दत्तू बांदेकर: एक अलक्षित विनोदकार

संकल्पना

दत्तू बांदेकर: एक अलक्षित विनोदकार

- कविता महाजन

काळाची तत्कालिक गरज म्हणून काही गोष्टी निर्माण होत असतात. काही मुळातच बळकट असतात, त्या सहज टिकतात; काही कशाबशा तग धरून राहतात; तर काही क्षीण, धूसर होऊन दिसेल न दिसेल अशा अवस्थेत अस्तित्वात राहतात. आपल्या काळाची गरज त्यांनी पुरेपूर व उत्तमरीत्या भागवलेली असते. त्यामुळे त्यांचे महत्त्व नाकारून किंवा त्यांना कमी लेखून चालत नाही. दत्तू बांदेकर यांच्या विनोदी लेखनालाही हाच निकष लागू करता येईल. दत्तू बांदेकर यांच्या विनोदाकडे पाहायचे, तर या आधी त्याकडे झालेल्या अलक्षाची काही पारदर्शक व काही अपारदर्शक पटले दूर सारावी लागतात आणि मगच त्या विनोदाची पाळेमुळे हाती लागू शकतात.

मराठी वाङ्‌मयाच्या इतिहासात विनोदाचे दोन प्रवाह आपल्याला आढळतात. त्यातील एक म्हणजे श्री. कृ. कोल्हटकर, चिं. वि. जोशी यांची परंपरा सांगणारा वाङ्‌मयीन विनोद व दुसरा, त्याही पूर्वीचा म्हणजे १८७०च्या सुमारास काशिनाथ विष्णू फडके व नंतर अच्युतराव कोल्हटकर यांची परंपरा सांगणारा वृत्तपत्रीय विनोद. बांदेकर यांचे स्थान यापैकी कोणत्या परंपरेत व कसे निश्चित होते याचा विचार पुढे करता येईल. त्याच अनुषंगाने समकालीन विनोदी लेखकांपेक्षा बांदेकरांचा विनोद काही वैशिष्ट्यपूर्ण, वेगळ्या वाटेने जाणारा आहे का, याचाही शोध घेता येईल. या शोधात बांदेकरांचा विनोद अलक्षित राहिला असे जाणवत असेल, तर त्याची कारणे कोणती हेही ध्यानात घ्यावे लागेल.

सौम्य वा खळखळून हसू येणे; मनाला आनंद, उत्साह, उल्हास वाटणे हे चांगल्या विनोदाचे लक्षण असते. तथापि ही भावना वा हा 'मूड' फार काळ टिकून राहणारा नसतो. विनोद जितका निखळ असेल, तितका तो एकपदरी असतो. त्याने वाचकाच्या जाणिवेला काही विशेष खतपाणी मिळेल अथवा त्याच्या विचाराच्या अनेक फांद्या विविध दिशांनी विस्तारू लागतील, असे घडत नाही. तो जेथे उगवतो तेथेच क्षणभर आनंद देतो व संपूनही जातो. जो विनोद विकारवश असतो, त्याबाबत नेमके याउलट सारे काही घडत असते. बांदेकरांचा विनोद हा या दुसऱ्या प्रकारातील आहे. तो विकारवश आहे आणि म्हणूनच अनेकपदरीही आहे. त्याने हसू येते, आनंद वाटतो ही एक बाजू झाली. पण दुसरी बाजू ही त्याहून अधिक महत्त्वाची वाटते; ती अशी की, या विनोदामुळे माणूस निव्वळ भावनांच्या आहारी न जाता विचार करायला लागतो, अंतर्मुख बनतो.

आपल्या विपुल लेखनातही एखादा लेखक त्याच्या विशिष्ट अशाच 'साहित्यकृती'ने ओळखला जात असतो. त्या साहित्यकृतीत त्याच्या लिखाणाची बहुतेक सर्वच वैशिष्ट्ये ठसठशीतपणे आणि सर्वश्रेष्ठ दर्जा घेऊन उतरलेली असतात. ती कृती ही त्याची अजरामर ओळख ठरते. दत्तू बांदेकर हे नाव ऐकले की 'सख्याहरी' हा शब्द लगोलग मनात उमटतो. 'सख्याहरी' ही बांदेकरांची ओळख आहे.

मानवी स्वभावाचे सूक्ष्म अवलोकन, उत्तम स्मरणशक्ती, संदर्भपूर्णता, काव्याची आवड, खमंग चुरचुरीत विनोद, राजकीय सामाजिक घडामोडींमधील रस, गरिबांविषयीचा कळवळा – ही बांदेकरांच्या एकूण लिखाणातील बहुतेक सर्वच वैशिष्ट्ये 'सख्याहरी'मध्ये आढळतात. 'सख्याहरी' हे सदर बांदेकरांनी 'चित्रा'मध्ये लिहिले. बांदेकरांच्या राजकीय लिखाणाची ही सुरुवात होती. 'माझ्या लिखाणाची बारा वर्षे' या लेखात बांदेकरांनी 'सख्याहरी'विषयी लिहिले आहे की, "सख्याहरीमध्ये काहीतरी जादू होती. खास उपरोध, विनोद, टवाळी, कोट्या, शृंगार, लाडिकपणा, नखरा, भाषाशैली वगैरे अनेक साहित्यगुणांनी आणि दुर्गुणांनी 'सख्याहरी'ला बेफाम रंग चढत होता."

सख्याहरी हा एक 'चाळी'त राहणारा तरुण आहे. त्याला त्याच्या प्रेयसीने लिहिलेली पत्रे, हे या सदराचे स्वरूप आहे. पत्रात ती सख्याहरीला 'माझ्या गुलाबाच्या फुला, सेविकेच्या सेवका, देशभक्तवल्लभा, राया, जिवलगा, स्वातंत्र्ययुद्धाच्या आघाडीवरील वीरा, शिमगाशिरोमणी, ढोंगी प्राणनाथा, सुताळ प्रियकरा, दमदार तरुणा, साहित्यभुरट्या' अशी विविध संबोधने वापरते. यात सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन, त्यातील भानगडी, गंमतीजमती हे तर येतेच; त्याखेरीज राजकीय घडामोडी, साहित्य संमेलने अशा गोष्टींकडेही 'सख्याहरी' आपल्या विशिष्ट अशा कल्पक, नावीन्यप्रिय, खेळकर, क्वचित थिल्लर दृष्टीने पाहत असतो. मर्मभेदी विषारीपणापासून अलिप्त असलेला भोचकपणा सख्याहरीच्या भाषेत आपल्याला आढळतो. व्यक्ती, राजकीय पक्ष, संस्था यांची खुमासदार तर सख्याहरीने आपल्या 'प्रेमपत्रां'मधून उडविलेली आढळते.

अत्रे लिहितात, "आपल्या अलौकिक प्रतिभेतून त्यांनी 'सख्याहरी' नावाचा एक अजब नमुना निर्माण केला. चाळीत राहणारा, मळकट कपडे अंगात घालणारा, नळावर बायकांशी चावटपणा करणारा, चौपाटीवर भेळ खाऊन जगणारा आणि मुंबईच्या साऱ्या गमतींचा वात्रटपणे नि मिश्किलपणे आस्वाद घेणारा दत्तू बांदेकर यांचा 'सख्याहरी' म्हणजे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण विनोदाचा एक अविस्मरणीय नमुना होय."

सख्याहरीकडे शिक्षणाचा अभाव आहे. परिणामी त्याला नोकरी नाही, त्यामुळे तो निरनिराळे 'धंदे' करतो करतो. लुगडी, बांगड्या आणि स्त्रियांना आवश्यक अशा इतर वस्तू विकत तो चाळींमधून फिरतो. बराचसा धंदा उधारीवर चालवून शेवटी तोट्यात येऊन बुडतो. तो कुठल्या पक्षाचा आहे, हे कळत नाही पण फुकट जायला मिळतं म्हणून तो रामगडच्या काँग्रेस अधिवेशनाला जाऊ पाहतो. तो कधी सनातनी असतो, तर कधी सुधारक असतो. शिमगा, रामनवमी असे सण आले की, त्याला एकाएकी हिंदू धर्माचा उमाळा येतो. स्वातंत्र्यसंग्रामकाळात निघणाऱ्या प्रभात फेऱ्यांमध्ये तो उत्साहाने गळ्यात पेटी अडकवून गाणी म्हणत फिरतो. तो बेफिकीर आहे. वृत्तीने रंगेल व काहीसा फाजीलही आहे. तो वात्रट आणि रोमँटिक गुंड आहे. त्याला पत्र लिहिणारी त्याची एक प्रेयसी निश्चित असली, तरी इतरत्रही त्याचे 'प्रयत्न' सुरूच असतात. राजकीय सभांप्रमाणे त्याला साहित्य संमेलनास जाणेही आवडते.

'आपला प्रांत सोडून भलत्याच प्रांतात लुडबुड करणारे लोक मला फार आवडतात. आजकाल साहित्याचा गंध नसलेले डॉक्टर, वकील, रावबहादूर, दाणेवाले, किराणामालाचे व्यापारी असे फालतू लोक साहित्य संमेलनांतून मिरवताना आढळतात.'

'प्रेम हे एखाद्या चित्रपटाप्रमाणे असतं. चार-पाच आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. अगदीच भडभडून आलं तर 'तुकाराम' बोलपटाप्रमाणे शंभर आठवडे चालेल.'

'मवाळाजवळ मोटारी असतात, फंड असतात, बंगले असतात. जहालांची नेहमी उपासमारच. म्हणून मी ठरवलं आहे की लग्न करायचं तर मवाळाशीच.'

'घोडा जलद पळावा म्हणून घोड्यावर लोक पैसे लावतात; पण स्त्रीला पैसे देताना ती पळून जाऊ नये अशीच इच्छा असते. पण काय गंमत पहा! घोडा पळत नाही म्हणून माणूस बुडतो आणि स्त्री पळून जाते म्हणून तो बुडतो! सख्याहरी, या दोन जुगारांचा अंतिम परिणाम एकच.'

अशी विधाने वेगवेगळ्या क्षेत्रांच्या संदर्भात बांदेकर करत असतात.

बांदेकरांची अशी विधाने, विशेषतः स्त्रीविषयक विधाने ही सनातन्यांना भडकवणारी ठरली. ग्राम्य, अश्लील लेखन म्हणून त्यांवर वारेमाप टीका झाली. त्यावेळीही सख्याहरीने आपल्या नेहमीच्याच शैलीत उत्तर दिले, "सटरफटर वर्तमानपत्रं आपापला 'सेल' वाढविण्यासाठी आमच्या भानगडीत लुडबुड करीत आहेत. आमचा खुमासदार शृंगार पाहून काही अक्कलमंदांचा जळफळाट होत आहे. आशकमाशुकाची एकशय्या असह्य होऊन जीर्ण पलंग जसा कुरकुर करतो, तसे हे जीर्णमतवादी लोक आमच्या नावाने कुरकुर करत आहेत."

या 'जीर्णमतावाद्यां'सोबत बांदेकरांचा पिच्छा पुरवला तो प्रा. ना. सी. फडके यांनी. " 'चित्रा' साहित्यिकाचे संपादक श्री. दत्तू बांदेकर हे गलिच्छ मजकूर 'चित्रा' पत्रात लिहितात. पुण्याच्या विद्यार्थिनी आता 'चित्रा'विरुद्ध पिकेटिंग करणार आहेत. तुम्ही बांदेकरांना काढून टाका." अशा आशयाचे पत्र प्राध्यापक फडके यांनी 'चित्रा'चे मालक रणछोडभाई यांना लिहिले होते.

परिणामी फडके हे बांदेकरांच्या विनोदाचे कायम लक्ष्य ठरले. अत्र्यांकडे 'नवयुग'मध्ये गेल्यानंतर तर अत्र्यांनी त्यांना फडक्यांविरुद्ध लिहायला मुभाच दिली.

"तू साहित्यिक नाहीस, प्रोफेसर नाहीस, पुढारी नाहीस आणि उगाच दोन बायका करायला निघालास याचा अर्थ काय?"

"आदर्श कादंबरी कशी असावी हे जगाला दाखविण्यासाठी तू 'पलंगशोभा' नावाची नावीन्यपूर्ण कादंबरी लिहायला घेतली आहेस असं कळतं."

"सख्याहरी, 'झंकार'चा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून तू पुण्यात एक नवीन साप्ताहिक सुरू करणार आहेस असं कळलं. नकटीचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून सुंदर स्त्रीने आपलं नाक कापून घ्यावं त्यातलाच हा प्रकार आहे."

अशा वेगवेगळ्या संदर्भांत त्यांनी सातत्याने फडक्यांवर टीका केली.

सख्याहरीच्या प्रस्तावनेत अत्रे लिहितात, "आरंभीच्या या संक्रमणकाळात एकदम विशुद्ध शृंगारिक किंवा विनोदी वाङ्‌मय निर्माण होणे कठीण आहे. म्हणून आरंभी-आरंभी श्रृंगाराबरोबर अश्लीलता आणि विनोदाबरोबर ग्राम्यताही वाङ्‌मयात वाहत आली, तर त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा झरा लागण्यापूर्वी सुरुवातीला गढूळ पाणी हे यावयाचेच; पण त्यामुळे अजिबात हे पाणीच नको म्हणून तो झरा आततायीपणे बुजवून टाकण्याचा मूर्खपणा करण्याचे काहीच कारण नाही." आणि बांदेकरांच्या संदर्भात तरी अत्र्यांचे हे मत खरे ठरलेले आढळून येते. अर्थात बांदेकरांचा विनोद हा पुढे-पुढे राजकीय वर्तुळातच अधिक वावरू लागला. त्यासाठीचे निकष निराळे होते आणि त्या निकषांवर तो पुरेपूर उतरला.

