शाईचा ढब्बा आन् बारमाही मोगरा

ललित

शाईचा ढब्बा आन् बारमाही मोगरा

- बब्रूवान रुद्रकंठावार

तं यकदिशी सभागती गावाकडचा सब्जेक्ट निंगला आन् दोस्तानं डायरेक्ट तिथंल्ली लव्हस्टोरीच स्टार्ट केली.
‘सकाळच्याला निंगालं की यक आडवी, दुसरी हुभी आन् तिसरी पुन्यांदा आडवी गल्ली आसं करून गावाभायेर आलं की, यक वखार लागायची; तिथनं दोन रस्ते फुटायचे. यक बायांसाठी व्हता आन् दुसरा बाप्प्यांसाठी. त्याच टर्नवर यक लव्ह स्टोरी प्रायमरी लेव्हलला स्टार्ट झाली. पैल्यांदा यकदा भल्या सकाळी दोगंबी नेमकं यकाच टायमाला त्या टर्नवर आले व्हते, तवा बाकी कुनीच नव्हतं. विदीन सेकंद दोगं दोन दिशेनं निंगूनबी गेले. म्हैनाभरानं यकदा त्यो परत येत व्हता आन् ती चाल्ली व्हती, तवा हालक्या डोळ्यांनी त्यांची नजरानजर झालती. आजूक आसाच कवाकवा टाईम जुळून येत गेला आन् नंतरच्याला त्यो जुळवन्यात येवू लागला. नजरानजर व्हायची बस्स! त्यो आडव्या गल्लीतून यायचा. ती हुभ्या गल्लीतून. त्यो आधी निंगायचा, तिची गल्ली वलांडताना त्याची धडधड वाडायची. त्यो पुडं धकत न्हाई की, त्याला मागनं झपझप आवाज यायचा. बस्स, टर्नवर नजरानजर झाली की, दिवस संपून जायचा.

गावात पुडं पान्याचे जराशेक वांदे झाले. गावातले दोनपाच आड आटून गेले आन् दोनपाच आडं पान्याचे ऱ्हायले. हुभ्या गल्लीतल्या शेवटाचा आड पान्याचा व्हता. आडव्या गल्लीमंदून मंग त्यो पानी शेंदायला तिथं जायचा. बायामान्सांचा तिथंबी गर्दा आसायचा; पन दुपारच्याला आड सुस्तावलेला ऱ्हायचा. हुकून चुकूनच कुनीतरी यायचं. त्याच आडावर. तिथंच पानी भरता भरता ही लव्ह स्टोरी जराशीक पुडं धकली. फुलत गेली. नजरेला नजर, कवा चऱ्हाटाला चऱ्हाट, आडातल्या आडात पव्हऱ्या पव्हऱ्यातली मस्करी. बस्स!

नंतर मंग पान्यापावसाचे दिवस आले. पावूस पडला. नद्यानाले वाहू लागले. दिवस आशेच सरत गेले. तवाच कवातरी रानातून परतताना नदीच्या वळणावर आशीच नजरानजर झाली. दोनपाच बायासंगं ती लगबगीनं निंगाली व्हती. त्योबी रानातून परतत व्हता. पुडच्या पंधरवड्यात मंग कवा मागं कवा पुडं, कवा आधी कवा नंतर अशा हुलकाण्या देत यकदोनदा यकांत पकडन्याची कोशीशबी झाली. सांजच्याला ते जमलं न्हाई; पन दुपारच्याला जमू शकतं ह्याचा आंदाजा आला. तिच्या रानापास्नं नदी वलांडली की, त्याचं रान. तं मंग तिथंबी गाठभेट झाली. तीनेकदा स्पर्श झाला.

तं काय की, नंतरच्याला काय झालं म्हाईती न्हाई; पन सारं फिसकटून गेलं. पावसाळी किड्यावानी खेळ आटपून गेला. कुनीतरी म्हनालं, त्यांची लव्हस्टोरी तिन्हीसांजेला वाहात आली आन् नदीपात्रातल्या उन्हाळी गड्ड्यात गढूळ व्हवून आटून गेली.’

