ते मराठीत कसं आणायचं हा मुद्दा होता.

मी 'घाशीराम'पासून बघत होतो, जब्बारच्या डोक्यात म्युझिकली एखादा विचार चालू असेल आणि त्याला साजेसं मटेरियल जर मिळालं (त्याला तो चान्स मटेरियल म्हणत असे), तर मग जब्बारसारखा शूरवीर कोणीही नाही; ते होणारच! त्या हिशेबात नंदू भेंडे घडायला पुष्कळ वेळ लागला, पण मुख्य त्याचं संगीत. तर, प्रील्यूडपर्यंत यायला महिना गेला. पुढे गंमत अशी, की पहिलं प्रील्यूड संपवल्यावर भास्कर चंदावरकर येईनासेच झाले. त्यांचं आणि जब्बारचं काय झालं ते मला आजपर्यंत कळलेलं नाही. प्रील्यूड संपतं आणि 'भिकारीजनहो आता उठा' हे माझं गाणं सुरू होतं, तिथपर्यंत भास्कर आहेत.

नंदूची मुळात गाणी कमी. त्यामुळे जब्बारला जिथेजिथे गाणी हवी होती, तिथे मग नंदूच्या संवादांचीच गाणी झाली.


नंदू भेंडे 'अंकुश नागावकर' या रूपात : नंदू भेंडेंच्या अनेक गाण्यांपैकी एक.


नंदू भेंडेंचं रॉक : संवादाचंच गाणं बनवलं.

माझ्या मते सबंध नाटक बसवण्यात सगळ्यात भन्नाट हे होतं, की एक नाटक संगीतकाचं रूप घेताना त्यात काय पद्धतीनं नि कुठल्या वेळी गाणं येतं; आणि मुळात गाणं नसताना ते निर्माण होऊन पुन्हा नाटक एकसंध राहतं. आम्ही थक्क व्हायचो. (ह्या प्रक्रियेची मुख्य जबाबदारी दिग्दर्शक म्हणून जब्बारची होती आणि संगीतकार म्हणून आनंद आणि नंदू त्याला मदत करत होते.) त्यांतल्या गझल, ठुमरी आणि माझी काही नंतरची गाणी, भैरवी इत्यादीत आनंदचं काम आहे. आणि अंकुशची गाणी नंदूनं केल्येत.

रंगीत तालमीला सुनीताबाई आणि भाई आले होते; सुनीताबाईंना सवय होती, की समोर काय सुरू आहे याची टिपणं काढायची. मूळ लेखनाशी तुलना करायची. माझ्या मते, काही वेळानं भाईंनी सुनीताबाईंना सांगितलं, 'आपलं काही घेत नाहीयेत ते. तू नोट्स घेऊ नकोस याच्या." त्यांची चिडचिडही झाली असणार. ही भलतीच मोडतोड झाली. त्यांना सवय नाही ना!

पण प्रयोग सुरू राहिले पुढे, म्हणजे त्यांनी ते स्वीकारलं असावं.

म्युझिकली ती निर्मिती म्हणून बघितली तर मला ते grandeur वाटतं. तसं काही त्या काळी व्यावसायिक रंगभूमीवरच नव्हतं, तर प्रायोगिक रंगभूमीवर कुठून येणार! ते सगळं व्हिज्युअलाईज करणं कठीण होतं. प्रील्यूडमध्ये माणसं एकमेकांच्या पायात यायची इतक्या हालचाली होत्या. एका वेळी सहा-सात गायक / वादक स्टेजवर आहेत, माईकना रंगीत गोंडे लावलेले, आपल्या हातात कोणता माईक असायला पाहिजे त्यासाठी त्या गोंड्याचा रंग लक्षात ठेवायचा. माईक चुकला की बोंबललं. आधीच्या माणसानं त्यासाठी तो योग्य जागी ठेवणंही गरजेचं. त्यात गोंधळ होत. पहिल्या प्रयोगापर्यंत सवय झाली होती, पण हे तालमीच्या काळात प्रचंड अवघड होतं. चिकार गोंधळ व्हायचे. तेव्हा १९७८-७९च्या काळात लेपल माईक नव्हते; साऊंड सिस्टम आजच्यासारखी प्रगतही नव्हती. स्टेजच्या बाहेरही प्रकाशयोजनेचा इंपॅक्ट असणं, हे काम समरनं (नखाते) केलं होतं. एकुणात फियास्को व्हायला क्षणार्ध पुरेल असं नाटक होतं. मात्र पहिले तीनही प्रयोग बिनचूक झाले. आधी गण, मग तो पटकन आत जाऊन माधुरीची गवळण सुरु, मग ती आत आणि मग गजल, मग एकदम रॉक, त्यात बाहेर बसलेले ५ वादक आणि स्टेजवर ६ - असे ११ वादक! (त्याला काही अर्थच नव्हता) - भरत, टिळकसारख्या स्टेजवर म्हणजे, धक्के चुकवत जाणं!

थोडक्यात, grandeur आणि करमणुकीची प्रचंड ताकद त्या नाटकात होती. मात्र, ब्रेश्तनं मुळात काय लिहिलेलं आहे, त्याचं तत्त्वज्ञान, कम्युनिझम, त्यातून ब्रेश्त निर्माण झाला, त्याचं नाटक, हे सगळं पाहता भाषांतर भाबड्या पद्धतीनं झालं असावं, असं मला आता वाटतं. त्यातला सगळ्यात यशस्वी नट मी होतो. कारण माझ्या तोंडी भाईंचे पंचेस होते. 'आमच्या कंपनीत फक्त तळीराम न पिणारा होता', अशा छापाचे. मला पंचपात्रे करताना वेड्यासारखी मजा आली. नंदूला थोडे फटके बसले कारण उच्चारण. आता कोणाला मराठी शिकवायचं तर हिंमत होत नाही माझी, एवढ्या नंदूच्या शिकवण्या घेतल्या मी. त्यानं खूप मेहनत केली, पण त्याचा बाज जाईना. आम्ही म्हणायचो, "अरे तू आत्माराम भेंड्यांचा मुलगा, मग असा कसा काय!" तो म्हणे, मी पूर्ण कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला, इंग्लिश नाटकांतच काम केलेला. त्याचं स्कूलच वेगळं होतं. पण अखेर ते जमून आलं, झालं आणि फार इकडे तिकडे नाही झालं. मुख्य म्हणजे म्यूझिकल म्हणून त्याचा जो भाग होता तो लोकांना प्रचंड आवडायचा. आणि तो फार अप्रतिम गायचा. काय सांगू! कोलकात्यामध्येही शंभूदांकडून (शंभू मित्र) 'आखिर तक लोग गाते ही है आप के प्ले मे!' अशी दाद आली.

कुठल्याही नाटकाच्या बाबतीत चर्चा तर होत राहणारच. कलाकार म्हणून सादरीकरणाच्या बाबतीत म्हणायचं तर, (ह्या एवढ्या एजन्सीज असताना) इतक्या वेगवेगळ्या गोष्टी घडत असताना नाटक स्टेजवर कसं येतं, याबाबत मला रस होता. प्रयोग म्हणून ते स्टेजवर कसं आणायचं त्याचा विचार जर पूर्ण पक्का असेल तर 'चान्स मटेरियल' या जब्बारच्या शब्दप्रयोगाला खूप अर्थ येतो. मी त्याला अनेकदा विचारलं होतं, "तू आधी चान्स मटेरियल शोधतोस की काय!" कारण तो म्हणायचा आणि ते तसं व्हायचं! त्या सगळ्यामुळे मला 'तीन पैशांचा तमाशा' मराठीतलं महत्त्वाचं आणि यशस्वी संगीतक वाटतं.

डॅशी : 'करून पाहणं' हा 'थिएटर अकॅडमी'च्या प्रक्रियेचा भाग होता. 'तमाशा'मध्ये हे खूपच करता आलं का?