'सख्याहरी'चे अनुकरण करून त्या काळी अनेकांनी लिहिले. आजही 'चित्रलेखा' साप्ताहिकात सख्याहरी नावानेच बांदेकर यांचे अनुकरण करणारे एक सदर लिहिले जात आहे. अर्थात बांदेकरांची सर यापैकी कुणालाच आली नाही हेही तितकेच खरे आहे.

वाङ्‌मयक्षेत्रातील अपप्रवृत्तींवर बांदेकरांनी काही वेळा टीका केली आहे. नवकवी, नवकविता यांचीही टिंगल त्यांनी केली आहे. मर्ढेकरांच्या कवितेचीही त्यांनी अत्र्यांच्या जोडीनेच टवाळी केली. पण ती फार वरवरची वाटते. क्वचितप्रसंगीच त्यांनी आपल्या समकालीन लेखक-कवींची खिल्ली उडवली आहे.

'क्षीरसागर म्हणजे साहित्यसुंदरीच्या गालावरील खळी किंवा कपाळावरील गोड सुरकुती! क्षीरसागर म्हणजे शारदेच्या हातातील वीणा किंवा शारदेच्या पानपट्टीतील चुना! क्षीरसागर म्हणजे शारदेच्या ओठांवरील रंगाचे सारवण किंवा शारदेच्या अंबाड्यातील गंगावन' अशी अजूनही मोठी यादीच त्यांनी दिली आहे.

चित्रपटांवर सगळेच लोक अभिप्राय देत असतात. त्यामुळे 'परतफेड' म्हणून नट-नटी साहित्यावर अभिप्राय द्यायला लागतात. त्यातील स्टंट क्वीन नादियाचा सावरकरांच्या लेखनावरील अभिप्राय उल्लेखनीय आहे. 'लेखकांचा मर्दाना शो' ही कल्पनाही चमकदार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मुंबई मराठी साहित्य संमेलनात काव्यगायन समारंभाच्या दंगलीत 'महाराष्ट्र साहित्य सुंदरी' बेशुद्ध पडते आणि सर्व साहित्यिक तिला आपापल्या परीने शुद्धीवर आणू पाहतात याची मजेशीर हकीकत 'एक वाङ्‌मयीन आपत्ती - साहित्य सुंदरीची किंकाळी!' या लेखात येते. त्यात तत्कालीन विनोदी लेखक शामराव ओक यांच्यावर 'नाही देवी, मी चोर बाजारातील साहित्यिक आहे. मी गोरा असलो तरी माझे नाव श्याम आहे' अशी कोटी केलेली आहे.

याखेरीज न. चिं. केळकर आणि भारतमातेचा संवाद, सावरकरांचा आणि भारतमातेचा संवाददेखील खुसखुशीत आहेत. त्यात सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या अतिरेकाची छान खिल्ली उडवली आहे.

तथापि काही वेळा बांदेकरांची विधाने भडक व बटबटीत होतात. 'साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यास तू अत्यंत लायक आहेस, यात शंकाच नाही. पण माझ्या राया, नुसती ताडी पिऊन तू अध्यक्ष होशील असं मला वाटत नाही; यापेक्षा अधिक कडक काहीतरी तू प्यायला शिकलं पाहिजे. हलकटपणा केल्याशिवाय मोठेपणा मिळत नसतो,' हे त्यांचे विधान या स्वरूपाचे आहे.

बांदेकरांनी एक लहानसा शब्दकोशदेखील तयार केला आहे. त्यातील शब्दांचे अर्थ मोठे समर्पक आहेत व मार्मिक आहेत:
भूक – जी श्रीमंतांना लागत नाही आणि गरिबांची भागत नाही;
रस्ता - मोटारीखाली मरण्याची जागा;
विद्या - भिकेचे लक्षण;
अंबाडा - गंगावन ठेवण्याची जागा;
अश्लीलता - जे लेखक फक्त लिहितात आणि सभ्य लोक करतात;
खोटा रुपया – जो खर्च होण्याची भीती नाही.

ठरावीक एक विषय निवडून त्यावर लिहीत जाणे ही बांदेकरांच्या लेखनाची वृत्ती नाही. त्यांच्या एकाच लेखात विविध विषय येताना दिसतात. त्यात एक मुख्य मुद्दा वरचढ असतो हे खरे, पण आजूबाजूचे सारे काही पुसट करून एकच गोष्ट विनोदाचे ठसठशीत लक्ष्य बनवायची, असे त्यांनी केले नाही. अवतीभवतीच्या तुलनेत लहान वाटणार्‍या पण खुपणाऱ्या अनेक मुद्द्यांना त्यांनी मधूनमधून डोके वर काढू दिले आहे. त्यामुळे काही वेळा विषयांतर झाल्यासारखे वाटते. लेखक मूळ मुद्द्यावरून घसरून इकडे तिकडे भरकटत चालला आहे की काय, अशी शंका मनात निर्माण होते. पण तसे घडत नाही. पूर्ण अंधाऱ्या चित्रपटगृहात पडद्याकडे टक लावून चित्र न्याहाळणे आणि रस्त्यावरून चालताना इच्छित स्थळ नजरेसमोर दिसत असतानाही आजूबाजूच्या असंख्य गोष्टी नजरेच्या आवाक्यात सहज व अपरिहार्यपणे येणे, यात जो फरक असतो तो बांदेकरांच्या लिखाणात आहे. विषयाची विशिष्ट चौकट ते शब्दांभोवती घालून ठेवू शकत नाहीत. त्यांच्यासमोरील फलक हा अधिकाधिक विस्तृतच होत जात राहतो. त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'रेडीओतून न सांगितलेली गोष्ट - विसाव्या शतकातील समुद्रमंथन!' हा बांदेकरांचा विनोदी लेख होय.

उथळ समुद्रात समुद्रमंथन करून 'रत्ने' काढली जातात व त्यांची 'यथायोग्य विभागणी' केली जाते, हे या लेखाचे मूळ सूत्र आहे. त्यात त्यांनी अनेक मुद्दे एकत्र केले आहेत. उद्योगपती, नेतेमंडळी, विविध पक्षांची माणसे, स्त्रीसहभागाचा अट्टहास बाळगणार्‍या आधुनिक स्त्रिया, चित्रपटक्षेत्रातील माणसे इत्यादी अनेक लोक यात टिंगलीचा विषय बनली आहेत.

'फंड आला, पण त्या फंडाचा हिशोब बरोबर होई ना! तेव्हा तो फंड पुणेकरांनाच देऊन टाकला, नटी बाबुराव पेंढारकर यांच्या ताब्यात गेली. लुंगी शंकरराव देवांना, नीरा काका कालेलकरांना, द्रोण भालाकारांना, चरखा गांधींना, बुरखा टीकाकारांना, आरसा कुरूप स्त्रियांना, मोटार कामगार पुढाऱ्यांना, कोरा चेक सही करण्यासाठी सदोबा पाटलांना असे रत्नांचे वाटप केले जाते व शेवटी समुद्रमंथनातून अफू येते. इतक्यात पार्वती नावाच्या एका नवमतवादी मुलीशी नुकतेच लग्न लावलेल्या शंकर नावाच्या तरुणाने ती अफू घेतली' असा समुद्रमंथनाचा शेवट होतो.

अनेक मुद्दे सामावले असले तरी त्यात विस्कळीतपणा येत नाही किंवा हे सारे ओढून-ताणून एकत्र कोंबले आहे, असेही वाटत नाही. सर्वच विषय तितकेच ताजे टवटवीत असतात, त्यामुळे त्याची परिणामकारकता कायम राहते.

बांदेकरांनी लिहिलेल्या विनोदी लघुकथांपेक्षा बांदेकरांची नाटुकली अधिक वरचढ वाटतात. वेगवेगळ्या क्षेत्रांतील, वेगवेगळ्या जाती-धर्मांची, वेगवेगळ्या विचारसरणींची माणसे एकत्र आणून हे खुमासदार चुरचुरीत संवाद रंगवले जातात. यातली बरीच नाटुकली सदर म्हणून लिहिली गेल्याने आकाराने फार लहान आहेत. पण त्यातील चमकदार कोट्या, राजकीय विडंबने समाजातील दोषांवरील उपहासाचा हल्ला, या स्वरूपात येणारा विनोदाचा आवाका मात्र फार मोठा आहे.

'आजकालचे गुन्हेगार' ही 'चित्रा'मधील लेखमाला ही सर्व वैशिष्ट्ये स्पष्ट करणारी आहे. अंधेरीनगरीतील भंपक न्यायालयापुढे भिकारीण, टॅक्सी ड्रायव्हर, फेरीवाला, वेश्या, बेकार इत्यादी वेगवेगळे 'गुन्हेगार' आणले जातात. न्यायमूर्ती कधी नीरा पीत, तर कधी विडी ओढत, आरोपींचे म्हणणे ऐकून घेत असतात, त्यांना मार्मिक प्रश्न विचारत असतात आणि अखेर 'न्याय' देत असतात.

यातील फेरीवाल्याचे भाष्य बांदेकरांच्या उपरोधाचे मार्मिक उदाहरण आहे. तो म्हणतो, "इन्कमटॅक्सच्या भीतीमुळे मला माझं खरं उत्पन्न सांगता येत नाही. पण एक गोष्ट खरी की गावात बेकारी फार असल्यामुळे चणेकुरमुऱ्यांचा धंदा सध्या तेजीत आहे. मुंबईतील शेकडो लोक या अन्नावरच जगतात. सरकारनं अशीच बेकारी चालू ठेवावी, अशी माझी विनंती आहे."

तर बेकाराच्या कैफियतीत कोर्ट बेकाराला 'देशभक्ती' करण्याचा उपदेश देते, त्यावेळी बेकार उत्तरतो, "मी प्रामाणिक आहे. या गुणांमुळेच मला देशभक्ती करण्याची सोय उरली नाही."

भिकारणीलाही कोर्ट जेव्हा 'सूत कातणे, टकळी फिरविणे इत्यादी धंदे तुला येत नाहीत?' असा प्रश्न विचारते तेव्हा ती म्हणते, "हे धंदेसुद्धा भिकेचेच आहेत."

तर वेश्या, आपण सभ्य लोकांच्या सोयीसाठीच सभ्य वस्तीत येऊन राहिल्याचे सांगून म्हणते, "डॉक्टर, वकील, न्यायाधीश, पुढारी इत्यादी बडी-बडी मंडळी माझी गिऱ्हाईके आहेत. या लोकांना वेश्या कसलीही चालते. फक्त जागा चांगली पाहिजे. कित्येक देशभक्त माझ्या घरी फायलीसुद्धा हरवून जातात. फावल्या वेळात मी चरख्यावर सूत काढते. निवडणुकीच्या वेळी काँग्रेसलाच मत देते."

हे सर्व गुन्हेगार 'स्पष्टवक्ते' आहेत आणि त्यामुळे भंपक न्यायालयाच्या रूपाने दाखवलेल्या सत्यसृष्टीत ते गुन्हेगार ठरतात. यातील वेश्येची कैफियत जेवढी मार्मिक आहे, तेवढीच तथाकथित शिष्टाचारमय परिस्थितीचे आवरण दूर केल्यामुळे विदारकही झाली आहे. या गुन्हेगारांना दिलेल्या शिक्षादेखील एकूणच समाजव्यवस्थेचे विडंबन करणाऱ्या आहेत.

या लेखमालेव्यतिरिक्तही काही नाटुकली बांदेकरांनी लिहिली. त्यातील 'अॅडम आणि इव्ह'चा संवाद, दुष्काळातून मृत्यू पावलेल्या प्रेतात्म्यांचा व यमाचा संवाद असे काही संवाद वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

कापडाचा दुष्काळ पडलेल्या गावातील इव्ह विचारते,
"आपल्या देशातील कापड गेले तरी कुठे? लढाईवर का?"
आदम : नाही. मध्यवर्ती सरकारने प्रांतिक सरकारला भरपूर पुरवठा केला होता. तसं म्हटलं तर फार थोडे कापड इजिप्तला, दक्षिण आफ्रिकेला, ऑस्ट्रेलियाला निर्यात झाले आहे. हिंदुस्थानच्या गिरण्यांत चार अब्ज ऐंशी कोटी कापड निघते.
इव्ह : तुम्ही असेंब्लीत व्याख्यान देता की, बायकोपुढे बोलता?
आदम : बरे, काल मी पिंपळाच्या पानाची साडी करून दिली होती, ती काय झाली?
इव्ह : ती बकरीने खाऊन टाकली.
आदम : अन् केळीच्या पानांची चड्डी?
इव्ह : ती शेजारच्या बैलाने खाऊन टाकली. म्हणजे सरकार कापड देत नाही अन् जनावरे झाडपाला नेसू देत नाहीत. काय करावे?
या संवादावर वेगळे भाष्य करण्याची गरजच पडू नये, इतका त्यातील उपरोध विदारक आहे.

