न्यू यॉर्करबद्दल काय लिहिता आलं असतं.

'अनुभव'च्या दिवाळी अंकातला फक्त निळू दामलेंचा लेख वाचला. 'न्यू यॉर्कर' या नियतकालिकाबद्दल आहे म्हणून. तो वाचून ('न्यू यॉर्कर') निराशा झाली. 'सध्या काय वाचताय - दिवाळी अंक' असा धागा काढणार होते. पण माझ्या भावनांचा विस्तार फारच वाढल्यामुळे त्याचाच स्वतंत्र धागा बनवत आहे.

---

'न्यू यॉर्कर'चं स्वरूप साधारणपणे, न्यू यॉर्क शहरात काय सुरू आहे याबद्दल माहिती; मग छोटेखानी, पानभर लेख - यांचे विषय साधारणतः समाजकारण आणि राजकारण; त्यापुढे ३-५ अललित लेख; मग एक ललित; त्यापुढे सध्याचे सिनेमे, संगीत, चित्रप्रदर्शनं आणि पुस्तकं यांची ओळख; अध्येमध्ये कविता, कार्टूनं आणि डूडलं पेरलेली असं असतं.

मी गेली ३-४ वर्षं (पैसे मोजून) न्यू यॉर्कर वाचत आहे. त्यातलं ललित वाचायला सुरुवात गेल्या काही महिन्यांतच केली; कविता अजूनही वाचत नाही. कार्टूनं आणि डूडलं मात्र सगळ्यात आधी पाहते. त्यांतले बहुतांश विनोद मार्मिक वाटतात. डूडलांमधलेही.

दामल्यांचा लेख स्मरणरंजनी फेरफटका म्हणून लिहिल्यासारखा आहे. लेखात मला आजच्या न्यू यॉर्करबद्दल फार काही सापडलं नाही. मोजके अपवाद - जगातला कोणत्याही देशातली महत्त्वाची बातमी न्यू यॉर्करच्या मधल्या, महत्त्वाच्या पानांवर दिसू शकते.

न्यू यॉर्करनं गेल्या वर्षाच्या शेवटी किंवा २०१७च्या सुरुवातीला वाचकांचा सर्व्हे घेतला होता; त्यामुळे तपशिलाची चूकही लेखात आहेच. दामले म्हणतात - "अंक सुरू करताना रॉस यांनी ना वाचकांचा सर्व्हे केला ना कुणाशी सल्लामसलत केली." त्याच परिच्छेदात आणि थोडं पुढे, न्यू यॉर्कर नक्की कशामुळे चालतं आणि टिकून राहिलं आहे, याबद्दल दामलेंचा घोळ झाल्यासारखा वाटतो. न्यू यॉर्करचा आर्थिक डोलारा चालवायला न्यू यॉर्करचा दर्जा कामाला येतो का येत नाही, हे मला लेख वाचून समजलं नाही. (वर्गणीदार वा वाचक म्हणून मी त्या प्रश्नाची चिंताही करत नाही. चांगलं काही वाचायला मिळण्यासाठी मला चिंता न करण्याचा पर्याय उपलब्ध नाही, हे मात्र मान्य.)

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रंपुली निवडून आल्यावर न्यूयॉर्करनं 'नॉट माय प्रेसिडंट' छापाचे लेख भराभर प्रकाशित केले; कट्टर डाव्या समजल्या गेलेल्या एनबीसीला जे म्हणता येत नव्हतं ते न्यू यॉर्करनं एकदाच केलं असं नव्हे; ती राजकीय भूमिका म्हणून साप्ताहिक चालवलं जातं. निवडणुकांच्या आधी ट्रंपची टिंगल, त्याच्यावर टीका करण्यात 'टाईम' हे दुसरं साप्ताहिकही मागे नव्हतं; पण त्यांनी अशी स्वच्छ भूमिका घेतली नाही. (मी 'टाईम'ही पैसे भरून वाचते.) पूर्ण निवडणुकांच्या काळात ट्रंपच्या मतदारांच्या मतांचा अभ्यास करणारे लेख प्रकाशित केले, अजूनही करतात. यांतल्या एका लेखाचा काही भाग मागे मी ऐसीवर डकवला होता‌ (हा दुवा). गेल्या किंवा त्या आधीच्या महिन्यात अतुल गावंडेंचा लेख छापला होता; हातातोंडाची जेमतेम गाठ पडणाऱ्या अनेक रिपब्लिकन मतदारांना सक्तीचा आरोग्यविमा का नको आहे, याचा ऊहापोह करणारा. (Is Health Care a Right?)

