‪निर्गुणी भजने‬ (भाग २.७) सुनता है गुरु ग्यानी - समाप्त

-------------------------------
भाग १ | भाग २.१ | भाग २.२ | भाग २.३ | भाग २.४ | भाग २.५ | भाग २.६
-------------------------------
मागच्या भागात "ओहं सोहं बाजा बाजे" मधील ओहं सोहं चा अर्थ लावताना मी आघाताशिवाय होणारा म्हणून अनाहत असलेला “ओम” चा अपभ्रंश म्हणजे “ओहं” तर शब्दविरहीत, न जपतादेखील जपला जाणारा ध्वनीमंत्र म्हणजे “सोहं” असे लिहिले होते. त्यावर माझ्या एका मित्राने अपभ्रंशाची कल्पना मानली पण, 'ते सोहं सोहं असेच आहे आणि पहिल्या सोहंचा अपभ्रंश हॊउन ओहं म्हटले गेले आहे', असे मत नोंदवले.

पूर्ण भजनाचा अर्थ एकत्र लावायचा प्रयत्न केला तर मला हे भजन जीवाची आणि शिवाची भेट कशी घडवावी त्याचे वर्णन वाटते. म्हणून मग जीवाचा सोहं, शिवाचा ओहं आणि या दोघांचा कायम झीनी झीनी वाजत राहणारा बाजा म्हणजे "ओहं सोहं". धृवपदाबद्दल लिहिताना मी याचेच वर्णन, "कायम होत रहाणारा शांत आवाज" असे केले होते. हा जरी कायम चालू असला तरी त्याचे ऐक्य फक्त ज्ञानी साधकाला कळते. आणि मग त्या साधकाचे वर्णन करताना कबीर म्हणतात,

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी |
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी ||

असा अर्थ मला जास्त सुसंगत वाटतो. अर्थात पूर्ण भजन लक्षात घेऊन मग त्यातील पाठभेद असलेल्या शब्दांचा अर्थ लावण्याचा माझा हा प्रयत्न कदाचित सिद्ध साधकाच्या कथेच्या वळणाने चालला आहे हे मला मान्य आहे.

आता राहिला शेवटचा चरण, इथे कबीर म्हणतात,

कहत कबीर सुनो भई साधो, जाय अगम की बानी रे..
दिन भर रे जो नज़र भर देखे, अजर अमर वो निशानी हो जी … ll 6 ll

त्या अगम्य पुरुषाचे वर्णन करणारी ही वाणी आहे. जो सातत्याने नजर स्थिर करून कुंडलिनीचा प्रवास बघतो तो या विश्वाचे अजर (कधीही वृद्ध न होणारे) अमर (कधीही मृत न होणारे) असे स्वरूप पाहू शकतो. असे सांगून कबीर हे भजन संपवतात.

माझ्या मते, माझ्या अल्पमतीला आणि अनुभवशून्य अभ्यासाला साजेसा असा ह्या भजनाचा मी जो अर्थ लावला आहे. तो अनेकांना पटला नाही तरी एक लांबलेली पण तरीही सुसूत्र असलेली गोष्ट म्हणून तरी त्याची उपयुक्तता असावी.

या भजनातील कुंडलिनीच्या मूळ संकल्पनेविषयी माझ्या मनात फार थोडा विश्वास आहे. त्यामुळे तिच्या प्रवासाचे हे वर्णन आणि साधकाला मिळणारा अनिर्वचनीय आनंद याबद्दल मी साशंक आहे. किंबहुना, माझे शब्दप्रधान असणे आणि इंद्रियगम्य ज्ञानावर विश्वास ठेवणे माझ्या अज्ञानाचे खरे कारण असावे हे मला मान्य आहे. ह्या भजनात वर्णन केलेल्या गोष्टीबद्दल माझ्या मनात कितीही अविश्वास असला तरी, या भजनातील आणि याच्या अनुषंगाने वाचायला मिळालेल्या अनेक संकल्पना मला आश्चर्यचकित करून गेल्या.