'आम्हाला मरायला काय झाले?' या नाटुकल्यात बिहारमधील दुष्काळात मेलेली माणसे स्वर्गात जातात; त्यावेळी भाववाढ, म्हातारपण, क्षयरोग, कॉलरा, विंचूदंश, श्वानदंश अशा कारणांनी आपण मेल्याचं सांगतात. 'मरताना तुम्हाला भूक लागली होती का?' या प्रश्नाचे उत्तर एकजण देतो, "ते काय विचारता? सपाटून लागली होती! रेशनकार्डसुद्धा खाऊन टाकलं!"

अशी प्रश्नोत्तरे, शिवाय काही विधानेदेखील अशीच उपरोधपूर्ण आहेत; जी देशाच्या सद्यस्थितीच्या विचार केला तर आजही तितकीच समर्पक ठरतील, असे वाटते. 'राष्ट्रापुढे मोठमोठे प्रश्न आहेत. दारूबंदीचा प्रश्न आहे. झाडे लावण्याचा प्रश्न आहे. अन्नाचे आणि वस्त्राचे काय घेऊन बसलात?' हे विधान किंवा 'आपल्या देशातील लोक इतके उतावळे आहेत की अधिकाऱ्यांनी काही व्यवस्था करण्यापूर्वीच मरून जातात.' हे विधान तत्कालिक घटनेवर आधारित असले, तरी आजच्या काळासही ते तितक्याच समर्पक रीतीने लागू पडते असे म्हणता येईल.

आपल्या लिखाणाच्या सुरुवातीच्या काळात १९४३ साली बांदेकरांनी 'विचित्र चोर' हे नाटक लिहिले, पण त्याला यश मिळाले नाही. पुढे बांदेकरांनी अनेक वेळा काही वाङ्‌मयीन कलाकृती, विशेषकरून नाटक लिहिण्याचे स्वत:शी ठरवूनही त्यांच्या हातून तसे काही लिहून झाले नाही. त्यांनी स्वत: तसा उल्लेख एका लेखात केला आहे. मात्र त्यांचा सूर निराशेचा नाही. हातून ज्याला 'शुद्ध वाङ्‌मयीन' म्हटले जाते, असे ठोस काही लिहून होत नाही; याची नोंद घेतली असली तरी त्याविषयीची खंत त्यांनी व्यक्त केलेली नाही. कदाचित, आपला कल वेगळा असल्याचे त्याच वेळी त्यांच्याही ध्यानात आले असावे. तथापि ही नाटुकली वाचल्यानंतर असे वाटते, की बांदेकरांनी याच विनोदी शैलीत अजून काही नाटके लिहिली असती, तर पुढील काळात ती निश्चितच अत्र्यांच्या नाटकांच्या तोडीची झाली असती व त्या माध्यमातून बांदेकर आजही लोकांपुढे येत राहिले असते.

दत्तू बांदेकरांची परंपरा ही वाङ्‌मयीन विनोदाची परंपरा नाही, हे स्पष्ट करताना आचार्य अत्रे लिहितात, "मराठी साहित्यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी जी वाङ्‌मयीन विनोदाची परंपरा पन्नास वर्षांपूर्वी निर्माण केली आणि जी गडकरी, चिं. वि. जोशी, कॅप्टन लिमये, पु. ल. देशपांडे यांनी मोठ्या यशस्वितेने पुढे चालविली; तिच्याहून आमूलाग्र वेगळ्या आणि आगळ्या विनोदाची मुहूर्तमेढ दत्तू बांदेकर यांनी मराठी वाङ्‌मयात रोवून आपल्या खेळकर आणि खोडकर विनोदाने वर्षानुवर्षे आणि आठवडेच्या आठवडे महाराष्ट्राला हसवून गडाबडा लोळायला लावले." अत्रे ह्यांचे हे मत ध्यानात न घेता अभ्यासक, समीक्षकांनी एकांगी अशा झापडबंद वृत्तीतून बांदेकरांकडे पहिले. ते ज्या परंपरेतील नव्हते त्याच परंपरेच्या चौकटीत त्यांना कोंबण्याचा प्रयत्न केला, आणि त्यात ते चपखलपणे न बसल्याने त्यांना दुसऱ्या रांगेतील लेखकाचा दुय्यम दर्जा देऊन टाकला, असे जाणवते.

मराठी वाङ्‌मयाच्या इतिहासाचे विविध लेखांद्वारे झालेले लिखाण पहिले तर विनोदी कथा आणि विनोदी ललितगद्य लेखनाच्या दालनात बांदेकरांविषयी दोन-चार ओळी प्रत्येकी सापडतात. उदाहरणार्थ :
"बांदेकरांमध्ये एका विशिष्ट तऱ्हेच्या उपरोधाची मर्यादित प्रमाणात धार आहे, परंतु काही ठिकाणी ती सद्भिरुचीची पातळी ओलांडत असताना दिसते." – प्रा. भीमराव कुलकर्णी.
"दत्तू बांदेकरांच्या विनोदातून अनेकदा बुद्धिचापल्य व कल्पनेची तरलता प्रत्ययाला येते; पण यांपैकी कोणतेच लेखन मनावर काही ठसा उमटवू शकत नाही. उथळ जीवनदर्शने व बाष्कळ विनोद यांच्याच आहारी बरेचजण गेल्यासारखे वाटतात. त्यामुळे चिं. वि. जोशी, अत्रे यांसारखे आघाडीचे विनोदी लेखक सोडले तर बाकीच्यांच्या विनोदी लेखनात सामान्यताच जाणवते." – म. ना. अदवंत.

ही सर्व मते पाहता बांदेकरांची परंपरा ही श्री. कृ. कोल्हटकर, चिं. वि. जोशी ह्यांचीच परंपरा आहे; हे गृहीत धरून त्या परंपरेतील शामराव ओक, वि. मा. दि. पटवर्धन इत्यादी लेखकांशी बांदेकरांची तुलना केलेली दिसते. त्याच तुलनेत बांदेकर यांच्या विनोदाचा दर्जा निश्चित केला जातो अथवा गुण-दोष सांगितले जातात.

ज्या चौकटीचे निकष त्यांना लागू होणार नाहीत, तेथे त्यांना ठेवून त्या चौकटीतील इतरांशी त्यांची तुलना करणे, ही गोष्टच मुळात आक्षेपार्ह वाटते.

बांदेकरांचा विनोद जर श्री. कृ. कोल्हटकर, चिं. वि. जोशी यांची परंपरा सांगत नसेल, तर तो कोणती परंपरा सांगतो? या प्रश्नाचा शोध वृत्तपत्रीय लिखाणाच्या वाटेवर घ्यावा लागतो. ही वाट थेट निबंधवाङ्‌मयाला जाऊन भिडते. बांदेकरांचे लेखन हे वाङ्‌मयीन परंपरेतील विनोदी लेखकांप्रमाणे केवळ विनोदी लेखन नसून, ते त्याच जोडीने वृत्तपत्रीय लेखनही आहे. वृत्तपत्रीय लेखन असणे आणि विनोदी लेखन असणे, हे दोन्ही मुद्दे बांदेकरांच्या लिखाणात समान पातळीवर आहेत.

बांदेकरांच्या लिखाणाची सुरुवातच मुळात त्यांच्या व्यवसायाची गरज म्हणून झाली. "या जगात असे कितीतरी लेखक आहेत की त्यांना प्रतिभेने निर्माण केले नसून छापखान्याने निर्माण केले आहे; मीही त्यापैकीच आहे," असे बांदेकर स्वतःच्या लेखक असण्याची खिल्ली उडवताना लिहितात.

त्यामुळेच काशिनाथ विष्णू फडके आणि अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या लिखाणात आपल्याला दत्तू बांदेकर यांच्या विनोदाची मुळे शोधावी लागतील. १८७० ते १९०९ या काळात काशिनाथ विष्णू फडके यांनी 'हिंदू पंच' हे विनोदी साप्ताहिक चालवले. 'पंच आजोबा' या टोपणनावाने त्यांनी हे सर्व लिखाण केले. त्या काळातील बालविवाह, बालवैधव्य, केशवपन, स्त्री-शिक्षण, इंग्रजी राजवटीचे व इंग्रजी शिक्षणाचे फायदे-तोटे अशा गंभीर विषयांवर त्यांनी उपहास, उपरोध, कारुण्य, विसंगती, अतिशयोक्ती इत्यादींनी युक्त असे लिखाण केले.

शि. म. परांजपे यांनी वृत्तपत्रीय लिखाणातला रुक्षपणा घालवून त्याला लालित्यपूर्ण केले. त्यांच्या लिखाणात जो विनोदाचा भाग होता, तो फार कमी होता आणि हा विनोदही उपहासगर्भ व वक्रोक्तिपूर्ण होता. शि. म. परांजपे यांच्या पावलांवर पाऊल टाकून पुढे स्वतःची स्वतंत्र नवी वाट निर्माण केली, ती अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी. वि. ह. कुलकर्णी यांच्या मते, 'अच्युतराव कोल्हटकर यांनी वृत्तपत्रीय वाङ्‌मय अधिक चटकदार, चुरचुरीत आणि चविष्ट केले, आणि बहुजन समाजाला वर्तमानपत्रे वाचण्याची चटक लावली. राजकारण हा काही केवळ गंभीर चर्चेचा विषय नाही; त्यालाही एक विनोद अशी बाजू असते, हे प्रथम अच्युतराव यांच्या 'संदेश'ने लोकांना सांगितले.'

अच्युतराव कोल्हटकर यांची 'माधवाश्रमात शिवाजी' आणि 'वत्सलावहिनींची पत्रे' आजही तितकीच ताजी टवटवीत वाटतात. अच्युतरावांचा लहानपणापासूनच संस्कृत व इंग्रजी वाङ्‌मयाचा व्यासंग होता. देश-देशभक्ती-देशाभिमान हे त्यांच्या लिखाणाचे प्रमुख सूत्र होते. 'चहा-चिवडा-चिरूट' हे त्यांचे सदर त्या काळात रंजकता, खेळकर वृत्ती दर्शवित स्वातंत्र्याचे धडे देत असे. शृंगारिक रस व्यक्त होईल अशी आकर्षक शीर्षके पुस्तकांचा द्यायचे आणि मजकूर मात्र देशभक्तीने, थोर नेत्यांच्या स्तुतीने भरलेला असायचा. अच्युत बळवंत कोल्हटकरांचाच वारसा दत्तू बांदेकर यांनी आपल्या शैलीने पुढे चालवला. दोघांच्याही लिखाणात अनेक समान वैशिष्ट्ये आढळून येतात. तथापि अच्युतराव कोल्हटकर यांच्या काळात निबंधवाङ्‌मयाला कादंबरी व नाटकाइतकेच महत्त्वपूर्ण स्थान होते. चिपळूणकर, आगरकर, न. चिं. केळकर, शि. म. परांजपे यांची महनीय परंपरा होती. १९२०पर्यंतच्या काळातील वृत्तपत्रीय अग्रलेख हे उत्कृष्ट निबंधवाङ्‌मयाचे नमुने होते. या काळातील संपादकदेखील केवळ पत्रकारितेची प्रभावी गुणवत्ता असलेले होते असे नव्हे; तर त्यासह त्यांच्याकडे श्रेष्ठ वाङ्‌मयीन मूल्यांची जाण होती आणि तिसरी गोष्ट म्हणजे नेतृत्वगुणही होते. १९२०नंतर ही परंपरा खंडित झाली. अग्रलेख आणि वाङ्‌मयीन मूल्य असलेला निबंध यांतील तफावत वेगवेगळ्या कारणांनी वाढत गेली.

याच सुमारास १९२५नंतर 'लघुनिबंध' या वाङ्‌मयप्रकाराचा उगम झाला. निबंधाचा व्याप त्यामुळे वाढला. त्यात प्रवासवर्णन, निसर्गवर्णन यांसोबत व्यक्ती व समाजजीवनाचाही समावेश झाला. वाङ्‌मयीन प्रश्नांची, वादांची चर्चाही निबंधाद्वारे होऊ लागली. तत्त्वज्ञानही आकर्षक शैलीचा मुलामा देऊन निबंधातून मांडले जाऊ लागले. निबंधाच्या कक्षेत येत नाही अशी कोणतीही गोष्ट उरली नाही. १९२५ ते १९४५ हा काळ लघुनिबंधांमुळे निबंधवाङ्‌मयाच्या उत्कर्षाचा काळ ठरला. माटे, कालेलकर, माडखोलकर, साने गुरुजी, इरावती कर्वे, वा. ल. कुलकर्णी, महादेवशास्त्री जोशी, रा. भि. जोशी, कुसुमावती, फडके, काणेकर अशा दिग्गजांनी वेगवेगळ्या वाटांनी निबंधवाङ्‌मयाचे क्षेत्र काबीज केले. या सर्वच लेखकांचा कल वा गुणवत्ता वाङ्‌मयीन स्वरूपाची होती.