याच्याच जोडीला गांजासारख्या ननैतिक गोष्टींवर ८-१० पानी आणि पुरेसे रोचक लेख येतात. गांजा घातलेली बिस्किटं आणि मिठाया विकणाऱ्या सासू-सुनांच्या व्यवसायावर हा मोठा लेख होता. (The Martha Stewart of Marijuana Edibles) ट्रंपचा मोठा मतदारवर्ग पापभीरू, धार्मिक ख्रिश्चन आहे; पण त्या गांजाच्या लेखात राजकारणी विधानं नाहीत. ट्रंप निवडून आल्यानंतर, २०१७पासून संगीत या सांस्कृतिक विषयावरही लेख लिहून येतात; हा सर्व्हेचा परिणाम असू शकतो; त्यात तशा अर्थाचा प्रश्न होता. आणि अशा लेखांमध्येही राजकीय विधानं सापडू शकतात. ट्रंपविरोधी मतं व्यक्त करणारे, 'पर्सनल हिस्टरी' प्रकारचे लेखही लिहून आले आहेत.

म्हणून 'न्यू यॉर्कर' हात धुवून ट्रंपच्या मागे लागला आहे, असं म्हणणाऱ्यांची त्वचा ट्रंपएवढीच सुकुमार आहे असं म्हणावं लागेल. राजकीय भूमिका घेऊन टीका करणं आणि हात धुवून मागे लागणं यांत फरक असतो. ट्रंपच्या 'हात धुवून मागे लागलेल्या' आणि चटपटीत, इमोसनल अत्याचार कार्यक्रम एनबीसीवर (एनबीसी ही ट्रंपच्या भाषेत 'फेक न्यूज' वाहिनी) सादर करणाऱ्या रेचल मेडोवर याच महिन्यात लेख छापला; त्यात तिच्यावर याच अर्थाची (इमोसनल अत्याचार करते) प्रच्छन्न टीका आहे. काही महिन्यांपूर्वी अशीच टीका, फॉक्सच्या एका कार्यक्रमाचा संचालक, टकर कार्लसनवरही अशीच प्रच्छन्न टीका न्यू यॉर्करनं छापली होती. फॉक्स ही वाहिनी ट्रंपसमर्थकांंध्ये अधिक प्रिय आणि ट्रंपलाही प्रिय.

न्यू यॉर्कर कव्हर
येत्या न्यू यॉर्करचं कव्हर; शीर्षक : October surprise. गेल्या वर्षीच्या निवडणुकांचा आणि हॅलोवीनचा संदर्भ समजल्याशिवाय यातला विनोद समजणार नाही. विनोद समजला नाही तर हे मागे लागणं वाटू शकतं.

हार्वी वाईनस्टाईन हा अगदीच ताजा विषय; पण त्यावरही न्यूयॉर्करनं मुद्दा लावून धरलेला आहे. अतिशय संयतपणे. (From Aggressive Overtures to Sexual Assault: Harvey Weinstein’s Accusers Tell Their Stories) आपल्या मतावर ठाम असणं, मुद्दा लावून धरणं आणि 'हात धुवून मागे लागणं' यांत फरक असतो. त्यासाठी नियमितपणे पूर्ण नियतकालिक वाचावं लागतं.

दामल्यांचा पूर्ण लेख वाचून, "हे नक्की कधी न्यू यॉर्कर वाचायचे" आणि आता न्यू यॉर्करचं स्वरूप आवडत नाही म्हणून स्मरणरंजनात रमले आहेत का, असा प्रश्न पडला. मला ट्रंपुली आवडत नाहीच, (हिलरी का ट्रंप असा पर्याय आला तेव्हाच अमेरिका हरली, असं माझं मत.) म्हणून मला न्यूयॉर्कर आवडतो, असंही नाही. न्यू यॉर्करमधला मला आवडलेला लेख म्हणजे इजिप्तमधल्या कचरा वेचणाऱ्यावर एक अललित लेख होता. त्यांच्या साच्यातून आलेला असला तरीही तो लेख मला आवडला. (Tales of the Trash) दुसरा आवडलेला लेख म्हणजे इजिप्तबद्दलचाच, अरबी भाषा शिकण्याबद्दल एकानं लिहिलेला. (Learning Arabic from Egypt’s Revolution) हा बहुदा साच्यातला वाटला नव्हता. चांगलं लेखन कसं असावं, किमान एखाद्या विषयाचे किती कोन-कंगोरे असू शकतात, याचे नमुने न्यू यॉर्करमध्ये सापडतात. एनबीसीवर चार दिवस 'रेक्स टिलरसन (अमेरिकेचा परराष्ट्रमंत्री) ट्रंपला 'फकिंग मोरॉन' म्हणाला', अशी बातमी चालवत होते - याला म्हणतात एखाद्याच्या हात धुवून मागे लागणं. गेल्या आठवड्यात टिलरसनवर लिहिलेल्या लेखात ही फक्त एक ओळ आहे आणि टिलरसन या व्यक्तीबद्दल, त्याच्या मूल्यांबद्दल चिकित्सा करणारा चांगला लेख न्यू यॉर्करनं छापला आहे.

