या लोकगीतांचे करावे तरी काय?

संकल्पना

या लोकगीतांचे करावे तरी काय?

- स्वामी संकेतानंद

वांशिक विनोद... नक्को!
जातीय विनोद... नक्को!
वैयक्तिक हल्ले करणारे विनोद.... नक्को!
दुखावणारे विनोद...नक्को!

ह्या नकारघंटा ठणाणा वाजण्याच्या आताच्या काळात पारंपरिक लोकगीते गातानाच नव्हे, तर ऐकतानाही मला अवघडल्यासारखे होते. (आमच्या पिढीचे ब्रेन वॉशले गेले हो!) ही गीते रचताना कुणी कुणाच्या भावना दुखावण्याचा विचार अजिबात केला नाही की काय, असे वाटून जाते. ही गीते रचली गेली तो काळ म्हणजे कसलाही कुजकटपणा, हलकटपणा "चकल्लस करून रायलो जी! हॅहॅहॅ!!!" म्हणत खपवण्याचा तो सुवर्णकाळ होता. याचा उत्कर्ष लग्नात गायल्या जाणाऱ्या गीतांमध्ये दिसून येतो. प्रत्येक विधीप्रसंगी एखादे गीत गायले जाते, आणि त्या गीताला चेष्टेची एक किनार असतेच. (बिदाईछाप गंभीर प्रसंग वगळून.)

महाराष्ट्राच्या पूर्व टोकाला असलेले दोन जिल्हे म्हणजे भंडारा आणि गोंदिया आणि वर मध्य प्रदेशात असलेल्या बालाघाट आणि सिवनी जिल्ह्यांमध्ये पोवार (मराठीत) किंवा पंवार (हिंदीत) जातीची स्वतंत्र संस्कृती आणि बोलीभाषा आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वी राजस्थान-गुजरात-मध्यप्रदेश या सीमाप्रदेशातून स्थलांतर करून महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगढ या सीमाप्रदेशात स्थलांतर करून आलेल्या पवारांच्या रूढी-परंपरा-सणवार आणि बोलीभाषेत कायमच सांस्कृतिक सरमिसळ होत राहिली आहे आहे. मूळ बोलीवर स्थलांतरानंतर स्थानिक मराठीच्या बोलीचा-झाडीबोलीचा, उत्तरेकडील बाघेलीचा आणि पूर्वेकडील छत्तीसगढीचा प्रभाव पडला. चालीरीतींबद्दल बोलायचे तर काही रीतीभाती सोडून दिल्या आणि काही धरून ठेवल्या. यातही पंवार समाज दोन राज्यांत विभागला गेल्याने आणि दोन्ही राज्यांच्या प्रगतीचा वेग वेगळा राहिल्याने विचारांतही फरक पडला. शाहू-फुले-आंबेडकरांच्या 'क्लिशेड' पुरोगामी महाराष्ट्रात राहण्याचा, शिक्षण घेण्याचा नाही म्हटले तरी लोकांच्या विचारसरणीवर मोठा फरक पडला आहे. कित्येक परंपरा महाराष्ट्रातील पोवारांकडून तत्परतेने त्यागल्या गेल्या; उदाहरणार्थ, लग्नाआधी कालीमातेला बोकडाचा बळी देणे, पडदाप्रथा, बालविवाह, वगैरे. सुधारणेचे वारे सीमेपलीकडे पोचायला तुलनेने जास्त वेळ लागला. आमची पिढी, म्हणजे 'मिलेनियल जनरेशन'तर लहानपणीच शिकायला शहरात जाऊ लागली होती, इंटरनेट हाताळू लागली होती, चार पुस्तके वाचू लागली होती. लैंगिक संवेदनशीलता, वांशिक विनोद, असंवेदनशील विनोद वगैरे आता साठीत असलेल्या पिढीला ठाऊक नसलेल्या संकल्पना कळू लागल्या होत्या. पण याचा अर्थ मिलेनियल जनरेशनच्या सगळ्याच तरुण-तरुणींना हे कळत होते असे नाही. ग्रामीण-शहरी, सीमेच्या अलीकडे-पलीकडे हा मोठा भेद असल्याने एकाच पिढीच्या काही लोकांना ही गीते गावीशी वाटतात. काही 'दस्तूर' काही घरांमध्ये अजूनही साजरे होतात आणि काहींनी त्यांना कायमची मूठमाती दिलीये. सीमेअलीकडे-पलीकडे रोटीबेटी व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने एकाच लग्नातील एका घरात अमुक 'दस्तूर' होत आहे आणि दुसऱ्या घरात तो विधी केला जात नाहीये, असे हमखास बघायला मिळते. आणि दस्तूर म्हटला की गाणे आलेच. इथेही अमुक घरात विशिष्ट गाणी टाळली जात आहेत आणि अमुक घरात तीच गाणी उत्साहाने गायली जात आहेत; हेदेखील नेहमीचेच दृश्य. आपली मानसिक घडण वेगळी असल्याने अशा प्रसंगी या गीतांचा आस्वाद घ्यायचा की अवघडून ऐकत बसायचे हे कळत नाही. आणि आपल्या लग्नात यातलं काय उचलायचं आणि काय टाकायचं, या विचाराने हैराण होऊन विधीवत लग्नाचाच विचार टाकावासा वाटतो!