चंद्रकांत काळे : म्युझिकली तर निश्चितच. 'करून बघणं' हा प्रकार संगीतकाच्या बाबतीत आणखी महत्त्वाचा ठरतो. या प्रक्रियेत साधारण एका नाटकाचं संगीत वाया गेलं, एवढं संगीत झालं होतं! एक भावगीत, माझी आणि माधुरीची दोन-दोन गाणी कापली गेली. असं संगीत खूप निर्माण झालं. संवादांमध्ये आणि प्रवेशांमध्ये फेरफार खूप नव्हते. संगीतक म्हणून नाटक रंगमंचावर आणायचं असेल तर जिथेजिथे संधी आहे तिथेतिथे जब्बारनं संगीत करून घेतलं. मी विचारलं जब्बारला, "अरे, दोन दिवसांतून एक प्रयोग करायचा आहे का?" ते एक सात अंकी 'शाकुंतल' होतं ना, एकदा चार अंक करायचे, एकदा तीन असेही प्रयोग झाले 'शाकुंतल'चे.

शेवटी संगीत तयार करण्यावर बंदी घातल्यासारखं ते थांबवावं लागलं, "आनंद, आता नाही आणखी करायचं." खूप कापलं, त्यामुळे जे उरलं त्यात सगळंच चांगलं होतं. शांतपणे तीन-सव्वातीन तास संस्थानिकी नाटकासारखं ते चालायचं.

(त्यातच 'तीन पैशांचा तमाशा'मध्ये कोरसचं संगीत, सूत्रधारांचं संगीत हा निराळा प्रॉब्लेम होता. 'अंकुश आला रे आला!' आणि माधुरीचं लावणी आणि रॉक ('झीनतची अन माझी') - ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी न खटकता नीट आत येणं हे फार अवघड होतं, पण फार उत्तम रीतीनं झालं बाबा ते!)


सूत्रधारांचं संगीत : 'अंकुश आला रे आला'


एकाच प्रसंगामध्ये दोन वेगळ्या संगीत पद्धती वापरूनही कानाला न खटकण्याचं उत्तम उदाहरण : माधुरी पुरंदरेंची लावणी आणि नंदू भेंडेंचं रॉक.

मला सगळ्या निर्मितीबाबतीत वाटतं, ते मुद्दाम घडतं असं वाटत नाही. तेव्हा एक झिंग असते, त्यात ते होत राहतं, होत राहतं. त्याची व्याख्या अशी काही नाही. किंवा, त्याचं तत्त्वज्ञान असं काही नसतं. हा सगळा कोलाज एकत्र करून 'करून पाहणं' ही मोठी गोष्ट होती.

डॅशी : नाटकात जो टवाळपणा आणि धिंगाणा आहे, तो नाटकातच होता का ती टीम अशी होती त्यातून ते आलं?

चंद्रकांत काळे : टवाळ तर आम्ही होतोच. त्याची मदत झालीच. 'महानिर्वाण'च्या वेळेला सतीश (आळेकर)ला तशीच मदत झाली. सगळे पोचलेलेच होते! पण 'तमाशा'त बाहेरचेही बरेच होते. सगळी गँगस्टर्सची फळी बाहेरची होती. वादकही खूप बाहेरचे होते. वादकांना सुरुवातीला खूप धक्के बसले. त्यांना रंगभूमीबद्दल फार माहीत नाही आणि अशा पद्धतीचं थिएटर तर काहीच माहीत नाही. त्यांना जेव्हा मजा यायला लागली, त्यांना जेव्हा हा फॉर्म आकळला, तेव्हा ते मांडणं सोपं झालं.

मीही व्यावसायिक नाही. 'घे पाच लाख आणि कर हे स्क्रिप्ट' असं मला जमत नाही. व्यावसायिकांची ही निराळी गुणवत्ता आहे, ती माझ्याकडे नाही. मला ते १००% पटल्याशिवाय मला ते 'सांगता'च येत नाही. जब्बारबरोबर या प्रक्रियेत काहीतरी भारून टाकणारं असतं. हे वेगळं चाललंय. हे कधी केलं नाहीए. आपल्या आयुष्यात हे कधी आलेलं नाही, असं. आमच्या आयुष्यात ते फार लवकर आलं. आम्ही पंचवीस-सव्वीसचे होतो. घाशीराम केलं तेव्हा तर विशीतच होतो मी. या रंगभूमीचा, संगीतक म्हणून वेगळाच एक अंदाज़ अनुभवणं, तेही एकदम मोठ्ठ्या पातळीवर अनुभवणं, यांतलं थ्रिल मनात होतं. बाकी चांगल्या अर्थानं मोडतोड केली; ते सोपं नव्हतं. सिनेमात जसं कोणत्या चौकटीत, कुठे, कुठून काय दिसणारे याची दिग्दर्शकाला जशी दृष्टी लागते, तसं रंगमंचाच्या बाबतीत ते कसं दिसायला हवं आणि कसं बाहेर यायला हवं, ह्याबद्दल जब्बारच्या डोक्यात स्पष्टता होती; म्हणून ते जमलं.

बसवताना टवाळपणा, धिंगाणा बराच असूनही टेन्शनच्या बऱ्याच गोष्टी होत्या. ३०-३५ लोक स्टेजवर बऱ्याच हालचाली करतात; आणखी वादक. जेव्हा चंदावरकर बाजूला झाले तेव्हा फक्त गद्य संवाद बोलले जायचे. संगीताच्या बाबतीत ह्या सगळ्या चिंताजनक गोष्टी सुरळीत व्हायला वेळ लागला.

त्यामुळे तुझ्या प्रश्नाला थेट उत्तर देता येणार नाही. टवाळपणा आणि रंगमंचावर जे काही घडलं याचा कितपत संबंध आला, तर जी प्रवृत्ती आहे त्यामुळे करताना मजा आलीच. तो धिंगाणा प्रेक्षकांना दिसताना जेवढा अंगावर येतो, तो आमच्या अनुभवापेक्षा बराच जास्त आहे. ३०-३५ लोक एकत्र काही करतात आणि ते किती बाहेर पोचतं, हे 'एनसीपीए'सारख्या ठिकाणी लोकांकडून जेव्हा थक्क होऊन प्रतिक्रिया आली की 'अरे हे काय आहे!' तेव्हा आम्हाला समजत असे. हे आम्ही बाहेर समोरून बसून कधीच अनुभवलं नाही. समर प्रकाशयोजनेसाठी बाहेर असे त्याला ते कदाचित जाणवलं असेल जास्त.

आमचा सर्वात तरुण दर्शकवर्ग होता, तो मुंबई आयायटीला प्रयोग केला तेव्हा. फक्त मुलं होती. तो फारच रंगला प्रयोग. आता वाटतं, की ते संगीत आता आपलं वाटू शकतं. आता आम्ही 'वेस्टर्न'चा विचार करतो.

अबापट : तिथे मूड इंडिगोमुळे लोकांना सवय असेल.

चंद्रकांत काळे : हो तर! पण त्या प्रयोगाच्या आधी आम्ही 'बदकांचं गुपित' (बा. सी. मर्ढेकरांचं संगीतक, १९४७) केलं बाहेर हिरवळीवर. म्हणजे त्या वेळेस विद्यार्थ्यांमध्ये ही संस्कृतीही होतीच.

अबापट : नंदू भेंडेंबद्दल तुम्ही विस्ताराने सांगितलंत. आता मला कुतूहल आहे ते तुमच्यातले नसलेले म्हणजे 'थिएटर अॅकॅडमी'बाहेरचे अन्वर कुरेशी यांच्याबद्दल. अन्वर कुरेशी, त्यांची परंपरा 'अरुण म्युझिक क्लास', शास्त्रीय आणि पार्श्वभूमी उपशास्त्रीय गझल गाण्याची. नाटकात ते पाश्चात्त्य सुरावटीवर, उंच स्वरात falsettoमध्ये गायले आहेत, ही कल्पनाच धक्कादायक होती. ते जबरदस्त गायले. अन्वर कुरेशी हे अश्या पद्धतीचं गाऊ शकतील ही कल्पना कुणाच्या डोक्यात आली?