सजीवांच्या सजीवपणाचे दृश्य लक्षण म्हणजे श्वासोछ्चवासाची क्रिया. ही थांबली की सजीव मृत मानला जातो. अगदी बेशुद्धावस्थेत देखील ही क्रिया चालू असते. गुदमरलेल्या, अर्धमेला झालेल्या व्यक्तीला प्रथम हवा असतो तो मोकळा श्वास. मग हा श्वास परमेश्वराचे रूप न वाटल्यास नवलच. म्हणून सजीव म्हणजे सप्राण आणि सजीवांचे लक्षण असलेल्या श्वासात जो महत्वाचा तो प्राणवायू. बरं या प्राणवायुचेही गुणधर्म विलक्षण. तो दिसत नाही पण वेदोपनिषद्काळी आणि कबीरांच्या वेळी मानवाला ज्ञात असणाऱ्या सर्व पोकळीत हा भरून राहिलेला असतो. झाकण बंद करून तो डब्यात कोंडला तरी तो डब्याबाहेर देखील असतो आणि डब्यात देखील असतो. तो सर्वसंचारी असतो. तो सर्व ध्वनींचे कारण असतो. ओम सारखा ध्वनी जो "अ + उ + म " या स्वरव्यंजनांचा बनलेला आहे त्याच्या मानवी देहातून निर्मिती साठी अ हा कंठ्य उ हा ओष्ठ्य आणि म हा अनुनासिक उच्चार पुरेसा असतो ज्यात आपले शरीर एखाद्या बासरीप्रमाणे असल्याचा अनुभव येऊ शकतो. मग जसा एखादा बासरीवादक मनाच्या लहरीखातर किंवा त्याच्या मनात गुंजणारे स्वरचित्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या बासरीत हवा फुंकून सुरांचे जसे एक विश्व उभे करतॊ तसेच कुठला तरी अगम्य बासरीवादक केवळ त्याच्या लहरीखातर प्राणवायूच्या रुपात चराचरात फिरून या विश्वाची निर्मिती करत असेल अशी कल्पना सुचणे मला अगदीच अशक्य वाटत नाही.

या लेखमालेच्या प्रतिसादात मला वाचकांकडून बरीच नवी माहिती मिळाली. भजनाचे पाठभेद मिळाले. शुचि या नव्या मैत्रिणीकडून श्री म वैद्य लिखित षट्चक्र दर्शन व भेदन ह्या पुस्तकाची लिंक मिळाली. राजेंद्र बाणाईत या ज्येष्ठ मित्राकडून स्वामी मुक्तानंद चित् शक्ति विलास हा ग्रंथ वाचावा अशी सूचना मिळाली. श्रीकांत पोळ या अत्यंत resourceful मित्राकडून Dancing Wu Li Masters या Gary Zukov लिखित पुस्तकाची प्रत मिळाली. पहिल्या भागाच्या शेवटी "ज्ञान वाटल्याने वाढतं आणि अज्ञान वाटल्याने कमी होतं" असं मी म्हणालो होतो आणि माझा तो तर्क खरा होता हे सिद्ध झाले. आता मिळालेले हे नवीन संदर्भ आधी वाचेन आणि मग इतर भजनांबद्दल अनियमितपणे लिहीन.

धन्यवाद

-------------------------------
भाग १ | भाग २.१ | भाग २.२ | भाग २.३ | भाग २.४ | भाग २.५ | भाग २.६
-------------------------------

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

राजेंद्र बाणाईत या ज्येष्ठ मित्राकडून स्वामी मुक्तानंद चित् शक्ति विलास हा ग्रंथ वाचावा अशी सूचना मिळाली

मोरे जी हा ग्रंथ कुठे मिळेल हो. मी १६ वर्षांपूर्वी घाटकोपर लायब्ररीत वाचला. नंतर अनेकदा शोध शोध शोधला. इंग्रजीत मिळतोय पण मराठी "चित्शक्तीविलास" मिळतच नाहीये.
अहो काय सुंदर पुस्तक आहे. ध्यानाचे वेळी मुक्तानंदांनी कितीतरी लोक पाहीले. काही अतिशय किळसवाणे, काही द्वेषी, काही निर्मळ काही स्वर्गीय.
स्वामी नित्यानंदांकडून त्यांना कशी दीक्षा प्राप्त झाली वगैरे सर्व आहे.
तुम्हाला जर का हा ग्रंथ मिळत असेल तर मला प्लीज कळवाल का. मी ही काहीतरी हातपाय मारेन.
या ग्रंथाइतका मला आवडलेल ग्रंथ विरळाच. आहेत ३-४ पुस्तकं. पण हे मुक्तानंदांचे पुस्तक काही वेगळेच.
या पुस्तकाच्या शेवटी "गुरुपादुकाष्ट्क" आहे. मी ते तेव्हा लिहून घेतलं होतं. आता खापरे आणि नेट वर सर्वत्र मिळतं. पण ते जे स्तोत्र आहे ते इतकं शांती देणारं वाटलेलं होतं.