पहिलाच विधी घ्या. लग्नाचे मांडव उभारणे. आम्ही याला 'मांडो सुताई को दस्तूर' म्हणतो. तर याप्रसंगी गायल्या जाणाऱ्या गाण्याचं टार्गेट असतं हा 'दस्तूर' करणारा माणूस - जावई! गीताचे दुसरे कडवे बघा,
जवाई (त्याचे नाव) मांडो सुतं से
सूत गोईता(गोवता) जवाईबापू तुमरो सेला(शेला) घोरं से(घरंगळतोय)
तोरन गोईना जवाईबापू तुमरो कास्टो(धोतर) सुटं से

पण ह्यातली मस्करी तरी मर्यादित आहे. कदाचित जावई नाराज झाला तर निस्तरताना नाकी नऊ येतील या भीतीने गीतकाराने फार काही लिहिले नसेल.

पुढची टार्गेट वर/वधूची आत्या असते. 'कुम्हारीन दस्तूर' या विधीत वर/वधूची आत्या कुंभारीण बनून अईग (झाकण असलेले मातीचे लहानसे मडके) घरच्या सदस्यांना विकते. हे गीत पाहा, या गीतात अईग विकत घेण्यास आतुर बाया तिला बोल लावतात...

आमरं अईगला काहे भयो उसीर? (आमच्या अईगला उशीर का झाला?)
कुम्हारीन बाईला, गड़ से कुसीर! (कुंभारीणबाईला कुशीर (कुसळ) रुततो)

आमरं गाव की, कारी माती (आमच्या गावची काळी माती)
कुम्हारीन बाईला, लिजासे खाती (कुंभारीण बाईला लोहार नेतो)

आमरं गाव की, गोटा की चट्टान (दगडी टेकडी)
कुम्हारीन बाईला, लिजासे पठान

हे असं काहीतरी यमक जोडून प्रत्येक कडव्यात त्या बाईला कोणीतरी उचलून नेतो, वगैरे मस्करी अईग संपेपर्यंत चालत राहते. आत्या बोलूनचालून माहेरीच आलेली असते, तर तिच्या चेष्टेला अंत नसतो.

लग्न लागलं, नवरी नवऱ्याघरी आली. याप्रसंगी नाचणेगाणेबजावणे होत असते. आमच्या भागात परंपरेने वाद्य वाजवण्याचे काम 'होली' या जमातीचे असते. तर या होली जमातीच्या वादकांना हास्यविनोदात सामील करून घेतले जाते. हे गाणे नवरीच्या मैत्रिणी, करवल्या वगैरे मैत्रिणीची थट्टा करायला गातात.

बजाव बजाव बाजा रे होल्या, बजाव नाना परी। (वाजव वाजव वाजा रे होल्या, वाजव नाना परीने)
तोला देबिन रे होल्या, (नवरीचे नाव) सरीखी घोडी॥ (तुला या नवरीसारखी घोडी देऊ)

बजाव गा बजाव गा, होल्या तोरो बाजा।
तोला देबिन रे होल्या, या छमछम घोडी॥

नवरीसरीखी नही भेटे बायको तोला (नवरीसारखी बायको तुला या जन्मात मिळणार नाही)
येनं जनम मा गा, येनं जनम मा
तोला देबिन रे होल्या, या पवारिन टुरी (तेव्हा तुला आम्ही ही पवाराची मुलगीच देऊ)

व्याहीविहीणींचा मस्करीच्या/विनोदाच्या निमित्ताने अपमान करणे हा तर अखिल भारतीय छंद आहे. त्यातही मुलाचे आईवडील मुलीच्या आईवडलांवर विनोद म्हणून काहीही खपवत असत. (उलट दिशेने आलेला मात्र विनोद वर्मी बसत असे.) उदाहरणार्थ ही दोन गीते पाहा.