परिणामी निबंधाचा विचार हा केवळ वाङ्‌मयीन दृष्टिकोणातूनच होऊ लागला. वृत्तपत्रीय लेखन हे प्रचारकी थाटाचे, अल्पजीवी व वाङ्‌मयीन मूल्यांचा अभाव असलेले असेच असते, हे गृहीत धरले गेले; आणि अभ्यासकांनी, समीक्षकांनी त्याचा विचार करण्याचे टाळले. त्यांनी लघुनिबंधाची नवी वाट हीच एकमेव ठरविली आणि इतर वाटा दुर्लक्षाने बुजवून टाकल्या.

"परांजपे यांच्यातील ओज सावरकर यांच्या निबंधात आणि कल्पनाचमत्कृती व स्वैरता अच्युतराव कोल्हटकरांच्या लिखाणात वृद्धिंगत झाली. सूक्ष्म, संशोधक दृष्टीने पाहिले तर आजच्या ललित निबंधाचे मूळही त्यांच्या लेखनात आढळून येईल," असे वि. स. खांडेकर लिहितात. परंतु हा विचार ध्यानात न घेता १९२५ आधीचे व १९२५नंतर निबंधवाङ्‌मय प्रकार ठरविला गेला. दत्तू बांदेकरांची दखल चुकीच्या चौकटीत घेतली जाण्याचे व परिणामी ते अलक्षित राहण्याचे दुर्दैव येथेच निश्चित झाले.

सामाजिक सुधारणेबाबत अनुदार दृष्टिकोण हा बांदेकरांच्या लिखाणातील एक ठळकपणे जाणवणारा दोष आहे. याबाबतीत त्यांनी शि. म. परांजप्यांची परंपरा पुढे नेली, असे म्हणण्यास हरकत नाही.

हा दृष्टिकोण बांदेकरांच्या विनोदातील स्त्रीविषयक मते पाहिल्यास अधिक अनुदार असल्याचे ध्यानात येते. स्वातंत्र्यचळवळीतील आणि परिणामी पुढील स्वतंत्र भारताच्या राजकीय, सामाजिक घडामोडींमधील स्त्रियांचा सहभाग, स्त्रीशिक्षण, 'आर्थिक स्वातंत्र्या'कडे सुरू झालेली स्त्रियांची वाटचाल आणि एकूणच समाजरचनेतील स्त्रियांचे बदलते स्थान याविषयी बांदेकरांनी नकारात्मक, निषेधात्मक मते व्यक्त केलेली आढळतात. त्याचप्रमाणे कुटुंबनियोजन, लैंगिक शिक्षण या गोष्टींचा पाया घालून देणारे कर्व्यांचे 'समाजस्वास्थ्य' मासिकही त्यांच्या टीकेचा कायमचा विषय ठरले आहे.

'गृहव्यवस्थेची ज्यामुळे आबाळ होईल अशा फंदात स्त्रियांनी पडू नये! गृहजीवनाची शांती आणि आनंद गृहदेवतांनीच सांभाळायला नको का?' या विधानातच बांदेकरांचा स्त्रीविषयक दृष्टिकोण स्पष्ट होतो. गुन्हेगार म्हणून न्यायालयासमोर आलेल्या पतितेला न्यायाधीश म्हणतात, "तू एवढी बिघडली कशी? तुझं शील डळमळीत होण्याचं कारण कोणतं? तू चटोर कादंबऱ्या वाचतेस काय? चवचाल सिनेमा पाहतेस काय? प्रसाद दीक्षा? समाजस्वास्थ्य?" यात बांदेकरांनी 'समाजस्वास्थ्य'ला 'चटोर' कादंबऱ्या व 'चवचाल' सिनेमाच्या पंगतीत तर नेऊन बसवले आहेच, पण स्त्रीचे 'बिघडणे', शीलभ्रष्ट होणे, ती पतिता ठरणे यासाठीसुद्धा 'समाजस्वास्थ्या'स कारणीभूत धरले आहे.

'भलत्याच्या गळी पडायला मी सुशिक्षित स्त्री नाही' हे त्याच पतितेचे विधान तसेच. 'माझ्या धर्मपत्नीला साक्षर करण्याचे कार्य मी हाती घेतले पण परिणाम मात्र भलताच झाला. तिला वाचनाची चटक लागली आहे. आता स्वयंपाकपाणी मलाच पहावे लागत आहे' ही विधाने स्त्री शिक्षणाची टिंगल करणारी आहेत. 'तू चोरून धंदा का करीत नाहीस?' या प्रश्नावरील, 'मी कुलीन स्त्री नाही, सरकार' हे वेश्येचे विधान चळवळीतील स्त्रिया, राजकारणातील स्त्रिया यांच्याकडे त्यांचे कार्य दुर्लक्षित करून केवळ स्त्री म्हणून पाहिल्याने, त्यांच्याविषयी किती विपर्यस्त व अन्याय्य विधाने बांदेकरांच्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोणातून केली जातात, हे जाणवते.

देशभक्त टॅक्सी ड्रायव्हर सांगतो, "माझ्या टॅक्सीमुळे कायदेभंगाची चळवळ जोरात चालली. त्यावेळी माझ्या टॅक्सीत सापडलेल्या केशरी साड्या अजून मी स्वातंत्र्ययुद्धाची खूण म्हणून जपून ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे 'चटकचांदणी चळवळी नार, गोल गोल नेसा साडेतीन वार' हा 'केशरी साडी' हे 'उत्तर' असलेला 'उखाणा' अशी अनेक उदाहरणे बांदेकर यांच्या लिखाणात जागोजागी आढळतात. तत्कालीन काँग्रेसच्या कार्यकर्त्या, ज्यांना 'सेविका' असे संबोधले जात असे, त्या बांदेकरांच्या टिंगलीचा कायमस्वरूपी विषय असलेल्या दिसतात.

बेकार तरुणाला उपदेश करणारे न्यायमूर्ती म्हणतात, "आजकाल लग्न हासुद्धा बेकारीवर एक उपाय आहे. सेविका, मास्तरीण, डॉक्टरीण, नर्स अशा धंदेवाईक स्त्रियांशी लग्न लावल्याशिवाय पुरुषांची बेकारी नष्ट होईल असं मला वाटत नाही. साहेबाकडे अर्ज पाठविण्यापेक्षा एखाद्या बाईकडे प्रेमपत्र पाठविले, तर जास्त काम होईल तुझं. मी तुझ्याप्रमाणेच बेकार होतो. पण बायकोच्या वशिल्यामुळे आज मी न्यायमूर्ती झालो आहे." स्त्रिया नोकरी करू लागल्याने पुरुषांमधील बेकारी वाढते आहे, हे जे विपर्यस्त विधान समाजात आजही प्रचलित आहे; त्याच्या प्रचारकांपैकी एकाची भूमिका बांदेकरांनी बजावलेली दिसते. चळवळीतील स्त्रियांपाठोपाठ चित्रपटनट्यादेखील सातत्याने बांदेकरांच्या टीकेचा विषय बनलेल्या आहेत. या स्त्रिया बिघडलेल्या आणि बिघडवणार्‍या असतात, हे त्यांचे मत लिखाणातून वारंवार व्यक्त होते.

बहुसंख्य विनोदकारांनी स्त्री हे एक विनोदाचे उत्तम साधन गृहीत धरलेले दिसते; बांदेकर त्याला अपवाद नाहीत. एवढेच नव्हे तर अनेकदा त्यांचा स्त्रीविषयक विनोद हा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून उच्छृंखल बनलेला दिसतो. स्त्रियांचे मोठ्या आवाजात बोलणे, आपसात भांडणे, नटणे-मुरडणे, अति खाणे, त्यांची व्यभिचारी वृत्ती, लठ्ठपणा, कुरूप दिसणे, आधुनिक राहणे असे दोष केंद्रस्थानी ठेवून बांदेकरांनी टिंगलीचाच सूर सतत लावलेला दिसतो.

'मोटार ही स्त्रीसारखी आहे, क्षणाक्षणाला तिचा तोल सुटतो आणि कितीही आवरली तरी ती काबूत राहत नाही.'
'स्त्री ही इस्त्रीसारखी आहे. एकदा बिघडली का कायमची बिघडली.'
'स्त्रिया या घड्याळासारख्या असतात. त्या फार मागे पडतात किंवा फार पुढे जातात, शिवाय घड्याळाप्रमाणे त्यांची 'कटकट' असते.'
'सृष्टीचा छळ करण्यासाठी 'स्त्री'ची निर्मिती झाली.'
'कुरूप स्त्रीचा नवरा होण्यापेक्षा सुंदर स्त्रीचा नोकर असणे काही वाईट नाही.'
'स्त्रियांना सत्पुरुष फार आवडतात, म्हणजे इतर सत्पुरुष. आपला नवरा सत्पुरुष असलेला स्त्रियांना खपत नाही.'

ही सरसकट स्त्रियांविषयी केलेली विधाने पाहिली, तर बांदेकरांची स्त्रीविषयक मते अनुदार असल्याच्या आक्षेपाला पुष्टीच मिळते. कल्पनेचा चमकदारपणा बांदेकरांच्या स्त्रीविषयक विनोदात मोठ्या प्रमाणात आढळतो. दोन तोंडे असलेली मुलगी जन्माला आली, अशी एक बातमी आल्यानंतर ते लिहितात, "स्त्रीला एक तोंड असणे म्हणजेच केवढा अनर्थ! मग दोन आणि तीन तोंडाच्या स्त्रिया जन्मास येऊ लागल्या म्हणजे काय विचारता? अगदी पुराणकाळापासूनसुद्धा स्त्रीला एकापेक्षा अधिक तोंडे न देण्याची खबरदारी परमेश्वराने घेतली आहे."

असे असले तरी स्त्रियांचा होणारा छळ, मारहाण, हुंडाबळी अशा गोष्टींवर बांदेकरांनी टीकाच केली आहे. त्यांनी काही लघुलघुत्तम कथा लिहिल्या आहेत. त्यांचे स्वरूप काहीसे किस्सेवजा आहे. 'नवऱ्याने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याने एक स्त्री मृत्यू पावली', या घटनेनंतर त्यांनी लिहिलेली अशीच एक कथा मोठी मार्मिक आहे.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात दत्तू बांदेकर यांच्या विनोदाने मोठी भूमिका निभावली होती. त्यांचा विनोद आंदोलनात वातावरणनिर्मितीला पोषक ठरला. स्वातंत्र्यानंतर राज्यांची पुनर्रचना करण्याचे ठरवले गेले. त्यावेळी देशात सोळा राज्ये होती; त्यापैकी चौदा राज्ये एकभाषिक बनविण्यात आली आणि महाराष्ट्र व गुजरात यांचे द्वैभाषिक राज्य बनविण्याचे ठरले. द्वैभाषिकास विरोध होऊ लागला तेव्हा मुंबई, गुजरात, महाराष्ट्र असा त्रिराज्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यानंतर केंद्रशासित मुंबई राज्य अशी कल्पना मांडली गेली. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे', अशी भूमिका संयुक्त महाराष्ट्र समितीने घेतली. काँग्रेसविरुद्ध लढण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले.

आचार्य अत्रे आणि त्यांच्या 'नवयुग'ने या आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नेहरूंपासून ते मोरारजी देसाईपर्यंत अनेकांनी महाराष्ट्रावर, मराठी माणसावर पूर्वग्रहदूषित टीका करणारी विधाने केली होती, शिवाजी महाराजांविषयी गैर-उद्गार काढले होते. या साऱ्या वक्तव्यांचा आचार्य अत्रे यांनी आपल्या लिखाणातून व भाषणातून खरपूस समाचार घेतला होता.

नवयुगचे पहिले पान लिहिण्याचे काम दत्तू बांदेकर यांचे होते. प्रत्येक अंकात अत्रे कोणत्या विषयाला केंद्रस्थानी ठेवणार आहेत, याची ते माहिती घेत व त्याच विषयाचा धागा पकडून, पण स्वतःच्याच स्वतंत्र पद्धतीने पहिले पान सजविण्यास सुरुवात करत. या पानावर त्यांनी वेगवेगळ्या सदरांचे लेखन केले. हे लिखाण अनेक वेळा निनावीही असे, तथापि बांदेकरांची शैली लोकांना ज्ञात झाली होती. त्यामुळे नाव नसले तरी हे बांदेकरांनी लिहिले आहे, हे ओळखू येत असे. 'आक्काबाईचा कोंबडा', 'जग ही एक रंगभूमी', 'घारूअण्णांची चंची' अशा विविध सदरांचे लिखाण त्यांनी केले. १९४३ पासून 'नवयुग'मध्ये आलेले बांदेकर त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९५९पर्यंत 'नवयुग'मध्ये होते. ही सतरा वर्षे सातत्याने त्यांनी 'नवयुग'चे पहिले पान लिहिले. खेरीज 'नवयुग'मधून चित्रपटपरीक्षणे, नाट्यपरीक्षणेही त्यांनी लिहिली. संगीत सौभद्र, संगीत मानापमान अशा नाटकांचा आधार घेऊन, त्यातील एखादा प्रसंग घेऊन बांदेकरांनी विडंबनातून आपले विचार मांडले. काही विनोदी लघुकथाही त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा संदर्भ डोळ्यापुढे ठेवून लिहिल्या.

