मटणवाला

चाळीच्या समोरचा रस्ता ओलांडला की मटणवाल्याचे दुकान दिसायचे. मटणवाल्याला आम्ही अमजद खानच म्हणायचो. कोंबडी आधी की अंडं आधी ह्या यक्षप्रश्नाप्रमाणे अमजद खान आधी की मटणवाला आधी या प्रश्नाचे उत्तर मला कधी मिळायचेच नाही. मी लहान असल्यापासून त्याला उभा किंवा चालताना किंवा इतर क्रिया करतांना बघीतलेलं नव्हतं. जेव्हा बघावं तेव्हा तो मटणाचे तुकडे करण्याच्या लाकडी ओंडक्यासमोर बसलेला असायचा. अंगात बोकडाच्या रक्ताने लाल झालेलं आणि कधी काळी विकत घेतलं तेव्हा सफेद असावं असा संशय येण्याजोगं बनियान आणि खाली लाल चौकडयाची लुंगी असा त्याचा अवतार असे. शाकाहारी असल्यामुळे मला अगोदरच रक्त, मांस बघीतलं तरी पोटात उमदळून यायचं. पण चाळीतून बाहेर पडायचं तर दोनच रस्ते होते. एक रस्ता मटणवाल्याच्या दुकानावरुन जायचा तर दुसरा रामूच्या घरावरुन.
त्यामुळे कोठुनही बाहेर जायचं ठरलं तर आगीतुन जायच की फुफाट्यातून एवढे दोनच पर्याय उपलब्ध होते. त्यातल्या त्यात मटणवाल्याच्या रस्त्यावरुन जायचा मार्ग सेफ होता. एकदा श्वास आत ओढून घ्यायचा, दोन मिनिटे नाकासमोर चालत रहायचं आणि मग रस्ता मोकळा होता. मात्र रामूच्या घरावरच्या रस्त्यावरुन निघालं आणी त्याने बघीतले की निदान तास अर्धा तासांची निश्चिंती असायची. त्यामुळे घरातून निघून कोठे पोहोचायचे असले की मी कमीत कमी १५ मिनिटे अगोदर निघत असे. यात रामूच्या हक्काची १५ मिनिटे धरावीच लागतं.

मटणवाल्याकडे एका वेळेस किती बोकड असत हे मला माहित नव्हते त्याचप्रमाणे त्याला नक्की किती पोरं होती हे देखील मला नक्की सांगता यायचं नाही. कदाचित ५-६ तर नक्कीच होती. एखादं जास्तच असेल मात्र कमी निश्चित नव्हतं. पोरी किती होत्या, होत्या की नव्हत्या ते काही शेवटपर्यंत कळालं नाही. मात्र बायको एकच होती हे नक्की.

एखाद्याची कार्टी उनाड असतील तर ते किस चक्की का आटा खातात असे विचारायची पद्धत होती. मात्र मटणवाल्याच्या पोरांना ते विचारायची सोय नव्हती. ते काय खातात हे उघडच दिसत होतं. त्यातल्या सर्वात मोठया पोराचं नाव सलीम. सलीम आणि एकूणच अमजदखानाची एकूणच पिळावळ डँबीस होती. दर ८-१५ दिवसांनी एकदा तरी ते एखाद्याला भर रस्त्यात बडवतांना दिसत. बरं अंगकाठी इतकी मजबुत की मार खाणारा माणूस आणि मटणवाल्याच्या कोयत्याखाली मरणारा बोकड / शेळी फळफळा मुतत असे. बरेच वर्ष एरीयावाल्यांना या पोरांचा धाक होता. काही जणांनी त्यांच्याशी अयशस्वी पंगा घेतला मात्र सहा पांडवांसमोर कोणाचे काही चालायचे नाही.

मात्र हीच कंपनी रविवार आला की दुकानावर उभे राहून जाणार्‍या येणार्‍याला 'आव सेठ आव' असे हसून पुकारत. एवढा ३६० अंशाचा बदल समजून घेण्याचे माझे वय नव्हते तेव्हा !