---

दोस्ताची स्टोरी जबरा व्हती; पन सिच्युएशन जुनाट व्हती. त्यात फुकाच लांबण व्हतं. सांप्रतला पान्यापावसावर कुठं डिपेंड आस्तेत का लव्हस्टोऱ्या? यवडा टाईम कुनालाहे? म्या तसं म्हन्लं, तं त्यो भनकला. म्हन्ला,
‘बबऱ्या, आशा गोष्टीन्ला काळाच्या चौकटीमंदी बशवीत नस्तेत. हिणवीत नस्तेत. त्यान्ला झिडकारन्याचं पाप करूने.’
‘दोस्ता, म्या यापैकी कायबी केलेलं न्हाई. बॅग्राऊंड जुन्या काळातलं वाटलं म्हनून इचारलं.’
‘त्याच्यात जुनं कायहे?’
‘दोस्ता, सांप्रतला आडावर बायांचा आन् झाडावर पाखरांचा थवा पैल्यावानी ऱ्हायलेला न्हाईहे. कलकलाट खबदाडात आन् किलबिलाट आभाळात गेलाहे. आडं आटून आन् झाडं वठून गेलेहेत. ही स्टोरी सांप्रतची आसंनच कशी?’
माझ्या स्टेटमेंटवर दोस्त जरासंक इमोशनल झाला; पन त्यानं लागलीच सोताला सावरलं आन् म्हन्ला,
‘काळानुसार सीन तं बदलनारच ना बबऱ्या; पन नायक-नायिकाची हुरहुर सेम आस्ती.’
‘दोस्ता, कुनाचीहे ही स्टोरी?’
‘बबऱ्या, त्यात आमूक यक कुनी नस्तो. त्याला पर्टीक्युलर नाव नस्तं. कवाकवा नावामुळं स्टोऱ्या नासून जातेत. त्यान्ला न्हाय न्हाय ते अँगल येत ऱ्हातेत. बस्स, निस्ती स्टोरी ऱ्हावू द्यावी, त्यातलं लव्ह शाबीत ऱ्हातं.’
‘बरं, त्यांचं पुडं काय झालं ते तरी सांगशील का?’
‘बबऱ्या, सपोज म्या म्हन्लं, त्यो पंचायत समितीमंदी कारकूनै आन् ती किराणावाल्याची बायकोहे तं...?’
‘तं?’
‘तं थुतरीच्या, माझ्या स्टोरीचं वांगं वासंल ना. म्या यक पिव्वर लव्हस्टोरी सांगून ऱ्हायलोहे. तुला त्यांची आयडेंटीटी कामून पायजेल. आशानं यखांद्या स्टोरीचा सारा नासाडा उदास व्हवून जातो ना बबऱ्या. यकदा आशा स्टोऱ्यांना काळ नस्तो म्हन्लं की त्याच्यातले नावं, त्यांचे कामधंदे अ‍ॅटोमॅटिक डिलीट व्हतेत ना. तुला कळंत कसं न्हाई.’
‘काळ न्हाई, नावं न्हाई, त्यांचे कामधंदे न्हाई, तं मंग ती लव्हस्टोरी फुलंल कशी? पुढं धकंल कशी?’
‘बसा मंग तुमी त्यांचे लेकरंबाळ मोजीत. त्यांचे बारशे करीत. काळाच्या कसोटीमंदी मंग तुमची स्टोरीच डिलीट व्हवून बसती. तिला इमॉर्टल ठिवायची आसंन तं बाकीच्या फंदात बिलकुल पडूने मान्सानं.’
‘बरंभौ, ठिकै. तुझ्या साऱ्या गोष्टी खऱ्या. आता ह्या करंट सिच्युएशनला म्या काय करावं आसं तुला वाटतं? म्या नेमकं कसं रिअ‍ॅक्ट व्हावं?’
म्या सपशेल सरेंडर झालो तसा दोस्ताचा पिसारा गळाल्यावानी झाला. त्यानं गपकन पॉजच घेतला. मुक्यावानी माझ्याकडं जरा टाईम बगत बसला. नंतरच्याला माझ्या खांद्यावर हात ठिवीत म्हन्ला,
‘बबऱ्या, लव्हस्टोऱ्यांच्या बाबतीत लैच प्रायमरी लेव्हलवर हायेस राव तू. ह्या वयातबी तुला मॅच्युरिटी नसावी म्हंजे गंमत वाटती मला.’
‘कशावरनं म्हन्तोस दोस्ता?’
‘बबऱ्या, आनुभवी मान्साला थीममंदी इंटरेस्ट आस्तो. चेहऱ्यामंदी ते बिलकुलच इंटरेस्ट दाखवीत न्हाईत.’
‘दोस्ता, मान्साला उत्सुकता आसू शकती.’
‘त्याला कुत्सुकता म्हन्तेत बबऱ्या. स्टोऱ्यांत फिगर बसवल्या की, थीम संपून जाती आन् गॉसीप जन्माला येत आस्तं. गॉसीप हे लूज टॉकिंगचं रॉ मटेरियल आस्तं. इन द सेन्स, मानूस ज्याला उत्सुकता म्हनून आपली खाज उघडी करतो, ती खरं तं कुत्सुकता आस्ती. आडा-झाडाच्या आडून किमान तू तरी त्यात शिरू नगोस.’

