डॉ होमी भाभांच्या निमित्ताने ...

गेले महिनाभर माझ्या ऑफिसमध्ये विद्यार्थ्याची व त्यांच्या पालकांची ये-जा चालू होती. दरवर्षी 'होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धे'त इयत्ता ६वी व ९ची हजारो मुले भाग घेतात. या वर्षी ६वीकरता 'घनकचरा व्यवस्थापन' तर ९वीकरता 'पर्यावरणस्नेही पर्यटन' हे विषय होते. काही पालक-विद्यार्थी व्यवस्थित विषय समजावून घेऊन 'होमवर्क' करून प्रकल्पावर विचार करून मार्गदर्शनाकरता आले तर बरेच जण अजूनही चाचपडत होते. काहींचे प्रकल्प आम्ही पूर्ण बदलून नवी दृष्टी दिली तर काहींना फक्त थोडक्यात मदत केली, कारण त्यांना स्वतःला हा विषय स्पष्ट झाला होता. तर काहीजण केवळ औपचारिकता म्हणून आले होते, कारण या स्पर्धेत तज्ज्ञांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेऊन एका फॉर्मवर त्यांची सही घेणे बंधनकारक असते.

काही दिवसांपूर्वी रात्री शास्त्रीबाईंचा फोन आला. त्या मुंबईत होमी भाभा स्पर्धेचं नियोजन करतात. ‘तुम्ही इयत्ता ९वी च्या प्रकल्पाचे मूल्यमापन कराल का’, असे त्यांनी विचारले. मी अर्थातच होकार भरला. अशा विद्यार्थ्यांकडून आपल्यालाच काही शिकायला मिळेल ही मला खात्री होती (आणि झालेही तसेच). शिवाय सह्याद्री निसर्ग संस्थेबरोबर कासव संवर्धन प्रकल्पामध्ये वेळास येथे पर्यावरणस्नेही पर्यटन योजण्याचा व राबवण्याचा थोडाबहुत प्रात्यक्षिक अनुभव माझ्या पाठीशी होता म्हणून मी त्या विषयास व प्रकल्पांस न्याय देऊ शकेन असं मला वाटले. तरीही परीक्षेच्या आदल्या दिवशी मीच त्या विषयाचा काही तास अभ्यास केला.

ठरलेल्या रविवारी सकाळी परळच्या सोशल लीग शाळेत प्रवेश करताच मला एकदम विचित्र वाटले. शेकडो विद्यार्थी व त्यांचे पालक आपापल्या प्रकल्पाची उजळणी करत होते. मन झरकन माझ्या शालेय वर्षांत गेले व त्यावेळच्या टेन्शनची आठवण झाली. असो. आम्हा सर्व परीक्षकांना एका वर्गात एकत्र केले गेले, व होमी भाभा परीक्षेची, प्रकल्पाच्या विषयांची, मूल्यमापनाच्या नियमांची, विद्यार्थ्यांशी कसा संवाद साधावा इ. बाबींची माहिती देण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याकरता चार परीक्षकांचा गट केला गेला. माझ्या गटात माझा मित्र डॉ. निनाद राऊत असल्याने मला जरा हायसे वाटले.

आम्ही चार परीक्षक नियोजित वर्गात पोहोचलो व आमच्या विषयाची तसेच मूल्यमापनाची थोडक्यात चर्चा केली. हळूहळू एकेक विद्यार्थी येऊन प्रकल्प मांडू लागला. प्रत्येक विद्यार्थ्यास फक्त पाच मिनिटे होती. त्या वेळेत विषय व प्रकल्प हे दोन्ही अगदी थोडक्यात मांडायचे होते. अर्थातच ते शक्य नव्हते. काही मुले धीट असून खूप बोलणारी होती तर काही शामळू आणि अगदी माफक बोलणारी. त्यांना बोलते करण्यातच आमची दोन-तीन मिनिटे जायची. एकंदरीत विद्यार्थ्यांनी त्या एका दिवसात आम्हाला अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राची सफर घडवली. तारकरली, देवबाग, कोल्हापूर, जुहू व वर्सोवा समुद्रकिनारा, कास पठार, सगुणा बाग, गोदरेज मॅन्ग्रोव्ह, राज्याची काही प्रसिद्ध देवळे, गुजरातचे डांग, बांद्रा-कुर्ला कॉम्लेक्सचे व गोरेगावचे प्रदर्शन मैदान, एवढेच नाही तर अगदी के ई एम हॉस्पिटल अशा जवळपास ३५-४० स्थळांची आमची व्हर्च्युअल सफर झाली. प्रत्येक विद्यार्थ्याने निवडलेल्या स्थळाची पूर्ण माहिती घेऊन तेथे पर्यावरणस्नेही पर्यटन कसे आयोजित करण्यात येईल हे मांडणे अपेक्षित होते.