मग १९९२ साल आले. आम्ही ४-५ मित्र मंडळी कॉलेजवरुन घरी चालत येत होतो. बस स्टॉपवर उतरलो तर रस्त्याला सगळी सामसुम. कोणीतरी मस्जिद जाळली अशी बातमी कानावर पडली. आम्ही देखील उत्सुकतेने हे नक्की काय प्रकरण आहे हे बघायला गेलो. मशिदीच्या आजुबाजुला सगळ्या वखारी असल्यामुळे बरीच आग लागली असणार. मात्र हिरवी मस्जिद काळी पडण्याव्यतिरिक्त तिची बाहेरुन जास्त काही हानी झाल्यासारखे वाटले नाही. हिंदुंची टीचभर मंदिरे आणि भरभक्कम मशिद यातील फरक तेव्हा प्रकर्षाने जाणवला. मग कळाले की बाबरी मस्जिद पाडण्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदु मुस्लीम दंगल चालू झाली होती आणि हा त्याचाच एक भाग होता. नंतर दुसर्‍या दिवसापासून नवाकाळ मधे बाबरी मस्जिद पाडल्याची वर्णने यायला लागली. सोबत कृष्णधवल रंगातील मशिदीच्या घुमटावर चढलेले करसेवक असे चित्र ! मी चित्र बघीतले आणि बातम्या पण वाचल्या पण बाबरी मशीद पाडली गेली असेल यावर माझा विश्वास बसला नाही. मी प्रत्यक्ष बघीतलेली मशीद एवढे तांडव झेलुन उभी होती आणि ही तर फत्थरात बांधलेली. फार फार तर दोन चार दगड निखळले असतील. मात्र दोन दगड फोडणे काय आणि आख्खी मशीद पाडणे काय, ते प्रतिकात्मक असावे असे मला वाटले.

नंतर एरीयातले वातावरण तंग होत गेले. एके दिवशी आजुबाजुच्या वस्त्यांतले लोक धान्याच्या गोणी वाहताना दिसले. खाली रस्त्यावर जाऊन बघीतले तर 'बिसमिल्ला' चे दुकान लोकांनी फोडले होते. एक एक चीजवस्तू लांबवली होती. माझ्या माहितीतला 'बिसमिल्ल्लावाला' म्हणजे एकदम गरीब प्राणी. त्याच्याशी बोलताना त्याने कधीही कोणाकडे नजर उचलू बघीतलेले नव्हते की मापात पाप केलेले नव्हते. अशा माणसाचे दुकान लुटणार्‍यांचा मला फार राग आला पण काही करण्यासारखी परिस्थिती नव्हती. आपण या पापात सामिल झालो नाही हेच काय ते समाधान असा विचार करुन अस्वस्थ बसलो.

रोज नव्यानव्या बातम्या ! आज एकडे हल्ला झाला, तर उद्या तिकडे. जीव मुठीत धरुन बसलो होतो. एक चाळीतले सगळे धावत सुटले. विचारपुस केली तर कळाले की आज मटणवाल्याचा नंबर आहे. सगळी प्रजा हे लाईव्ह फुटेज बघायला धावत होती. कोणी त्याच्या सात पिढयांचा उद्धार करत होते. कोणी शटरवर दगड फेकत होते तर कोणी तलवारी नंग्या नाचवत होते. प्रचंड आरडाओरडा चालला होता. मला उरात धडधड व्हायला लागली. चित्रपटांमधे मर्डर बघणे वेगळे आणि हे वेगळे. तिथून पळून जावेसे वाटत होते पण सगळे रस्ते बंद होते. माघारीचा रस्ताच नव्हता. वेळ जाऊ लागला मात्र पब्लिकला आत घुसायला यश येत नव्हते. एवढे सगळे खुल्लेआम चालले होते पण पोलिस कोठे दिसत नव्हते. बकरे कापणारे आज स्वतःच कापले जाणार होते. अगदी टिपीकल सौदिंडीयन चित्रपटातील दृश्यच समोर होते.