अन्वर कुरेशींचच्या गाण्याची झलक

चंद्रकांत काळे : हे करून बघणं आहे! चंदाव‌रकरांनी पहिल्यांदा त्याला गाऊन दाखवलं तेव्हा माझ्या मनात आलं, 'मेला हा!' चंदावरकर सगळ्या पद्धतींनी गाऊन दाखवत असत. अन्वरलाही ते फॉल्सेट्टोमधलं - आवाजात खरखर आणून गायलेलं - 'अंकुश नागाऽवकर!' अवघड गेलं असणार, रवी साठेपेक्षाही सॉफ्ट आवाज त्याचा. पण सुंदर निभावलं त्यानं. गझल गाणारा माणूस, पण त्यालाही मजा आली. प्रयोग बंद झाल्याचा त्याला त्रास झाला. आम्हांला सगळ्यांना झाला.

साडेतीन महिन्यांच्या नाटकांतल्या नटांना सबस्टिट्यूट नाही असू शकत. 'तमाशा' ज्या पद्धतीनं बंद झालं त्याची मला फार खंत आहे. सब्स्टिट्युट म्हणून आलेली लोकं चांगली नव्हती असं मी म्हणणार नाही, पण ती तिथे 'दिसली' नाहीत. चार-आठ दिवसांच्या तालमीत 'तमाशा' होत नाही. साडेतीन महिन्यांत आसपासच्या माणसांची तुम्हाला सवय होते. समोर काय घडणार आहे ह्याची सवय होते. आम्ही सूत्रधार बदलला, श्यामला (वनारसे) बाईंऐवजी वेगळ्या बाईंनी काम केलं. ते जमलं नाही. सुदैवानं वंदना पंडितनंतर वंदना परांजपे फिट बसली. तिनं बरेचदा नाटक बघितलं होतं, तालमीला भरपूर वेळ दिला होता. पण तिसरी जी आली ते फिट जमलं नाही.

अबापट : लोकांवर जो परिणाम व्हायचा तो संगीतामुळे व्हायचा का इतर काही गोष्टी होत्या?

चंद्रकांत काळे : मी म्हणेन की संगीताचा परिणाम खूप मोठा होता. 'भिकारीजनहो उठा आता' हे लोकांना जेवढं आवडायचं, तेवढंच तरुण पिढीला नंदूची गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटत असत.

सगळ्या संगीतांचा बाज एकत्र येणं, हे नवीन होतं. ते लोकांना भावलं. साधारण निम्मं संगीत असेल आणि निम्मे संवाद असतील, तर मला संगीताचा प्रभाव जास्त वाटतो.

संगीतक आणि संगीत नाटक असा जो गोंधळ आपल्याकडे आहे तो त्यात नव्हता. लोकांनी त्याकडे संगीतक म्हणूनच बघितलं. संगीत वेगळं आणि संवाद वेगळे असं ते नव्हतं. संगीतामधूनही संवाद पुढे जायचा. संवादांमुळे जेवढा हशा मिळायचा तेवढा 'भिकारीजनहो आता' गाण्यालाही फुटायचा. माधुरीचं 'तेरे नाम पे नौजवानी' सगळा भोगवटा आणि त्रास घेऊन यायचं, त्यामुळे लोक हादरून जायचे. ही जशी नट-नट्यांची गुणवत्ता आहे, तशी ट्रीटमेंटचीही गुणवत्ता आहे. म्हणजे कोणत्या वेळेला काय बाहेर आलं पाहिजे, आणि ते काय पद्धतीनं हा संगीताचा हिशोब आहे. संगीतक बसवणाऱ्या दिग्दर्शकाला संगीताचा कान असलाच पाहिजे. जब्बारला तो होता. नाही तर नाटकातलं मोठं नाव असलं तरी संगीताची जाणीव नसेल तर पंचाईत होते, संगीतक फसतं.


माधुरी पुरंदरेंच्या आवाजात 'तेरे नाम पे नौजवानी'

डॅशी : जसं 'सत्यकथा' आणि 'साठोत्तरी' यांनी ठरवलंच होतं, की आधीच्या काळातलं जे रोमँँटिसिझम आहे त्याच्या विरोधातच आपण उभं राहायचं. असंच मुद्दाम ठरवून, संगीत नाटक हा प्रकार करायचा नाही असं केलं का ते घडलं?

चंद्रकांत काळे : नाही, नाही. मराठी संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा निराळा फॉर्म आहे. तो ज्यांना वापरायचा आहे त्यांनी 'ययाती-देवयानी', 'मत्स्यगंधा' लिहावं. महाराष्ट्रातली दोन उत्तम संगीतकं म्हणजे 'सौभद्र' आणि 'शारदा'. संपूर्ण नाटकात जे काही म्हणायचं आहे ते संगीतामधून बाहेर येऊ शकतं. 'सौभद्र'बाबत असं म्हटलं जायचं की मुळात त्यामध्ये खूप गाणी होती आणि अण्णासाहेबांनी (किर्लोस्कर) मुद्दाम शास्त्रीय संगीत न वापरता त्यांना साध्या चाली दिल्या होत्या. त्यात नाटक पुढे जायचं. नंतर त्यातलं बरंच काव्य कापलंही गेलं आणि गाणी राहिली.

प्रस्तावनेत किर्लोस्करांनी असं काहीसं लिहिलेलं आहे, की कदाचित रसिकांना आंग्ल भाषेतील ऑपेराचा प्रभाव पडल्याचं जाणवेल. त्यांच्यासारख्या लोकांचं वाचन चांगलं होतं. म्हणून ते असा वेगळा विचार करू शकले. पुढे मात्र पुढे जेव्हा ते गायकांचं नाटक झालं तेव्हा मूळ संगीतकाची वाताहत झाली असं दिसतं.

म्हणूनच मर्ढेकरांपासून अनेकांनी संगीत नाटकांवर आसूड ओढलेले आहेत. त्याचा एक निराळा प्रेक्षकवर्ग होता, 'कट्यार'पर्यंत तो दिसतो. पण विषयापासूनच त्याच्या मर्यादा दिसू लागतात. मराठी संगीत नाटकं काढून पाहा, 'शाकुंतल'पासून पाहा. पौराणिक विषय किंवा 'दोन घराण्यांतली खुन्नस' हेच विषय! एखादे रांगणेकर किंवा कानिटकरांचं 'लेकुरे उदंड झाली' हे अपवाद. कृष्ण गातो, किंवा दोन घराणी असं संगीत नाटक लिहिणं सोपं. 'मंदारमाले'पासून कट्यार'! त्या फॉर्मशी माझं थोडंफार भांडण आहे, पण त्यातून संगीत चांगलं तयार झालं. मला नाट्यसंगीत आवडतं. जितेंद्र अभिषेकी हा नंतरच्या काळातला बुद्धिमान आणि प्रयोगशील संगीतकार. नाही तर त्या पूर्वी अनेकवेळा ‘घ्या चीजा आणि हाणा पद’ असा मामला दिसायचा!