एवढं असूनही मला अधूनमधून न्यू यॉर्कर रटाळ वाटतं. कारण त्यांचे माहितीपर लेख बहुतेकदा एका साच्यातून काढल्यासारखे लिहिलेले असतात. निवडणुकांच्या धामधुमीत, हिलरीवर टीका करणारा एकही लेख त्यांनी प्रकाशित केला नव्हता. डेमोक्रॅटांना (हिलरीचा पक्ष) आरसा दाखवला नव्हता. आता पश्चातबुद्धी म्हणून हिलरीचं नवं पुस्तक आल्यावर लेख छापला, बहुदा; लेख लिहिणारा इसम संपादक, डेव्हिड रेमनिक आहे! त्यात 'हिलरी जिंकली असती तर हे मुखपृष्ठ छापणार होतो' असं म्हणून पानभर चित्रही छापलं होतं. Hillary Clinton Looks Back in Anger

न्यू यॉर्करमध्ये आणखी काय हवं, किंवा मला काय बदलावंसं वाटतं याचा विचार केला तर आणखी टीका करता येईल. संपूर्ण वाचते ते सगळेच लेख मला आवडतात किंवा सगळंच ललित वाचवतं, असा दावा नाही. तो थोडा व्यक्तिगत आवडीनिवडींचा प्रकार असतो; 'घालून घालून सैल झालंय' किंवा माझ्या अपेक्षा सरासरीपेक्षा बऱ्याच वरच्या आहेत, हा आरोपही मान्यच.

पण अँडी बोरोवित्झचं नाव घेतल्याशिवाय न्यू यॉर्करची समीक्षा पूर्ण होत नाही; (नाव गूगलून पाहा. बारकी टवाळी असते.) ना त्यातल्या कार्टून्सबद्दल बोलल्याशिवाय. त्यांतलं एक कार्टून मी कधीही विसरणार नाही. (चटकन जालावर सापडलं नाही.) दोन माणसं एका कुत्र्याच्या पुतळ्यासमोर उभी राहून बोलत आहेत, "For all I know, he was a good dog."

न्यू यॉर्कर जेवढा मजकूर छापतं, त्यापेक्षा किती तरी जास्त मजकूर जालावर प्रकाशित करतं. याची दखल दामल्यांनी घेतलेली दिसत नाही.

न्यू यॉर्कर कार्टून
Caption - "Dad? can you anti-Trump free style rap me to sleep?"
हे 'ट्रंपच्या हात धुवून मागे लागलेलं' एक कार्टून!!!!

आणि दामले तक्रार करतात की न्यू यॉर्कर पूर्वीपेक्षा कमी ह्यूमरस किंवा मिश्किल आहे! कदाचित आजूबाजूचं जगच मिश्कील राहिलेलं नाही; पुतिन, अर्दोगान, मोदी, ब्रेक्झिट, ट्रंपच्या जगात काय सुरू आहे याची जाणीव असणारा संपादक फार मिश्किल असू शकत नाही; ही एक शक्यता आहेच. तरी, गेल्याच आठवड्यात जोनी मिचेलवर लिहिलेल्या पुस्तकावर लेख छापला आहे; आणि त्यातही (अगदी काळा नसला तरीही) कोरडा विनोद आहे; You turn me on, I am a radio; हे गाणं तिनं लिहिताना जो कोरडा विनोद केला होता, त्याचा उल्लेख आहे. (गाणं छानच आहे. तिचा संपूर्ण 'हिट्स' हा अल्बम यू ट्यूबवर आहे. ऐका, अशी नम्र विनंती.) तशा कोरड्या विनोद-छापाची अनेक वाक्यं अनेक लेखांमध्ये सापडतात.

मला शंका अशी येते की दामल्यांचं वय झाल्यावर 'जुनं न्यू यॉर्कर राहिलं नाही' अशी टीका केलेली आहे. जुन्या न्यू यॉर्करबद्दल मला अनेक गोष्टी माहीत नव्हत्या; या लेखाशिवाय मला त्या समजल्या नसत्या. ते संपूर्ण खरं असंही नाही. हाना आर्ण्ड्टवर काढलेला चित्रपट बघून न्यू यॉर्कर हे काय प्रकरण आहे, याबद्दल थोडी माहिती मिळतेच. 'आइशमन इन जेरुसलेम' या तिच्या पुस्तकासंदर्भात चित्रपट आहे, आणि ते संपूर्ण पुस्तक आधी लेखरूपात न्यू यॉर्करमध्येच प्रकाशित झालं होतं. तिच्या पुस्तकाबद्दल मागे लिहिलेला लेख इथे - आइशमन इन जेरुसलेम : सामान्यांचा दुष्टपणा - सापडेल.