अचाकन तिथे एक गाडी येऊन भस्कन थांबली. आमच्या एरीयाचे शिवसेनेचे नगरसेवक तिथे आले होते. त्यांनी हातात पिस्तुल घेऊनच गर्दीत प्रवेश केला. त्यांना बघताच बरेच जण मागे सरकले. त्यांनी सगळ्यांना मागे सरकवून घरातल्यांना बाहेर काढले आणि लगोलग मुसलमान मोहल्ल्यात नेऊन सोडले. समोर इतका प्रचंड जमाव, त्यातुन एका हिंदु ने एका मुसलमान कुटुंबाला बाहेर काढणे म्हणजे हिमतीची हद्द होती. अर्थात त्याचे फळ म्हणून नंतर तो नगरसेवक निवडणूकीत पडला. त्याचे ते कृत्य चुकीचे की बरोबर ? माहित नाही. पण लक्षात राहिली ती त्याची डेरींग !

नंतर मिलिट्री आली आणी कर्फ्यु लागल्यावर लोक बाहेर पडायचे बंद झाले. त्यानंतर मटणवाला कायमचा मुसलमान मोहल्ल्यात राहायला गेला. त्याची धश्चोट पोरं अगदी सरळ झाली. त्यानंतर ते कधीही मारामारी करताना दिसले नाही. एकाने तर सरळ जुना धंदा सोडून टेपरेकॉर्ड रिपेअर करण्याचे काम सुरु केले. जुन्या ओळखीमुळे मटणवाल्याची पोरं अजुनही माझ्याबरोबर नजरानजर झाल्यावर हसायची पण त्यांच्या हसण्यातला 'जगाची पर्वा न करण्याचा' तो भाव परत दिसलाच नाही. जमाना अच्च्छे अच्छों को बदल देता है हेच खरं ! नंतर कधीतरी मटणवाला नैसर्गीक मरणाने मेला.

मी देखील तो एरीया सोडून दुसरीकडे राहायला गेलोय. पण कधीतरी जुन्या घराच्या रस्त्याने जाताना आपसुक नजर त्याच्या दुकानाकडे जाते. आता ना तिथे मटणवाला आहे ना त्याचे दुकान ! पण नजर आपसुकच विचारते, 'अमजद खान कुठेय' ?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुमचा लेख खूपच आवडला. शिवसेना नेत्याचे डेरिंग कौतुकास्पद होते. मटणवाल्याची मुलं दादागिरी का करायची ते कळलं नाही. कदाचित मटणाच्या पैशाच्या वसुलीचा तो मार्ग असावा.
लिहित रहा आणि फिक्शनचं प्रमाण वाढवायला मदत करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे तुम्ही पूर्वी कुठे प्रकाशित केलं आहेत का ? वाचल्यासारखं वाटतंय . आवडले आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय. मिसळपाव वर. तिथे अक्षरमित्र या नावाने प्रकाशित केले आहे. मात्र इथे हे सभासद नाम अगोदरच दुसऱ्या कोणीतरी घेतलेले असल्यामुळे 'अक्षरमैत्री' या सदस्यनावाने इथे प्रकाशित केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लिहिलंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान लिहीलंय. एकदम सरळ. स्पष्ट. वास्तवदर्शी. खूप आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

छान लिहिले आहे.
एकदम सरळ, हलकं पण विचार करायला लावणारं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मतवाल्याने मटणवाल्याला मत+दाद देणे म्हणजे गंमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या अनुभवांचा कल्पनाविस्तार करायचा तर -

आता 'अमजद खान'च्या सुना बुरख्यात दिसतात, नातवंडं मदरशांमध्ये शिकतात. 'अमजद खान'च्या परिवाराचं तसं बरं चाललंय. जुन्या शेजाऱ्यापाजाऱ्यांची पोरं आता मोठी झालेली आहेत. समोर दिसलेल्या प्रत्येकाची पंधरा-वीस मिनीटं खाणाऱ्या रामूची पोरंही. ती आता जोरजोरात बडबडत असतात, "आमच्या गल्लीत होते तेव्हा आमच्या शाळांत शिकायची यांची पोरं. चार-चार लग्नं केली असणार यांनी. यांच्या बायकांवर बुरखा घालायची वेळ आम्ही आणली नव्हती. शेवटी हे लोक असलेच... वळचणीचं पाणी आढ्यालाच गेलं पाहा!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.