आमच्याकडे मुंबईच्या शाळा होत्या. आणि विद्यार्थ्यांवर त्यांच्या शाळांचे अक्षरशः छाप होते. कारण प्रत्येक शाळेने आपापल्या विद्यार्थ्यांची आपापल्या शिस्तीनुसार व पद्धतीनुसार तयारी करून घेतली होती. उदाहरणार्थ, बालमोहनच्या बहुतांश विद्यार्थ्यांची तयारी खूपच सखोल होती व त्यांचे विषयही मध्यमवर्गाशी एकदम जवळचे होते. तसेच ही मुले एकदम विनम्र होती. तर पोद्दार इंटरनॅशनलचे विद्यार्थी एकदम बेधडक होते व त्यांचा भर शहरी स्थळांवर होता. काही मुलांना प्रश्नाचे उत्तर येत नसल्यास आम्हाला माहीत नाही असे ते प्रांजळपणे सांगत तर काहीजण बेधडक मनात येईल ते सांगत. काहींनी अगदी वरवरची तयारी केली होती तर काहींनी विषयाच्या पलीकडेही डोकवायचा प्रयत्न केला होता. एकंदरीतच प्रत्येक प्रकल्पाबरोबर व्यक्तिविशेष उलगडत गेले.

होमी भाभा परीक्षेची एक मुख्य अपेक्षा अशी होती की विद्यार्थ्याने आपापल्या विषयातील एखादी समस्या शोधावी व ती सोडवण्याकरता सिद्धांत मांडावा. तसेच आपापल्या शक्तीनुसार प्रात्यक्षिक प्रकल्प करून काही प्रमाणात ती समस्या सोडवावी. प्रत्यक्षात हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकीच मुले या कसोटीस पार पडली. सर्व परीक्षकांना ठळकपणे जाणवला तो म्हणजे विद्यार्थ्यानी केलेला इंटरनेटचा सढळ वापर. एका क्लिकवर सर्व माहिती, मग ती चुकीची का असेना, उपलब्ध असल्याने, सर्वांनी हा मार्ग निवडला. बहुतेक मुलांनी अशी माहिती आपले ज्ञान म्हणून खपवायचा प्रयत्न केला. हळूहळू प्रात्यक्षिक करणे विद्यार्थी विसरतात की काय अशी भीती आम्ही परीक्षक आपापसांत व्यक्त करू लागलो. इंटरनेटवरची माहिती संकलित करून तिचा वापर प्रयोगात करण्याऐवजी ती माहिती म्हणजेच प्रकल्प म्हणून अनेकजणांनी खपवली. पण एक दोन प्रश्न विचारताच त्यांचे अज्ञान किंवा गैरसमज लगेच उघडे पडत होते.

अशात आम्हाला सगळ्यात जास्त भावली बालमोहनची एक विद्यार्थिनी जिने के ई एम हॉस्पिटलचा अतिशय सखोल अभ्यास केला होता. तेथील पेशंट्सची सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी, तेथील आरोग्यव्यवस्था, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, डॉक्टर्स व पेशंट्सकरता असणाऱ्या सोयी व त्यांच्या मर्यादा, तेथील कार्यरत सामाजिक संस्था असे अनेक विषय तिने स्वतः तपासले होते व ते अतिशय कळकळीने मांडले. तिची कळकळ बघून ‘तू पुढे डॉक्टर होणार का’ असे विचारताच तिने ठाम नकार दिला. आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. का असे विचारता ती स्पष्टपणे म्हणाली, की सरकार व रुग्णालय तेथील रेसिडेंट डॉक्टर्सची अजिबात काळजी घेत नाही व पेशंट दगावल्यास त्यांचे नातेवाईक डॉक्टर्सना मारहाण करतात. इतकी वर्षे अभ्यास व कष्ट करून का बरे हे सहन करावे, असा प्रतिप्रश्नच तिने आम्हाला केला व आम्हीही निरुत्तर झालो. आपल्या सामाजिक बेशिस्तीमुळे व भ्रष्टाचारामुळे जर हुशार विद्यार्थी वैद्यकीय व्यवसाय नाकारणार असतील तर कठीण आहे.