लेखाच्या सुरुवातीलाच दामले म्हणतात, "न्यू यॉर्करमध्ये गवगवांकित (शब्द आवडला आहे!) नट-नट्या, खेळाडू, पुढारी, गुन्हेगार अशी पेज-थ्री माणसं सापडत नाहीत." यासंदर्भात, दामले न्यू यॉर्कर वाचत नाहीत, एवढंच मी म्हणेन. या अशा छापाच्या सगळ्या लोकांबद्दल न्यू यॉर्करमध्ये लिहून येतं. फक्त, दामले न्यू यॉर्करला जसे म०म०व० (मराठी मध्यमवर्गीय) देव्हाऱ्यात बसवू पाहत आहेत, तसं न्यू यॉर्कर कोणालाच देव्हाऱ्यात बसवत नाहीत किंवा कोणाचाही न्यायनिवाडा करायला बसले आहेत, अशी टिपिकल इव्हँजेलिकल ख्रिश्चन भूमिका - ही अमेरिकेत पैशाला पासरी - घेत नाहीत. उदाहरणार्थ, दोन आठवड्यांपूर्वीचा Birth of a White Supremacist, हा लेख पाहा.

लेखात 'काँडे नास्ट' - हे अंकात काँडे नेस्ट असं छापलं आहे; हे माणसाचं नाव होतं - या न्यू यॉर्करच्या पालक-कंपनीचा त्यांनी उल्लेख केला आहे. (काँडे नास्टमध्ये काम करणारे लोकही असाच उच्चार करतात. मी त्यांच्या हाफिसात जाऊन आल्ये; ही माझी स्वतःची जाहिरात समजा!) ते सगळ्या प्रकारची नियतकालिकं छापतात. (हवं तर, गूगलून पाहा.) त्यांच्या इतर स्वस्त आणि मस्त नियतकालिकांच्या विक्रीतून न्यू यॉर्कर चालवण्याचे पैसे मिळतात का नाही, ही माहिती माझ्यासाठी महत्त्वाची नाही. पण काँडे नास्टच्या इतर प्रकाशनांचा उल्लेख करायचा, ती प्रकाशनं 'विकाऊ' असल्याचं सुचवायचं आणि 'वायर्ड' टाळायचं, हा प्रकार माझ्या दृष्टीनं अक्षम्य. तंत्रजगतात 'वायर्ड'सारखं दुसरं प्रतिष्ठित आणि मानाचं नियतकालिक सापडणं कठीण!

'वायर्ड'च्या शीर्षकांसारखा दिसणारा टंक (font) गूगलनं त्यांच्या स्लाईड्ससाठी उपलब्ध करून दिलेला आहे, यावरून त्यांच्या प्रतिष्ठेची आणि लोकप्रियतेची कल्पना यायला हरकत नाही. असा न्यू यॉर्कर टंक उपलब्ध नाही.

---

आजच्या आंतरजालाच्या जगात, जालावर उपलब्ध असणाऱ्या नियतकालिकाबद्दल लिहिताना लेखांच्या लिंका देण्याची सोय असण्याबद्दल मी आंतरजाल, ऐसी आणि स्वतःचे आभार मानते.

field_vote: 
0
No votes yet

समिक्षा आवडली. या दैनिक/साप्ताहिक? बद्दल उत्सुकताही वाढली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साईनफेल्डमध्ये इलेनचं एक कार्टून छापतं न्यु यॉर्कर मॅगझिन ते आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

न्यू यॉर्कर बद्दल अजून जास्त लिहा कृपया .
( अवांतर : बाकी सायबांच्या दावणीला बांधल्यानंतर निळू दामलेंनी लिहिलेली पुस्तिका/लेख वगैरे वाचल्यानंतर त्यांनी लिहिलेलं काहीही वाचण्याची इच्छा गेली आहे . सध्या भाऊ तोरसेकरांचं तेच झालं आहे . दावण वेगळ्यांची आहे एवढाच फरक )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची सूचना मान्य आहे.

विचार करून चांगलं लिहायला थोडा वेळ लागेल. पण माझा विचार आहे की फक्त न्यूयॉर्करबद्दल लिहिण्यापेक्षा, अमेरिकेत मी काय-काय नियमितपणे पाहते/वाचते याबद्दल लिहावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

समीक्षा रोचक आहे. इंटरनेटीय जमान्यात जुन्या पिढीतल्या लोकांच्या लेखनाच्या मर्यादा आवर्जून जाणवतात. माध्यमाचीही मर्यादा आहेच म्हणा त्याला.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समर्पक आणि नेटके लिहिले आहे न्यूयॉर्करबद्दल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख लेख
आवडला फार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0