ज्या संगतीनेच विराग जाला, विसरु कसा मी गुरु पादुकाला,
मनोदरीचा जडभास गेल, साक्षात परात्मा मज भेटविला,
विसरु कसा मी गुरु पादुकाला

मुलगी अगदी तान्ही होती त्या काळात ५ महीने घरी होते (नोकरी न करता), अध्यात्माची इतकी पुस्तके वाचली. की पोस्ट्पार्टम डिप्रेशन असतं का नसतं काही काही पत्ता लागला नाही. (अर्थात डिप्रेशन हा केमिकल इम्बॅलन्स असतो व तो कळतोच. वगैरे वगैरे) . मुलगी तान्ही झोपलेली असायची आणि तिचं आवरुन मी पुस्तकांवर तु-टू-न पडायचे. खूप समृद्ध करणारे दिवस होते. काय की मुलीचा पायगुण (अंधश्रद्धा आहे माहीते) पण तिची सेवा करण्याच्या निमित्ताने, किती तरी सुंदर पुस्तके वाचली.
तुम्ही घाटकोपर-विद्याविहार-विक्रोळी आदि भागात रहात असाल तर घाटकोपर ईस्ट ची लायब्र्री जरुर शोधा व व्हिझिट द्या.
_________

मग इतर भजनांबद्दल अनियमितपणे लिहीन

हाहाहा! लिहा हो नियमितपणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग जसा एखादा बासरीवादक मनाच्या लहरीखातर किंवा त्याच्या मनात गुंजणारे स्वरचित्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या बासरीत हवा फुंकून सुरांचे जसे एक विश्व उभे करतॊ तसेच कुठला तरी अगम्य बासरीवादक केवळ त्याच्या लहरीखातर प्राणवायूच्या रुपात चराचरात फिरून या विश्वाची निर्मिती करत असेल अशी कल्पना सुचणे मला अगदीच अशक्य वाटत नाही.

मोरे जी आपण हे पान वाचले आहे का? यात वीणेची तुलना शरीराशी केलेली आहे.
.
http://divine-instrument-veena.blogspot.com/
.

____
बासरीची उपमा पटते स्पेशली शरीरास ९ माहीत असलेली रंध्रे असतात (बासरीप्रमाणेच). आणि एक ब्रह्मरंध्र म्हणजे १० वे रंध्र गुप्त असते ज्यातून प्राण फुंकला जातो.
हे जपजी साहीब मधुन -

ਵਜਾਇਆ ਵਾਜਾ ਪਉਣ ਨਉ ਦੁਆਰੇ ਪਰਗਟੁ ਕੀਏ ਦਸਵਾ ਗੁਪਤੁ ਰਖਾਇਆ ॥
.
वजाइआ वाजा पउण नउ दुआरे परगटु कीए दसवा गुपतु रखाइआ ॥
.
He blew the breath of life into the musical instrument of the body, and revealed the nine doors; but He kept the Tenth Door hidden

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हवेतूनआघाताशिवाय स्वरसृष्टी निर्माण करणारे म्हणून बासरी हेच एक वाद्य सुच... नऊ द्वारांचा मुद्दा मला तुम्ही सांगितल्यावर जाणवला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमाला आवडली. संतवचनांचा अर्थ अनेकांना अनेक परींनी भावला आहे. तसेही हे ज्ञान गहनगूढ आहे आणि सहजसाध्य नाही. साधकांनी आपल्यापरीने प्रयत्न करीत राहावे. जेव्हढे गवसेल तितके आपले.
या शेवटच्या लेखातल्या 'अगम की बानी'बद्दल थोडे स्पष्टीकरण. अगम म्हणजे आगम. वेदशास्त्रादि ग्रंथांत आगम आणि निगम असे दोन प्रकर मानतात. निगम म्हणजे वेद. श्रुती, स्मृती वगैरे. आणि आगम म्हणजे पूजा-अर्चनेचे ज्ञान, ईश्वराप्रति पोचण्याचे, साधनामार्गाचे योगमार्गाचे ज्ञान. कुंडलिनी, हठयोग वगैरे. 'जायि अगम की बानी' म्हणजे हे ज्ञान नादरूपाने प्रगटले.
अगम हा शब्द संतवाङ्मयात अनेकदा येतो. उदा. 'गुरुभजनाचा महिमा न कळे अगमानिगमासी, धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची'
लेखमाला आवडली हे पुन्हा एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा दृष्टिकोन लक्षात आलाच नव्हता. मी अपभ्रंशाच्या कल्पनेत इतका गुरफटलो होतो की मला तो आगम निगम चा संदर्भ लागलाच नाही. मी त्याला अगम्य शी जोडून मोकळा झालो होतो.
सुधारणेसाठी आणि प्रतिसादासाठी धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0