दोस्तानं लैच उचलून हाण्ला व्हता. माझं पानीपानी झालं. फुकनीच्याची कॉन्फीडन्स लेव्हल आज जबरा वाडलेली व्हती. त्याला कायबाय डायलॉग सुचायला लागले व्हते; पन ह्याचा आर्थ म्या काय यवडा जायेल मानूस व्हतो काय? यखांद्या मान्साला यवडंबी अंडरइस्टीमेट करूने. जुळलेल्या आन् तुटलेल्या लव्हस्टोऱ्या प्रत्येकालाच कुठंना कुठं भेटत आस्तेतच. त्यातून त्यो शहाणा व्हत आस्तोच. शिवाय त्याचीबी यखांदी स्टोरी आसू शकती ना. नस्तीच आसं ग्रहितमंदी धरनं बरं नस्तं. म्या गप -हायलेलो बगून दोस्त म्हन्ला,
‘बबऱ्या तू कंदी पडला न्हाईस का आशा भानगडीत?’
‘कोन्त्या? कसल्या?’
‘हेच लव्हबिव्ह एक्सेट्रा...’
‘गंज पडलो; पन इचारतो कोन?’
‘तुझ्यावानी साऱ्याच पोरांचा त्यो युनिव्हर्सल प्रॉब्लेमै. पन म्हनून कुनी कोशीश करीत न्हाई आसं कंदी व्हत न्हाई. कायतरी झटतोच मानूस.’
‘झटलो व्हतो म्या पन.’
‘काय म्हन्तो? तुझंबी मन लागलं व्हतं कुठं...?’
‘व्हतं ना. शाळातली गोष्टै. दगडाच्या भिंती, पत्र्याचं छप्पर, म्होरं गुलमोहोर फुललेला. त्याच्या खोडाला म्हैस, व्हरांडा शेणानं सारवलेला. खिडकीमंदून लांबपत्तोर हिरवंकंच. शेवटाला डोंगर. डोंगरावर मंदीर. आभाळाचं दुसरं टोक मंदिराच्या कळसाला ताणलेलं.
म्या बसायचो त्याच्या एक्झ्याक्ट आपोजिट, पैला सोडून दुसरा बेंच. तिची जागा डाव्या कोपऱ्यात. बेंचवर शाईचा ढब्बा. त्याच्या बाजूला करकटकनं कायबाय कोरलेलं. शाईचे ओघोळ घुसून त्याचा टॅटू झालेला. क्लास सुटला, ती गेली की, दुनियाभरचा सन्नाटा आंगावर धावून यायचा. एम्प्टी क्लासमंदी म्या सुन्न बसून ऱ्हायचो. निंगता निंगता बेंचाभवती घुटमळायचो. पाठमोरा हुभा ऱ्हावून त्याला टच करायचो. न बगता भायेर पडायचो. तुला सांगतो दोस्ता, त्या शाईच्या ढब्ब्यातून बारमाही मोगऱ्याचा वास सुटायचा. माझा पाठलाग करायचा. त्याला म्या छातीत फुल्ल भरून घ्यायचो आन् रातभर पुरवत ऱ्हायचो.’
‘मंग पुडं? पुडं काय झालं?’
‘तिनं शाळा सोडली.’
‘आन् तू फेल. ही रेग्युलरची स्टोरीहे.’
‘म्या फेल न्हाई झालो.’
‘मंग ती फेल झाली?’
‘तसंबी न्हाई.’
‘बापानं तिला उजवून टाकली.’
‘तसंबी न्हाई.’
‘मंग?’
‘फुकनीच्या धाव्वीनंतर कुनी शाळात ऱ्हातं काय?’
‘म्हंजे ऐन धाव्वीतला पराक्रमै का ह्यो तुझा?’
‘तुझा कोन्त्या क्लासमंदला व्हता दोस्ता?’