'एका पोपटाची कहाणी' ही लघुकथा त्यांपैकी एक महत्त्वपूर्ण कथा आहे. मिस हसीना दिलवाली ही कोठीवर गाणारी गायिका, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात पायाला गोळी लागून जखमी झालेला तिचा निरपराध प्रियकर बैदाअल्ली, हसीनाच्या घरातील पिंजऱ्यात असलेला 'हम पंछी दुसरे डाल के' एवढंच सतत बोलणारा पोपट, दोन बायका असलेला सावकार, सवतीच्या मुलाला छळणारी सावत्र आई ही या कथेतील प्रमुख पात्रे आहेत. सावकाराच्या दोन बायकांपैकी एक दुबळी, अशक्त होऊन मरून जाते, तिचा मुलगा उघड्यावर पडतो, सावत्र आई त्याला छळते, इतकेच नव्हे तर त्याचा खून करून फेकून दे असे ड्रायव्हरला सांगते. तो ड्रायव्हर म्हणजे बैदाअल्ली, मुलाला हसीनाकडे आणून सोडतो. मुलगा सतत 'हम पंछी दुसरे डाल के' म्हणत असतो, त्याच्या पोपटानेही तेच शिकलेले असते. नंतर सावकाराची कानउघडणी केली जाते. तो मुलाची स्वतंत्र व्यवस्था करतो. या मुलाचा पोपट मात्र हसीनाकडेच असतो. ही कथा शेवटपर्यंत एक अत्यंत साधी भावनिक आक्रोश करणारी कथा वाटत राहते. पण शेवटचे बैदाअल्लीचे वक्तव्य तिला पूर्ण कलाटणी देते आणि कथेला राजकीय संदर्भ मिळताच एक सखोल आशय प्राप्त होतो. बैदाअल्ली म्हणतो, "हिंदुस्थानात तेरा प्रांतांना भाषिक राज्ये मिळाली, मग महाराष्ट्रालाच का मिळू नये? हिंदुस्थानच्या राजकारणात महाराष्ट्राला सवतीच्या मुलाप्रमाणे का वागवण्यात येते? इतर भाषकांना एक कायदा आणि महाराष्ट्रालाच तेवढा दुसरा कायदा का? हा पक्षपात का?" पंखांची फडफड करीत पोपट किंचाळला- "हम पंछी दुसरे डाल के!" पोपटाच्या या सुरुवातीपासूनच्या पालुपदाने ही कथा संपते. बैदाअल्लीच्या अत्यंत साध्या भाषेतील वक्तव्यानंतरच तेच पालुपद कथेला विलक्षण आशय प्राप्त करून देते. अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी महाग झालेला, अगतिक झालेला व मृत्यूच्या दिशेने जाणारा सवतीचा मुलगा हा अखिल महाराष्ट्रातील जनतेचे प्रतीक बनतो.

प्राचीन लोककथांमधून मराठीत ज्या अनेक मिथ्स येतात, त्यात 'सावत्र आई' ही एक मिथ असतेच. ही कथा याच लोककथेच्या ढंगाने आल्याने लोकांना पटकन कळते, त्यांच्या मनाला भिडते, त्यांच्या मनात करुणा निर्माण करते, डोळ्यात पाणी आणते; आणि जे प्रबोधन वा जी लोकजागृती गंभीर, बोजड शब्दांच्या भाषणांनी होईल, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी हेच काम एक लहानशी कथा सहजपणे करते. 'हम पंछी दुसरे डाल के' हे वैशिष्ट्यपूर्ण पालुपद तत्कालीन, प्रसिद्ध चित्रपटातील 'हम पंछी एक डाल के' या गाजलेल्या गीतावरून घेतलेले आहे. ही मनोरंजनाची साधने लोकांपर्यंत सहज पोहोचलेली असतात. त्यांचा वापरही बांदेकरांनी अत्यंत मार्मिकपणे केलेला आहे.

लोकांजवळ जायचे असेल तर लोकभाषा आधी आपलीशी केली पाहिजे, हे बांदेकरांनी जाणले होते. त्यातूनच त्यांनी लोकवाङ्‌मयाचा उचित वापर करून घेतला. लोकवाङ्‌मयाचे महत्त्वपूर्ण अंग म्हणजे लोकगीत. त्यातील अंगाईगीत, बडबडगीत, खेळगीत, पाळणा यांचा वापर; त्याचप्रमाणे फटके, लावण्या, आरत्या, भजने, नाट्यगीते, चित्रपट गीते या सगळ्यांचाच त्यांनी विनोदनिर्मितीसाठी विपुल वापर करून घेतला. गद्यलेखनात पूरक म्हणून त्यांनी पद्य विडंबने लिहिलीच, पण संयुक्त महाराष्ट्र आंदोलनकाळात त्यांनी लोकगीतांवर आधारित स्वतंत्र विडंबनकाव्ये लिहिली. या विडंबनकाव्यांस 'सख्याहरी'इतकीच अफाट लोकप्रियता लाभली.

सर्वसामान्यांना ज्ञात असलेल्या लोकगीतांच्या चालींमुळे ती लहानथोरांच्या तोंडी सहज रुळली. सभांमधून, रस्त्यारस्त्यांवरून, गल्लीबोळातून, घराघरांतून ही विडंबनगीते गायली जाऊ लागली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात लोकांनी या गीतांचा उत्स्फूर्त वापर केला.
"काँग्रेसच्या नरा, बांगड्या भरा
बांगड्या भरा अहो, बांगड्या भरा
फलटणच्या मोरा,
सासवडच्या चोरा,
नाशिकच्या फितुरा,
साताराच्या मुजोरा
बांगड्या भरा अहो, बांगड्या भरा"
हे बांदेकरांचे विडंबनगीत ऐकवत लोकांनी काँग्रेस नेत्यांना खरोखरच बांगड्यांचा आहेर केला होता; इतकी त्याची परिणामकारकता होती.

राज्यपुनर्रचना समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस नेते त्रिंबकमामा देवगिरीकर पुणे ते दिल्ली वाऱ्या करू लागले त्यावेळी,
"त्रिंबकमामा, त्रिंबकमामा
खाई थालीपीठ आणि फुटाणा,
कुंथत कुंथत जाई विमाना
दिल्लीत जाऊन पडे उताणा"
असे बालगीत बांदेकरांनी रचले होते.
"अश्शी दिल्ली सुरेख बाई
चोरांना राखिते
अश्शी मुंबई द्वाड बाई
चोरांना हाकिते"
हे विडंबन, अथवा
"म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान
मंत्री अजुनी लहान!"
हे विडंबन आजही तितकेच टवटवीत वाटते. तो काळ तर ही विडंबन गीते जिवंतपणे समोर उभा करतात. नेहरू, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, काकासाहेब गाडगीळ, शंकरराव देव, मालोजीराव निंबाळकर, मामा देवगिरीकर, स. का. पाटील अशा तत्कालीन काँग्रेसच्या बहुतेक नेत्यांना बांदेकरांच्या विडंबनकाव्याने धारेवर धरले होतेच.
"असा कसा देवाचा देव बाई ठकडा,
देव एका पंचाने उघडा"
हे शंकरराव देव यांच्या वरील विडंबनगीत,
"अडगुळं मडगुळं
काकाचं कडबोळं
दिल्लीला जाऊ
लाथा खाऊ"
हे काकासाहेब गाडगीळ यांच्यावरील भाष्य, किंवा
"एक जोडा झेलू बाई, दोन जोडे झेलू
चार जोड्यांचा चपलाहार
पाहुणा झाला गारीगार
मोटारीतून होई पसार"
अशी एकाहून एक प्रासादिक, प्रभावी विडंबनकाव्ये बांदेकरांनी रचली. लोकांना आंदोलनकाळात कृतिप्रवण करण्यात या विडंबनगीतांनी मोठाच हातभार लावला होता.

पुढे अत्रे व बांदेकर यांचा मिळून या राजकीय विडंबनकाव्याचा संग्रह 'पंचगव्य' या नावाने प्रसिद्ध झाला. हा मराठीतील पहिलाच राजकीय विडंबनकाव्य संग्रह होता. यात बांदेकरांची ३६ विडंबनगीते आहेत. "संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा या संग्रहातील कित्येक गाण्यांनी लोकजागृतीचे जे प्रभावी कार्य केले; त्याचा त्यात अवश्यमेव उल्लेख करावा लागेल", असे आचार्य अत्रे यांनी 'पंचगव्य'च्या प्रस्तावनेत नोंदवले आहे.

लोकगीताखेरीज बांदेकरांनी विडंबनासाठी बालकवी, यशवंत यांच्या प्रसिद्ध कवितांचा तसेच ग. दि. माडगूळकर यांच्या लोकप्रिय गीतांचाही वापर केला होता
"नाच रे मोऱ्या मुंबईच्या रस्त्यात
नाच रे मोऱ्या नाच,
हक्कासाठी मराठा झुंजला रे
सत्याग्रही मोर्चा आला रे
चालव तुझी गोळी, ढेबर देई टाळी
महाराष्ट्रवैऱ्या, नाच"
हे विडंबन इतर विडंबनांपेक्षा निराळे, करुणेचा कळस गाठणारे आहे. मोरारजी देसाईंनी आंदोलकांवर केलेला गोळीबार, त्यात मृत्युमुखी पडलेली १०५ माणसे यांचे स्मरण अत्यंत साध्या-सोप्या शब्दांमधून ज्या दाहकतेने बांदेकर करून देतात; त्याला तोड नाही. तो काळ न अनुभवलेल्या आजच्या पिढीच्या मनातही चीड निर्माण व्हावी, इतके जालीम रसायन या साध्या वाटणाऱ्या शब्दांमध्ये बांदेकरांनी भरले आहे.

विडंबनाचा दर्जा उत्तम राखायचा असेल तर विडंबनकार हा स्वतःदेखील उत्तम लेखक असणे आवश्यक असते. बांदेकरांना उपजतच अशी प्रतिभेची देणगी लाभलेली होती. समाजातील दोष, व्यंग, ढळलेला तोल त्यांनी वारंवार आपल्या विडंबनातून व्यक्त केला. तत्कालिक घटनांवरील विनोद हा त्या घटनेबरोबरच विरून जात असतो, तर चिरंतनाचे विडंबनही चिरंतन राहते. बांदेकरांची बहुतेक विडंबने ही राजकीय आहेत. राजकीय घडामोडी या तत्कालिक असल्या, तरी ही विडंबने केवळ घटनेची, व्यक्तीची नव्हेत; तर ती त्या प्रवृत्तीची विडंबने आहेत. आणि प्रवृत्तीला, स्वभावाला काळाचे बंधन नसते. कोणत्याही काळात या काही ढोंगी, स्वार्थी, मत्सरी, अतिरेकी प्रवृत्तींची माणसे असतातच.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाव्यतिरिक्त इतर राजकीय व सामाजिक संदर्भ असलेली विडंबनकाव्येदेखील बांदेकरांनी रचली. त्यावेळचे 'लोकमान्य'चे संपादक पां. वा. गाडगीळ यांच्यावर बांदेकरांनी एक शिशुगीत लिहिले होते. त्याविषयी आचार्य अत्रे यांनी लिहिले होते, "हे इतके अपूर्व आहे की, त्याची स्तुती करावयाला माझ्याजवळ शब्दच नाहीत. पांडोबा गाडगीळ यांचे बांदेकर यांच्यावर विलक्षण प्रेम होते. स्वतः पांडोबादेखील आपल्यावर बांदेकरांनी केलेले हे विडंबन वाचून पोट धरधरून हसले असतील."
"पांडोबा, पांडोबा भागलास का?
शेटजीच्या डगल्याखाली लपलास का?
शेटजी डगला गुजराती
मंत्र्यांचा वाडा चिकणमाती
मंत्र्यांचा वाडा पाहून जा
तूपरोटी खाऊन जा
तुपात पडला 'मामा'
पांडोबा देई राजीनामा
पण –
दुसऱ्या दिवशी जाई कामा!"

बांदेकरांनी आयुष्यभर वृत्तपत्रव्यवसायातच काम केले. दैनंदिन राजकारणाशी त्यांचा रोजचा संपर्क होता. त्यामुळे बांदेकर यांचा राजकीय विनोद ताजा आणि खमंग असे. तत्कालिक घटनांचे संदर्भ देऊन असे लेखन पुन्हा प्रकाशित केले, तर ते वाचकांना तितकेच आवडू शकते. ते तत्कालिक होते त्यामुळे विरून वा संपून गेले आहे, असे म्हणता येणार नाही. त्याचे महत्त्व हे ऐतिहासिक महत्त्व आहे. अशा स्वरूपाचे लेखन झाले होते याची वाचकांना माहिती होणे व लेखन उपलब्ध असणे, या गोष्टीही त्याबाबतीत तितक्याच महत्त्वाच्या आहेत, असे वाटते. आता प्रकाशकांकडूनही बांदेकर अलक्षितच राहिले आहेत, असे म्हणायला हरकत नाही. अनेक प्रकाशकांनी आपल्या जुन्या लेखकांच्या निवडक लिखाणाचे संग्रह काढले आहेत, तसेच इतरही काही पुस्तके जशीच्या तशी पुनर्मुद्रित केली आहेत. हे बांदेकरांबाबत मात्र हा 'चांगल्या खपाचा' लेखक असूनही घडले नाही, हे इथे आवर्जून नोंदवावेसे वाटते.

