आकलन व आत्मभान ..

आपण जे विचार अगदी मनापासून मांडतो आहोत , ते ऐकणाऱ्याला वाचणाऱ्याला खरतर अंशतःच समजत आहेत ; आणि म्हणून स्वतःच्या उक्ती-कृतींचा विपर्यास होतो आहे याची जाणीव झाली की हताश अर्थशुन्यता वाटते . गैरसमजांमुळे विनाकारण मतभेद व मनस्ताप होतो , पण यातून उद्भवणाऱ्या भावनाविवशतेला लवकरात लवकर निकराने बाजूला सारून बौध्दिक पातळीवर या परिस्थितीचे तार्किक विश्लेषण केल्यास , असे लक्षात येते की स्वतःची गृहीतके , धारणा , पूर्वानुभव व पूर्वग्रह हे इतरांच्यापेक्षा निराळे असल्याकारणाने; इतरांना त्याच भाषेतील त्याच शब्दांचे निराळे व वेगळ्याच वजनाचे अर्थ प्रतीत होत असतात . यामध्ये सांस्कृतिक-सामाजिक फरक स्थलां- कालानुरूप भरच घालत असतात . आचार-विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मुद्दाम निर्माण केलेली व शतकानुशतके आवृत्त होत राहिलेली मानवी भाषाच जिथे गहन विचार मांडण्या-कळण्यासाठी तोकडी पडते ; तिथे देहबोली , कृतिशीलता , सांकेतिकता वगैरे इतर माध्यमांची काय कथा ! .
जे अगदी जीवाच्या गाभ्यापासून सांगायचे आहे ,त्यासाठी उद्धृत केलेल्या शब्दातील संकेतांचे आपल्याला अपेक्षित असणारे आकलन ऐकणाऱ्याला होत नाही आहे ; हे त्या व्यक्तीच्या अनाठायी प्रतिक्रियेद्वारे जाहीर होत असते. खूप वेळा तिला मूळ मुद्दा समजून घेऊन संवाद साधण्यापेक्षा प्रत्युत्तर करून वाद जिंकण्यातच रस असतो. त्यातून निर्माण होत जाणारा विसंवाद वैताग आणतो ,निराश करतो व शेवटी असहाय्यपणे तुम्ही विसंगतीपुढे हतबल होता . समंजस चर्चा करण्याच्या प्रवृत्तीबद्दल अनासक्ती निर्माण होते. या सर्व प्रक्रियेचे कारण शोधताना माणसाला जटील विचार मांडण्याची गरज का असते याचेच कारण शोधावे लागते . समाजमाध्यमांमध्ये लिहिण्या बोलण्याची साधीसरळ कारणे म्हणजे ; मिळणारा मोबदला, होणाऱ्या कौतुक-टीकेमधून खेचले जाणारे लक्ष, साधला जाणारा राजकीय हेतू , मुत्सद्दीपणा व विद्वत्ता प्रदर्शनाची संधी , समाजाचे प्रबोधन इ. असतात. पण या सर्वांच्या व्यतिरिक्त मानवी स्वभावाच्या अनुषंगाने जाणवणारे मूळ कारण आणखी थोडे खोलात शिरून शोधावे लागते. .
वाचक-श्रोत्यांच्या प्रतिक्रियांचा आढावा न घेताच जे जाणवलेले सत्य प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला जातो ; त्यामध्ये स्वतःच्या दीर्घकाळ झालेल्या जडणघडणीतून, पिंड-प्रवृत्तीमधून बनलेल्या स्वभावाचे व्यक्त होणे , मन मोकळे करणे अनस्युत असते. व्यक्त झाल्यानंतर त्याचे स्वतःला अपेक्षित असलेले आकलन श्रोत्यास योग्य रीतीने झाल्यास सुसंवाद साधतो . मग भले त्याच्या प्रतिक्रिया विरोधी-वेगळ्या मताच्या असोत, तरीही होणाऱ्या विचारमंथनातून मानसिक सोबत मिळाल्याचे समाधान होते व ‘स्वतःच्या पिंडाच्या इतर व्यक्तीसुद्धा सहवासात आहेत , आपण अगदीच एकाकी नाही ‘ या दिलाशाने भावनिक आधार वाटतो. आत्मभानातून येणारा आत्मविश्वास तयार होण्यासाठी ,खात्री वाटण्यासाठी सुरुवातीला तरी अशी मानसिक सोबत मिळणे गरजेचे असू शकते . या सर्व जाणीवेमधूनच विसंवादामुळे होणाऱ्या खंत-मनस्तापाची कारणे सहज लक्षात येतात.