संगीतक आपल्या रक्तात नाही; त्यामुळे त्यात प्रयोग झाले नाहीत. पुढे 'सौभद्र' संगीतक पद्धतीनं झालं नाही. त्याचं संगीत नाटक झालं आणि त्याच्याच आणखी आवृत्त्या निघाल्या. संगीतकं हाताच्या बोटांवर मोजता येतील. ती करून पाहण्याची गोष्ट होती. 'घाशीराम' हातात पडलं म्हणून जब्बारच्या डोक्यात तसा विचार सुरू झाला असेल. मात्र कोणी यावं आणि संगीतकाचा विचार करावा अशी रंगभूमीची अवस्थाच नव्हती 'घाशीराम'पर्यंत. तमाशा ह्या फॉर्ममध्ये ते होतं, पण त्यातली पद्धत आणखी निराळी. त्यात मधेमधे लावण्या आणि गाणी यायचीच. वगनाट्यं निराळीच. त्याला संगीतक म्हणता येत नाही.

त्यामुळे असं वाटतं की संगीत नाटक आपल्या रक्तात आहे, पण संगीतक आपल्या रक्तात नाही, ते परदेशीच आहे. त्याचे संस्कार घेऊन मोजकेच प्रयोग झाले. अगदी 'लेकुरे'मध्येही तो नायक संगीतकार आहे, म्हणजे विषयाची निवड पुन्हा संगीताशी निगडित. 'चि. सौ. कां. चंपा गोवेकर' आणि 'तुमचे आमचे गाणे' मतकरींनी प्रयत्नपूर्वक लिहिली. ते दिग्दर्शकानं कसं हाताळलं हा निराळा भाग आहे; ते सोपं नाही.

त्यामुळेच आपल्याकडे संगीतकं फार कमी झाली, याची मला फार खंत वाटत नाही. आपल्या पिंडातच ते नाही तर नाहीच. आता तर कठीणच वाटतं. मुळात एखाद्या स्क्रिप्टचा म्युझिकली विचार झाला पाहिजे. ती दूरदृष्टी पाहिजे. आता संगीत एकांकिका केल्या जातात, पण त्याचं पुढे काही झालं पाहिजे. असो!

अबापट : तेव्हाच्या तरुण पिढीला, म्हणजे माझ्या पिढीला या नाटकातला कथाभाग भाबडा वाटायचा. पुलं आधीच्या पिढीतले. राजकारण्यांचा भ्रष्टाचार म्हणजे सहकार, सहकारी बँका वगैरे किंवा मुंबईतला टॉप डॉन अंकुशचं शस्त्र सुरा असणे वगैरे त्यांनी लिहिलेलं फार भाबडं वाटायचं. आम्ही तेव्हा हे नाटक त्यातल्या संगीताकरता बघायचो. मात्र पुलं तेव्हाही सुपरस्टारच होते; तुम्ही लोक तरुण होतात. संगीतामध्ये तुम्ही लोकांनी अफाट बदल केले होतेत. पुलं किंवा सुनीताबाईंनी या बदलाला विरोध केला होता का?

चंद्रकांत काळे : नाही. आश्चर्यकारकरीत्या विरोध झाला नाही. सुनीताबाई सतत तालमींना येत नसत. पण भाईंचं लेखन फार बदलणं त्यांना मान्य नसायचं. शब्द फार बदलू नका असा पुलंचाही आग्रह होता. जेव्हा जब्बारची संकल्पना काय पद्धतीची आहे हे भाईंना पटलं असेल तेव्हाच त्यांनी सोडून दिलं असावं. त्यांनी मदतही केली. पहिला गण त्यांनी बदलून दिला. 'शुभ मंगल चरणी गण' मी, रवी साठे आणि आनंद - आम्हांला भाईंनी शिकवलंय. त्यांनी प्रक्रियेत थोडाबहुत भाग घेतला. हटवादीपणा अजिबातच नव्हता. सुनीताबाई आणि भाईंच्या मर्ढेकरांचं वाचन - त्याचे पहिले काही प्रयोग आम्ही, 'थिएटर अॅकॅडमी'नं केलेत. ते चिंतातुर झाल्याचं मी बघितलं नाही. त्यामुळेच आमचं-त्यांचं नातं राहिलं.

आणि त्याशिवाय नंदूची ५-६ गाणी होऊच शकली नसती - 'आमचा पटवर्धन सर काय संस्कृत शिकवायचा'! ह्याचं गाणं!

हा आक्षेप नाटकावर तेव्हाही आला, की हे मध्यमवर्गीय भाषांतर वाटतं. पण मुळात ते भाषांतर नाहीच. मूळ Three Penny Opera मी वाचलेला नाही. ब्रेश्तचा अभ्यास मी केलेला नाही. त्यावर चिकार संवाद, परिसंवाद झाले. ज्या पद्धतीनं पुलंचं नाटक समोर आलं, त्यातून जे निर्माण झालं ते महत्त्वाचं आहे. पुढे पुलंनी एका मुलाखतीत म्हटलं, "'तमाशा'त मी हस्तक्षेप केला नाही. मात्र नाटक रंगमंचावर आल्यावर ‘मला ब्रेश्त कळलाच नाही’, असाही आरोप झाला."

डॅशी : तुम्ही, नंदू भेंडे, आनंद मोडक, रवींद्र साठे अशी संगीत म्हणूनही वेगळ्या प्रकृतीच्या माणसांनी मिळून संगीताचा विचार करणं यांत तेव्हा काही अडचणी आल्या का? काय काय घडलं? देवाणघेवाण झाली का? प्रयोग बघताना हे सगळं स्वतंत्र असलं तरीही सगळं मिळून काही सांगतं आहे असं वाटायचं.

चंद्रकांत काळे : तालमीच्या वेळेस हे सगळं तुकड्यातुकड्यांत व्हायचं. उभं राहून मग एकत्र करायला सुरुवात झाली. म्हणून संगीत जास्त झालं. वापरायचं काय, यावर चर्चा झाली. उदा. 'दोघांचं मिळून काही भावगीत पाहिजे', असं जब्बार म्हणाला. मग पुलंचं मुळात काही गाणं होतं. त्याची चाल झाली. मीरा पुंड नावाची गायिका होती. रवी आणि मीरा पंधरा दिवस बिचारे गायले. मग जब्बार म्हणाला, "नाही रे, हे जात नाही रे." मग ते गेलं. असे अनेक प्रकार झाले.

तालमीत गुंतून राहण्यासाठी काहीतरी लागतं. एरवी कंटाळा येऊ शकतो. तालमीला कधीकधी नटांपेक्षा प्रेक्षक जास्त असायचे. त्यामुळे तालमीच्या वेळी 'सत्तर चहा' लागायचे! पंचवीस लोक तालमीला आणि बघायला याचे-मित्र-त्याच्या-मैत्रिणी असा प्रकार! पण ते तुकड्यांत व्हायचं. मी शेवटी जब्बारला म्हटलं, "माझं काहीच होत नाहीये. मी तुला साहाय्यच करतोय फक्त. मला आता गंड यायला लागलाय, मी कसा दिसणारे स्टेजवर." कारण शेवटच्या चार दिवसांपर्यंत माझ्याकडे लक्षच नव्हतं त्याचं! 'भिकारीजन हो'ची तालीम आणि श्यामलाबाईंबरोबर थोडी तालीम. माधुरीचाही एक प्रसंग तीन-चार दिवसच आधी बसवलाय!

तीन पैशांचा तमाशा
खाली : चंद्रकांत काळे
मध्ये बसलेले : सतीश आळेकर, मोहन आगाशे, दीपक ओक, जब्बार पटेल, आनंद मोडक, मीरा पुंड
वर : सुरेश बसाळे, विजय जोशी, वंदना पंडित, श्यामला वनारसे.

जब्बारला मात्र अंदाज होता, "तू काही काळजी करू नकोस. होईल ते!" त्याला कदाचित विश्वास असेल. कुठून बळ आलं कोण जाणे. पण जब्बारला हे मुळात माहीत होतं की नाटक रंगमंचावर नक्की कसं जाणारे. आता अवघड वाटतं, एवढा नेटकेपणा कसा आला. जराही चुकण्याची सोय नव्हती, फियास्कोच झाला असता.