---

माझ्या प्रश्नावर दोस्त हास्ला; पन त्यानं त्याचं उत्तर दिलं न्हाई. ल्हान आस्तानाच्या लव्हस्टोरीचे धनी लैच मॅच्युअर आस्तेत. त्यांची फिलॉसॉफी प्रॅक्टीकल लेव्हलला लै स्ट्राँग आस्ती. टायमावर चुप्पी साधन्यात आन् तिसरीकडं घुसन्यात ते माहीर आस्तेत. त्यानं आताबी तिसरंच सुरू केलं. म्हन्ला,
‘बबऱ्या, परवाच्याला गावाकडं गेल्तो. शाळा खोल्याचं काम बगायला. तुझी लै आठवन झाली. मंग हाटकून आपल्या क्लासमंदी गेलो. फुकनीचा त्यो क्लास आजूकबी जसाच्या तसाचै. आपल्या ड्रॉइंगच्या मास्तरांनी भिंतीवर ल्हेलेले सुविचारबी तशेच हायेत. ‘जेथे नाही जिव्हाळा, ती नव्हेच शाळा’ मधला जिव्हाळा गळक्या पत्र्यानं गाळून टाकलाहे. ‘प्रयत्ने वाळूचे...’ मधल्या नेमक्या वाळूवर प्लॅस्टरचा पॅच मारलाहे. बाकीचे आक्षरंबी कुठंकुठं फेंट झालेत; पन शिलकीत हायेत. मास्तर मात्र मागल्या सालीच गेले. पोरींच्या खिडकीची यक काच तडकली व्हती बग, ती आता कंप्लीट फुटून गेलीहे. फळ्याला मात्र नव्यानं काळं फासलंय. त्याच्यावरला खडू लैच गॉडी दिस्तो, आंगावर येतो. मागंल्या बाकड्यापास्ली यक फरशी उखडली व्हती बग, तिथं पाय आटकून शिऱ्या त्वोंडावर पडला व्हता, ती तं आजूक तशीचै, तिची लागण तिसऱ्या रांगेपत्तोर गेलीहे.’
‘च्यायला, शाळावाल्यांनी कायबी चेंज केला न्हाई?’
‘बबऱ्या, झेडपीची शाळाहे ती, प्रायव्हेट न्हाई.’
‘तुझ्यासारख्यानं इनिशिटिव्ह घेतलं पायजेल दोस्ता.’
‘म्हनून तं गेल्तो ना फुकनीच्या.’
‘तं मंग झालं का काई काम?’
‘ते व्हत ऱ्हाईल बबऱ्या. म्या यवडं सांगून ऱ्हायलोहे; पन क्लासमंदल्या बेंचाचं तू कायबी इचारलं न्हाईस.’
‘तेबी आजूक तशेचैत काय? उचकलेल्या खिळ्यासगट? मायला लै स्टुडंटच्या चड्ड्या फाटल्या आस्तीन राव यवड्या वर्षात. आपल्याच क्लासमंदी धाबारा जणांच्या फाटल्या व्हत्या. आतापत्तोर तं कितीक झाल्या आस्तीन.’
‘बबऱ्या, त्यो तुझा नाजूक बेंचबी आजूक तसाचै.’
‘काय म्हन्तो?’
‘त्याच्यावरला शाईचा ढब्बाबी आजूक ताजाचै.’
‘कायबी म्हन्तोस दोस्ता.’
‘खरं सांगून ऱ्हायलोय बब-या, आयशपथ!’
‘तेवडा बेंच बरा ध्यानात ऱ्हायला तुझ्या?’
‘बबऱ्या, म्या क्लासमंदी हुभा ऱ्हावून सुविचार वाचत व्हतो. तेवड्यात हेडमास्तरानं मला उखडलेल्या फरशा दाखवल्या. यका बेंचावर हात टेकून म्या आंदाजा घेत व्हतो. नंतरच्याला वळावं म्हनून हात काढला तं पंजाखाली त्यो ढब्बा दिसला. म्या डचकलोच. तुझ्या ढब्ब्याला हात लावल्याचं गिल्टबी वाटलं. म्या झटकन हात मागं घेतला. हेडमास्तरान्ला वाटलं खिळा टोचला. ते पुडं झुकले. बबऱ्या, त्यो ढब्बा तसाचै, सेम टू सेम. त्याच्या बाजुचे बेंचटॅटूबी तशेचैत. माझी नजर त्याच्यावर खिळली तं हेडमास्तरच शरमून गेले. पोरं बेंचावर शाया सांडून ठिवतेत म्हनून कंप्लेन करीत बसले. बबऱ्या, यक गोष्टै य्यार पन, त्या ढब्ब्यातनं मला मोगऱ्याचा वास काई आला न्हाई. बिलकुलच न्हाई.’