. स्वानुभवाने पटलेले , ऐकलेले-वाचलेले आणि मग आपलेसे केलेले विचार जर का सर्वसामान्य जनमतापेक्षा निराळे असतील ,तर एकाकी पडण्याबाबत धास्ती-बेचैनी वाटू शकते , स्वतःच्या मानसिकतेबाबत शंका निर्माण होऊ शकते. सततच्या विसंवादामुळे येणारा निरुत्साह मूलतः सर्व प्रक्रियेच्या व्यर्थपणाबद्दल असतो. चर्चेसाठी मांडलेला मूळ मुद्दाच निरुपयोगी ठरताना दिसतो. स्वतःच्या मानसिकतेला सोबत मिळत नसल्याची एकाकी, हताश भावना येते. आणि जर का समोरील विसंवाद करणारी व्यक्ती खास जिव्हाळ्याची असेल , तर अशा वेळेस येणारी उदासीनता मन विदीर्ण करते. ती व्यक्ती बौध्दिक-सामाजिक पातळीवर अधिक प्रभावी, सामर्थ्यवान असेल तर आपल्या धारणांविषयी शंका वाटून हतबलता येते. संवादातील विसंगतीमुळे कसलेही विचारमंथन करणे अवघड होऊन बसते. आकलन होण्यासाठी कितीही चपखल शब्द वापरले ,तरीही जेव्हा अर्थपूर्ण संवादाची मानसिक गरज भागत नाही तेव्हा त्या विसंवादाची जबाबदारी स्वतःवरच आहे ;असे वाटून निराशा पदरी पडते . एकाकी वाटते. .
मानवी मनात स्वतःच्या दृष्टिकोनाचे महत्व व इतरांच्या दृष्टिकोनाबद्दल जाणीव असे परस्परविरोधी अथवा पूरक भान सतत जागृत असते . आकलनाच्या सीमित क्षमतेच्याही भानामुळे अस्तित्वाच्या ,सत्यपडताळणीचच्या विचारांबाबत मन अस्वस्थ व बेचैन राहते. घडणाऱ्या विसंवादामुळे इंद्रियगोचर जगताबाबत स्वतःला होणारे ज्ञान अपुरे असल्याची शंका खात्रीत बदलते. विज्ञान असे सांगते की प्राणीजगतातील अनेक प्रजातींकडे असलेल्या अमानवी शारीरक संवेदनांमुळे , अतींद्रियक्षमतेमुळे त्यांना जगाचे जे ज्ञान होत असते, ते मानवाच्या जगाबद्दलच्या ज्ञानापेक्षा खूप वेगळे असते. त्यांना या क्षमतांमुळे सृष्टीचे अनोखे दुर्लभ दर्शन घडते. पण मनुष्य व प्राणीमात्रांमध्ये असा संभाषणाचा विसंवाद होत नसल्याकारणाने विसंगतीची शक्यताच उद्भवत नाही. कोणाची अनुभूती सत्याच्या जास्त जवळ , याची स्पर्धा निर्माण होत नाही. .