डॅशी : 'घाशीराम', 'महानिर्वाण', 'बेगम बर्वे',आणि 'तमाशा' ही चार नाटकं बघितली, तर 'तमाशा' वगळता बाकीच्यांचं संगीत एकरेषीय आहे. त्याचा बाज ठरलेला आहे. पण इथे वेगवेगळ्या बाजाचं संगीत होतं. इथे नट म्हणून, गवई म्हणून तुम्ही काही करून पाहिलंत का?

चंद्रकांत काळे : वेगवेगळ्या पद्धतीचं संगीत यात दिसलं तरी ते घडताना सीन एकच आहे. अपवाद फक्त अंकुश (नंदू भेंडे) आणि झीनत (माधुरी पुरंदरे). माझा प्रसंग आख्खा माझ्या स्टाईलवर घडतो. तशी खिचडी कुठे नाहीये. फक्त एक अपवाद 'झीनतची अन् माझी…' संगीतकार म्हणून आनंद आणि नंदूनं तिथे फार सुंदर ब्लेंडिंग केलंय.

अबापट : 'माणूस जगतो कशावरी?'वर रवींद्र साठे, अन्वर कुरेशी आणि नंदू भेंडेंची पॉलीफोनी आहे. असं संगीत स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करतानाही तारांबळ उडते, तर कानांवर इयरफोन नसताना हे म्हणणं कसं जमलं?


अन्वर कुरेशी , रवींद्र साठे आणि नंदू भेंडे यांच्या पॉलिफोनीचा तुकडा

चंद्रकांत काळे : बिनचूक म्हणायचे सगळे.'घाशीराम'मध्ये एका ठिकाणी एक कोरस आहे. तिथेही चंदावरकरांनी तशा प्रकारची गंमत केली होती. त्यांचा पाश्चात्त्य संगीताचा अभ्यास होता. सगळं संगीत एकसंध वाटणं ही खरी गंमत होती. सगळे गायक एक्स्प्रेसिव्ह होते. आणि संवादांच्याच अंगानं जात संगीतातून ते बाहेर आणणं हे सगळ्यांना छान साधलं होतं.

नंदूच्या संवादोच्चारावर टीका झाली, पण संगीताच्या बाबतीत एक्स्प्रेशन्स फार सुरेख होती. नंदू ज्या पिचमध्ये रॉक गायचा ते अत्यंत सफाईदार होतं. नंदूचं रॉक ऑथेंटिक आहे. त्यामुळे सुरुवातीला धक्का बसला असेल, कारण असं गाणं आम्ही ऐकलंच नव्हतं कधी, पण कदाचित त्यामुळेच आकर्षक वाटलं असेल.

किंवा 'भिकारीजन' सादर करायचं किंवा माधुरीची गाणी पाहा, तर त्या व्यक्तिरेखेचा अभिनय करता आल्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. हावभाव, एक्स्प्रेशन्स नसतील तर ती गाणी प्रभावी ठरणार नाहीत.


'भिकारीजनहो'चा तुकडा : १


'भिकारीजनहो'चा तुकडा : २

ज्या कॅटेगरीत निवडलंय, त्यातली गाणी पेलून समर्थपणे सादर करणं, हाच उद्देश प्रत्येक गायकासमोर होता. संगीत म्हणून ते खूप परिणामकारक व्हायला पाहिजे. एरवी 'तेरे नाम पे नौजवानी' खूप लोक गातात. प्रत्येक गायकाची बलस्थानं काय आहेत, याचा विचार केला पाहिजे, ही उत्तम संगीतकासाठी एक पद्धतच नव्हे का! अगदी शास्त्रीय संगीतातदेखील, गायकांना त्यांची बलस्थानं सोडून गायला सांगा, पंचाईत होते.

वेगवेगळ्या गायकांची ही बलस्थानं संगीतक म्हणून तीन तासांच्या नाटकात, त्या बंदिस्तपणामध्ये वापरायची, आणि त्यातून काय पोहोचवायचं आहे, ते दिग्दर्शकाला समजलं पाहिजे. जब्बारला हे अगदी बरोबर समजलेलं होतं म्हणून ते झालं. एक वेगळा प्रवाह त्यामुळे सुरु झाला. ‘एक प्रचंड ताकदीचं करमणूकप्रधान संगीतक’ हे बिरूद ‘तीन पैशाचा तमाशा’ निर्विवादपणे मिरवू शकतं हे मात्र नक्की.

---

नाटकाचे एक संगीतकार आनंद मोडक यांनी 'लोकसत्ता'मध्ये 'तीन पैशांचा तमाशा'बद्दल लिहिलेला लेख

नाटकाचे ध्वनिमुद्रित तुकडे कै. नंदू पोळ यांच्या सौजन्याने

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मुलाखत आवडली. यातली गाणी कधीही ऐकली नव्हती पण वरील तुकड्यांत जे आहे ते बेहद आवडलं!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रेकॉर्डींगमधले तुकडे काढताना फारच वाईट वाटलं; जरा आधी जन्माला आले असते तर हा दंगा प्रत्यक्षात बघता आला असता. ऐसीच्या अंकासाठी गधामजदूरी करतानाही मजा येते.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तमाशा मधील सगळी गाणी ऐकणे हा एक मोठा आणि धमाल आनंद असे /आहे . मी स्वतः बालगंधर्व मध्ये प्रेक्षकांमध्ये बसून कैकदा चोरून रेकॉर्डिंग केलं होतं . तो शबनम मध्ये लपवलेला पॅनासॉनिक चा टू इन वन कसेट प्लेयर वगैरे .. बेक्कार रेकॉर्डिंग . पण चालत असे . (म्हणतात ना वेळेला केळे आणि उपासाला ... असो . ) तरीही भयंकर डिमांड होती त्याला त्यावेळी . माझी रेकॉर्डिंग्स चोरीला जात .. आणि मी परत जाऊन .. वगैरे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती सगळी रेकॉर्डिंग ऐकायला मिळली तर .....फारच मजा येईल. केव्हातरी १९९० च्या आसपास "टिळक" हा प्रयोग पाहायला होता मी ! टेरिफिक झाला होता

तुमच्या कडे आहेत का ती सगळी गाणी ? किंवा कुठे मिळतील ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या नावाचं गूढ काये ते सांगा आधी. चांगली इयान गिलीयन, रिची ब्लॅकमोर, जॉन लॉर्ड , इयान पेस वगैरे नावे सोडून डीप पर्पल आणि ऋग्वेदी हे काही उलगडेना.
ते सांगाल काय.
काही गाणी मिळू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मधल्या सांगितिक तुकड्यांशिवाय, मुलाखत अपूर्णच वाटली असती. त्यावेळेस, हे बघायचं राहून गेलं. मुलाखत चांगलीच झालीये. चंद्रकांत काळेही दिलखुलास बोलले आहेत.
राहून राहून असं वाटतं की, माधुरी पुरंदरे आणि चंद्रकांत काळे या दोन थोर कलाकारांचं पाहिजे तसं, चीज नाही झालं! अत्यंत प्रतिभावान आहेत दोघेही!

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१००% ॲग्री

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलाखत लिहिली कशी? त्याचवेळी रेकॅार्ड केली का?
डॅशी कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय झालं काय माहीत , संदीप देशपांडेंचा प्रश्न होता तो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखकचे नाव वाचून आनन्द झाला. आता सावकाश वाचतो/ऐकतो

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्ययकारी मुलाखत. पाहायचं राहून गेलेली गोष्ट. याचं दस्ताऐवजीकरण करायला हवं होतं. निदान संपूर्ण ध्वनीमुद्रण आहे का ?
आनंद मोडक यांच्या लेखाने विषय अधिक पूर्णत्वाला गेला (किंवा तो भाग टाळून इतर पूरक गोष्टींचा उल्लेख झाला व विषयाला पूर्ण न्याय मिळाला). आभार.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा थिएटर अकॅडमीवर हाच राग आहे.त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं नाही. सुदैवाने श्री चिंतातुर जंतू यांनी कुठूनस एक ऑडिओ रेकॉर्डिंग तरी पैदा केलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळेंनी बराच ताप सोसलेला दिसतो एकूण ह्या प्रयोगापायी. ह्यावर एका 'मिलेनीअल'ची प्रतिक्रिया खरंतर अप्रस्तुत वाटू शकते.