दोस्ताच्या डायलॉगवर म्या निस्ताच हास्लो. शाईच्या ढब्ब्यातून कंदी मोगऱ्याचा वास येत आस्तो काय? बरं, येतबी आस्ला तरी त्यो साऱ्यांनाच कसा येईल? ज्याचं त्याचं फिलिंग आस्तं ते. पन म्या तसं तोडून बोल्लो न्हाई. खरं तं त्यो सांगत आस्तानाच माझ्याभवती मोगऱ्याच्या वासानं फेर धरला व्हता. बेंचाचा स्पर्श आठवून आंगातून यक लहर सर्रकन गेली व्हती. सांप्रतला आपल्या बेंचावर कोन बसत आसंल? त्याच्याबी आधी कोनकोन बसून गेलं आसंन? तिकडच्या बेंचावर कोन बसलं आसंन? आजूक यखांद्या बेंचाच्या मनात दुसऱ्या बेंचानं घर केलं आसंन काय? आपल्यावानीच ते यखांद्याच्या मनात रुतून बसलं आसंन काय? नव्या जनरेशनमंदी ढब्ब्याच्या आन् वासाच्या खुणा आल्लग आस्तीन काय? माझ्या डोळ्याम्होरं आख्खा क्लास हुभा ऱ्हायला.
‘बबऱ्यौ, लै मागं जावू नगो भाऊ. रिटर्न मार.’
आसं म्हनून दोस्त जोरजोऱ्यानं हासायला लागला. म्या लागलीच क्लासमंदून सोताला भायेर काडलं आन् म्हन्लं,
‘छ्या छ्या दोस्ता, म्या कुठं मागं गेलोहे?’
‘मंग काय इचार करीत व्हतास बेट्या?’
‘दोस्ता, बॉलपेनानं लैच वाट्टोळं केलं राव मान्साचं.’
‘फुकनीच्या, इथं बॉलपेनाचा काय संबंध आला?’
‘बॉलपेनं गळतेत कुठं दोस्ता? गळत नस्तीन तं मंग त्याचा ढब्बा कसा पडनार? ढब्बाच न्हाई तं त्यातनं मोगऱ्याचा वास कसा येनार? दोस्ता, कवाकवा वाटतं, शाईच्या पेनामंदी जो सच्चेपना आस्तो, त्यो बॉलपेनात नस्तो काय?’
दोस्त पुन्यांदा हास्ला. मायला आपन यवडं इमोशनल बोलून ऱ्हायलोय आन् ह्यो फुकनीचा हासून ऱ्हायलाय म्हनून मला जरासाक घुस्साबी आला; पन म्या त्यो दाबून ठिवला. नंतरच्याला त्याला म्हन्लं,
‘दोस्ता, गावाकडंच गेला व्हतास तं मंग हुभ्या गल्लीतल्या आडावर चक्कर हाण्ली न्हाईस काय?’
‘कशाला? आता आडाची भानगडच ऱ्हायली न्हाय बबऱ्या. नळ आलेत गावामंदी, हायेस कुठं तू?’
‘बरं मंग खाल्लाकडच्या टर्नवर तरी गेल्तास काय?’
‘तिथं कोन्ता टर्न ऱ्हायलाहे बबऱ्या आता? दुकानं झालेत पायलीचे पन्नास. निस्ती गर्दी आस्ती तिथं.’
‘मंग तिथल्ली सकाळची लगबग?’
‘ती कवाच हाटली. आता परसातच जिरती.’
‘किमान मंग नदीवर यखांदी चक्कर?’
‘बबऱ्या, नदीला कुठं पानी आस्तं पैल्यावानी?’
‘नदी तं आसंनच ना? पानी नस्लं म्हंजे ती नस्ती काय?’
‘बबऱ्या, कोन्तीबी गोष्ट वाहती आसंन तं ध्यानात ऱ्हाती, न्हाय तं मनातून वाहून जाती. सांप्रतला तिथं गाडीवाटै.’