जामुरी को पान, राखड़ को चूना (जांभळीचे पान, राखेचा चूना)
माटी की काथ, गोटा की सुपारी (मातीची काथ, दगडांची सुपारी)
नवरी को बाप भिकारी
पान नहीं पुऱ्या, पान मांगं से उधारी ((तरी) पान पुरले नाहीत, पानं उधारी मागतोय)

से नवरदेव को बाप औध्यार बाई (नवरदेवाचा बाई उदार आहे)
पान भरभर दे से उधारी (भरपूर पाने उधार देतो)
पड्यौ नवरी को बापदून
नवरदेव को बाप भारी (नवरीच्या बापापेक्षा नवरदेवाचा बाप भारी पडला)

या गीतातून केलेली मस्करी विनोद म्हणून तरी कशी चालवून घेत असावेत?

दुसऱ्या गीतात मुलीच्या आईने विहीणीला टोमणे मारले आहेत. अतिशय श्रीमंत कुटुंबात आपण आपली पोरगी दिली, पण तिच्या सासूने माझ्या पोरीला दागिने करून दिले नाहीत, ही तक्रार इथे दिसते. (आमच्या ज्ञातीत लग्नात मुलीचे दागिने, कपडे हा खर्च मुलाकडच्यांनी करायचा असतो. मुलाचा खर्च मुलीकडचे करतात.)

डोंगर परं की डोंगरोली, वहान सोनोली को झाड
वहान देयो बाईला, पर वहान पड्यो सोनो को अकाल
यनं दारीन समधिन बाईला, देय देहो सोनो उधार
देय देहो सोनो उधार, सोनार बनाहे पचरंगी हार

(डोंगरावर डोंगरोली गाव आहे, तिथे सोन्याचे झाड आहे
तिथे मी पोरीला दिले, पण तिथेच सोन्याचा दुष्काळ पडला
या विहीण बाईला कुणी सोने उधार द्या (दारी ही बायांची बायांकरिता वापरली जाणारी आवडती शिवी आहे.)
म्हणजे सोनार (माझ्या लेकीकरिता) पंचरंगी हार बनवून देईल.)

करवल्यांचे नटणेमुरडणेही मस्करीचा विषय बनतो,
टवरी की बात बुझं से त बुझन देहो (पणतीची वात विझते तर विझू द्या)
नवरा भूको रवं से त रवन देहो (नवरा उपाशी राहतो तर राहू द्या)
टुरु रोवं सेती त रोवन देहो (पोरं रडतात तर रडू द्या)
पर मोरो सिनगार होवन देहो (पण माझा शृंगार होऊ द्या)
बाई, मी करोलिन जासू (बाई, मी करवली जाते)
यव आरसाफनी ठेव देहो (हे आरसाफणी ठेवून द्या)

तर अशी ही लग्नाची गाणी. २-३ दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा एकेक टप्पा म्हणजे कुणाचा तरी अपमान करायला, मस्करी करायला, स्वभावावर टोमणे मारायला, जातीय विनोद करायला आंदण मिळाले असते. कुणाच्या भावनांचा विचार वगैरे न करता लिहिली गेलेली ही गाणी असंवेदनशील मनाची विकृती म्हणावी की मुक्त विचारस्वातंत्र्याचा आविष्कार म्हणावा? चारचौघांत निर्धास्तपणे ही गाणी गाणारी पिढी विनोदाचे खरा आस्वाद घेणारी; की 'अमुक विनोदाने कुणाच्या भावना तर दुखावणार नाहीत ना?', 'हा पॉलिटिकली करेक्ट आहे ना?', 'राडा तर होणार नाही ना?' या सगळ्या चाळणीवाटे बाहेर पडलेला विनोद तोच खरा विनोद म्हणणारी सध्याची पिढी? विनोदी कविता, विडंबने लिहिताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतोच, पण एखादी साधी चारोळी लिहितानाही हा विचार नकळत केला जातो. माझ्या आईच्या काकीने तिच्या मुलीच्या सासुरवासावर टिप्पणी करताना लिहिले होते, "काया गोंडिणीची झाली लेकीची माझ्या"... माझी मुलगी काळी पडली, हे सांगायला तिचा रंग एखाद्या गोंड मुलीसारखा झाला, ही उत्प्रेक्षा चटकन तिला वापरता आली खरे. आता हे लिहिताना स्टिरिओटायपिंग, जातीवाद वगैरे मुद्दे डोक्यात येतात. आता काकी असती तर तिने कदाचित "काया कोळशाची झाली लेकीची माझ्या" असे लिहून तोडगा काढला असता.