या दृष्टीकोनाला समांतर अशी जाणीव बाळगल्यास मानवी विसंवादाबद्दल होणारी खंत टाळणे शक्य असते. प्रत्येक व्यक्तीच्या भावनिक-बौध्दिक क्षमता व दृष्टीकोन निरनिराळे असल्या कारणाने जगाबद्दल व त्यामुळे इतर व्यक्तींच्या विचारांबद्दल स्वतःच्या अपेक्षेपेक्षा वेगळे आकलन समोरच्याला होते. एकाकीपण दूर करण्यासाठी ; कितीही समप्रवृत्त माणसांचे मेळावे जमवले, योग्य शब्दांमध्ये विचार मांडण्याचे प्रयत्न केले, शारीरिक-भावनिक जिव्हाळ्याचे माणूस शोधले, आवडीच्या वैचारिक लेखकांचे वाचन केले इ इ , तरीही कधीच शंभर टक्के परिपूर्ण सुसंवाद घडत नाही. स्वतःच्या व इतरांच्या दृष्टीकोन-क्षमतेबाबतचे आत्मभान एकाकीपण दूर करण्यास मदत करते. संवेदनशील जाणिवांची तीव्रता आपले विचार आत्मविश्वासाने तर मांडतेच, पण इतराच्याही विचारांचे जास्तीतजास्त आकलन करण्यास प्रवृत्त करते. तसे आकलन न झाल्यास , मानसिक सोबत अथवा सुसंवाद नसल्याचे ओझे करून घेत नाही. स्वस्वभाव व स्वानुभवाचे व्यक्त होणे महत्वाचे असते; परंतु समोरच्याकडून आदर्श आकलनाची अवाजवी अपेक्षा ,भान ठेऊन टाळल्यास विसंवादाची जबाबदारी स्वतःवर पडत नाही व एकाकीपणाबाबत बेचैनी वाटत नाही. वाद जिंकण्याची अहमहमिका लागत नाही व हळूहळू सतत व्यक्त होत राहण्याची गरजसुद्धा मंदावते . .
योग्य आत्मभान व्यक्तीला अंतर्मुख बनवते आणि स्वतःची अभिव्यक्ती समृध्द करण्यास भाग पाडते. आपण स्वतः केवळ व्यक्ती नसून , विश्वाचा असा भाग आहोत की ज्याला स्वतःबद्दल सतत जागृत भान आहे , अशी जाणीव एकाकीपण दूर करण्याची धडपड व्यर्थ ठरवते

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अभिव्यक्ती आणि त्याचे दुस-याला होणारे आकलन या बाबींवर लक्ष केंद्रित करू –
1.मानवी भाषा ही एक सांकेतिक व्यवस्थाच आहे. ती त्या भाषक समूहाने कालौघात रूढ केलेली असते. तिची एक भाषिक व्यवस्था – व्याकरण – निर्माण होते.
2.शब्द हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. पण विशिष्ट समर्पक शब्द निवडणे एवढेच पुरेसे नसते. वाक्यरचना आणि उच्चारणातील ओघ, विराम, आवाजाचे चढउतार या सर्वांचा प्रभाव पडत असतो.
3.अभिव्यक्ती शब्दांइतकीच देहबोलीतूनही होत असते. निरनिराळ्या भाषक समूहांचे देहबोलीचे संकेत वेगळे असू शकतात. त्यातून गैरसमजही निर्माण होणे शक्य असते.
4.कोणत्याही दुस-या व्यक्तीच्या संपर्कात आले – समोरासमोर, लेखी वैयक्तिक संपर्क वा समाजमाध्यमांवर – तर “ व्यक्त न होणे अशक्य असते ”. तुम्ही जे बोलता किंवा बोलत नाही, कसं बोलता, कोणते हेल काढता या सर्वांची छाप समोरच्यावर पडतच असते. पण म्हणून श्रोता प्रभावित होतोच असे नाही.
5.भाषेमधे काहीच “ निरागस ” नसते. एखाद्या वाक्याचा संदर्भविरहित अंगभूत अर्थ जाणणे ही झाली भाषेची प्राथमिक ओळख. पण कोणताच संवाद संदर्भविरहित नसतो. भाषाव्यवस्था आपलीशी करून स्वतःची अभिव्यक्ती करताना जे गैरसमज होतात ते एकीकडून भाषेचे बारकावे लक्षात न घेतल्याने झालेले असू शकतात तसेच श्रोत्याची भाषिक समज तेवढी सजग नसल्यानेही होतात. त्याहीपेक्षा संदर्भांची दोघांची तपशीलाची पातळी तीच नसल्यानेही होतात. त्यात कोणाचा कुरघोडीचा स्वभावही असतो. आणि तो शब्दच्छल करण्यात “विजया”ची शक्यता पाहतो.
6.लेखी संज्ञापनात मुद्देसूदपणा महत्त्वाचा असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक एकाला अजिबात भाव द्यायचाच नाही,दुर्लक्षच करायचे अशा थाटात असणाय्रा माणसांना/बायांना आपल्या वाक्चातुर्याने प्रभावित करण्याची खटपट करणेच चुकीचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0