म्हणूनच मर्ढेकरांपासून

संगीत, तेही चाळीस वर्षांपूर्वीचं म्हणजे गुरुंची थुंकी हातात झेलणाऱ्या बखलेबुवांची महती सांगणारं आणि 'बाबा वाक्यं प्रमाणम्' मानणाऱ्या शिष्यांचं
होतं (जे शास्त्रीय संगीतात अजूनही आहे), म्हणून सुस्थापित सारस्वतांच्या रोषाला न जुमानता केलेल्या ह्या प्रयोगाची स्तुती झालीच पाहिजे. रॉकबरोबर बंड आलेलं नसलं तर ते कसलं रॉक म्हणा...!
इथल्या 'रॉक' म्हटलेल्या संगीतावर लेड झेप्पलिन/निर्वानाची छाप सरळ कळून येते. 'इमिग्रंट साँग' लगेच वाजायला लागलं कानात.
शीर्षक मात्र मजकूराचं 'सार' म्हणता येणार नाही. मजकूरात 'नवीन, क्रांतिकारी प्रयोग करताना आलेले अडथळे' हे चपखल बसलं असतं. अर्थात, तेव्हाच्या संगीत नाटकांच्या दृष्टीने हा प्रयोग पूर्ण वेगळ्या मिती(dimension)तच होता आणि त्याचं कौतुक करावं तेव्हढं थोडंच आहे. शिवाय त्याचं त्या काळात म्हणावं तितकं कौतुक झालं नसावं हेही जाणवून जातं.

पण, पण, पण...
ह्या सगळ्याच प्रकाराला पाऽर पुणेरी-मुंबईकर मध्यमवर्गीय छाप आहे. मत्प्रिय लेखकमहोदय अबापटांच्या शब्दांतच सांगायचं तर हे 'ज्याम भाबडं' वाटतं. रॉक म्हणून त्यात 'अंकुश नागावकर' आणि 'अंकुश आला रे आला' वगैरे ऐकलं अगदी 'वोक'वर साधं वरण ओतल्यासारखं वाटतं. शिवाय कुरेशींचा आवाज हे 'म्हणावं तितकं' नवीन वाटत नाही. ह्याचसुमारास बर्मनने हे प्रकार गाऊन लोकप्रिय केलेले होतेच. शिग्रेट फुंकणाऱ्या, नेमाने अपडाऊन करून महिन्यातनं एकदा सिद्धीविनायकाला जाणाऱ्या, शरद पवारांचा तिटकारा असणाऱ्या आमच्या तीर्थरुपांनी आणि दिवसभर शिवसेना शाखेत बसणाऱ्या त्यांच्या दाढी-आणि-सोनेरी-चष्मा सवंगड्यांनी मध्येच रॉक बँड काढला तर ते कसं गातील तसं ते वाटतं. शिवाय, ते लावणी आणि रॉक 'प्ले' करण्याआधी त्याखालचं

एकाच प्रसंगामध्ये दोन वेगळ्या संगीत पद्धती वापरूनही कानाला न खटकण्याचं उत्तम उदाहरण : माधुरी पुरंदरेंची लावणी आणि नंदू भेंडेंचं रॉक.

वाचून अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. एका प्रसंगात वापरल्या असतील खऱ्या, पण लावणी अक्षरश: बंद होऊन लगेच रॉक सुरू होतं. ती दोन वेगळी गाणी दिसतात. कदाचित इथे व्हिडीओ कामी आला असता. असो.

आपल्याच चौकटीत राहून नवीन प्रयोग करणारे हे बंडाचे अध्वर्यू असतात. त्यांचं कौतुक हे झालंच पाहिजे. त्या काळात ते कधीच होणार नसलं, तरीही ४० वर्षांनी तरी नक्कीच.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

टू लिटल, टू ले ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याच चौकटीत राहून नवीन प्रयोग करणारे हे बंडाचे अध्वर्यू असतात. त्यांचं कौतुक हे झालंच पाहिजे. त्या काळात ते कधीच होणार नसलं, तरीही ४० वर्षांनी तरी नक्कीच.

४० वर्षांनंतर तरी कौतुक व्हायला हवं असा उल्लेख आल्यामुळे इथे एक ताजाताजा किस्सा सांगणं भाग आहे - सध्या चालू असलेल्या पुलोत्सवात पुण्यातल्या एका प्रख्यात, ज्येष्ठ वगैरे (त्यात एकारान्त) रंगकर्मीनं 'तमाशा'ची खिल्ली उडवणारे किस्से सांगण्यात धन्यता मानली - म्हणजे पुलं कसे 'कानात बोळे घालून जा' असे सल्ले देत फिरत होते वगैरे. आणि जमलेल्या तमाम पुलंप्रेमींनी ते खसखस पिकवत वगैरे ऐकलं. थोडक्यात काय, तर आजही पुलं कसे ग्रेट होते आणि त्यांच्या महान नाटकाचं टीएनं कसं वाट्टोळं केलं असंच साधारणतः म्हटलं जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हेही ठीकच म्हणा . ज्यांचा त्यांचा विनोद. बाकी तुझे आहे तुजपाशीची अपेक्षा घेऊन थेट्रात गेलेल्या ममवीय रसिकांच्या करता तमाशा हा धक्काच होता .
पण पुलं हे असे सांगत असतील का याबद्दल शंका वाटते . पण शाम खोटं बोलेल का ,अशीही शंका येते .
इतर किस्से कुठले सांगितले ?

अवांतर : बाकी हा शाम स्वतःला प्रायोगिकवालाच म्हणवून घ्यायचा का कधीकाळी ? (इंटर प्रायोगिक जेलसी )
त्याचा काही संदर्भ आहे का ? त्याचे राजा ईडीपस ( किंवा जो काही योग्य उच्चार असेल तो) बघण्याचे दुर्भाग्य लाभले होते. ते पाहिल्यावर , तेव्हा तरी याने फक्त संगीत नाटकातील गद्य भूमिका करावी असे मत झाले होते . असो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी तुझे आहे तुजपाशीची अपेक्षा घेऊन थेट्रात गेलेल्या ममवीय रसिकांच्या करता तमाशा हा धक्काच होता .

"ती गल्लाभरू नाटके निराळी." ('खुरच्याऽऽऽऽऽऽ'मधून साभार.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शामराव साप्ताहिक सकाळमध्ये नाट्यविषयक सदर लिहायचे. साधारण मराठीसारखे दिसणारे शब्द वापरून. हा खेळ मला शिकवल्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. आता नवे प्लेयर आले आहेत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हे कोणाबद्द्ल बोलतायत नाही समजलं. कोण शाम?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कोण शाम?

ढेरे पुण्यात असतीलही, पण अद्याप पुणं ढेऱ्यांच्या रक्तात नाही Smile
'चित्रपट नाटकातील पुलं' या विषयावरील परिसंवादाची आलेली एक बातमी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

या बातमीतील " नंदू भेंडे , भास्कर चंदावरकर आणि आनंद मोडक यांच्यावर असलेल्या पाश्चात्य संगीताच्या प्रभावामुळे .... "
सिरियसली ? आनंद मोडक आणि पाश्चात्य संगीताचा प्रभाव ??
भास्कर चंदावरकरांनी याच पाश्चात्य संगीताच्या प्रभावातूनच घाशीरामलाही संगीत दिले असावे . कसें ?