बांदेकरांचा विनोद हा शुद्ध निखळ स्वरूपाचा विनोद नाही. त्यामागे एक विशिष्ट गंभीर अशी तात्त्विक भूमिका आहे. या विनोदातील मोठा हिस्सा राजकीय विनोदाचा आहे. राजकीय घडामोडींमध्ये स्वत:ची एक निश्चित भूमिका असणे, ती वर्षानुवर्षे त्याच ठामपणाने निभावणे आणि या भूमिकेचा प्रचार करण्यासाठी विनोदाचा समर्थ वापर करणे, हे तिन्ही धागे बांदेकरांनी उत्कृष्टरीत्या जुळवून ठेवले आणि हा पीळ अखेरपर्यंत उलगडू, विस्कटू, गुंतू दिला नाही.

बांदेकरांनी ज्या व्यक्तींना आपल्या विनोदाचे लक्ष्य बनवले आहे, त्या बहुतेक व्यक्ती राजकीय क्षेत्रातील आहेत. त्यांच्याखेरीज न्यायाधीश, वकील, सरकारी नोकर अशी काही ठरावीक क्षेत्रांतील मंडळी त्यांच्या लिखाणात वारंवार येतात. पण नावानिशी येणारी माणसे ही राजकारणातीलच. नेहरू, गांधी, वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ, कॉ. रॉय, शंकरराव देव इत्यादी अनेक तत्कालीन नेतेमंडळींना बांदेकरांच्या विनोदाने वेठीस धरले आहे. या सगळ्यांवर कुठे विशिष्ट लेखात निश्चित ठरवून लिहिले जाते असेच नव्हे, तर इतर कुठल्याही विषयावरील लेख असला तरी जाता-जाता सहज त्यांना चिमटे काढले जातात.

दारूड्यांच्या एका संवादात अशी काही खोचक व चलाख विधाने येतात – "जवाहरलाल नेहरूंप्रमाणे घटकेत या बाजूला तर घटकेत त्या बाजूला त्यांचा तोल झुकत आहे." 'एकदा पडलो तरी शंकरराव देवांप्रमाणे पुन्हा उठण्याची मला हिम्मत आहे.' 'ही झब्बुगिरी आहे. गांधी आणि वल्लभभाईप्रमाणे तुम्ही दोघांनीच राजकारण करावं, हे मला पसंत नाही.'

ही वाक्ये दारूड्यांच्या तोंडी येतात. त्यामुळे ती कितपत गंभीरपणे पहायची असे वाटू लागते. दुसरीकडून त्यातील खरेपणा ध्यानात येऊ लागतो, आणि एक मजेशीर द्वंद्व वाचकाच्या मनात उभे राहते. हसता-हसता वाचक नकळत विचारही करू लागतो. वाचकाच्या भावनेला आणि बुद्धीला असे चटकन आवाहन करण्याचे कार्य काशिनाथ विष्णू फडके आणि अच्युतराव कोल्हटकरांप्रमाणेच बांदेकरांनी उत्तमरीत्या साधलेले दिसते. कल्पकता, ओघ, सहजता, ढंगदारपणा अशी दोघांच्याही विनोदाची काही समान वैशिष्ट्ये आढळतात. लोकरंजन होते आहे, असे या लिखाणातून वरवर पाहता वाटते; पण चलाखीने आपली गंभीर व ठाम स्वरूपाची मते त्यांनी चुरचुरीत, चटकदार करून मांडली आहेत हे ध्यानात येते.

'दोन दादांची दोस्ती याने हिंदू-मुस्लिम ऐक्य' हा लेख बांदेकरांच्या उपहासाचा उत्कृष्ट नमुना असून हिंदू-मुसलमान ऐक्याच्या प्रयत्नातील विनोदी बाजू त्यात चटकदारपणे रंगविली आहे. मुसलमान दादाची स्वार्थी दृष्टी व रंगेलपणा आणि हिंदू दादाची खुशामतखोर वृत्ती व पडखाऊपणा यांच्या चित्रणाने जी दोन स्वभावचित्रे लेखकाने वाचकासमोर उभी केली आहेत, त्यांची प्रतिबिंबे राजकारणातही उमटलेली दिसून येत असल्यामुळे, हा लेख वाचताना सर्वसामान्य वाचकाप्रमाणेच पक्षाभिनिवेशी वाचकालाही भावतो. या लेखात गांधी-जिना मुलाखतीचे त्यांनी कासम-सखाराम मुलाखत असे विडंबन केले आहे. सखाराम गळेपडू हा कामाठीपुऱ्याचा प्रसिद्ध दादा, मदनपुऱ्यातील नामांकित मवाली कासम कबाबवाला याच्याकडे ऐक्याचा प्रस्ताव घेऊन जातो; त्यांचा संवाद म्हणजे हा लेख आहे.

"तुम्ही लोक छापलेलं वाचीत नाही, त्यामुळे तुम्हाला तुमचा लीडर कोण हे माहीत नसते. हे बघ, आम्ही गांधींना ओळखत नाही आणि तुम्ही जिनांना ओळखीत नाही. पण हे दोघे आज तुमच्या आणि आमच्यावतीने बोलत बसले आहेत."
"एकीचं बोलणं तुमच्यात आणि आमच्यात झालं पाहिजे. भांडतो तुम्ही आणि आम्ही; यात गांधींची आणि जिनांची एकी कशाला?"
"संपूर्ण दारूबंदी झाली तरी पुढार्‍यांना आणि मवाल्यांना मुळीच अडचण भासणार नाही. तू दोन ग्लास मागतोस, तर आता मी तुला तीन ग्लास देतो. आम्ही हिंदू लोक स्वार्थत्यागाला नेहमी उत्सुक असतो."
हे संवाद बांदेकरांची विशिष्ट राजकीय भूमिका सहजपणे दाखवून देतात.

अशा 'मान्यवर' व्यक्तींमध्ये लोकांच्या भावना गुंतलेल्या असतात. त्या व्यक्तींची एकदम मानगूट पकडणे वा त्यांच्यावर घाव घालणे, हे बहुतेकवेळा उपयुक्त ठरत नाही. त्या व्यक्तींचे बरेवाईट कार्य समग्रपणे ध्यानात घेणे अपरिहार्य ठरते. अशा वेळी त्या व्यक्तीच्या सकारात्मक गोष्टी जागच्या जागी राहू देऊन नकारात्मक बाजू अधिक कुरूप, अधिक बीभत्स करून लोकांपुढे मांडणे भाग पडते. स. का. पाटील हे केंद्रीय मंत्रिमंडळात अन्नमंत्री झाल्यावर बांदेकरांनी त्यांना एक जाहीर पत्र लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात, "तुम्ही अन्नमंत्री होण्यास सर्वस्वी पात्र आहात. तुमचा गाल पाहून बाजरीच्या भाकरीची आठवण होते. तुमची कांती गहूवर्णाची आहे. तुमचा चेहरा तुपाळ आहे. तुमचा जाडजूड देह पाहून जोंधळ्याच्या पोत्याची आठवण होते. तुमचे मुंडके पाहून जोंधळ्याच्या पोत्यावर ठेवलेले तांदळाचे गाठोडे आठवते. या गोष्टी म्हणजे गरिबांची दिवाळी! यंदा दिवाळीत साखरेची टंचाई होणार नाही, कारण आपण साखर पेरण्यात पटाईत आहात. तुम्ही महाराष्ट्राच्या मिठाला जागला नाहीत असा आरोप आहे, कारण तुमचा मिठापेक्षा पिठावर जास्त जोर आहे. मुंबईत आपली कणीक चांगलीच तिंबली आणि पाठीचे धिरडे निघाले. आपण आपल्या पोटाप्रमाणेच इतरांच्याही पोटाची काळजी घ्याल, अशी आशा आहे."

बांदेकरांच्या या व्यक्तिचित्रांची तुलना 'अर्कचित्र' या चित्रप्रकाराशी करता येईल. त्या-त्या व्यक्तीची एखादीच दोषपूर्ण बाजू आकाराने वाढवून; शक्य तेवढी चहूबाजूंनी, अनेक पटींनी विस्तारित करून त्या व्यक्तीचे स्वरूप शक्य तितके बेढब व हास्यास्पद बनवणे, हेच अर्कचित्रांचे काम बांदेकरांनी लेखणीद्वारे केले आहे. सर्वसामान्य माणसाला पुढे आपले जे मत, जो विचार मांडायचा आहे; तो यशस्वीरीत्या मांडण्यासाठी विनोदाचे हे अर्कचित्र माध्यम मोठे उपयुक्त ठरते. विशेषकरून तीव्र अभिनिवेशाने, गंभीर स्वरूपात माहिती व आकडेवारीची रेलचेल करत जे वृत्तपत्रीय लिखाण केले जाते; त्याच मुद्द्यावर खेळाडू वृत्तीने, रमतगमत, थोडासा थिल्लरपणा करत, बारीक चिमटे काढत लक्ष्यवस्तुला हास्यास्पद बनवत जे विनोदी लिखाण केले जाते; ते कधीही अधिक परिणामकारक ठरते. धारदार उपहास, बोचरी व वक्रोक्तिपूर्ण भाषा ही प्रतिपक्षीयांच्या जिव्हारी झोंबते; पण सामान्य वाचकांचा जीव मात्र त्यात गुदमरतो, हे ध्यानात घेऊनच बांदेकरांनी आपले लिखाण केले. आपल्या मताचा प्रचार जनसामान्यांमध्ये करायचा असेल तर आपले मत हे बोजड, न पेलवणारे राहून चालणार नाही; तर ते एक आकर्षक, कलात्मक स्वरूपाचे, सहज आकलन होणार असले पाहिजे हा दृष्टिकोण त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवला.

अच्युतराव कोल्हटकरांच्या विनोदाशी बांदेकरांचा विनोद अधिक मिळता-जुळता असला, तरी त्यांच्या उपहासात्मक लेखनात शि. म. परांजप्यांचा अंशही क्वचित आढळतो. 'श्राद्धदिनाचा पिंड ग्रहण करण्यासाठी लोकमान्यांनी पाठवलेला काकदूत' अशा लांबलचक शीर्षकाचा बांदेकरांचा एक अप्रतिम लेख आहे. या लेखाने शि. म. परांजप्यांची मर्मभेदपटुता आणि तरल कल्पनाविलास यांची आठवण होते. बांदेकरांचा नेहमीचा सात्त्विक उपहासही प्रसंगी किती भेदक व जळजळीत होऊ शकतो याची साक्ष हा लेख पटवून देतो, असे 'अतिप्रसंग'च्या प्रस्तावनेत चं. वि. बावडेकर यांनी म्हटले आहे. बांदेकरांची काव्यात्मवृत्ती, सौंदर्यपूर्ण उपहास आणि आत्यंतिक टोकाचा आवेश या लेखात आढळतो. लोकमान्य टिळक स्वर्गातून कावळ्याला सांगतात -
"माझ्या पिंडावर असा तुटून पड की जसे माझ्या फंडावर माझे अनुयायी तुटून पडले. माझ्या नावाच्या एक कोट रुपये फंडाचा जसा बोजवारा उडाला; तसाच हे कावळ्या, माझ्या नावाच्या पिंडाचाही तू बोजवारा उडवून दे. भिऊ नकोस, तुमच्याकडून हिशेब मागण्यासाठी मी पुन्हा जन्म घेणार नाही."
"माझ्या पश्चात निघालेले केसरीचे अंक चाळून बघ आणि त्यातून क्रमश: प्रसिद्ध झालेल्या कादंबरीवर सहानुभूतीचे दोन अश्रू ढाळ. केसरीत नवीन सुरु झालेले निर्बुद्ध सदर 'सहज सुचले, वाचले, ऐकले'; ते पाहून घे आणि विचार कर, माझ्या केसरीची इतकी विटंबना माझ्या शत्रूंनी तरी केली असती का?"

अशा विविध मुद्द्यांवर, देशातील तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीवर उपरोधिक भाष्ये बांदेकरांनी लोकमान्यांच्या तोंडून वदविली आहेत. "गांधीच्या आश्रमात तुला संत्री, मोसंबी, खजूर व शेळीचे दूध मिळेल. डल्ला मारायचा असला तर शहाण्या प्राण्याने गांधींकडेच जावे. केवळ डल्ला मारण्यासाठीच कित्येक कार्यसाधू ढोंगी लोक आज गांधींभोवती पिंगा घालीत आहेत."

अशी तत्कालीन नेत्यांविषयीची जळजळीत मतेही त्यांनी या लेखात नोंदविली आहेत. हा संपूर्ण लेखच अशा वक्रोक्तीने भरलेला आहे. एरवी एखाद्या व्यक्तीला, घटनेला, विचाराला टीकेचे लक्ष्य बनविताना बांदेकर दूर उभे राहून मारा करत असतात; पण या लेखात मात्र ते असे अलिप्त राहू शकलेले नाहीत. त्यात ते गुंतून गेलेले, भावनाविवश झालेले आढळतात. अपवादात्मक असाच हा लेख असला, तरी त्यात बांदेकर भावनेच्या कसोटीवर उत्कृष्टरीत्या उतरलेले आहेत.