---

दोस्ताच्या शेवटाच्या वाक्यावर म्या सायलेंट झालो. लैच कोरडाठाक टोन व्हता त्याचा. सांप्रतला, टर्या हाणीत बसावं म्हन्लं, यखांदा ज्योक मारायला जावं म्हन्लं तं कुठून तरी सिरियस लाईन येवून भिडती आपल्याला. कवा जहरी, कवा लहरी. मंग हाडबडल्यावानी व्हवून जातं. शब्दच फुटत न्हाईत फुकनीचे. अ‍ॅजयुज्वल मंग, आमची शाळातली स्टोरी सुविचारातल्या आक्षरावानी फेंट व्हत गेली आन् नदीतल्या गाडीवाटेखाली दबून गेली. दोस्तानं आन् म्या संगनमतानं तवाच्या साऱ्याच गोष्टी डस्टरनं पुसून टाकल्या.

(ता. क.- बगितलेल्याच्या कंपॅरिझनमंदी ऐकलेल्या लव्हस्टोऱ्यातले चेहरे स्पेशल आस्तेत. त्यांचं कास्टिंग आपलं स्वत:चं, आपल्या मनानं आकाराला आलेलं आस्तं. त्यांची चेहरेपट्टी, पेहराव, त्यांची लांबी-रुंदी आसं जे काय आस्तं ते आपलं आस्तं. आपन सोडून ते कुनालाच दिसत नस्तं, दाखवता येत नस्तं, त्याचं चित्र काडता येत नस्तं. दुसऱ्याच्या बहकाव्यानं आपन त्यात चेंज केला तं ते सोताशीच गद्दारी केल्यावानी आस्तं. त्यातल्या प्युअ‍ॅरिटीला मंग जबरा धोका उत्पन्न व्हतो. ऐकीव लव्हस्टोऱ्यातले क्यारेक्टर्स दुसऱ्या चेहऱ्यातून इमॅजिन करूनेत. प्रत्येक चेहऱ्याची सोताची यक स्पेशल आयडेंटीटी आस्ती. त्याला दुसरा चेहरा जोडायची घाई केली की, पैला भुर्रकन उडून जात आस्तो. नंतर बेलिमिट मनस्ताप व्हतो.)

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ता.क.तला समारोप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत खवचट वृत्ती बाळगून असताना, असं काही गोड वाचायला मिळेल अशी शंका वाचेपर्यंत येत नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संपादक मंडळाला वाचावंच लागतं, पण प्रतिक्रियाही द्यावीच लागते काय Smile ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

बऱ्याच दिवसांनी, असं काहीतरी ताजं, टवटवीत वाचायला मिळालं! जबरदस्त कॅप्चरिंग पॉवर आहे तुम्हाला.
ग्रामीण लव स्टोऱ्यांमधला लिटरली 'बेंचमार्क'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किस्से सांगण्यासाठीची पद्धत आणि भाषा आवडली.('देऊळ' चित्रपटातले चकाट्या पिटणारे चारपाच दोस्त नि त्यांचे इंग्रजी पेरलेले संवाद उगाच आठवले). भाषिक वळसे एकदम गोड आणि चपखल!

लिहीत राहावे ही विनंती.
--
एक तार्किक शंका:

त्यानं आताबी तिसरंच सुरू केलं. म्हन्ला,
‘बबऱ्या, परवाच्याला गावाकडं गेल्तो. शाळा खोल्याचं काम बगायला. तुझी लै आठवन झाली........ यका बेंचावर हात टेकून म्या आंदाजा घेत व्हतो. नंतरच्याला वळावं म्हनून हात काढला तं पंजाखाली त्यो ढब्बा दिसला. म्या डचकलोच. तुझ्या ढब्ब्याला हात लावल्याचं गिल्टबी वाटलं. म्या झटकन हात मागं घेतला. हेडमास्तरान्ला वाटलं खिळा टोचला. ते पुडं झुकले. बबऱ्या, त्यो ढब्बा तसाचै, सेम टू सेम.

बबऱ्याच्या दोस्ताला शाईचा ढब्बा असलेला बाक नि त्यासोबतची बबऱ्याची मोगरी प्रेमकथा हे आत्ता वर्तमानात कळतं आहे. मग तो दोस्त काही दिवसांपूर्वी शाळेत गेला असता त्याला त्या ढब्ब्याला हात लागल्याने अपराधी का वाटावं नि त्याने झटकन हात काढून का घ्यावा? तेव्हा तर त्याला त्या बाकाबाबतच्या बबऱ्याच्या भावना माहीत नव्हत्या.
--
अवांतर:
अशा प्रकारच्या भाषेत इंग्रजी शब्द येताना अनेकदा 'स'चा श होत असल्याचं ऐकलं आहे. सेकंद - शेकंद, स्टेटमेंट- श्टेटमेंट, स्टोरी-श्टोरी, इंटरेस्ट-इंटरेश्ट इ. तसं न लिहिल्याने ते शब्द थोडे उपरे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0