जेव्हा मी एखाद्या लग्नसमारंभाला हजेरी लावतो; विविध टप्प्यावर ही गाणी ऐकतो; आणि कोणालाही यात काही वावगे वाटत नाही हे लक्षात येते; तेव्हा या लोकांचे संवेदीकरण करावे की नको, असा एक प्रश्न मला गोंधळात पाडतो. यांच्या ज्ञानात भर पाडून यांचे विनोदाचे हे चार क्षणही हिरावून घ्यावे का? की 'गर्व से कहो हम ऑफ़ेण्ड करते है' म्हणत मीदेखील चेष्टामस्करी - असंवेदनशील विनोदांच्या मैफिलीत रंगून जावे? की नवी सगळ्यांच्या संवेदनांचा विचार करून नवी गाणी लिहून लोकप्रिय करावीत? की शहरीकरणाच्या, स्थलांतराच्या, आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांच्या रेट्यात ही सगळी लोकगीते आपोआप काळाच्या उदरात गडप होण्याची वाट पाहावी? या लोकगीतांचे करावे तरी काय?

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

स्वामीजी, एक नंबर लेख! तुमच्याकडल्या लोकगीतांबद्दल उत्सुकता अजूनच वाढलेली आहे आता. अजून काही सँपल्स ॲडवा नंतर वेळ मिळेल तशी.

बाकी तुम्ही म्हणता ते पटलं. जुन्या काळची ही मोकळीढाकळी गाणी आणि त्यांच्या सभोवतालचा तसाच मोकळा समाज (भेदाभेदांसकट) बरा की सध्याचे पीसी कल्चर बरे? हा प्रश्न खरेच अवघड आहे आणि त्याचे सहज उत्तर बहुतेक कुणाकडेही नसेल. वैयक्तिक मला वाटते त्यानुसार पूर्वी समाजमनाचा लंबक एका टोकाला होता. आता दुसऱ्या टोकाला गेलाय किंवा जातोय. ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय स्थिरता येणार नाही....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पिसी कल्चरबद्द्ल फार चांगले मत नाही. तुमचा लेख आवडला स्वामिजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कोणे एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला
त्याने एक उंबर तोडले बाई उंबर तोडले
सईच्या दारात नेऊन टाकले बाई नेऊन टाकले
सईने उचलून घरात आणले बाई घरात आणले
कांडून कांडून राळा केला बाई राळा केला
राळा घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली
त्याच पैशाची घागर आणली बाई घागर आणली
घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली
उजव्या हाताला मधल्याच बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला
आणा माझ्या सासरचा वैद्य
अंगात अंगरखा फाटका-तुटका
डोक्याला पागोटे फाटके-तुटके
पायात वहाणा फाटक्या-तुटक्या
कपाळी टिळा शेणाचा
तोंडात विडा घाणेरडा किडा
हातात काठी जळकं लाकूड
दिसतो कसा बाई भिकार्‍यावाणी बाई भिकार्‍यावाणी

आणा माझ्या माहेरचा वैद्य
अंगात अंगरखा भरजरी
डोक्याला पागोटे भरजरी
पायात वहाणा कोल्हापूरी
कपाळी टिळा चंदनाचा
तोंडात विडा केशराचा
हातात काठी चंदनाची
दिसतो कसाबाई राजावाणी बाई राजावाणी

हे भोंडल्याचं गाणं आठवलं. माझं माहेर किती श्रीमंत होतं आणि सासर कसलं दळिद्री आहे हे खुलवून खुलवून सांगणारं.

यातही मूळ गाण्यात 'दिसतो कसा बाई म्हारावाणी बाई म्हारावाणी' असे शब्द आहेत. ऐशीच्या दशकात शांता शेळकेंनी संकलन करून दूरदर्शनवर ही गाणी सादर झाली होती. तिथेच ते शब्द बदलून 'भिकार्यावाणी' झालेले होते. त्याबद्दल एक माफक वादही झाला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहेरचं कवतिक गायला माहेरच कुठं उरलय?
लवकर लग्न झालेल्या मुलींचे लहान मोठे भाऊ कौतुक करत. त्यांचं लग्न होऊन नणंद आली की माहेर संपतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शहरी आणि तरुण लोकांचा विचार करता सासरतरी कुठे उरलंय? लग्न करणारे लोकही नोकऱ्या करण्यासाठी भलत्या शहरांत जाऊन राहतात. दोन्ही बाजूंचे सासू-सासरे मुलांच्या घरी जाऊन राहतात.

स्वामी, लेख आवडला. एकेकाळी गोष्टी कशा पद्धतीनं चालत आणि काळानुसार त्या कशा बदलल्या या नोंदी होणं महत्त्वाचं आहेच. तेवढीच माहिती आली तर तो विकिपीडीया बनतो. तुझ्या त्यामुळे काय विचार चालतो, बदलांचा तुझ्यावर व्यक्ती म्हणून काय-कसा परिणाम होतो, ते वाचायला आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.