अंबानी इंटरनॅशनल शाळेतील एक विद्यार्थीही मस्त कलंदर होता. जेव्हा त्याने बोलण्यास सुरुवात केली तेव्हा तो प्रौढी मिरवतोय असे आम्हाला सुरुवातीस वाटले. पण हळूहळू त्याचा समस्या सोडवायचा दृष्टिकोन आमच्यावर ठसला. त्याने बांद्रा-कुला संकुलातील प्रदर्शन मैदानाचा अभ्यास केला होता. तेथील पाणी नियोजन, कचरा व्यवस्थापन, हिरवळ, ऊर्जा पुरवठा, ट्राफिक व्यवस्था, तसेच तेथे येणाऱ्या लोकांचा या सगळ्याविषयीचा दृष्टिकोन तपासले होते. तेथे प्रदर्शन मांडणाऱ्या संस्था तसेच मैदानाच्या व्यवस्थापकांचे पर्यावरणविषयक ज्ञान व दृष्टिकोन त्याने तपासले होते. पट्ठ्या एवढ्यावरच थांबला नाही. त्याने तेथील ओला-सुका कचरा वेगळा केला व सुका कचरा रिसायकलर्सना विकला. तसेच वीज तयार करण्याच्या एका नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घेऊन छोट्या प्रमाणात वीजही तयार केली. तेथील ट्राफिकची होणारी कोंडी लक्षात घेऊन त्यावरील उपायही त्याने आर टी ओ ला सुचवले. एकंदरीत तो अतिशय रेस्टलेस होता व प्रकल्प मांडताना काय बोलू काय नको असे त्याला झाले होते. त्याचा विषयाचा सखोल अभ्यास व प्रॅक्टिकल अप्रोच आम्हाला सगळ्यांनाच जाणवला.

एका मुलीने इंटरनेटवरून माहिती घेऊन विघटनशील जैव प्लास्टिक तयार केले व ते वापरूनही पहिले. ते तयार करण्यास व वापरण्यास किती खर्च येईल याविषयी ठोकताळे तिने मांडले. तर दुसऱ्या मुलीने वर्सोवा बीच वरील प्लास्टिकचा कचरा गोळा करण्याकरता हातगाडा कसा वापरता येईल दाखवले. पण हे निवडक अपवाद वगळता बहुतांश प्रकल्पांमध्ये खोली नव्हती. कदाचित आजची शिक्षण व्यवस्थाच तशी असावी का? एकाच वेळेस अनेक ऍक्टिविटीज व प्रत्येक वेळी यशस्वी होण्याचा दबाव. भारंभार होमवर्क आणि ट्युशन्स. प्रत्येक प्रकल्पाबरोबर जोडलेले शाळेचे नाव व शिक्षकांच्या आणि पालकांच्या अपेक्षा. इंटरनेटची मुबलक उपलब्धता, एकंदरीतच मुलांची आसपासच्या समाजाशी तुटलेली नाळ… अनेक कारणे आहेत नक्कीच.

पण तरीही या परीक्षेच्या निमित्ताने मुले आसपासचे निरीक्षण करतात हे नक्क्की झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून ६०,००० विद्यार्थी ही परीक्षा देतात हेही नसे थोडके. संपूर्ण भारतात फक्त महाराष्ट्र राज्य अशी परीक्षा घेते हे विशेष. तसेच या परीक्षेत आता इतर राज्येच नव्हे तर परदेशांतीलही थोडे विद्यार्थी सहभाग घेऊ लागले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा अनेक वर्षे सातत्याने आयोजित करण्यात जे शिक्षक पुढाकार घेतात त्यांचे आभार संपूर्ण राज्याने मानावेत नाही का?

- लक्ष्मिकांत (अमर) देशपांडे

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

चांगली माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या स्पर्धेचं स्वरूप बदलून अधिक चांगलं - उपयुक्त कल्पना, त्यांवर प्रयोग आणि त्यांची अंमलबजावणी यांवर भर देणं - केल्याचं दिसतंय. त्याबद्दल स्पर्धा आयोजित करणाऱ्यांचं अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.