बांदेकरांवरील मृत्युलेखात पां. वा. गाडगीळ लिहितात, "त्यांचे राजकीय लिखाण अतिशय कठोर व मोठे मारामारीचे असे. यांना उपरोध व उपहास वाङ्‌मयाचे कलात्मक प्रकार म्हणून आवडतात, त्यांना बांदेकरांच्या लेखनाचा राग येत नसे. समाजातील सूक्ष्म अंतर्विरोध ते मोठ्या कौशल्याने चव्हाट्यावर मांडीत."

बांदेकरांच्या एकूण विनोदात राजकीय विनोदाने अधिक जागा व्यापलेली आहे. समीक्षेच्या क्षेत्रात मात्र राजकीय विनोदाची दखल त्याकाळी व नंतरही फारशी घेतलेली दिसत नाही. वाङ्‌मयीन विनोदाप्रमाणे राजकीय विनोद हा वाङ्‌मयीन चिंतनाचा विषय का होत नाही? असाच प्रश्न समीक्षकांनी अलक्षित केलेल्या बांदेकरांच्या विनोदाकडे पाहून उपस्थित करावासा वाटतो.

अच्युतराव कोल्हटकरांनंतर खंडित झालेली, वृत्तपत्रीय विनोदाची परंपरा पुनरुज्जीवित केली ती आचार्य अत्रे यांनी आणि अत्र्यांच्या सोबतीनेच हे वृत्तपत्रीय विनोदी लेखनाचे शस्त्र परजले ते दत्तू बांदेकरांनी. अत्रे स्वतःला गडकऱ्यांचा शिष्य मानत असले, तरी विनोदाच्या बाबतीत मात्र ते अच्युतराव कोल्हटकर यांच्या जातकुळीचे होते. "अच्युतरावांच्या सर्व गुणावगुणांनी युक्त असलेला, आचार्य अत्र्यांसारखा महान पत्रकार त्यांच्या लेखणीने निर्माण केला; यातच अच्युतरावांच्या प्रतिभेचे श्रेष्ठत्व सिद्ध होते," हे प्राध्यापक भीमराव कुलकर्णी यांचे मत अत्र्यांची व पर्यायाने दत्तू बांदेकरांचीदेखील परंपरा स्पष्ट करणारे आहे.

आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. त्यांच्या लिखाणात अनुभवांची आणि कल्पकतेची विविधता होती. लिखाणाच्या जोडीला त्यांच्याजवळ उत्तम वक्तृत्व आणि नेतृत्वगुणही होते. अत्र्यांनी केवळ वृत्तपत्रीय नव्हे; तर कथा, नाटक अशा स्वरूपाचे इतर लिखाणही मुबलक व तेवढ्याच ताकदीने केले. स्वतःचेच वृत्तपत्र असल्याने लिखाणाचे एक निराळे स्वातंत्र्यही त्यांच्याकडे होते. अत्र्यांची वृत्ती मैफल, सभा जमवण्याची होती. लोकांना खळखळून हसवण्यासोबतच एखाद्या प्रश्नाची कारुण्यमय बाजू मांडून लोकांच्या भावनांना आवाहन करण्याचे कार्यही त्यांच्या शब्दांनी सहजतेने केले.

बांदेकरांचा स्वभाव, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण, समाजजीवनातील आणि व्यक्तिजीवनातील वर्तन या सर्वच गोष्टी मात्र अत्र्यांच्यापेक्षा वेगळ्या, किंबहुना दुसऱ्या टोकाच्या होत्या.

दुर्दैवाने बांदेकरांची सातत्याने पाठ पुरवली. गाणगापूरला दत्तदर्शनासाठी लहान मुलांसहित गेलेली बांदेकरांची आई तेथेच एका साथीच्या रोगात मृत्यू पावली. वडिलांचा मृत्यू तत्पूर्वीच झाला होता. मुलांचे पालनपोषण नीट झाले नाही. बांदेकरांचे दोन भाऊ लहान वयात मृत्यू पावले, पुढे बहिणीचाही ऐन तारुण्यात मृत्यू झाला. भावंडांवर आटोकाट प्रेम करणाऱ्या बांदेकरांनी भावंडांचीच नावे आपल्या मुलांना ठेवली. वयाच्या पस्तिशीत त्यांचे लग्न झाले. 'चित्रा' साप्ताहिकातील नोकरी गेल्यावर बांदेकरांनी 'भरारी' हे साप्ताहिक स्वतः सुरू केले, पण ते अल्पावधीतच बंद पडले. पुढे 'नवयुग'मध्ये मात्र बांदेकर कायमचे चिकटले.

बालपण व तारुण्य, दारिद्र्य आणि दुरवस्थेत गेल्याने बांदेकरांचा स्वभाव एककल्ली बनला होता. गर्दीची ठिकाणे त्यांना नापसंत होती. सभा-संमेलनांचे अध्यक्षपद भूषवणे वा भाषणबाजी करणे त्यांनी कटाक्षाने टाळले. निवासस्थानाची निवड करतानाही ते चाळीतील जिन्यालगतची पहिलीच खोली कायम निवडत; म्हणजे इकडे-तिकडे पहायला नको, सरळ पायर्‍या उतरून जाता येते असा हेतू.

बांदेकरांचे लिखाण विनोदी असले तरी त्यांच्या स्वभावात विनोदी वृत्ती नव्हती. त्यांचा विनोदही वेदनेत लपलेला असाच आढळतो. अखेरपर्यंत त्यांच्या वाट्याला आर्थिक दुरवस्थाच आली. या दारिद्र्याचे चटके पुढे त्यांच्या कुटुंबीयांनाही सहन करावे लागले. तथापि वाचकांचे अलोट प्रेम बांदेकरांना लाभले. "मृत्यूच्या वेळी त्यांच्या खिशात वीस रुपये होते, पण अंत्ययात्रेला मात्र वीस हजार माणसे उपस्थित होती", असा उल्लेख त्यांची मोठी मुलगी नेत्रा बांदेकर यांनी केला आहे.

अत्र्यांसमवेत काम करताना बांदेकरांना लिखाणाचे स्वातंत्र्य असले तरी, 'या आठवड्यात कुणाला सावज बनवायचे' ही गोष्ट अत्रे ठरवत आणि त्यानुसार बांदेकरांची लेखणी चालू लागे. या दडपणामुळे बांदेकरांच्या राजकीय विनोदाचे लक्ष्य मर्यादित बनलेले दिसते आणि त्याच त्याच व्यक्ती, संस्था, पक्ष याविषयीच ते वारंवार लिहिताना दिसतात. समुदायाने वावरणे त्यांच्या प्रकृतीला कधी पटले नाही, मानवले नाही. तरीही सर्वसामान्य जनतेच्या पातळीवरूनच ते राजकीय घडामोडी न्याहाळत आणि त्यातील व्यंगे टिपत. "ते शाब्दिक कोट्यांच्या आहारी कधी गेले नाहीत. त्यांनी शब्दाच्या अर्थावर श्लेष निर्माण करून अनेक प्रसंगी बहारीचे विडंबन साधले. पण शब्दनिष्ठ विनोदापेक्षा मार्मिक कल्पनांनी मिश्किल स्वरूपात खुलवलेला खुमासदार विनोद हेच बांदेकरांच्या प्रतिभेचे लक्षण होते," असे मत र. गो. सरदेसाई यांनी नोंदवलेले आहे. ही त्यांची वैशिष्ट्ये अत्र्यांच्या विनोदाशी साम्य दर्शवणारी अशीच आहेत.

अत्र्यांच्या राजकीय विनोदाएवढाच बांदेकरांचा राजकीय विनोदही श्रेष्ठ होता, पण अत्र्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मात्र बांदेकरांकडे नव्हते. त्यामुळे बांदेकरांची वाटचाल एकाच वाटेवरून आणि एककल्ली स्वरूपात झाली. परिणामी प्रचंड लोकप्रियता मिळूनही बांदेकरांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण जागवण्याची धडपड कुणी केली नाही; त्यांचे एखादे लहानसेतरी स्मारक अथवा त्यांच्या नावे विनोदी लेखनातील एखादा पुरस्कार नियमितपणे देणे, अशा स्वरूपाची घटना घडली नाही. अशिक्षित पत्नी व लहान मुले यांना ते करणे तेव्हा शक्य नव्हते. त्यांच्या सहकाऱ्यांनीही याकडे लक्ष पुरवले नाही आणि हळूहळू बांदेकर लोकांच्या विस्मरणात गेले.

बांदेकर यांचे मित्र श्री. केळुसकर यांना लिहिलेल्या एका पत्रात पु. ल. देशपांडे यांनी बांदेकरांविषयी म्हटले आहे की, "दत्तू बांदेकर पत्रकार असल्यामुळे, आपले लिखाण नेमक्या कॉलमात बसवून परिणामकारक करण्याची कला त्यांना उत्तम साधली होती. बांदेकरांचे ज्या प्रमाणात कौतुक व्हायला हवे होते, त्या प्रमाणात झाले नाही. एक कारण म्हणजे त्यांच्यातला खास मुंबैकर मुंबईबाहेरच्यांना कळला नाही, आणि दुसरे म्हणजे त्यांचे उत्तम गुण फक्त वर्तमानपत्रातून वाहून गेले. त्यांचा 'सख्याहरी' मला अजूनही क्लासिक वाटतो."

बांदेकरांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त ऑक्टोबर १९८३ ते १९८४ या काळात बांदेकरांच्या 'चिरीमिरी' या विनोदी पुस्तकाचा परिचय करून देणारे 'सप्रयोग व्याख्यान' असे काही कार्यक्रम श्री. रंगनाथ कुलकर्णी यांनी सादर केले. तसेच अत्र्यांनी लिहिलेले तीन मृत्युलेख व 'नवयुग'चा बांदेकर विशेषांक वगळता पुढे बांदेकरांच्या स्मृती जागवल्या गेल्या नाहीत.

आर्थिक दुरवस्थेमुळे व लेखन हाच उपजीविकेचा एकमेव मार्ग असल्यामुळे बांदेकर सातत्याने लिहीत तरी असत अथवा लिखाणाचा विचार तरी करत असत. "रात्री मध्येच कधी जाग आली, तर खोलीतील काळोखात मला दिसत असे. तो मध्येच विझून जाईल व पुन्हा दिसू लागेल तेव्हा मी म्हणत असे, 'बाबा विचार करताहेत' आणि रात्री दिवे लावल्याने आमची झोपमोड होईल म्हणून विडी ओढत, विचार करत जागे राहिलेले बाबा दिवस उजाडताच लिहिण्यास सुरुवात करत," अशी बांदेकरांची आठवण त्यांची कन्या नेत्रा बांदेकर यांनी सांगितली.

ती काळोखात प्रज्वलित होणारी, वरून जाणारी लालबुंद ठिणगी आजही राख झटकत बांदेकरांच्या विनोदाचे स्वरूप सांगत, आपले धगधगते अस्तित्व दर्शवित आहे.

संदर्भ:
१. प्रदक्षिणा आवृत्ती सातवी (मराठीतील निबंधवाङ्‌मय: वि. ह. कुलकर्णी, वि. स. खांडेकर, ललित गद्य: भीमराव कुलकर्णी)
२. संक्रमण: डॉ. सरोजिनी वैद्य (१९८५)
३. सभ्य स्त्री पुरुष हो! (भाग २) – आचार्य अत्रे
४. मी माझे मला – शिरीष पै
५. 'नवयुग' साप्ताहिकाचे सर्व अंक

दत्तू बांदेकर : जीवनपट

पूर्ण नाव : दत्तात्रय तुकाराम बांदेकर;
मुंबईतील वास्तव्य : खेतवाडी, गिरगाव,
जन्मदिनांक : २२ सप्टेंबर १९०९,
जन्मगाव : कारवार,
आईचे नाव : तुळशी तुकाराम बांदेकर,
भावंडे : नेत्रा, गजानन, सूर्यकांत,
विवाह साल : १९४२,
पत्नी : कमला;
माहेरचे नाव : गंगा भाडकर;
जन्म साल : १९२५;
मुले : नेत्रा (जन्म दिनांक: ७ मे १९४४); गजानन (अपंग, जन्म दिनांक: १ जून १९४५); शोभा (जन्म दिनांक: २८ मार्च १९४८); अरुण (जन्म दिनांक: ३ जुलै १९५१);
शिक्षण : (अंदाजे) सातवीपर्यंत, बेळगाव येथे कन्नड माध्यमात; मुंबईला आगमन: १९४१ (तत्पूर्वी काही काळ पुणे येथे वास्तव्य),
व्यवसाय : सुरुवातीस अनेक किरकोळ कामे केल्यानंतर 'रांगणेकर-काणेकर' संपादित 'चित्रा' या साप्ताहिकात प्रूफरीडर म्हणून नोकरी. तेथेच लिखाणास सुरुवात. 'भरारी' हे स्वत:चे साप्ताहिक काढले, 'नवयुग'मध्ये ऑक्टोबर १९४२ पासून ते मृत्यूपर्यंत नोकरी;
मृत्यू : ४ ऑक्टोबर रोजी – मेंदूतील रक्तस्रावाने

दत्तू बांदेकर यांची ग्रंथसंपदा :

विनोदी लेखसंग्रह : अतिप्रसंग (प्रस्तावना: चं. वि. बावडेकर, टिपण: अनंत काणेकर, मुखपृष्ठ: दीनानाथ दलाल) (१९४०), बहुरूपी (१९४१), आडपडदा (१९४७), पेचप्रसंग (१९४७), आवळ्या-भोपळ्याची मोट (१९५८), चिरीमिरी (१९५९), प्रेमाचा गुलकंद (१९५९);
लेखसंग्रह : सख्याहरी (प्रस्तावना: प्र. के. अत्रे) (१९४०); नवी आघाडी (मुखपृष्ठ: दीनानाथ दलाल) (१९४४), प्यारी (१९४४), वेताळ प्रसन्न (मुखपृष्ठ: श्रीकांत उगार) (१९६०);
ललित लेखन : प्रेमपत्र (मुखपृष्ठ: रघुवीर मुळगावकर) (१९४६);
संवाद लेखन : तो आणि ती (५० संवाद-लेखकाचे नाव घातलेले नाही. सुधारित व पुनर्रचित प्रकाशक: गो. भा. घाणेकर, मुंबई) (१९३८);
नाटक : विचित्र चोर (१९४३), नजरबंदी (१९४४), जावईशोध (मुखपृष्ठ: कृ. ना. सापळे) (१९५१);
आत्मकथनात्मक : तू आणि मी (मुखपृष्ठ: दीनानाथ दलाल) (१९४४);
लघुकादंबरी : चुकामूक (मुखपृष्ठ: रघुवीर मुळगावकर) (१९४९);
लघुनिबंध : अमृतवाणी (मुखपृष्ठ: दीनानाथ दलाल) (१९४८);
राजकीय विडंबन काव्यसंग्रह : पंचगव्य (सहकवी व प्रस्तावना: आचार्य अत्रे, मुखपृष्ठ: श्याम जोशी) (१९५८);
प्रकाशित लेखन : गुंडाच्या तावडीतील सुंदरी (रहस्यमाला, दिवाळी अंक) (१९४६), गुलछबुचा फार्स (तमाशा) (दिवाळी अंकात);
अप्रकाशित : कबुली जबाब, हिरवी माडी, गट्टी फू, मोहनिद्रा.