" अशी प्रतिक्रिया 'पुलं'नी वसंतराव देशपांडे यांच्याकडे दिली होती," ..
खरंच . वसंतरावांनी उगाचच या नाटकातील उत्तर भारतीय उपशास्त्रीय संगीत कसे गावे याचे धडे माधुरी पुरंदरेंना भर पुलंच्या घरी बसून दिले असणार .
माणसं गेली कि त्यांच्या नावावर काहीही खपवता येत असावं बहुधा शाम .

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह! आईवाले शाम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तेंडुलकरांनी 'तेंडुलकर आणि हिंसा : तेंव्हा आणि आता' या अतुल पेठेंनी बनवलेल्या डॉक्युमेंट्रीत घाशीराम मधल्या संगीताबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यात ते अमेरिकेत झालेल्या प्रयोगाबद्दल बोलतात ज्यात वादक कमी असल्याने संगीत मर्यादित होते. हा प्रयोग त्यांना ज्यास्त भावला. डॉक्युमेंट्रीचा दुवा (४४:१४ पासून पुढे). वझेंची ही बातमी मटा मधे वाचल्यावर या डॉक्युमेंट्रीची आठवण आली.
पुलंची देखील अशीच भावना असेल का तमाशाबद्दल? अर्थात त्यांच्या संगीतावरील पहिल्याप्रेमामुळे त्यांना संगीताचा अतिरेक झालाय असे वाटणे अशक्य आहे. कदाचित त्यांना घाशीराम सारखे लोकसंगीत अपेक्षित असावे पण गोष्टी वेगळ्या वळणाने जायला लागल्यावर त्यांनी फार हस्तक्षेप केला नसावा.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या पिढीला काय वाटेल अशी धागधुग मला होती . ती पूर्णपणे खोटी ठरली नाही .
एकंदरीत कौतुकाबद्दल आभार .
शीर्षकाबद्दल आपल्याशी सहमत आहे. बदलायला पाहिजे ते.
आता काही खुलासे :
++इथल्या 'रॉक' म्हटलेल्या संगीतावर लेड झेप्पलिन/निर्वानाची छाप सरळ कळून येते. 'इमिग्रंट साँग' लगेच वाजायला लागलं कानात.++
खरं तर बंड सोडलं आणि नंदूचा आवाज सोडला तर त्यात ' क्लासिक रॉक' नाही . रॉक ही संज्ञा अत्यंत लूजली वापरली आहे. ( अकॉर्डीयन पण वाजे रे यात ... Smile )पाश्चात्य नॉनपॉप सुरावटीचा वापर असे खरे तर ( पण भौ , पूर्ण ऐकलं असतंस तर बेस गिटारचा वापर आवडला असता कदाचित ) आणि निर्वाना नाही रे.. निर्वाना जोरात येईपर्यंत हे नाटक बंद झालं होत . निर्वानाचा जन्म होण्याच्या दहा वर्षे आधी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला .

++ह्या सगळ्याच प्रकाराला पाऽर पुणेरी-मुंबईकर मध्यमवर्गीय छाप आहे.++
बरं मग ? अडचण काय आहे ? होतच ते पुणेरी मुंबईकर .. हाच आक्षेप ( म्हणजे जर आक्षेप असलाच तर ..) त्या काळच्या बहुतांश नाट्यकृतींवर करता येईल.
++कुरेशींचा आवाज हे 'म्हणावं तितकं' नवीन वाटत नाही. ++
शक्य आहे. पार्श्वभूमी माहित असल्याने व ते उपशास्त्रीय गायक असल्याने तत्कालीन प्रेक्षकांना त्यांचा तसा आवाज किंवा त्यांचे त्या पद्धतीने गाणे नाविन्यपूर्ण वाटले असावे . आज नाही वाटणार. ( इन फॅक्ट आजच्या पिढीला नंदूच्या गाण्यातही/आवाजाचे काही विशेष वाटणार नाही ) आज असा विचार कर की पंडित हृ मं असे गाऊ लागले तर विस्मय वाटेल का नाही ? ...तेव्हढेच ..
++याचसुमारास बर्मनने हे प्रकार गाऊन लोकप्रिय केलेले होतेच. ++
अर्थात.... पण ते हिंदीत आणि चित्रपटात ..त्याही पूर्वी गोवन म्युझिशियन्सनी जॅझही भारतात उत्तम आणले होते विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काही दशकांमध्ये . ( इनफॅक्ट ताज मध्ये पंडित लुई आर्मस्ट्राँग पण वाजवून गेलेत .मुंबईत) पण म्हणून तुपारे ,मानबा असल्या मालिकांच्या मधेच वर एखादी झक्क जॅझ असलेली संगीतिका शी टीव्हीवर लागली तर ' म्हायतेय हे आम्हाला, झालेय शंभर वर्षांपूवी इथे , काय नवीन नाय त्यात ' म्हणून इग्नोरायची काय ?
++ माधुरी पुरंदरेंची लावणी आणि नंदू भेंडेंचं रॉक. वाचून अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. ++
हे मान्य . पण उगा कुणी दावा वगैरे लावाया नको या भयाने मी छोटी क्लिप टाकली . पुण्यात दर्शन दिलेस तर ऐकवीन तुला संपूर्ण .
बाकी लोभ आहेच . तो वाढावा हि विनंती .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या शिग्रेट फुंकणाऱ्या, नेमाने अपडाऊन करून महिन्यातनं एकदा सिद्धीविनायकाला जाणाऱ्या, शरद पवारांचा तिटकारा असणाऱ्या आमच्या तीर्थरुपांनी आणि दिवसभर शिवसेना शाखेत बसणाऱ्या त्यांच्या दाढी-आणि-सोनेरी-चष्मा सवंगड्यांनी मध्येच रॉक बँड काढला

वरचं वाक्य वाचलं जाण्याऐवजी, डोक्यात नंदू भेंडेंच्या आवाजात रॉक स्टाईलनं वाजलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अबापट : 'माणूस जगतो कशावरी?'वर रवींद्र साठे, अन्वर कुरेशी आणि नंदू भेंडेंची पॉलीफोनी आहे. असं संगीत स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करतानाही तारांबळ उडते, तर कानांवर इयरफोन नसताना हे म्हणणं कसं जमलं?

.....अबापट, तुम्हांला नक्की पॉलिफोनीच म्हणायचं आहे का‌?
माझ्या पॉलिफोनीच्या आकलनानुसार तरी मला तर दिलेल्या पूर्ण तुकड्यात ती कुठेच ऐकायला आली नाही. 'माणूस जगतो कशावरी'वर ०:३८ आणि ०:४६ मिनिटांपासून पुढे प्रत्येकी ४ सेकंद जे साधलं आहे, त्याला पाश्चात्त्य अभिजात संगीतात 'कॅनन' म्हणतात. कॅननमध्ये एक वाद्य एक धून (मेलडी) वाजवत असताना दुसरे वाद्य तीच धून किंचित अवकाशाने पुन्हा वाजवते आणि पुढे कधीतरी कुठेतरी त्या एकमेकांत मिसळतात. इथे वाद्यांऐवजी तीन गायकांचे आवाज आहेत, जे एकच ओळ ('माणूस जगतो कशावरी') कॅनन स्वरूपात गायल्याने तीनदा प्रतिध्वनित झाल्यासारखं वाटतं, इतकंच. कॅनन गाणं/वाजवणं पॉलिफोनीच्या तुलनेत खूपच सोपं कारण पॉलिफोनीत एका धुनेचा दुसरीशी संबंध नसल्याने वादकांचं वा गायकांचं लक्ष्य आपापल्या धुनेवरून अधिक सहजी उडू शकतं.