बांदेकरांच्या विनोदातील स्त्री

बांदेकरांच्या स्त्रीविषयक विनोदाला अजून एक निराळी बाजू आहे. त्यांच्या मनात 'स्त्री'ची एक आदर्श प्रतिमा ठसलेली होती. ही पारंपरिक भारतीय देवतासमान स्त्रीची प्रतिमा होती. या चौकटीत न बसणाऱ्या आधुनिक स्त्रियांची त्यांनी प्रामुख्याने टिंगलटवाळी केली. असे असले तरी देवतेसमान स्त्रीच्या प्रतिमेमुळे स्त्रियांचा होणारा छळ, त्यांना नवऱ्याकडून केली जाणारी मारहाण, स्त्रियांची दुःख-वेदना, हुंडापद्धती याविषयी त्यांनी कळवळ्याने लिहिले. त्यांनी लिहिलेल्या 'लघुलघुत्तम कथां'पैकी एक कथा हा कळवळा स्पष्ट करणारी आहे. नवऱ्याने लाथा मारून बायकोला ठार मारल्याची एक बातमी आली होती, त्या बातमी वरील ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे :

त्याचे दुःख

ट्राम अपघातात एका माणसाचा पाय तुटला. डॉक्टरांनी तो कापून काढला. तेव्हा तो ढळाढळा रडू लागला. नर्स त्याची समजूत घालू लागली. तेव्हा तो म्हणाला, "पाय गेल्याचे मला दुःख नाही, पण आता मी बायकोला लाथ कशी मारू?"

बांदेकरांचे चुटके

दत्तू बांदेकर हे नाव व बांदेकरांचा विनोद आज विस्मरणात गेला आहे, असे म्हटले जात असले तरी ते तितकेसे खरे नाही. बांदेकरांचे विनोद हे आजही ऐकवले ऐकले जातात व ते तितकेच टवटवीत आहेत हेही जाणवते. अनेक जागी ते तुकड्या-तुकड्यांनी चुटक्यांच्या स्वरूपात निनावी छापलेदेखील जातात, पण ते बांदेकरांचे आहेत, हे माहीत नसते; ही गोष्ट दुर्दैवाची. बांदेकरांचे साहित्य उपलब्ध नसणे हे त्याचे प्रमुख कारण असू शकेल. बांदेकरांच्या विनोदाची अशी काही उदाहरणे पाहिली की हे सहज लक्षात येईल :

१. एखादी स्त्री असहायपणे पुरुषाच्या हृदयावर आपले डोके ठेवते, तेव्हा तो देखावा मोठा हास्यास्पद दिसतो; कारण तिला डोके नसते आणि त्याला हृदय नसते.
२. हरवलेली छत्री आपणास परत मिळाली तर आपल्याला आनंद होतो; पण हरवलेली पत्नी परत मिळाली तर?
३. बायको पाळण्यापेक्षा ब्रह्मचर्य पाळणे अधिक खर्चाचे असते.

बांदेकरांच्या लघुलघुत्तम कथा

लघुकथा, लघुनिबंध यांची चलती सुरू झालेल्या काळात या गाजणाऱ्या साहित्यप्रकाराची टवाळी बांदेकरांसारख्या लेखकाने करावी, ही गोष्ट साहजिकच होती. बांदेकरांनी साहित्यविषयक वा साहित्यिकविषयक विनोद फारसा लिहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर, वरील अपवाद मात्र ठसठशीत उठून दिसणारा आहे. लघुकथेसोबत फडक्यांचे नाव येते, हा संदर्भही येथे ध्यानात घ्यावा असा आहे.

लघुकथा-लघुत्तम कथा-लघुलघुत्तम कथा असा कथावाङ्‌मयाचा 'विकास' गृहीत धरून बांदेकरांनी या साहित्यप्रकाराची खिल्ली उडवत 'विनोदी लघुलघुत्तम कथा' लिहिल्या. त्यात काही 'विज्ञानकथा'ही आहेत. त्यांतली ही एक :

मंगळावरील एक शास्त्रज्ञ म्हणाला, "घारोपंत, गेल्या काही दिवसांपूर्वी आम्हाला पृथ्वीवर काळे डाग दिसून आले. काही भयंकर घडामोडी झाल्या काय तिकडे?"
यावर नारोपंत हसून म्हणाले, "छे छे! घाबरण्याचे कारण नाही. तशा काही विशेष घटना घडल्या नाहीत पृथ्वीवर. अहमदाबादेत मोरारजींना काळी निशाणे दाखविण्यात आली."

बांदेकर आणि तमाशा

बांदेकरांच्या लिखाणाला विनोद, वृत्तपत्रीयता यांसोबत वगनाट्य ही तिसरी मिती होती. 'सख्याहरी'च्या प्रस्तावनेत आचार्य अत्रे लिहितात, "बांदेकरांचा सख्याहरी हा लावणी वाङ्‌मयातील सख्याहरीचा गद्य आणि आधुनिक अवतार आहे. तो मुंबईतील मध्यवर्ती मध्यमवर्गीय चाळीत राहतो."

आयुष्याच्या अंतिम पर्वात बांदेकरांना मद्यासोबतच तमाशाचे व्यसन लागले होते. आपला एकुलता एक कोट घालून, नीट भांग पाडून ते हौसेने आपल्या मित्रासमवेत नियमितपणे तमाशा पाहण्यास जात. तमाशाचा आपल्या लिखाणाला उपयोग होतो, असे ते सांगत.

बांदेकरांच्या छोट्या नाटुकल्यांमधील संवाद हे तमाशाच्या ढंगाचे आहेत, हे सहज ध्यानात येते. त्यात कधी तमाशातील सोंगाड्या, मावशी अशी पात्रे आली नाहीत; पण कुठल्याही गोष्टीवर तात्कालिक, मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त करण्याची ताकद, हजरजबाबीपणा, सामान्य माणसाच्या बोलीभाषेचा वापर याचसोबत चावटपणा, अश्लीलतादेखील त्यांच्या विनोदात मुबलक प्रमाणात आढळते. आपल्या विडंबनकाव्यात बांदेकरांनी लावणीचा वापर अनेक जागी केला आहे.

बांदेकरांनी तमाशा हा केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिला नाही आणि केवळ आपल्या लिखाणासाठीच त्याचा वापर करून घेतला, असेही नाही. त्या काळात तमासगीरांची दुःखे बांदेकरांनी शब्दबद्ध केली, त्यांच्या प्रश्नांना वृत्तपत्रांतून वाचा फोडली. बांदेकरांचे हे काम निश्चितच महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय आहे.

दत्तू बांदेकरांचे साप्ताहिकातील सदर लेखन

तो आणि ती (चित्रा), सख्याहरी (चित्रा), आजकालचे गुन्हेगार (चित्रा), रविवारचा मोरावळा (नवयुग), आक्काबाईचा कोंडा (नवयुग), जग ही एक रंगभूमी (नवयुग), घारूअण्णांची चंची (नवयुग)

अनुक्रमांक नियतकालिकाचे नाव प्रकाशन दिनांक लेखक
नवयुग (साप्ताहिक) ११ ऑक्टोबर ५९
वर्ष २०, अंक ३५
आचार्य अत्रे, अनंत काणेकर, पां. वा. गाडगीळ, सोपानदेव चौधरी, अप्पा पेंडसे, कॅप्टन मा. कृ. शिंदे, र. गो. सरदेसाई, शिरीष पै, सुधा अत्रे, लक्ष्मण जाबरे
मनोहर (मासिक) डिसेंबर १९५९ सी. केळुसकर
नवयुग (साप्ताहिक) १ ऑक्टोबर १९६० आचार्य अत्रे
नवयुग (साप्ताहिक) २५ ऑक्टोबर १९६० आचार्य अत्रे
मराठा (दैनिक) ४ ऑक्टोबर १९६२ आचार्य अत्रे
ललित (मासिक) दिवाळी १९६६ अनंत काणेकर
बालकमंदिर (मासिक) डिसेंबर १९६८ श्रीनाथ परळकर
ललित (मासिक) ऑक्टोबर १९७५ मो. ग. रांगणेकर
मराठा (दैनिक) ५ ऑक्टोबर १९७५ पां. वा. गाडगीळ
१० मराठा (दैनिक) ५ ऑक्टोबर १९७५ अप्पा पेंडसे
११ नवशक्ती (दैनिक) ५ ऑक्टोबर १९७५ अरुण बांदेकर
१२ नवशक्ती (दैनिक) २१ नोव्हेंबर १९८२ रमेश ठाकरे
१३ वसंत (मासिक) दिवाळी १९८३ भालचंद्र फडके
१४ मुंबई सकाळ (दैनिक) ३० सप्टेंबर १९८४ मनोहर केळुसकर
१५ सामना (दैनिक) १० फेब्रुवारी १९९१ अच्युत तारी
१६ नवाकाळ (दैनिक) १३ ऑक्टोबर १९९३ अग्रलेख (नीलकंठ खाडिलकर)
विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

दत्तू बांदेकर हे नाव नुसतं ऐकलं होतं. यांच्याबद्दल घंटा काऽहीही माहिती नव्हती. असा जबरदस्त विस्तृत परिचय करून दिल्याबद्दल कै(!!). कविता महाजन यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. शिवाय तत्कालीन राजकीय संस्कृतीवरही उत्तम भाष्य या निमित्ताने झाले आहे. लेख खूप आवडला.

महाजनांबद्दलही विशेष माहिती काहीच नाही- एक प्रसिद्ध लेखिका यापलीकडे. पण या लेखातून त्यांचा अभ्यासूपणा अगदी पुरेपूर दिसतो. इत:पर त्यांच्याकडून असे काही वाचायला मिळणार नाही ही जाणीवही खिन्न करणारीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कविताचा हा शेवटचाच लेख असेल... किती सखोल संदर्भ घेऊन लिहिला आहे. दत्तू बांदेकर म्हटलं की वाचकांना आता हा लेखही आठवेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दत्तू बांदेकर म्हटलं की वाचकांना आता हा लेखही आठवेल.
-- नक्कीच.
कविता महाजनांचं अकाली जाणं खरंच चटका लावून गेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांगोपांग आणि तरी सहज ओघ असलेला लेख. बांदेकरांविषयी किंचितच माहीत होते. एखाद्या व्यक्तीचं लेखन राजकीय, सामाजिक, वाङ्मयीन, ऐतिहासिक, मानवी अशा अनेकविध कोनांतून इतक्या बारकाव्यांनिशी सांगणं कठीण. आभार!
--
सूक्ष्म, संशोधक दृष्टीने पाहिले तर आजच्या ललित निबंधाचे मूळही त्यांच्या लेखनात आढळून येईल," असे वि. स. खांडेकर लिहितात. परंतु हा विचार ध्यानात न घेता १९२५ आधीचे व १९२५नंतर निबंधवाङ्‌मय प्रकार ठरविला गेला.
...ह्यातल्या दुसऱ्या वाक्याचा अर्थ लागला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच सुमारास १९२५नंतर 'लघुनिबंध' या वाङ्‌मयप्रकाराचा उगम झाला. (मूळ लेखात, आधीच्या परिच्छेदातून). त्याचा अर्थ मी तिथे लावण्याचा प्रयत्न केला. ते फार समजलं असं नाही; मात्र आता अर्थ विचारणार कोणाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.