पॉलिफोनी म्हणजे फक्त अनेक आवाजांचं एकत्र गाणं नव्हे किंवा अनेक आवाजांनी एकच धून गाणं नव्हे. पॉलिफोनीत
१. एकापेक्षा अधिक आवाज हवे, २. प्रत्येक आवाज स्वतंत्र, निराळी धून गातो ३. ह्या सगळ्या धुना एकाच वेळी, जवळपास एकाच वजनात चालू असतात ४. तरीही त्यांचा एकत्र स्वरमेळ हा कानाला गोंधळ न वाटता 'संगीत' वाटला पाहिजे (त्यात हार्मनी हवी).

'माणूस जगतो कशावरी'मध्ये तिघांचे तीन आवाज तीन धुना एकाच वेळी गाताना दिसले तरी त्या वेगवेगळ्या नाहीत, म्हणून ती पॉलिफोनी नाही.

गंमत म्हणून ह्याच धाग्यातल्या शेवटच्या दोन ध्वनिफिती (भिकारीजनहो'चे तुकडे १ व २) एकाच वेळी वाजवून पाहा. पॉलिफोनीच्या पहिल्या तीन अटी साधल्या, तरी चौथी अट - कानाला 'गोड' वाटणे हे होत नाही. म्हणून ती पॉलिफोनी नाही. हे गोड वाटणं अर्थातच व्यक्तीवर अवलंबून.

पॉलीफोनीचाच प्रकार म्हणजे काउन्टरपॉइन्ट. ज्यात एकत्र स्वरमेळ किती गोड वाटतो ह्यापेक्षा स्वतंत्र धुनांच्या परस्परसंबंधांवर, एकमेकींतल्या जुगलबंदीवर, काही ठिकाणी एकरूप/विरूप होण्यावर अधिक भर दिला जातो. पाश्चात्त्य संगीतातल्या बारोक काळात योहान सेबास्टियन बाख हा कॉन्ट्रापॉइन्टल संगीताचा दादा होता. आपल्याकडे इलैयाराजाने त्याच्या चित्रपटसंगीतात अनेकदा हा प्रकार सुरेखरीत्या वापरला आहे.
उदा.
१. 'पून्दळिर् आडं' गाण्यात २:५० ते ३:०९ ह्या तुकड्यात दोन वाद्यांचा काउन्टरपॉइन्ट आहे. ह्याच धुना गायकांच्या आवाजात कल्पून पाहा.
२. 'गंगै आट्रिल्' गाण्यात ०:०० ते ०:२१ आणि त्यापेक्षा सुरेख २:४० ते २:५७.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुकराव ,
आपण धन्य आहात . आपल्याला या(ही) विषयाचे सखोल ज्ञान आहे . ( आपले विविध विषयांचे सखोल ज्ञान कुणालाही चकित करेल )
आपण म्हणता ते कॅनन " माणूस " या शब्दाने सुरु होणाऱ्या पंक्तिंमधे एकापाठोपाठ तीच पंक्ती दोन सूत्रधार आणि एक लीड यांच्याकडून म्हणाली जाते तिथे दिसतो . परंतु या पाठोपाठच कशावरी मधील 'री ' दोन सूत्रधार एका चालीत म्हणतात व लीड वेगळ्या .. हे मी पॉलिफोनी चे उदाहरण म्हणून मुलाखतीत काळे यांना विचारले . ( व बहुधा त्यांना समजले असावे म्हणून त्यांनी उत्तर दिले )
हा मुद्दा मान्य कि इथे अगदी छोट्याशा /सूक्ष्म म्हणाव्या अशा भागात ती असावी . ही चूक माझी .. हे उदाहरण सिलेक्ट करण्याची .

पण मूळ मुद्दा वेगळाच आहे . प्रश्नाचा आशय समजून येण्याकरिता १९७७ साली उपलब्ध असणारे तंत्रज्ञान ( rather lack of it ) आणि या परिस्थितीत असे काही गाऊ शकणे असा होता . ( कदाचित जगाच्या पाठीवर इतर ठिकाणी याच काळात हे सहजतेने होतही असेल, पण इथे नवीन होते )
सर्वसाधारणपणे संगीत नाटकांमध्ये , किंवा गद्य नाटकांमधे रंगमंचावर गाणी /संगीत काही फिक्स्ड ठिकाणी स्थिर उभे राहून ..अशी परिस्थिती सत्तर च्या दशकात तरी होता . या नाटकात रंगमंचावर एकाचवेळी गाणाऱ्या अनेक व्यक्तींचा अत्यंत वेगवान वावर , कॉर्डलेस नसलेले माईक, त्याचे वेगवेगळ्या रंगांच्या गोंड्यांनी केलेले आयडेंटिफिकेशन , आपला भाग गाऊन झाले की विवक्षित ठिकाणी तो माईक ठेवून पळणे वगैरे विविध व्यवधाने सांभाळून साधे सरळ गाणे हेसुधा थोडे अवघड असावे . तर ही अशी व्यवधाने सांभाळून तुम्हाला हे प्रयोग करायला कसे जमले , हा मूळ प्रश्नाचा गाभा होता.
( आज तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ही /अशा अडचणी येत नाहीत .)

सखोल माहिती करीता पुनः धन्यवाद .

आता तुम्ही लिहिलेलया एका विधानाबद्दल एक प्रश्न : आपण म्हणता " कानाला 'गोड' वाटणे " ... म्हणजे काय ? हे व्यक्तिसापेक्ष आहे हे आपणच लिहिता. माझा प्रश्न असा की हे 'गोड ' वाटण्याचे काही सांगीतिक पॅरामीटर्स आहेत का ? असल्यास कृपया त्याविषयी जास्त माहिती सांगाल काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्नाचा आशय समजून येण्याकरिता १९७७ साली उपलब्ध असणारे तंत्रज्ञान ( rather lack of it ) आणि या परिस्थितीत असे काही गाऊ शकणे असा होता .
....होय. कल्पना आहे. मंचावर अभिनय करता करता नि चूक न करता कॅनन गाणेही आव्हानात्मक होतेच. पॉलिफोनी साधल्याचं वाचल्याने मला फारच आनंद होऊन मी फीत ऐकली नि तसं न आढळल्याने विचारलं. नाटकात इतर ठिकाणी पॉलिफोनी खरंच साधली असेल तर फारच कमाल!

'गोड ' वाटण्याचे काही सांगीतिक पॅरामीटर्स आहेत का ?
....मला संगीताचं सखोल ज्ञान वगैरे नाहीय हो! जे आहे ते फार वरवरचं नि जुजबी आहे. एखादी धून कानाला गोड वाटणे नि गोंधळ वाटणे ह्याबाबतीतल्या सांगीतिक चाचण्या मला माहीत नाहीत. बहुधा धनंजय वा घाटावरचे भट काही सांगू शकतील. मी एका तपापूर्वी फुरिए विश्लेषणाच्या (Fourier Analysis) आधारे ह्याबाबत काही म्हणू शकतो का - म्हणजे सांगीतिक तत्त्वानुसार जरी एखादी हार्मनी असेल, तरी सगळ्या मानवजातीच्या कानाला ती गोड वाटेल असं काही असू शकतं का - ह्याचा अभ्यास गंमत म्हणून करायला घेतला होता. त्यावेळी काही मोजक्या गोष्टी हाती लागल्या होत्या (ज्या आता विसरलोय) नि अधिक खोलात जाऊन अभ्यासाची गरज वाटली होती. नंतर कामांच्या गडबडीत ते सगळं राहून गेलं. कदाचित आता ही उत्तरं जालावर शोधलं तर सहज मिळतीलही, पण मी ते केलेलं नाही. त्यामुळे तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आत्ता तरी देऊ शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग >>'गोड ' वाटण्याचे काही सांगीतिक पॅरामीटर्स आहेत का ? कुणाला सापडल्यास सांगाल काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0